Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

कल्याणची सविता खरमाळे रात्र विद्यालयातून दुसरी
कल्याण/प्रतिनिधी :
रामबागमधील सिद्धार्थ नाईट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सविता खरमाळे हिने ८०.८३ टक्के गुण मिळवून ती रात्र विद्यालयात मुंबई विभागातून दुसरी आली आहे. सविता ही कला शाखेतील मराठी माध्यमाची विद्यार्थिनी आहे. ती आपल्या कुटुंबासह कोन गाव येथे राहते. ती विवाहित आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून सविताने यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेली सात वर्षे सविता प्रवेशासाठी धडपडत होती, परंतु तिला प्रवेश कोठेच मिळत नव्हता. सिद्धार्थ नाईट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर कुटुंबातील आठ माणसांचा सांभाळ करून, वेळ काढून अभ्यास करून तिने यश मिळवले आहे. तिला उज्ज्वल नावाचा सहा वर्षांंचा मुलगा आहे. तिचे पती खासगी कंपनीत नोकरीला आहेत.
संस्थेचे प्रमुख एस.पी. शर्मा म्हणाले की, गरजू, गरीब विद्यार्थी आमच्या संस्थेत प्रवेश घेतात आणि मिळालेल्या संधीचे सोने करतात. असेच यश सविताने मिळवले आहे.

विकासाची ‘हायटेक’ स्वप्ने दाखविणारा कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प
कल्याण/प्रतिनिधी :
विकासाची अनेक स्वप्ने दाखविणारा, शहराला येत्या दोन वर्षांत ‘हायटेक’ करण्याचे गाजर दाखविणारा, कल्याण-डोंबिवली पालिकेचा ९४७ कोटी १७ लाखांचा अर्थसंकल्प गुरुवारी महासभेत मांडण्यात आला. हा अर्थसंकल्प १० लाख ५१ हजार रुपये शिलकीचा आहे.
स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी गणेश स्तवन करून अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली. नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करणारी योजना, कचरामुक्त शहरांसाठी कचरा वेचक योजना, पालिकेच्या आधुनिकीकरणाचा भाग म्हणून नगरसेवक, अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्याची योजना प्राधान्याने राबविण्यात येणार आहेत.

मासुंदाप्रकरणी मनसेस्टाईल आंदोलन छेडणार -राजे
ठाणे/प्रतिनिधी

ठाणेकरांचा आत्मा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला जात असून, सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिका आणि ठेकेदाराकडून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज आयुक्त नंदकुमार जंत्रे यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आहे. योग्यती कारवाई न झाल्यास मनसे पद्धतीने आंदोलन छेडण्याचा लेखी इशाराही देण्यात आला.

पर्यावरण रक्षणाचा सैनिक ग्रीन केमिस्ट्री
जागतिक पर्यावरण दिन विशेष

भगवान मंडलिक

पर्यावरण संवर्धनाचे धडे देणारी, जागरूकता निर्माण करणारी, प्रदूषण टाळण्याचे आवाहन करणारी, एवढे सगळे कमी की काय, म्हणून उद्योगांना तुम्ही तयार करीत असलेल्या उत्पादनातून घनकचरा निर्माण करू नका, तो जागच्या जागी म्हणजे कंपनीतच प्रक्रियांद्वारे नष्ट करा किंवा त्याचा पुनर्वापर करा अशा प्रकारचे सामाजिक, औद्योगिक स्तरावर काम करणारी ‘न्यूरेका’ ही संस्था गेल्या १२ वर्षांपासून डोंबिवलीत कार्यरत आहे. बहुआयामी डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक नवबिंदू न्यूरेका संस्थेच्या रूपाने चमकू लागला आहे.

