Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आत्मज्ञान आणि विज्ञान : गुरुदेव रानडे यांचे वस्तुनिष्ठ विचार
दि. ५ व ६ जूनला तत्त्वज्ञ संत प्रा. रा. द. तथा गुरुदेव रानडे यांच्या ५२ व्या पुण्यतिथिनिमित्त पुण्यात ‘सायन्स अॅण्ड स्पिरिटय़ुअॅलिटी’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ निबंध सादर करणार आहेत. या निमित्ताने गुरुदेव रानडे यांनी मांडलेले विचार व

 

नंतरची त्या दिशेने झालेली प्रगती सर्वासमोर येईल. त्या निमित्ताने हा छोटासा लेख उपयुक्त ठरेल.
धर्म म्हणजे निरनिराळ्या पारंपरिक चालीरिती व कर्मकांडात्मक गोष्टी असा अर्थ घ्यावयाचा नसून व्यापक अर्थाने आध्यात्मिक विचार असा घ्यावयाचा आहे. आणखी एक गैरसमज असाही आहे की विज्ञान आणि अध्यात्म यांचा काही संबंध नाही, ते जणू परस्परविरोधी आहेत. निदान मधल्या काळात तरी तसे मानले जात होते. अलीकडच्या काळात बरेच वैज्ञानिकही आपली विज्ञानातली कोडी सुटण्यासाठी आध्यात्मिक भाषा बोलू लागल्यामुळे असे गैरसमज दूर होण्याला मदत होऊ लागली आहे आणि दोन्ही क्षेत्रांमध्ये धुरीण एकमेकांच्या क्षेत्रातल्या संकल्पनांचा आश्रय घेऊ लागले आहेत. गुरुदेव रानडे या तत्त्वज्ञानी व साक्षात्कारी संतांनी, विज्ञानासंबंधात मांडलेले विचार आपण या लेखात पाहणार आहोत.
१९३७ साली नागपूर येथे भरलेल्या भारतीय तत्त्वज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बोलताना ते म्हणाले होते की विज्ञानातले शोध आणि धर्मातली सत्ये यात संपूर्णतया मेळ किंवा सुसंगती आहे. ‘विज्ञान हे ईश्वराने केलेल्या कार्याचाच विचार करते’ धर्म धर्म- खरे तर आध्यात्मिक दृष्टिकोनाने कर्ममार्गाला, कार्यप्रवणतेला पुष्टीच मिळते. ईश्वर- साक्षात्कारासाठी प्रयत्न करणे किंवा आध्यात्मिक जीवन जगणे म्हणजे आळशी, काहीच न करणारा होणे असे मुळीच नाही. आपले सर्व संत कोठल्या ना कोठल्या क्षेत्रात कौशल्यपूर्वक काम करीत होते. शंकराचार्य, विवेकानंद यांनीही फार मोठे कार्य केले हे आपणा सर्वाना माहीत आहे. गुरुदेव रानडे हे प्राध्यापक होऊन कुलगुरूपदावरही विराजमान झाले होते. उत्तमोत्तम ग्रंथ त्यांनी लिहिले, व्याख्याने दिली व अनेकांना अनुग्रह देऊन भक्तिप्रसारही त्यांनी केला.
गुरुदेव रानडे यांचे विज्ञानातील शोधासंबंधीचे विचार
वर उल्लेख केलेल्या भाषणात सुरुवातीलाच त्यांनी आधुनिक पदार्थविज्ञान (फिजिक्स), जैवविज्ञान (बायॉलॉजी), मज्जाविज्ञान (न्युरॉलॉजी) वगैरेंमधल्या अलीकडच्या काळातल्या संशोधकांवर विचार व्यक्त केले होते आणि त्यांचे त्यावरून झालेले मत की या सर्वावरून आत्मा हे एकच सत्य आहे असे स्पष्ट होते हे मांडले होते आणि पाश्चिमात्य विचार हा भारतातल्या थोर प्राचीन ऋषी आणि तत्त्वज्ञांनी काढलेल्या निष्कर्षांच्या बरोबर त्यांचा कसा मेळ बसतो हे दाखविले होते.
