Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

p

पुणे विभागात चमकली.. ‘महर्षीची लेक’!
बारावीत मुलींचे ‘जय हो’! निकाल ८१.८५ टक्के; आठ टक्क्यांची घट; नगर, सोलापूरने पुण्याला टाकले मागे

पुणे, ४ जून/खास प्रतिनिधी

मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या तपोभूमीतील गौरी अरविंद देशमुख हिने ६०० पैकी ५७३ गुण (९५.५० टक्के) मिळवून बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात पहिले स्थान पटकाविले. तिच्या यशाने महिलाश्रम कनिष्ठ महाविद्यालयाला प्रथमच हा मान मिळाला. विभागाचा एकूण निकाल ८१.८५ टक्के लागला असून, त्यात आठ टक्क्यांची घट आहे. ‘परंपरे’प्रमाणेच बहुतांश विद्याशाखांमध्ये मुलींनीच बाजी मारली! अहमदनगर व सोलापूरने पुण्याची मक्तेदारी मोडून प्रथम विभागात आघाडी घेतली आहे.

टेंडर सेलमध्ये कंत्राटदारांची पुन्हा दादागिरी
पुणे, ४ जून/प्रतिनिधी

पुणे महापालिका भवनाबरोबरच उपायुक्त कार्यालयातील ‘टेंडर सेल’वरही गुंडगिरीचेच साम्राज्य असल्याचे आज सिद्ध झाले. टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आज दुपारी गुंडगिरी व दादागिरी करून अनेक कंत्राटदारांना निविदा भरायला मज्जाव करण्यात आला. अखेर या प्रक्रियेलाच मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर आली. महापालिकेतील टेंडर सेलमध्ये चार महिन्यांपूर्वी झालेले गुंडगिरी व दहशतीचे प्रकार गाजले होते. पालकमंत्री अजित पवार यांनी आदेश देऊन अखेर ही सर्व प्रक्रियाच आयुक्तांना रद्द करायला लावली होती.

कुलगुरू डॉ. जाधव नियोजन मंडळावर?
पुणे, ४ जून/खास प्रतिनिधी

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांची केंद्रीय नियोजन मंडळावर नियुक्ती होण्याची शक्यता असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. या संदर्भात खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीच डॉ. जाधव यांच्याशी आज संपर्क साधला, अशी मुंबईत चर्चा होती. या संदर्भात एक-दोन दिवसांत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांचे रिझव्र्ह बँकेतील सेवेदरम्यान डॉ. मनमोहनसिंग यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध प्रस्थापित झाले आहेत.

अखंड वीजपुरवठय़ासाठी आता नवे मॉडेल
पुणे, ४ जून/ प्रतिनिधी

अखंड वीजपुरवठय़ाच्या ‘पुणे मॉडेल’मध्ये निर्माण झालेल्या विविध समस्या व कायमस्वरूपी वीजपुरवठय़ाची यंत्रणा उभी करण्याबाबत राज्य वीज नियामक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार ‘महावितरण’कडून पुणे, नवी मुंबई व ठाणे येथे अखंड वीजपुरवठा करण्यासाठी नवे मॉडेल तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केवळ एक वर्षांसाठी नव्हे, तर दीर्घकाळ अतिरिक्त वीजपुरवठा करण्याचे हे मॉडेल लवकरच आयोगापुढे सादर होणार आहे. टाटा पॉवर कंपनीकडून सध्या पुण्यासह नवी मुंबई व ठाणे या शहरांना अखंड वीजपुरवठय़ासाठी लागणारी वीज पुरविण्यात येत आहे.

‘हे यश कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचेच !’
पुणे, ४ जून/प्रतिनिधी

‘‘माझ्या आजीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्येच शिक्षण घेतले. आईनेही सामाजिक बांधिलकीतून याच संस्थेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आजी व आई प्रमाणेच मी या संस्थेचे ऋण मानते. म्हणूनच इतर नावाजलेली महाविद्यालये सोडून मी इथे प्रवेश घेतला आणि आज या संस्थेमुळेच मला पुणे विभागात प्रथम येण्याचे यश मिळाले आहे..’’
या शब्दात पुणे विभागात बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गौरी देशमुखने भावना व्यक्त केल्या. बारावीतील यशाबद्दल लोकसत्ताच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेने साध्य झालेली यशोगाथा कथन केली.

पर्यावरण दिनानिमित्त आज चित्ररथ
पुणे, ४ जून/प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिना निमित्त सामाजिक वनीकरण विभागातर्फे उद्या, शुक्रवारी शहरात जनजागृतीसाठी चित्ररथ काढण्यात येणार आहे. हा चित्ररथ टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथून सकाळी ११ वाजता निघेल व दत्तवाडीतील म्हात्रे पुलापर्यंत जाईल. सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक सुभाष बडवे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यासह अॅलर्ट व टु यूथ या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याच दिवशी न्यू इंग्लिश स्कूल येथे विभागीय आयुक्त दिलीप बंड, संचालक प्रकाश ठोसरे, सार्वजनिक वाहतूक विभागाचे उपायुक्त महेश पाटील, पुणे महापालिकेचे आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता संजीवकुमार गुप्ता हे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पर्यावरणा विषयी जनजागृतीपर मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर पुण्याच्या माजी महापौर वंदना चव्हाण जागतिक तापमान वाढ या विषयावर विशेष पॉवरपाँईंट प्रेझेंटेशन सादर करणार आहेत तसेच वटपौर्णिमे निमित्त वड, पिंपळ, नीम, बांबू इ. वृक्षांची रोपे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. न्यू इंग्लिश स्कूल येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत आणि ६ जून रोजी ओंकारेश्वर मंदिर येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत या रोपांची विक्री केली जाणार आहे.