धोकादायक इमारत पाडण्याची मागणी
भिवंडी/वार्ताहर

ब्राह्मण आळी येथील प. रा. विद्यालय व जुनी एन. ई. एस. शाळा- कॉलेज ब्राह्मण आळी या ठिकाणी जुने बांधकाम मोडकळीस आले असून, येत्या पावसाळ्यात विद्यार्थ्यांना आपले जीव मुठीत घेऊन येणे- जाणे करावे लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी मोडकळीस आलेले जुने घर त्वरित तोडण्याबाबत महापालिका आयुक्त प्रकाश बोरसे यांना पालक संघटनेचे उपाध्यक्ष महेश देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

नाल्यांना शिंगावर घेणाऱ्या बैलेंची प्रशासनाने केली तडकाफडकी बदली
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात जवाहरलाल नेहरू नागरी अभियानांतर्गत सुरू असलेल्या नाल्यांचा प्रश्न काल विधिमंडळात एका तारांकित प्रश्नाद्वारे चर्चेला आला होता. या प्रकरणावरून आयुक्त गोविंद राठोड यांना विधिमंडळात जाऊन खुलासा द्यावा लागला. या प्रकरणामुळे पालिका प्रशासनाची चांगलीच चलबिचल झाली. ‘वृत्तान्त’ने नागरी हिताचा विचार करून पालिका हद्दीत सुरू असलेल्या नाल्यांची कामे कशी निकृष्ट दर्जाची सुरू आहेत याची माहिती उघड केली होती.
याचवेळी पालिकेच्या दक्षता व गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक बैले यांनी नाल्यांची कामे योग्य रीतीने सुरू नसल्याची, त्या कामांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा अहवाल स्थायी समितीला सादर केला होता. या अहवालांवरून प्रशासन अडचणीत आले होते. प्रशासनाचे प्रशासनाने वाभाडे काढल्याने या विषयावर पालिकेत चर्चा रंगल्या होत्या. नाले विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. बैले यांनी गुळमुळीत अहवाल दिला असता तर विधिमंडळात नाल्यांचा विषय चर्चेला आलाच नसता, पण बैले यांनी एकतर्फी अहवाल तयार करून स्थायी समितीला सादर केल्याने अधिकाऱ्यांमध्ये वाद रंगू लागले होते. या वादाचे चटके आयुक्तांना विधिमंडळात बसले. अखेर हा राग कसा आणि कोणावर काढावा तर तो राग नाल्यांच्या निकृष्ट कामाचा अहवाल देणाऱ्या बैले यांच्यावर काढून त्यांची बदली प्रशासनाने तडकाफडकी बांधकाम विभागात केली आहे.

कात्रप रस्त्याला फेरीवाल्यांचा विळखा
कल्याण/प्रतिनिधी -
बदलापूर रेल्वे स्थानक ते कात्रप या रस्त्याला फेरीवाल्यांनी विळखा टाकल्याने नागरिकांना या भागातून चालणे अवघड बनले आहे. फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई नगरपालिकेकडून करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सकाळ- संध्याकाळच्या वेळेत या रस्त्यावर मासेविक्रेते आपली दुकाने थाटून बसलेले असतात. याशिवाय अन्य विक्रेतेही रस्ते अडवून बसलेले असतात. या भागातून रिक्षा, अन्य वाहनांची वाहतूक असते. त्यामुळे नागरिकांना या भागातून चालता येत नाही. बाजार संपल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकून दिला जातो. तो वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे या भागात दुर्गंधी पसरते. फेरीवाल्यांना या रस्त्यावरून कायमचे हटवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

चोरटी प्रवासी वाहतूक थांबवण्यासाठी एसटीच्या ‘मिडी बसेस’
ठाणे/ प्रतिनिधी

जिल्ह्णाातील काही भागांत खासगी जीपद्वारे सुरू असलेली चोरटी प्रवासी वाहतूक थांबवण्यासाठी आकर्षक रंगाच्या मिडी बसेस सुरू केल्या. ३२ आसनी असलेल्या पोपटी रंगाच्या या मिडी बसेस मुरबाड-शहापूर मार्गावर गुरुवारपासून सुरू करण्यात आल्या. मुरबाड-सरळगाव-किन्हवली-शेणवा-शहापूर असा या मिडी बसचा मार्ग असणार आहे. या मार्गावर असलेली एसटीची सध्याची सेवा अपुरी पडत असल्याने जीपद्वारे चोरटी प्रवासी वाहतूक मोठय़ा प्रमाणावर चालते. मिडी बसेस घेतल्याने या मार्गावर आता सातत्याने एसटीची सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. पहाटे ५ वाजल्यापासून संध्याकाळी ८.३० पर्यंत मिडी बसेस या मार्गावर चालविण्यात येणार आहे. दर अर्धा तासाने बसेस धावणार आहेत. प्रवाशांनी खासगी जीप, गाडय़ांपेक्षा एसटीने सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

