Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

राज्य

निकालात ‘मंदी’.. मंडळ म्हणते हा तर बॅलन्सिंग अ‍ॅक्ट!
पुणे, ४ जून / खास प्रतिनिधी

बारावीच्या निकालामध्ये यंदा सहा टक्क्य़ांची घट झाली असून कलेपासून विज्ञानापर्यंत सर्वच शाखांचा निकाल घसरला आहे. गेल्या वर्षी झालेल्या ‘गुण फुगवटय़ा’नंतर आता टक्केवारी जमिनीवर आली असून मंडळ म्हणते ही ‘बॅलन्सिंग अ‍ॅक्ट’ आहे! दहावी-बारावीच्या निकालात झालेली भरमसाठ वाढ हा गेल्या वर्षी चर्चेचा मुद्दा ठरला होता. सीबीएसई-आयसीएसई या केंद्रीय मंडळाच्या निकालाचे आव्हान पेलण्यासाठी सढळ हाताने गुणदान करण्यात आले, अशी टीका करण्यात आली. यंदाचा निकाल जाहीर झाला आणि त्या टीकेमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाले.

नाशिक विभागात युगंधरा घोडगांवकर सर्वप्रथम
नाशिक, ४ जून / प्रतिनिधी

मालेगावच्या एम. एस. जी. महाविद्यालयाच्या युगंधरा घोडगांवकरने ९६ टक्के गुण प्राप्त करत नाशिक विभागामध्ये बारावीत सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला. नाशिकच्या हं. प्रा. ठा. महाविद्यालयाची श्रृती सोनवणे (९५.६७) द्वितीय तर ओझर टाऊनशिपच्या एच. ए. एल. कनिष्ठ महाविद्यालयाची सायली ढोले (९५.३३) हिने तिसरा क्रमांक मिळवला. जळगावच्या के. आर. कोतकर महाविद्यालयाची रेश्मा लाड (९२.३३) मागासवर्गीयात तर नंदुरबारच्या श्री शिवाजी महाविद्यालयाची प्रियंका सोनवणे (८३.८३) अपंगात प्रथम आली.

पुणे विभागात चमकली.. ‘महर्षीची लेक’!
पुणे, ४ जून/प्रतिनिधी

‘‘माझ्या आजीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्येच शिक्षण घेतले. आईनेही सामाजिक बांधिलकीतून याच संस्थेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आजी व आई प्रमाणेच मी या संस्थेचे ऋण मानते. म्हणूनच इतर नावाजलेली महाविद्यालये सोडून मी इथे प्रवेश घेतला आणि आज या संस्थेमुळेच मला पुणे विभागात प्रथम येण्याचे यश मिळाले आहे..’’
या शब्दात पुणे विभागात बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या गौरी देशमुखने भावना व्यक्त केल्या.

कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव नियोजन मंडळावर?
पुणे, ४ जून/खास प्रतिनिधी

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांची केंद्रीय नियोजन मंडळावर नियुक्ती होण्याची शक्यता असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. या संदर्भात खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीच डॉ. जाधव यांच्याशी आज संपर्क साधला, अशी मुंबईत चर्चा होती. या संदर्भात एक-दोन दिवसांत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

जळगाव : अतिक्रमण हटाव मोहीम थांबल्याने वाहतूक समस्या 'जैसे थे'
जळगाव, ४ जून / वार्ताहर

महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता पूर्णपणे थांबल्याने परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येऊन वाहतूक समस्या जैसे थे झाली आहे. दरम्यान, महापालिकेने फेरीवाला धोरणाला मंजुरी दिली असली तरी धोरणाची अंमलबजावणी होणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

महाड-बिरवाडीनंतर आता अलिबाग एमआयडीसी कार्यालयही पनवेलला नेण्याचा घाट
तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी ६० कर्मचाऱ्यांना मन:स्ताप, तर ५०० कोटींचा खेळखंडोबा
जयंत धुळप
महाड-बिरवाडी औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसीचे कोकण क्षेत्रीय कार्यालय व कार्यकारी अभियंता कार्यालय अशी दोन कार्यालये रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमधील औद्योगिक कारखानदार व जलउपभोक्ता यांची प्रचंड गैरसोय करून खांदा कॉलनी (पनवेल) येथे कोणतीही पूर्वकल्पना न देता स्थलांतरित केल्यावर, आता अलिबाग येथील एमआयडीसीचे विभागीय कार्यालयदेखील खांदा कॉलनी (पनवेल) येथे स्थलांतरित करण्याचा घाट घालण्यात आला आह़े

विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू
मतदार याद्या अद्ययावत करणार
रत्नागिरी, ४ जून/खास प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून, जिल्ह्यातील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम गेल्या १ जूनपासून हाती घेण्यात आला आहे. देशातील लोकसभा निवडणुका गेल्या महिन्यात झाल्या. त्यापाठोपाठ राज्याच्या विधानसभेची निवडणूक येत्या सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर कारवाई सुरू झाली आहे.

