Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

एका अमेरिकन जायंटचा अस्त
अ मेरिकन जायंट म्हणून जगभरात ओळखल्या गेलेल्या जनरल मोटर्स या वाहन उद्योगातल्या महाकाय कंपनीने आता दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केल्याने या जायंटची अस्ताच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. याच कंपनीने डेट्रॉईटला जगाच्या नकाशावर आणले, हजारो कामगारांना मध्यमवर्गीय बनविले, सुमारे आठ महिन्यांपूर्वीच ज्या कंपनीने आपल्या स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण केली, तीच कंपनी आता जगाच्या औद्योगिक नकाशावरुन पुसली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगदी काही वर्षांपर्यंत जनरल मोटर्स हे नाव जरी घेतले तरी केवळ अमेरिकेनेच नव्हे तर जगात एक प्रकारचा दबदबा असे. परंतु एवढय़ा झपाटय़ाने ही कंपनी अस्तंगत पावेल असे कुणाला वाटलेही नसेल. अमेरिकेत आलेल्या मंदीच्या भक्ष्यस्थानी ही ऐतिहासिक कंपनी जाईल असा विचार कुणाच्या मनाला शिवलाही नसता.

गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या राजकीय नेत्यांचे काय?
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या पोलिसांनीच गुंडांशी मैत्रीचे व सर्वसामान्य जनतेबरोबर तुसडेपणाचे धोरण स्वीकारल्यावर काय होऊ शकते याचे प्रात्यक्षिक सध्या उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगावसह नाशिकमध्ये बघावयास मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत राजकीय पक्ष गुंतलेले असल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सध्या त्यांना वेळ नाही. निवडणूक जाहीर झाल्यावर पुन्हा एकदा त्यांच्याकडून जनकल्याणाच्या गप्पा सुरू होतील. मालेगावप्रमाणेच संवेदनशील शहर म्हणून धुळ्याची ओळख आहे. मागील वर्षी झालेल्या जातीय दंगलीमुळे तर विकासाच्या वाटेवरून हे शहर पार आडवाटेला फेकले गेले. दंगलीच्या जखमा भरून काढण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार असली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ‘हितसंबंध’ कर्तव्याआड येत असल्याची चर्चाही घातक आहे.

मनं जोडणारी भाषा
भाषेचा वापर समाजात फूट पाडण्यासाठी जसा होऊ शकतो; तसेच समाज जोडण्याचेही ते महत्त्वाचे साधन ठरू शकते. पश्चिम बंगालमधील मदरशांत अरबी शिकणाऱ्या हिंदू मुलांची संख्या जशी जास्त आहे तशीच काही मदरशांत आणि इस्लामी शैक्षणिक संस्थांमध्ये संस्कृतचा अभ्यासही सुरू आहे. दिल्लीतील बाटला हाऊसमधील मदरशाचे मौलाना शाहीन यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की भारतातील अनेक मदरशांमध्ये संस्कृत शिक्षणाचे प्रयत्न सुरू आहेत. मौलाना शाहीन यांनी स्वत: राष्ट्रीय संस्कृत संस्थानाचा संस्कृत अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हिंदूंचे धार्मिक ग्रंथ मुळातून समजून घेण्यासाठी आम्हाला संस्कृत शिकावेसे वाटते, हा आपला हेतूही त्यांनी स्वच्छपणे सांगितला. शाहीन यांच्या प्रयत्नांमुळे आता राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे शिक्षक विविध मदरशांत तीन महिन्यांचा संस्कृतचा प्राथमिक वर्ग घेत आहेत. मुस्लिम धर्मीयांचे तत्त्वपीठ मानल्या जाणाऱ्या दारूल उल देवबंद मदरशाचे माजी विद्यार्थी असलेले ए. आर. कासमी यांनी विविध धर्मीयांमधील परस्परविद्वेष दूर करण्याच्या हेतूने एक संस्था स्थापन केली आहे. त्यांनी स्वत: संस्कृतचे दोन वर्षे शिक्षण घेतले. भारतातील मदरशांमध्ये संस्कृत शिक्षणाचा समावेश करणाऱ्यांमध्ये त्यांचाही मोठा वाटा आहे. सुरुवातीला मदरशांमध्ये संस्कृत शिकविण्याच्या आपल्या प्रयत्नांना अनेक बुजूर्गानी स्वाभाविक विरोध केला मात्र नंतर त्यांचा विरोध मावळला, असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील मेरठ, गाझियाबाद जिल्ह्यातील मदरशांमध्येही संस्कृत शिक्षण दिले जाते. मध्य प्रदेश आणि बिहारमधील काही उर्दू शाळांनीही संस्कृतचा समावेश आपल्या अभ्यासक्रमात केला आहे. दक्षिणेतील चेन्नईतील ‘मुर्तुझाविया एज्युकेशनल अँड कल्चरल फाऊंडेशन’ ही गेली सहा दशके आघाडीवर असलेली शैक्षणिक संस्था. अठराव्या शतकातील संत हजरत सईद मुर्तझा पाशा कादरी यांच्या नावे स्थापन झालेल्या या संस्थेतही संस्कृत प्रशिक्षण वर्ग चालतो. यात अनेक तरुणी हिरिरीने संस्कृतचे शिक्षण घेत आहेत, हे शेजारील छायाचित्रात दिसत आहेच. या संस्थेतील सहा ते ३५ या वयोगटातील विद्यार्थी संस्कृत शिकत आहेत आणि त्यासाठी भारतीय विद्या भवन साह्य करीत आहे. यातील कित्येकांच्या घरी तर प्रथम संस्कृत शिकण्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. ‘इंडियन मुस्लिम्स डॉट इन’ या संकेतस्थळावर सईदा शमीम जहान हिनेही संस्कृत शिक्षणाचा आपला अनुभव नोंदवला आहे. त्यात मोहल्ल्यातील लोकांनी आपल्या संस्कृत शिक्षणाला कसा विरोध केला पण इंग्रजीचे शिक्षक असलेल्या आपल्या वडिलांनी आपली कशी पाठराखण केली, त्याचे वर्णन आहे. इथे आठवण होते ती वरळीचे पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांची. संस्कृत भाषेने आणि संस्कृत शिक्षणाच्या ध्यासाने त्यांना नुसते झपाटून टाकले आहे. त्यांचे सहजसुंदर व प्रवाही संस्कृत भाषण हे एखाद्या कसलेल्या गवयाच्या मैफलीचा आनंद देणारे असते. ‘आऊटलूक’मधील एका लेखात नम्रता जोशी यांनी उत्तर प्रदेशातील मदरशांमधील संस्कृत शिक्षणाचे चित्रण केले होते. ‘संस्कृत शिकल्याने वाणी स्वच्छ होते’, असे काही विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितले. या देशात भाषाशिक्षणाचे वारे असेच मुक्तपणे वाहत राहिले आणि मातृभाषेबरोबरच दुसऱ्या प्रांताची भाषाही शिकायची इच्छा रुजली तर कदाचित भाषिक द्वेषाची जळमटे झडतील आणि मनेही साफ होतील..
उमेश करंदीकर
umeshkaran9@gmail.com