Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

व्यक्तिवेध

धोनी ब्रिगेडने दोन वर्षांपूर्वी उंचाविलेला ट्वेन्टी-२० विश्वचषक, संगीतकार ए. आर. रहमान व कंपनीने पटकाविलेले ऑस्कर अशा जल्लोषाच्या वातावरणामध्ये एका व्यक्तीची कर्तबगारी काहीशी झाकोळून गेली. कुणी त्याला पुरुषप्रधान संस्कृतीचे लेबल लावले, तर कुणी महिलांच्या कर्तबगारीला समाजात अजूनही मान्यता नाही, अशी टीका केली. परंतु या सर्व भेदाभेदांच्या पलीकडे जात झुलान गोस्वामी हिची कामगिरी खरोखरीच भारतीयांची शान उंचाविणारी आहे. टीम

 

इंडिया ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये विजयाच्या पताका फडकावीत असताना महिलांच्या क्रिकेट संघानेदेखील कांगारूंची भूमी गाजविली. महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला दोनदा धूळ चारण्याचा पराक्रम तर या संघाने केलाच, शिवाय स्पर्धेमध्ये तिसरे स्थानही पटकाविले. भारतीय महिलांच्या या क्रिकेटक्रांतीची धुरा समर्थपणे सांभाळली ती झुलान गोस्वामी या पंचवीस वर्षीय खेळाडूने. पश्चिम बंगालच्या नदिया गावामध्ये जन्मलेल्या झुलानला क्रीडाप्रेमाचे बाळकडू मिळाले होते. मुलांच्या टीमबरोबर टेनिस चेंडूचे सामने खेळण्यात ती आघाडीवर असे. तिच्या गोलंदाजीच्या वेगाने घाबरगुंडी उडून मुलांनी तिला फलंदाजी करण्यास भाग पाडले. त्यामुळे महिला क्रिकेटला मिळाली आघाडीची अष्टपैलू खेळाडू! पश्चिम बंगाल, पूर्व विभाग आणि कालांतराने भारतीय क्रिकेट संघात तिने भरारी घेतली. चेन्नई येथील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये डेनिस लिली यांच्याकडून घेतलेल्या मार्गदर्शनाचे चीज झाले आणि झुलान महिला क्रिकेटविश्वातील सर्वात वेगवान गोलंदाज ठरली. १२० किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या झुलानने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसारख्या मातब्बर संघांतील फलंदाजांची दाणादाण उडविली. महिला क्रिकेट संघाचे उपकर्णधारपद भूषविताना २००६ मध्ये तिने करिष्मा दाखविला. इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीत ७८ धावांत १० विकेट आणि नाइटवॉचमन म्हणून अर्धशतकी खेळी करीत झुलानने कसोटी व मालिका जिंकून दिली. या कामगिरीबद्दल तिला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विशेष पुरस्कार दिला. २००७ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने तिला सवरेत्कृष्ट महिला क्रिकेटपटूचा बहुमान दिला. त्या वर्षी एकाही भारतीय पुरुष खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही बहुमान मिळविता आला नव्हता. महिलांच्या विश्वचषक स्पर्धेतही ‘झुलान एक्स्प्रेस’चा धडाका सुरू राहिला. अष्टपैलू कामगिरीबरोबरच संघाचे कर्णधारपद भूषवीत तिने भारताला तिसरा क्रमांक मिळवून दिला. आठ कसोटी सामन्यांमध्ये ६९ धावांच्या सर्वोच्च खेळीसह २६३ धावा, तुफान गोलंदाजी करीत घेतलेल्या ३३ विकेट अशी कामगिरी झुलानने केली आहे. एकदिवसीय सामन्यांचे शतक साजरे करून तिने १०९ विकेट घेतल्या आहेत. विकेटचे शतक गाठणारी महिला क्रिकेटविश्वातील ती केवळ चौथी खेळाडू. ट्वेन्टी-२० स्वरूपाच्या क्रिकेटसाठीही आता ती सज्ज होत आहे. पुरुषांबरोबर इंग्लंडमध्ये पुढील आठवडय़ापासून महिलांची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा भरविण्यात येत आहे. झुलानच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ गुरुवारी रवाना झाला. प्रशिक्षक सुधा शहा यांच्यासह झुलानने यशस्वी कामगिरीचा विश्वास व्यक्त केला. ‘न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया आदींचे खेळाडू आमच्यापेक्षा उंच, तंदुरुस्त आणि जोरदार फटकेबाजी करणारे आहेत. परंतु क्रिकेटमध्ये ताकद हेच सर्वस्व नसते. कौशल्य आणि चतुराईने खेळ करून प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व मिळविता येते, हे आम्ही एकदिवसीय विश्वचषकात सिद्ध केले आहेच. आता त्या अनुभवाच्या जोरावर ट्वेन्टी-२० ची बाजी मारण्यास आतुर आहोत. भारतीय महिलांना ट्वेन्टी-२० चा अनुभव कमी असला, तरी सराव शिबिरामध्ये या अतिझटपट स्वरूपाच्या खेळाचे कौशल्य, बारकावे आम्ही हेरले आहेत. त्यानुसार नव्याने रणनीती आखली जात आहे. त्याचप्रमाणे मिथाली राज, अंजुम चोप्रा यांच्यासारख्या विक्रमी खेळाडूंच्या अनुभवाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल,’ असे झुलान म्हणते. ‘महिला क्रिकेटविश्वातील मॅक् ग्रा’ अशी ओळख असलेल्या झुलानचे स्विंग इंग्लिश वातावरणामध्ये विश्वविजेते ठरोत, हीच अपेक्षा.