Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भगूर पालिकेची नालेसफाई मोहीम
भगूर / वार्ताहर

पावसाळ्यात शहरातील गटारी तुंबू नयेत, यासाठी पालिका प्रशासनाने गटारी सफाई मोहीम हाती घेतली असून मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम पूर्णत्वास नेण्यात आली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे पावसाळ्यापूर्वी नाले सफाई मोहीम पहिल्यांदाच शहरात

 

राबविण्यात आली आहे.
शहरात ८० टक्के गटारी या भूमिगत करण्यात आल्या आहेत. परंतु त्या गटारी वर्षांनुवर्षे साफ करण्यात येत नव्हत्या. परिणामी पावसाळ्यात अनेकांना या गटारींचा त्रास सहन करावा लागत होता. गेल्या दोन वर्षांत पालिकेने रस्त्यांच्या कामांबरोबर गटारीही भूमिगत करण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण केले. शहरात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होत असल्याने त्यांचा परिणाम भुयारी गटारी तुंबण्यावर होत असतो. भरलेल्या चेंबर्समधूनच हे सांडपाणी रस्त्यावर वाहण्यास सुरूवात होते, यावर उपाय म्हणून मेनकर यांनी पावसाळ्यापूर्वीच पालिकेच्या धर्तीवर नाले सफाई कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी खरेदी केलेल्या मैला उपसा यंत्राव्दारे शहरातील गटारींमध्ये फ्रेशरने पाण्याचा मारा करण्यात येऊन मैला थेट मोठय़ा नाल्यात सोडण्यात आलेला आहे. मैला उपसा यंत्राव्दारे हा सर्व मैला उपसण्यात येऊन तो मैला खत डेपोवर स्थलांतरित करण्यात आला आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या टाक्या या पावसाचे पाणी जाऊन भरण्याचा प्रकार यावर्षी तरी पालिका अनुभवणार नसल्याचा दावा मेनकर यांनी केला आहे.
नालेसफाईसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येऊन मेनकर, आरोग्य निरीक्षक निलेश बावीस्कर यांनी प्रत्येक नाल्याची पाहणी करून तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे. शहरात दोन मोठे नाले असून त्यापैकी एक नाला हा भूमिगत करण्यात आलेला आहे. तर सुकापूर पेठ ते रोहिदास वाडा इथपर्यंत मोठय़ा नाल्याची सफाई करण्यात येऊन तो भूमिगत करण्याचे काम पालिकेने हाती घेतले असून या नाल्याचे काम महिनाभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करीत आहे. यावर्षी पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेला अधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा एक भाग म्हणून हाती घेतलेली ही मोहीम शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटू लागली आहे. शहरातील ८० टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात पावसाच्या पाण्याचे तलाव निर्माण होण्याचा प्रकार सध्या भगूरमध्ये तरी पाहावयासा मिळत नाही. त्याला आता जोड म्हणून पालिका प्रशासनाने घेतलेली नाले सफाई मोहीम पावसाळ्यात किती यशस्वी ठरणार हे पावसाळ्यातच कळेल. सध्या शहरात मोठय़ा प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असल्याने त्याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होताना जाणवत आहे. त्यासाठी पालिकेने शहरात औषधे फवारणी मोहीम घेण्याचा निर्णय घेतला असून आधुनिक फवारणी यंत्राची खरेदी करण्यात आली आहे. एकंदरीत नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी पालिकेला ज्या उपाययोजना कराव्या लागतील ते करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचेही मुख्याधिकारी डॉ. मेनकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.