रायगडचा निकाल ७९.४३ टक्के; मुंबई विभागात रायगड प्रथम
अखिल बाफना गणितात ९५.८३ टक्के गुण मिळवून बोर्डाच्या पारितोषिकांचा मानकरी
अलिबाग, ४ जून/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत रायगड जिल्'ााने ७९.४३ टक्के उत्तीर्ण प्रमाण साध्य करून, मुंबई विभागात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आह़े रसायनी येथील एच़ ओ़ सी़ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा अखिल प्रकाश बाफना याने गणितात ९५.८३ टक्के गुण मिळविले असून, बोर्डाच्या कै़ यशवंत रामचंद्र तेंडुलकर आणि कै़ गोविंद बाळकृष्ण नातू या गणित विषयात बोर्डात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या दोन पारितोषिकांचा तो मानकरी ठरला आह़े

वाडय़ाजवळ मोटारसायकल अपघातात दोन ठार
वाडा, ४ जून/वार्ताहर

येथील परळीनाका येथे आज दुपारी झालेल्या मोटारसायकल अपघातामध्ये संदेश माळी (२७, रा. देवळी) व बाळू चौधरी (५५, रा. ठुणावे) हे दोनजण ठार झाले. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने हे दोघेही ठार झाले.गेल्या महिनाभरापासून तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असून या अपघातांमध्ये दहाहून अधिक जणांना प्राण गमवावा लागला आहे. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वाढलेली संख्या, बहुतेक वाहनचालकांकडे गाडी चालविण्याचा नसलेला परवाना, बेकायदेशीर गोष्टींकडे पोलीस व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष तसेच सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे रस्त्यांवरील खड्डय़ांकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष हेही कारण आहे. जानेवारी २००९ पासून ते आजपर्यंत अवघ्या पाच महिन्यात वाडा तालुक्यात मोटारसायकल व अन्य वाहनांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये २० हून अधिक जणांना प्राण गमवावा लागला आहे. आजच्या अपघातात ठार झालेल्या संदेश माळी याचा विवाह १५ दिवसांपूर्वीच झाला होता, तर बाळू चौधरी हे एक शेतीनिष्ट शेतकरी होते.

मालेगावजवळील अपघातात तीन ठार
मालेगाव, ४ जून / वार्ताहर

चाळीसगाव येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या रिक्षाला भरधाव मालट्रकने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार तर पाच जखमी झाले. आज दुपारी हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि जखमींमध्ये चार बालकांचाो समावेश आहे. नजमा बानो महंमद खलील (४८), आबिद अली मुजफ्फर अली (२९), फातमा बानो अजगर अली (३०), सर्व रा. रौनकाबाद अशी मयतांची नावे आहेत. हे तिघे तसेच त्यांच्या कुटुंबातील दोन मुली आणि दोन मुलगे असे सात सदस्य दुपारी चाळीसगाव येथील दग्र्याच्या दर्शनासाठी एका अ‍ॅपेरिक्षाने निघाले होते. त्यांची रिक्षा गिगाव फाटय़ाजवळ जाताच मालेगावकडे येणाऱ्या ट्रकने रिक्षाला धडक दिली. त्यात तिघे जागीच ठार झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी तालुका पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

ज्योतिष परिषदेच्या परीक्षेत जयश्री देशपांडेंचे यश
जळगाव, ४ जून / वार्ताहर

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत ज्योतिष विद्या प्रचारक मंडळाच्या विद्यार्थिनी जयश्री नितीन देशपांडे या राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाने त्यांना शास्त्री या पदवीने विभूषित करण्यात आले आहे. जळगाव येथील निवृत्त बँक अधिकारी विनायक झिरमिरे यांच्या जयश्री या कन्या असून सिद्धेश्वर नाटकर (पुणे) व उपाध्ये यांना त्यांनी आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

बाल कामगार ठेवणाऱ्या मालकास तीन महिने कैद
नाशिक, ४ जून / प्रतिनिधी

मालेगाव येथील प्रवीण ईश्वरभाई पटेल यांच्या प्लास्टिक कारखान्यात बालकामगार आढळून आल्याने त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या खटल्यात न्यायालयाने पटेल यांना तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तसेच संबंधित बाल कामगाराच्या पुनर्वसनासाठी बाल कामगार कल्याण निधीमध्ये २० हजार रुपये जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नाशिक विभागाचे कामगार उपायुक्त टी. जी. चोळके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. संबंधित ठिकाणी बाल कामगार आढळून आल्यानंतर मालेगाव न्यायालयात पटेल यांच्याविरोधात बाल कामगार प्रतिबंधक कायद्यानुसार खटला दाखल करण्यात आला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने पटेल यांना दोषी ठरवले.