Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

उन्हाळा.. धुळे..अन् पाण्याची उधळपट्टी !
संतोष मासोळे / धुळे

शहरातील काही वसाहतींचा अपवाद वगळता अन्य सर्वच भागात यंदा भर उन्हाळ्यातही पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने शहरवासिय आणि प्रामुख्याने गृहिणींनी समाधान व्यक्त केले आहे. पण काही भागात प्रमाणापेक्षा अधिक पाणी वितरित होत असल्याचे चित्र आहे. महापालिका प्रशासन व महापौर यांनी या उधळपट्टीकडे गांभिर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे. गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाणी टंचाईने ग्रासलेल्या धुळे शहराला यंदा निसर्गाने तारले आहे. निरनिराळ्या प्रकल्पातील आरक्षित पाणीसाठा, वाहती तापी नदी, शहराला पाणी पुरविणाऱ्या जलाशयांमधील सद्यस्थितीतील पाणीसाठा पाहिला तर पाऊस होईस्तोवर रोज पाणी पुरविले तरीही काही हरकत नाही अशी परिस्थिती आहे. अर्थात मान्सून दीर्घकाळ लांबायला नको.
सध्या शहरातील बहुतेक वसाहतींमध्ये एरवीच्या तुलनेत पाणी पुरवठा सुरळीत आहे.

धुळे कारागृह व्यवस्थापनाचे आवाहन
धुळे / वार्ताहर

धुळे येथील कारागृहात ज्या उद्योजकांना आपले उद्योग सुरू करायचे आहेत, त्यांना कारागृहाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाणार आहे. प्रकल्पात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपले प्रस्ताव त्वरीत पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कारागृह अधीक्षक वाय. जी. बावीस्कर, कारखाना तुरूंग अधिकारी हेमंत पवार यांच्याकडे ०२५६२-२३५०४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

गटसचिवांच्या संपामुळे शेतकऱ्यांची गैरसोय
शहादा / वार्ताहर

गटसचिवांच्या संपामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असून याप्रकरणी प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात तालुक्यातील सोनवदच्या शेतकऱ्यांनी दिला आहे. गटसचिवांच्या मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने गटसचिवांनी खरिप हंगाम सुरू होण्यापूर्वीच बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गटसचिवांच्या माध्यमातून खरिप हंगामाच्या काळात होणारा कर्जपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गटसचिवांच्या मागण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीपासाठी लागणारा कर्जपुरवठा तात्काळ होण्यासाठी सरकारने संपाबाबत तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित आहे. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशारा सोनवदच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

येवला नगराध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
येवला / वार्ताहर

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक ९ जून रोजी होणार असून निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना जाहीर झाली असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूल यांनी दिली.
नगराध्यक्ष रामदास दराडे यांचा अडीच वर्षांचा सत्ताकाळ १७ जून रोजी संपत आहे. आगामी नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे. ९ जून रोजी सकाळी १० ते १२ दरम्यान पालिका सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. छाननी व माघारीनंतर नगरसेवक हात उंचावून नगराध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेचा कौल देतील. लगोलग उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडेल. पालिकेतील २३ पैकी १६ नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या झेंडय़ाखाली शहराबाहेर मुक्काम हलविल्याने राष्ट्रवादीचा झेंडा पालिकेवर फडकण्याची शक्यता अधिक आहे. नगराध्यक्षपदी जयाबाई जाधव यांची निवड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने प्रारंभी चार अपक्ष नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठवले होते. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ओबीसींकडे नगराध्यक्षपद राहणार असल्यामुळे उपनगराध्यक्षपदी कोण, याविषयी चर्चा रंगली आहे. येवला पंचायत समितीवर संभाजीराजे पवार हे बहुजन समाजाचे सभापती तर मागासवर्गीयांचे प्रतिनिधी म्हणून मच्छिंद्र मोरे यांना उपसभापतीपदाचा मान मिळाला होता. बाजार समितीवर अंबादास बनकर हे सभापती तर मागासवर्गीयांचे प्रतिनिधी म्हणून उपसभापतीपदी देवीदास निकम यांची वर्णी लावून सरपंच परिषदेच्या म्हणण्यालाही मान दिला गेल्याचा इतिहास आहे. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला साथ देणारे अपक्ष नगरसेवक संतोष परदेशी यांना अविरोधपणे उपनगराध्यक्ष पद मिळाले होते. राष्ट्रवादी गोटात प्रारंभी गेलेल्या रिजवान शेख, वसीम शेख, शफीक शेख व कविता जावळे यांना कोणते आश्वासन दिले गेले हे पाहणेही महत्वाचे आहे. समता परिषदेचा सत्तेत सहभाग म्हणून राजेश भांडणे यांना संधी मिळते काय, मराठा समाजाला प्रतिनिधित्व देणार काय, या प्रश्नांची चर्चा आहे.

महापालिकेतर्फे हिवताप प्रतिरोध महिन्यानिमित्त जनप्रबोधन मोहीम
मालेगाव / वार्ताहर

महानगरपालिका व हिवताप निर्मुलन विभाग यांच्या वतीने जून हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळण्यात येत असून त्यानिमित्ताने जनजागरण मोहिमेबरोबरच विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. भरत वाघ यांनी दिली. पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचतात. या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती होत असल्याने ते हिवतापासाठी आमंत्रण ठरते. त्यामुळे अशी डबकी वाहती होण्यासाठी सर्वानी दक्ष राहणे आवश्यक आहे. डबकी साचल्याचे निदर्शनास येताच जनतेने महापालिका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना कळविण्याचे आवाहन डॉ. वाघ यांनी या निमित्ताने केले आहे. पाण्याचे साठे झाकून ठेवावेत, घराच्या छतावर तसेच परिसरातील टायर, नारळाच्या करवंटय़ा नष्ट कराव्यात म्हणून महापालिकेतर्फे मोहीम हाती घेण्यात येणार आहे. शहरात आतापर्यंत २५५१ मच्छरदाण्या किटकनाशकाने भारित करण्यात आल्या असून यापुढेही लोकांनी मच्छरदाण्या भारित करून घ्याव्यात म्हणून जनजागरण करण्यात येत आहे. यासंदर्भात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात येऊन हिवताप प्रतिरोध महिन्याच्या निमित्ताने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.