Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

..त्यात मद्य प्यायला!
मेलबर्न, ४ जून / पीटीआय

 

हरभजन सिंगने मर्कट संबोधलेला ऑस्ट्रेलियाचा वादग्रस्त अष्टपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू सायमंडस् आता मद्यपानामुळे पुन्हा संकटात सापडला आहे. त्यामुळे ‘सायमंडस् परत जा’ असे फर्मान काढण्याखेरीज क्रिकेट ऑस्ट्रेलियापुढे पर्यायच उरला नाही. आता आयसीसी विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सुरू होण्याआधीच सायमंडस् मायभूमीकडे निघाला आहे. मद्यपानामुळे ओव्हलवरील संघाचा सराव टाळल्याप्रकरणी सायमंडस्वर आज ही कारवाई करण्यात आली आहे. मैदानाबाहेरील वादग्रस्त वागणुकीच्या पाश्र्वभूमीवर आता सायमंडस्ची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सुदरलँड यांनी सांगितले की, गेल्या २४ ते ४८ तासांत ३३ वर्षीय सायमंडस् अनेक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड त्याला ऑस्ट्रेलियात परत जाणाऱ्या विमानाचे तिकीट काढण्यात व्यस्त आहे.
घडलेल्या चुकांबाबत चर्चा केली असता सायमंडस् त्याबाबत गंभीर नव्हता. परंतु सायमंडस्चा पूर्वइतिहास पाहता त्याला मायदेशी पाठविण्यासाठी या घटना पुरेशा होत्या, असे सुंदरलँड यांनी सांगितले.
गेल्याच महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सायमंडस्शी नवा करार केला. परंतु या घटनेमुळे आता बोर्डाला कराराचा पुनर्विचार करावा लागणार आहे, असे ते पुढे म्हणाले.
दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील विजेत्या डेक्कन चार्जर्सतर्फे खेळताना सायमंडस्ने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले. परंतु सायमंडस्च्या अनुपस्थितीमुळे आता ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला धक्का बसला आहे. शनिवारी रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाची वेस्ट इंडिजशी सलामीची लढत रंगणार आहे. परिस्थितीची जाणीव होताच ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापनाने तातडीची बैठक घेतली आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे चिंता प्रकट केली. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाकडे बदली खेळाडू देण्याची विनंती संघाने बोर्डाकडे केली.
गेल्या वर्षभरातील वादांच्या पाश्र्वभूमीवर गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन निवड समितीने अ‍ॅशेज स्पध्रेसाठी जाहीर केलेल्या संघात सायमंडस् स्थान देण्यात आले नाही. मासेमारी आणि हरभजन सिंगसोबतचे बहुचर्चित मर्कटायन नाटय़ हे वाद त्याच्या कारकीर्दीच्या मुळावर आधीच उठले होते.
सायमंडस्ने २६ कसोटी सामन्यांत ४०.६१ धावांच्या सरासरीने १४६२ धावा केल्या आहेत. नाबाद १६२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. याचप्रमाणे त्याने ३७च्या धावसरासरीने २४ विकेटस् घेतल्या आहेत. तसेच १९८ सामन्यांत सायमंडस्ने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना ३९ ही धावांची सरासरी तर गोलंदाजीतही ३७ ही धावसरासरी राखली आहे.