Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

क्रीडा

ऑल रशियन फायनल
सफिना आणि कुझनेत्सोवा आमने-सामने
पॅरिस, ४ जून / वृत्तसंस्था
दिनारा सफिना आणि स्वेतलाना कुझनेत्सोवा या जीवाभावाच्या मैत्रिणींमध्ये शनिवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पध्रेच्या महिला गटाची ‘ऑल रशियन फायनल’ रंगणार आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील २३ वर्षीय दिनारा सफिनाने पहिल्यावहिल्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाच्या दिशेने आपली झंझावती घोडदौड सुरू राखली आहे. स्लोव्हाकियाच्या २०व्या मानांकित डॉमिनिका सिबुल्कोव्हाचा ६-३, ६-३ तिने असा सरळ सेटमध्ये पराभव करीत गुरुवारी अंतिम फेरी गाठली.

बढे चलो...
भारताचा पाकिस्तानवर ९ विकेट्सने विजय
लंडन, ४ जून/ पीटीआय
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना हा क्रिकेटविश्वासाठी महत्त्वाचा असतो. मग तो सराव सामना असला तरी त्याला एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्याचे वलय प्राप्त होते आणि असाच प्रत्यय आला तो या दोन्ही संघांमधील ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यात. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने भारतासमोर १५९ धावांचे तोडीस तोड असे आव्हान ठेवले होते. पण रोहित शर्मा आणि गौतम गंभीर या सलामीवीरांनी हे आव्हान लीलया पेलून भारताला नऊ विकेट्सने सोपा विजय मिळवून दिला.

सावधान, बाँड परततोय !
वेलिंग्टन, ४ जून/ वृत्तसंस्था

इंडियन क्रिकेट लीगला रामराम ठोकून आलेला वेगवान गोलंदाज शेन बाँड याला न्यूझीलंडच्या संघात पुन्हा स्थान देण्यात येईल, असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने आज जाहीर केले. इंडियन क्रिकेट लीगशी संबंध तोडलेल्या सर्व खेळाडूंचे आम्ही स्वागतच करू, असे न्यूझीलंड मंडळाने स्पष्ट केले आहे.

इंग्लंडच्या सलामीवीरांचा वेस्ट इंडिजला तडाखा
लंडन, ४ जून/ पीटीआय

कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर खेळविण्यात आलेल्या ट्वेन्टी-२० सराव सामन्यातही इंग्लंडने वेस्ट इंडिजवर वर्चस्व राखले. इंग्लंडच्या सलामीवीरांनी वेस्ट इंडिजला तडाखा देत सराव सामना नऊ विकेट्सने सहज खिशात टाकला. सलामीवीर रवी बोपारा आणि ल्यूक राईट यांच्या दमदार सलामीच्या जोरावर वेस्ट इंडिजचे १४५ धावांचे लक्ष्य इंग्लंडने पाच षटके राखून पूर्ण केले. आत्तापर्यंतच्या ११ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये इंग्लंडने वेगवेगळ्या सलामीच्या जोडय़ा वापरल्या. पण त्यांना यश मिळत नव्हते.

भारतीय मुष्टियोद्धय़ांचा सुवर्णपदक मिळविण्याचा निर्धार
नवी दिल्ली, ४ जून, वृत्तसंस्था

बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या मुष्टियोद्धा विजेंदरसिंग आणि दहा जणांच्या चमुपुढे झुहाई येथे होणाऱ्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला एक तरी सुवर्ण पदक मिळवून देण्याचे ध्येय आहे. २००७ मध्ये मंगोलियात झालेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत विजेंदरसिंग याने रौप्य पदक मिळविले होते.

आयसीएलची गळती क्रिकेटच्या पथ्यावर- क्लार्क
लंडन, ४ जून, वृत्तसंस्था
इंडियन क्रिकेट लीगला गळती लागली ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने चांगली बातमी आहे, असे इंग्लंड क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष जाईल्स क्लार्क यांनी म्हटले आहे.
भारतातील ७९ क्रिकेटपटूंनी इंडियन क्रिकेट लीगला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे. शेन बॉंडसारख्या खेळाडूनेही ‘आयसीएल’ ला रामराम ठोकला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंडियन क्रिकेट लीग सोडणाऱ्या खेळाडूंना ‘माफ’ करण्याचे जाहीर केले आहे.पाकिस्तानचा मोहंमद युसूफ, दक्षिण आफ्रिकेचा जस्टीन केंप यासारख्या स्टार खेळाडूंनीही इंडियन क्रिकेट लीग सोडण्याचा निर्णय घोषित केला आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने ही चांगली घटना आहे, असे क्लार्क यांनी सांगितले. इंडियन क्रिकेट लीगसारख्या स्पर्धेला माझा पहिल्यापासूनच विरोध होता. अशा स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मुळावर येणाऱ्या आहेत, असे माझे मत आहे, असेही क्लार्क यांनी सांगितले.

उद्घाटन समारंभात भारतीय लोककलांना प्राधान्य : कलमाडी
नवी दिल्ली, ४ जून/पीटीआय
हायटेक तंत्रज्ञानाचा उपयोग न करता भारतीय लोककलांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१० च्या उद्घाटन समारंभात प्राधान्य दिले जाईल, असे स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी यांनी येथे सांगितले. बीजिंग येथील ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात हायटेक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला होता. आम्ही मात्र त्याचा उपयोग न करता भारतीय पारंपरिक लोककलांना स्थान दिले जाईल, असे कलमाडी यांनी सांगितले. भारतास पाच हजार वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. ते आम्ही स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाद्वारे सर्वाना दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे साऱ्या जगास भारताच्या समृद्ध सांस्कृतिक कलेचे दर्शन घडेल, असे कलमाडी म्हणाले. स्पर्धेच्या क्रीडाग्रामचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण होईल. बीजिंगच्या ऑलिंपिक क्रीडानगरीपेक्षा ही क्रीडानगरी अव्वल दर्जाची असेल, अस ते म्हणाले.

राष्ट्रीय रिगाटा स्पर्धेत शेख-राजेशकुमार आघाडीवर
पुणे ४ जून/प्रतिनिधी

आर्मी रिगाटा संघाच्या अयाज शेख व राजेशकुमार यांनी राष्ट्रीय रिगाटा स्पर्धेत गोल्डन फ्लीट गटात आज दिवसअखेर आघाडी स्थान घेतले आहे. खडकवासला येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत नरेश यादव व एम. तारा यांनी दुसरे स्थान घेतले आहे तर उपमन्य दत्ता व गौतम दत्ता ही पिता-पुत्र जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिल्व्हर फ्लीट गटात सी के राय व नरेंद्रकुमार ही जोडी आघाडीवर आहे. टी.के.देवनाथ व ए.के साहनी ही जोडी दुसऱ्या क्रमांकावर आहे तर कॅडेट शिरोडकर व व्ही.एस. चौहान यांनी तिसरे स्थान घेतले आहे.