आळंदीत उद्यापासून सिद्धयोग शिबिर
पुणे, ४ जून / प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व लोकनाथतीर्थ स्वामी महायोग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ जून रोजी आळंदी येथे सिद्धयोग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. संस्थानचे विश्वस्त प्रशांत सुरू यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, समाजात प्रेमभाव निर्माण व्हावा व वैश्विक शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी समाजाकडे अंतशुद्धी व इतरांकडे समभावाने पाहण्याची दृष्टी असणे आवश्यक आहे. ज्ञानेश्वर माउलींनी दिलेला विश्वमांगल्याचा संदेश सर्वदूर पोहोचावा या हेतूने हे दोनदिवसीय विनामूल्य निवासी शिबिर आयोजित केले आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या आयोजना व्यतिरिक्त संस्थान वारक ऱ्यांसाठी वर्षभर यांसारखे उपक्रम राबवत असते, असे त्यांनी आवर्जून सांगितले. या शिबिरात पंढरपूरचे चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे कीर्तन व नारायणकाका ढेकणे यांचे जाहीर प्रवचनही होणार आहे. वारकरी संप्रदायातील संत मंडळी व भाविकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.

पणदऱ्याची ऐश्वर्या कोकरे मागासवर्गीयांमध्ये प्रथम
पुणे, ४ जून / प्रतिनिधी

बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची ऐश्वर्या श्रीहरी कोकरे पुणे विभागात द्वितीय व मागासवर्गीय विभागात प्रथम आली. मूळ बारामती तालुक्यातील पणदरे येथील असलेल्या ऐश्वर्याच्या यशाबद्दल पणदऱ्यासह तालुक्याच्या विविध भागांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. ऐश्वर्याने आई वडील व कुटुंबीयांसमवेत आपल्या यशाचा आनंद साजरा केला. ‘लोकसत्ता’शी बोलताना ऐश्वर्या म्हणाली, ‘‘मी सुरुवातीलाच जास्त गोंधळात न पडता अभियांत्रिकी शाखेत उच्च शिक्षण घेण्याचे ध्येय निश्चित केले. त्यामुळे, गणित विषय (‘ए’ ग्रूप) घेतला व वेळेचे नियोजन करून ‘आजचा अभ्यास आजच’ अशी नियमितता राखली. तसेच, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडविल्या. म्हणूनच मला ९५ टक्क्य़ांपर्यंत मजल मारता आली.’’ आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व शिक्षकांना देत असल्याचे ऐश्वर्याने सांगितले. माजी आमदार विजयराव मोरे, ‘राष्ट्रवादी युवक’चे जिल्हाध्यक्ष योगेश जगताप, किशोर भापकर यांनी ऐश्वर्याचे घरी जाऊन अभिनंदन केले.

‘फग्र्युसनच्या विद्यार्थ्यांनी परंपरा राखली’
पुणे, ४ जून / प्रतिनिधी

‘माझ्या यशामध्ये पालक तसेच शिक्षकांचा वाटा असून, फग्र्युसनमधील आठवणी आयुष्यात विसरू शकणार नाही,’ या शब्दात मृण्मयी काटदरे हिने सत्कार स्वीकारताना आनंद व्यक्त केला.
फग्र्युसन महाविद्यालयात बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पुणे विभागात ९१.३३ टक्के गुण मिळवून बोर्डाच्या परीक्षेत कला शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मृण्मयी काटदरे हिचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच गौरी नूरकर आणि महाविद्यालयात उत्तम गुण मिळवून पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळविलेल्या कला आणि विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विज्ञान शाखेत मधुमित्रा मुतालिक हिने ९३.८३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला, तर माधुरी नागरे ९३.३३ टक्के गुण मिळवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांत बोर्डात दुसरी आली. फग्र्युसन महाविद्यालयात कला शाखेत पहिल्या दहा क्रमांकात सर्व मुलींनीच बाजी मारली, तर विज्ञान शाखेत पहिल्या दहात मुलींची संख्या जास्त होती. सत्काराच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. परदेशी म्हणाले की, फग्र्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यात उत्तम गुण मिळवून महाविद्यालयाची परंपरा कायम राखली असून, सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले यश मिळेल.