रस्त्याची दुरवस्था; नागरिकांचे उपोषण
वाडा/वार्ताहर :
तालुक्यातील कुडूस-कोंडला व कुडूस-उचाट या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने चालविणे अशक्य झाले आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या परिसरातील २० गावांतील नागरिकांनी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. डी प्लस झोनमुळे कोंडला, उचाट परिसरात मोठय़ा प्रमाणात उद्योगधंदे स्थिरावले आहेत. या गावांना ये-जा करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचा पक्का रस्ता असून, या रस्त्यावर जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम खात्याने लाखो रुपये खर्च केल्याचे दाखविले आहे, परंतु प्रत्यक्षात आज या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या रस्त्यावर दुचाकी अथवा चार चाकी वाहन चालविणे अशक्यप्राय झाले आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत या परिसरातील नागरिकांनी संबंधित खात्यांकडे वारंवार अर्ज-विनंत्या केल्या आहेत, परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याने, अखेर १ जूनपासून या परिसरातील नागरिकांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उगारले आहे. या परिसरात असलेल्या उद्योगधंद्यांमुळे मोठय़ा प्रमाणात अवजड वाहने ये-जा करीत असल्यामुळे या रस्त्यांची वारंवार दुरवस्था होते, असे अधिकाऱ्यांकडून बोलले जाते, तर अंदाजपत्रकानुसार या रस्त्याचे काम केले जात नाही. कामामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होतो, यामुळे रस्त्याची दुरवस्था होते, असे या परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात नऊ हजार इको क्लबची स्थापना
ठाणे/ प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने २००१-०२ मध्ये देशातील निवडक शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत इको क्लब स्थापन करण्याचा कार्य\क्रम राबविण्यात येत असून, महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक वनीकरण विभागामार्फत त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात सुमारे नऊ हजार इको क्लबमधील चार लाख विद्यार्थ्यांमार्फत दरवर्षी विविध पर्यावरणविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. केंद्र शासनाच्या प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या जरी ही योजना काही निवडक शाळांमध्येच राबवली जात असली, तरी दिवसेंदिवस उग्र होत चाललेले पर्यावरणविषयक प्रश्न विचारात घेता तिची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त शाळांतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणविषयक उपक्रम राबवून या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे.
संपर्क- सामाजिक वनीकरण विभाग, दूरध्वनी- २५३४१४८६.

आंब्याच्या कोयी अन् वडाच्या फांद्या; आज कार्यसत्र
ठाणे/ प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि हरियाली या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ५ जून रोजी दुपारी ४.३० वाजता घोडबंदर रोडवरील कासार वडवली येथील पाश्र्वनाथ अभियांत्रिकी महाविद्यालयालगत जाणाऱ्या गावठाण रस्त्यावर या दोन्ही संस्थांच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या रोपवाटिका व पर्यावरण कृती केंद्राच्या ठिकाणी एक विशेष कृतीसत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यात आंब्याच्या कोयी आणि वडाच्या फांद्या कशा रुजवाव्या याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. आपण आंबे खातो आणि कोयी फेकून देतो. त्यामुळे घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनावर ताण पडतो. तसेच वटपौर्णिमेला आधी वडाच्या फांद्या तोडून एक चूक करतो, नंतर त्या तशाच फेकून देतो. आंब्याच्या कोया तसेच या वडाच्या फांद्या रुजू शकतात. याबाबत या कार्यसत्रात मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रवेश विनामूल्य असून अनेक कोयींची रुजवण या रोपवाटिकेत यावेळी केली जाईल. संपर्क-९३२३२९१८९०.