त्यांनी प्रथम जेम्स जीन्स यांनी मांडलेल्या आधुनिक पदार्थविज्ञानातल्या नव्या विकासाने तत्त्वज्ञानातल्या आध्यात्मिक आदर्शवादाचे स्पष्टीकरण व्हायला कशी मदत होते त्याबद्दल सांगितले. त्यांनी १९३४ सालच्या ब्रिटिश असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या अध्यक्षीय भाषणाकडे लक्ष वेधून अशी आशा व्यक्त केली होती की पुढील वर्षी कोलकात्यात होणाऱ्या काँग्रेसच्या भाषणाच्या वेळी ते आपल्या सिद्धांतांवर अधिक खुलासा करतील. १९३४ सालच्या भाषणात जेम्स जीन्स यांनी म्हटले आहे की, अवकाश आणि काल ही केवळ मनाची निर्मिती आहे. त्यांनी याबाबत सात पैलूंचा सिद्धांत मांडला व त्यात दोन स्वतंत्रपणे भ्रमण करणाऱ्या विद्युत- परमाणूंना सहा पातळ्यांची आणि काल या सातव्या पातळीची आवश्यकता असते. यानंतर त्यांनी दोन गोष्टी मांडल्या, एक म्हणजे कण आणि दुसरी म्हणजे तरंग, की ज्या दोन्हींनी आतापर्यंतचा भौतिक विचार निश्चित केलेला आहे. फोटॉन, प्रोटॉन, पॉझिट्रॉन, नेगाट्रॉन, ग्रॅव्हिट्रॉन हे सर्व पहिल्यात मोडतात. जेम्स जीन्स यांना जर पहिली गोष्ट मान्य असेल तर त्या दोन्ही मान्य असाव्यात असे म्हणता येईल. जरी त्यांना त्या दुसऱ्या- तरंग संकल्पनेने आपल्याला सत्याचा अंतिम खुलासा होत नाही, असे जरी वाटत असले तरी दुसरी तरंग ही संकल्पनाही मान्य आहे असे म्हणता येईल. ते म्हणतात की निसर्ग किंवा सृष्टी ही आपल्या ज्ञानाचे तरंग असते किंवा असेही म्हणता येईल आपल्या अर्धवट ज्ञानाचे तरंग किंवा लाटा असतात.ही सर्व मांडणी तत्त्वज्ञानात्मक आदर्शवादाचे सार किंवा आत्मा म्हणता येईल. आणि त्यांच्या मते यातूनच आधुनिक पदार्थविज्ञानाचे सर्व सिद्धांत नियमित होतात.
ते पुढचा प्रश्न उपस्थित करतात की असे गृहीत धरले की निसर्ग हा जाणणाऱ्यांच्या स्वत:पुरते ज्ञान अशा स्वरुपाचा असेल तर मग सर्वजण तो एकच सूर्य, चंद्र आणि ते सर्व तारे कसे जाणतात, पाहतात? जेम्स जीन्स त्या प्रश्नांचे उत्तर असे मांडतात की हे अशामुळे घडते की सर्व सृष्टीमधून एकच एक जीवनप्रवाह वाहत असतो व तो आपणा सर्वामधूनही झिरपत असतो. ते म्हणतात या दिशेने वा अशा प्रकारे विचार करण्यानेच प्लेटोपासून बर्कलेपर्यंतच्या सर्व तत्त्वज्ञांनी मांडलेल्या आध्यात्मिक आदर्शवादाशी मेळ घालता येतो. गुरुदेव रानडे यावर म्हणतात की हे सर्व ठीकच म्हणता येईल आणि आता या आदर्शवादाच्या सिद्धांताची जागा सर्व विश्वात एकच आत्मा आहे असे मांडणारा सिद्धांत पुढे येण्याचा टप्पा फार दूर नाही. यानंतर गुरुदेव रानडे यांनी जीवशास्त्रातल्या (बायॉलॉजी) त्यावेळपर्यंतच्या शोधांचा आढावा घेतला आहे. ते म्हणतात त्यातून असेच सिद्ध होत आहे की जीवमात्राच्या विकासाच्या मुळाशी एक आगळे तत्त्व आहे ज्याला ‘स्पिरिटॉइड’ किंवा ‘स्पिरिटॉन’ किंवा ‘बिंदुले’ असे म्हणता येईल. त्याच्यामार्फत सर्व जैविक प्रक्रिया (सामावून घेणे, प्रवाहीपणा, पुनरुत्पादन वगैरे नियंत्रित केल्या जात असल्या पाहिजेत. गुरुदेव रानडे यांनी त्यानंतर मज्जातंतुशास्त्रातील (न्यूरॉलॉजी) संशोधनाचा आढावा घेऊन भावनांचे केंद्र आणि बुद्धीचे त्यावरील नियंत्रण कितपत असते वगैरेंवर विचार करून असे मत मांडले आहे की भावना या ‘अंतरतर’ म्हणजे सत्याच्या अधिक जवळच्या असतात व भावना व बुद्धी यांच्यात म्हणजेच ज्ञान आणि भक्ती (श्रद्धा) यांचा चांगला ताळमेळ असणे अत्यंत आवश्यक आहे.