सातत्यामुळे यश - मृण्मयी काटदरे
पुणे, ४ जून / प्रतिनिधी

अभ्यासातील सातत्य आणि महाविद्यालयातील विविध उपक्रम यामुळे अपेक्षित नसतानाही अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले, अशा शब्दांमध्ये राज्यात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कला शाखेत पुणे विभागात सर्वप्रथम आलेल्या फग्र्युसन महाविद्यालयाच्या मृण्मयी काटदरे हिने आनंद व्यक्त केला. मला ९१.३३ टक्के गुण मिळणे अपेक्षित नव्हते; परंतु माझे पालक व शिक्षक यांच्यामुळेच ते शक्य झाले. त्यामुळे माझ्या यशाचे श्रेय त्यांना देते. माझे बाबा मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि आई प्राथमिक शिक्षिका आहे. यापुढे मी कायद्याचे शिक्षण घेणार असून, बंगलोर येथील नॅशनल स्कूल ऑफ लॉ येथे प्रवेश घेणार आहे. फग्र्युसन महाविद्यालयाची गौरी नूरकर बारावीच्या परीक्षेत कला शाखेतून बोर्डात दुसरी आली. आपल्या यशामध्ये पालक व शिक्षकांचा मोठा वाटा आहे. मला चांगले गुण मिळणे अपेक्षित होते, पण अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळण्याचा आनंद होत आहे. माझे पालक डॉक्टर असून, मी अर्थशास्त्रामध्ये पुढील शिक्षण घेणार आहे. मला मराठी, इंग्रजी, हिंदी आणि फ्रेंच या चारही भाषा उत्तम अवगत असून, जागतिक घडामोडींची आवड आहे. ८९.३३ टक्के गुण अनपेक्षित होते. त्यामुळे खूप आनंद होत आहे, अशा शब्दांत तिने आनंद व्यक्त केला.

जनवाडीत विद्युत रोहित्राला आग
पुणे, ४ जून / प्रतिनिधी

जनवाडी पोलीस चौकीमागे असलेल्या विजेच्या रोहित्राला मागील तीन दिवसांपासून स्फोट होऊन आग लागण्याचा प्रकार होत आहे. दोन ट्रान्सफार्मरचा भार एकाच ट्रान्सफार्मरवर टाकल्याने हा प्रकार होत असून, त्यामुळे या भागातील नागरिकांना धोका निर्माण झाला असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. आज याबाबत वीज मंडळाचे कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादी झाली.
ट्रान्सफार्मरला परवा व कालही आग लागली होती. त्यामुळे या भागात वीजही गेली होती. तोच प्रकार आजही झाला. स्फोट झाल्यानंतर आग लागली. ट्रान्सफार्मरच्या जवळच नागरी वस्ती आहे. त्याचप्रमाणे या भागात सुकलेला पालापाचोळाही मोठय़ा प्रमाणावर आहे. सुदैवाने आग पसरली नाही. मात्र, तीन दिवसांपासून आग लागत असतानाही वीज कंपनीचे कर्मचारी ट्रान्सफार्मरबाबत कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक महेंद्र पाटील यांनी केली. आज आग लागल्यानंतर काही कर्मचारी दुरुस्तीसाठी आले. मात्र, ही समस्या कायमची सोडविण्यासाठी दोन स्वतंत्र ट्रान्सफार्मरची मागणी नागरिकांनी केली. काही काळ वादावादी झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने ट्रान्सफार्मर बसविण्याचे आश्वासन दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

अडीच लाख विद्यार्थ्यांनी केला निकालासाठी इंटरनेटचा वापर
पुणे, ४ जून / प्रतिनिधी

बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी बारा वाजल्यापासून उपलब्ध होता. या सुविधेचा वापर बहुतेक विद्यार्थ्यांनी आज केला. अनेकजण या संकेतस्थळांवर भेट देत असल्याने काही अडचणी येत होत्या. मंडळातर्फे यासाठी तीन सव्र्हरची व्यवस्था करण्यात आली होती. बऱ्याच पालकांनी व विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेमध्ये निकाल पाहिला. शहरातील बहुतेक कॅफेमध्ये आज गर्दी होती. अनेकांनी एसएमएसद्वारे देखील निकाल पाहिला. बीएसएनएलच्या सेवेचा सुमारे दोन लाख पन्नास हजार जणांनी उपयोग करून घेतला. सकाळी अकरापासून निकाल उपलब्ध होता.

बँकांना फसवणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा
पुणे, ४ जून / प्रतिनिधी

बनावट नावे व कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरूद्ध डेक्कन ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले. या फिर्यादी देण्यात आल्या आहेत आयसीआयसीआय बँकेची चौदा लाख, वास्तू फायनॉन्सची चौदा लाख, विजया बँकेची बारा लाख ऐंशी हजार व स्टेट बँकेची सात लाख साठ हजार अशी एकूण ४८ लाख ४० हजार रुपयांना या टोळीने फसवणूक केल्याचे लष्कर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. सूत्रधार विपीन मुरलीधर पाटील (वय २६, रा. पारिजात सोसायटी, धनकवडी) याच्यासह चंद्रकांत विष्णू वाघमारे (वय ४६, महापालिका वसाहत, वाकडेवाडी), नंदकिशोर बापू थोरात, दत्तात्रय घुले, नरेश देवाडिगा अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाचजणांची नावे होती.