Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आदिवासींच्या शोषणाच्या इतिहासाला सांस्कृतिक पाश्र्वभूमी
धुळे महाविद्यालयातील चर्चेत मान्यवरांचे मत
धुळे / वार्ताहर

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा निर्मित आणि अजित देशमुख दिग्दर्शित ‘स्वच्छ ऊर्जा.. गलिच्छ कारवाया’ या माहितीपटाचे प्रदर्शन येथील जयहिंद संस्थेच्या नानासाहेब झेड. बी. पाटील महाविद्यालयात नुकतेच करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित चर्चासत्रात आदिवासींचे शोषण,

 

त्याची कारणे याविषयी मान्यवरांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते रवी देवांग हे होते. यावेळी जयहिंद संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरूण साळुंखे, प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, वृक्षमित्र वसंत ठाकरे, रिपाइं नेते एम. जी. धिवरे, नर्मदा बचाव आंदोलनाचे प्रा. श्याम पाटील, अॅड. आय. जी. पाटील, जनता दलाचे अॅड. धैर्यशील पाटील, अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी, भाजपचे नेते लखन भतवाल, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे कॉ. किशोर ढमाले, कॉ. सुभाष काकुस्ते, कॉ. सुभाष परदेशी यांसह धुळे शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक निमंत्रक तथा अंनिसचे राज्य कार्यवाह अविनाश पाटील यांनी केले. चर्चेत देवांग, प्रा. दिलीप चव्हाण, मिलींद दुसाने आणि कॉ. करणसिंग कोकणी यांनी सहभाग घेतला.
चर्चेत मिलींद दुसाने यांनी आपल्या देशात सांस्कृतिक भेसळीची परंपराच असल्याचे मत व्यक्त केले. अनेक कला, सांस्कृतीच्या प्रांतात दिसते. सिनेमाही त्याला अपवाद नाही. मुळात सिनेमा ही महागडी मात्र सर्वाधिक परिणाम करणारी कला आहे. आंदोलनाची माहिती देतानाच परकीय आक्रमकांच्या कारस्थानांमुळे स्थानिक मूळ रहिवाशांचे होणारे शोषण आणि पिछेहाट याचा इतिहासच हा माहितीपट मांडतो. आदिवासींच्या शोषणाला सांस्कृतिक पाश्र्वभूमी आहे. भांडवलदारांच्या दावणीला बांधलेली माध्यमे ही शोषितांच्या दबलेल्या आवाजाला न्याय देऊन भांडवलदारांविरुद्ध उघड पवित्रा कसा काय घेऊ शकतील ? मात्र सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने हा माहितीपट तयार करून आणि त्याचे प्रदर्शन करून शोषितांचा आवाज नव्या माध्यमातून जनतेसमोर मांडला, ही कौतुकास्पद बाब आहे, असेही ते म्हणाले.
प्रा. दिलीप चव्हाण यांनी या माहितीपटातून झालेले चित्रण अनेक धक्कादायक बाबी पुढे आणत असल्याचे सांगितले. भांडवलदारांच्या हितांचे रक्षण करणारे राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी यांची युती, पवन ऊर्जेच्या नावाखाली पिढय़ा अन् पिढय़ा जमीन कसणाऱ्या आदिवासींच्या जमिनी हडपण्याचे कारस्थान, त्याविरोधात पुकारलेले आंदोलन दडपण्याचा आटापिटा. या देशाच्या मूळ रहिवाशी असणाऱ्या आदिवासींवरील अत्याचार ही लाजीरवाणी बाब आहे. शहरात राहणाऱ्या लोकांनी या माहितीपटातून बोध घेऊन आदिवासींच्या या लढय़ाला आपले पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कॉ. करणसिंग कोकणी यांनी आदिवासी हे मूळ रहिवासी जंगलाचे, येथील जमिनीचे मूळ मालक, पण त्यांच्यावर सातत्याने अत्याचार होत असल्याची बाब मांडली. ब्रिटीशांविरोधात मोठा लढा उभारूनही स्वातंत्र्याच्या इतिहासात आदिवासींच्या उल्लेख टाळला जातो. थोडक्यात सर्वच क्षेत्रात आदिवासींवर अन्याय होत असतो. मात्र सडून मरण्यापेक्षा लढून मरा असा निर्धार सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने केला आहे. हा निर्धार आम्हां आदिवासींना लढण्याचे बळ देतो. सदर माहितीपटातून हाच संदेश आम्हाला शहरी जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. दारिद्रय़ रेषखालील जीवन जगणाऱ्या आदिवासींनी लोकवर्गणीतून हा माहितीपट तयार केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
रवी देवांग यांनी पवन ऊर्जा कंपन्यांच्या कारस्थानातून आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाची कथा या माहितीपटातून पाहिल्यानंतर कुणाचेही ऱ्हदय पिळवटून निघेल, असे सांगितले. शेतकऱ्याला शेती परवडू नये अशी व्यवस्था इथलेच राज्यकर्ते करतात आणि तेच नंतर शेती परवडत नसेल तर विका असा सल्ला देतात, आणि मग अशा पवन ऊर्जा कंपन्यांच्या बहाण्याने या जमिनी भांडवलशहांच्या घशात घालतात. आदिवासींच्या या आंदोलनाच्या समस्येला धुळेकरांनी पाठींबा द्यावा, आणि वेळोवेळी त्यांना सक्रीय पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चेनतंर अविनाश पाटील यांनी आभार मानले.