कामगारांच्या मृत्यूप्रकरणी डाईंग मालकावर गुन्हा दाखल
भिवंडी/वार्ताहर :
सरवली औद्योगिक वसाहतीमधील मुंबई क्रिम्प्स प्रा. लि. या कंपनीस लागलेल्या आगीत तिघा कामगारांचा होरपळून झालेल्या मृत्यूप्रकरणी डाईंग कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरवली औद्योगिक वसाहतीमधील मुंबई क्रिम्प्स प्रा. लि. कंपनीला महिनाभरापूर्वी आग लागली होती. या भीषण आगीत मच्छिंद्र रतन परदेशी (५०), नित्यानंद ओघोणी (२९), प्रकाश मनोहर पाटील (४१) या तिघांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेस एक महिना उलटून गेल्यानंतर कामगारांच्या मृत्यूस जबाबदार धरून डाईंग कंपनीचे मालक विनोद हरिबन्स खेतपाल (रा. ठाणे) यांच्याविरुद्ध शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेरीवाल्यांना हटविण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्थेची मागणी
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ सॅटिस प्रकल्पाचे काम सुरू असून त्यासाठी या भागात अनेक अडथळे उभे करण्यात आले आहेत. त्यात फेरीवाल्यांनी रस्ते काबीज केल्याने या भागातून चालणे अवघड होते. त्यामुळे या ठिकाणी सकाळी सात ते रात्री दहापर्यंत पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांना हटविण्यासाठी कर्मचारी, वाहनांची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सॅटिस प्रकल्पाचे काम रेल्वे स्थानक परिसरात सुरू आहे. या ठिकाणी कामाच्या सुरक्षिततेसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. एका बाजूला अवजड यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात सकाळपासून वाहतूक कोंडी होत असते. नागरिकांना चालणे अवघड झाले आहे. या सगळ्या बजबजपुरीत फेरीवाले विशेषत: फळ, फुले विक्रेते, अन्य फेरीवाले यांच्या गजबजाटात रस्ते अडवून बसलेले असतात. त्यामुळे नागरिकांना चालणे अवघड होऊन बसते. विशेषत: सकाळच्या वेळेत नोकरी, व्यवसायासाठी लोकल पकडण्याच्या धडपडीत असलेल्या चाकरमान्यांना या फेरीवाल्यांचा सर्वाधिक त्रास होतो. पालिकेची गाडी सकाळी अकरा वाजल्यानंतर या भागात फक्त फेरी मारण्यासाठी येते. पालिका अधिकारी नियमाने करीत असलेला तो एक देखावा असतो. गाडी आली की तेवढय़ापुरते फेरीवाले गल्लीबोळात लपतात. एक कर्मचारी वसुली करतो आणि पुन्हा पालिकेच्या आवारात गाडी नेऊन उभी केली जाते.

शिवसेनेचे दोन नगरसेवक मनसेत जाण्याच्या तयारीत!
डोंबिवली/प्रतिनिधी -
शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मनसेमध्ये जाण्याची जोरदार तयारी केली आहे. या नगरसेवकांच्या सोबत त्यांचे प्रभागातील विभागप्रमुख, कार्यकर्तेही मनसेच्या वाटेवर असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. अशा प्रकारे नगरसेवक पक्ष सोडून जाऊ लागले तर ते नंतर पक्षाला अन्य निवडणुकांमध्ये भारी पडतील, ही बाब निष्ठावान शिवसैनिक जिल्हाप्रमुखांच्या लक्षात आणून देणार असल्याचे समजते. दोन्ही नगरसेवकांची मने वळविण्यात यावीत यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समजते. पक्षांतर्गत राजकारणावर उघडपणे कुणी बोलत नसले तरी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

व्हॉलीबॉल स्पर्धेत ३२ संघ सहभागी
बदलापूर/वार्ताहर :
अंबरनाथ नगर परिषद शिक्षण समिती, स्टेट बँक ऑफ इंडिया अंबरनाथ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये ३२ संघ सहभागी झाले. नगर परिषदेच्या मैदानामध्ये झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन प्रा. सुरेन्द्र बाजपेई यांच्या हस्ते करण्यात आले. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी स्पोर्टस् क्लबने प्रथम, तर वाय.सी.सी. संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. ए.व्ही.एम. स्पोर्टस्, ओम साईनाथ स्पोर्टस् क्लब, सिद्धांत पाठक, भीम पाटील, बिहारीलाल शर्मा, एल.आय.सी. संघ ठाणे या संघांच्या खेळाडूंना विविध पारितोषिके तर अंबरनाथ नगर परिषद कर्मचारी व्हॉलीबॉल संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.