तत्त्वज्ञांचे विचार
त्यानंतर त्यांनी नैतिक आणि धार्मिक (आध्यात्मिक) जाणीव या मुद्दय़ांवरील तत्कालीन विद्वानांच्या मतांचा विचार केला आहे. त्यासंबंधी पाश्चात्त्यांची मते कशी सयुक्तिक नाहीत हे दाखवून, नैतिकता व आध्यात्मिकतेचा मूळ स्रोत एकच आहे आणि ते म्हणजे अंत:स्फूर्ती (इन्टय़ूशन) असे म्हटले आहे. तसेच बुद्धानेही आत्म्याचे अस्तित्व कसे मान्य केले आहे ही त्याच्या आध्यात्मिक अनुभवांचे व त्याच्या तात्त्विक वचनांचे विश्लेषण करून दाखविले आहे.
अनेक पाश्चिामात्य तत्त्वज्ञ, म. गांधी, गीता यांच्या तत्त्वज्ञानावर विचार करून त्यांनी असेही स्पष्टपणे मांडले आहे की निरनिराळ्या तत्त्ववेत्यांचे तत्त्वज्ञान व निरनिराळ्या धर्मामधील तत्त्वे, यांच्यातील मतभेद हे राजकीय वा नैतिक आधारावर कधीही मिटवता येणार नाहीत. मात्र सर्व मानवतेने एकत्र येऊन सर्व गोष्टींच्या मागे असलेले एकमेव आध्यात्मिक तत्त्व जर लक्षात घेतले तर निरनिराळे पंथ, राष्ट्रे आणि
जाती जमाती (रेसेस) यांच्यामद्ये ताळमेळ जुळवता येईल.
त्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात डॉ. राधाकृष्णन यांच्या अधिपत्याखाली स्थापन झालेल्या तत्त्वज्ञानशाखेप्रमाणे सर्व विद्यापीठांमध्ये शाखा स्थापन होऊन आत्म्याच्या तत्त्वज्ञानाच्या झेंडय़ाखाली सर्व मानवता एकत्र यायला हवी. आध्यात्मिक जीवनाच्या समान जाणिवेच्या मुद्दय़ावर सर्व मानव एकत्र हवेत, तेव्हाच आपण ज्या मानवी ऐक्यासाठी, उन्नतीसाठी धडपडत आहोत ते साध्य होईल. या दृष्टिकोनातून पाहिले तर जगाचे भवितव्य हे तत्त्वज्ञांच्या हातात आहे असे दिसून येईल, असे गुरुदेव रानडे यांनी म्हटले आहे.
अलीकडच्या काळातले विचार
प्रख्यात वैज्ञानिक आलबर्ट आइन्स्टाइन यांनी म्हटले आहे की, ‘धर्माशिवाय (आध्यात्मिक दृष्टिकोन किंवा आत्मज्ञानविषयक विचार यांच्याशिवाय) केवळ विज्ञान हे लंगडे असून आध्यात्मिक दृष्टिकोन किंवा आत्मज्ञानविषयक विचार लक्षात न घेणारे विज्ञान हे आंधळे असते. याचा अर्थच तो दोन्ही परस्परपूरकच असायला हवेत, एकमेकांच्या साह्य़ाने समाजाला पुढे नेणारे व्हायला हवेत. आपल्या वेदात, उपनिषदांत व संत वाङ्मयात मांडलेले वैज्ञानिक विचार आज लोक आजच्या भाषेत आवर्जून मांडत आहेत. पाश्चात्त्य जगातही त्यांचा अभ्यास केला जात आहे. सतत बदलणाऱ्या जगताच्या पाठीमागचा न पालटणारा भाग कोणता आहे यावर आजचे वैज्ञानिकही विशेष लक्ष देत आहेत. लिबनिझ, डेव्हिड वोम, आइन्स्टाइन, फ्रिज काप्रा, केन विल्बर, फ्रेड अॅलन वूल्फ, अमित गोस्वामी वगैरे कितीतरी वैज्ञानिकांनी ग्रंथ व लेख लिहून आपली मते मांडली आहेत. विज्ञान हे अशा तऱ्हेने आत्मज्ञानास पूरक असे कार्य/विचार करीत पुढे जाईल तरच अणुबॉम्बसारख्या विघातक अशा विज्ञानाच्या उपयोगातून जग दूर राहून मानवाला प्रगती करून आपले ध्येय गाठता येईल.
डॉ. हेमचंद्र कोपर्डेकर