Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

अमरावती विभागात अनुश्री बूब अव्वल
बारावीच्या निकालावर मुलींचे वर्चस्व

अमरावती, नागपूर, ४ जून/ प्रतिनिधी

प्रियंका बोरकर मागासवर्गीयात प्रथम अजिंक्य सोमवंशी अमरावती विभागातून दुसरा अमरावती विभागाचा निकाल ७९.९४ टक्के बारावीच्या निकालात यंदा वैदर्भीय विद्यार्थिनींनी राज्यात आघाडी घेऊन विदर्भाच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. राज्यातील पहिल्या तिन्ही स्थानांवर वैदर्भीय विद्यार्थिनींचा झेंडा फडकला आहे. नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी अलमास नाझीम सय्यद ९८.५० टक्के गुण मिळवून राज्यात अव्वल आली असून अमरावतीच्या ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाची अनुश्री बूब ही तिच्यापाठोपाठ ९७.८३ टक्के गुणांसह राज्यात दुसऱ्या आणि अमरावती विभागात पहिल्या स्थानावर आली आहे.

जनसामान्यांचा नेता वामन तुरिले
भंडारा विधानसभा मतदारसंघातून २००४ सालच्या निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना पंचबुद्धे यांची प्रतिमा जनसामान्यांचा नेता अशी आहे. त्यांना खनिकर्म, शालेय शिक्षण राज्यमंत्रीपद मिळाले. गोंदिया जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद मिळाले पण पदे मिळूनही सत्ता अंगात भिनवू न देता ‘लोकांचे देणे लागतो’ या शालीनतेने नाना पंचबुद्धेवागतात. जिल्ह्य़ातील दयनीय शाळा, कॉपीचे थैमान, शाळांचे बाजारीकरण, जिल्ह्य़ाचे शैक्षणिक मागासलेपण, बाजारू शिक्षण इत्यादी गोष्टींवर ते धाडसाने उपाययोजना करतील , अशी जनतेची अपेक्षा होती, पण ती त्यांना पूर्ण करता आली नाही.

माती परीक्षणातून उत्पादनात वाढ -राऊत
साकोली, ४ जून/ वार्ताहर

मातीचे परीक्षण, बियाण्यांची निवड याबाबत जागृत राहिल्यास कृषी उत्पादनात वाढ करणे शक्य आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी जी.एन. राऊत यांनी केले. ते कृषी विभागाच्यावतीने खंडाळा येथे आयोजित कृषी दिंडीच्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पी.डब्ल्यू. नेमाडे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीमध्ये बदल करून सुधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळू शकते. शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम अर्धवट स्थितीत
आर्णी, ४ जून / वार्ताहर

सुमारे एक कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती अर्धवट स्थितीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही इमारत त्वरित पूर्ण करून आरोग्य विभागाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सुमारे १० वर्षांअगोदर महाराष्ट्र शासनाने ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिली. मात्र, ७ ते ८ वर्षे हा प्रश्न केवळ जागेअभावी रखडला होता. आमदार संजय देशमुख यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागला. मोठय़ा विलंबाने महाराष्ट्र शासनाने ९० लाख रुपये या इमारतीसाठी मंजूर केले.

नक्षलवाद्यांनी वनविभागाची लाकडे जाळली
गडचिरोली, ४ जून / वार्ताहर

वनविभागाच्या एटापल्ली येथील आगारातील जळाऊ लाकडे व बांबूंना काल मध्यरात्रीनंतर नक्षलवाद्यांनी आग लावल्याने अंदाजे तीन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.
एटापल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या एटापल्ली-कसनसूर मार्गावरील वनविभागाच्या लाकडी आगारामध्ये बुधवारला मध्यरात्रीनंतर अंदाजे ३० ते ३५ सशस्त्र गणवेशधारी नक्षलवाद्यांनी प्रवेश केला. तेथे असलेल्या जळाऊ लाकडाच्या तसेच बांबूच्या बिटांना आग लावली. या आगीत ४०० जळाऊ लाकडांची बिटे तसेच २ हजार बांबू भस्मसात झाले. या घटनेत अंदाजे ३ लाख रुपये किमतीची वनविभागाची मालमत्ता नष्ट झाली. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकीपूर्वीसुद्धा नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन करीत याच आगारामधील जळाऊ लाकडांच्या बिटांना आग लावली.

चौकीदाराने दस्तावेज जाळले
भंडारा, ४ जून / वार्ताहर

लाखांदूर कृषी विस्तार अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत अन्य कर्मचारी कार्यालयात येण्यापूर्वी चौकीदाराने कुणाचीही परवानगी न घेता दस्ताऐवजाच्या ८६ फाईल्स जाळल्या. यात ‘अ’ वर्गाच्या ७० फाईल्स व ‘ड’ वर्गाच्या १६ फाईल्स होत्या. जाळलेल्या दस्तावेजात सन १९९९ ते २००० मधील निविदा वाटप फाईल, ५० टक्के अनुदानावर स्प्रेपंप वाटप माहितीचे फाईल, सन २००० ते २००१ मधील ऑडिट फाईल, १९९८- ९९ मधील ऑडिट फाईल, विशेष घटक योजना अंतर्गत विहिरीचे अॅडव्हाँस फाईल, ओटीएसपी योजनेचे फाईल, शेती अवजारे वाटपाचे दस्तावेज, बैलजोडी बैलगाडी, कर्जप्रकरणाचे दस्तावेज, सिंचन विहिरी संबंधात अंदाजपत्रक, डिझेलपंप, विद्युत पंप यांच्या नस्ती, विहिरी बांधकाम नस्ती अशा अनेक महत्त्वाच्या फाईल होत्या. कृषी अधिकाऱ्यांनी चौकीदाराला विचारता साफसफाईच्या नावाखाली जाळण्यात आले, असे सांगितले गेले. कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली व लाखांदूर पोलिसात तक्रार नोंदविली. यातील गौडबंगाल तपासानंतरच बाहेर येऊ शकेल.

खाणीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर
शेंदुरजनाघाट, ४ जून / वार्ताहर

पालिकेचे पेयजलाचे स्रोत असलेले पुसली धरण, नागठाणा धरण, जायतळाच्या विहिरी यापैकी पुसली धरण अल्प पावसाने एक महिन्यापूर्वीच आटले. पाण्याची पातळी खोल गेल्याने जामतळावरील दोन विहिरींची पातळी खोल गेली आहे. फक्त नागठाणा धरणातून पालिकेत पाणीपुरवठा होत असताना पेयजल समस्या गंभीर झाली. पूर्वी एक दिवसाआड मिळणारे पाणी आता ४ ते ५, कधी-कधी सहा दिवसानंतर मिळत आहे. अप्पर वर्धाचे पाणी वरुड येथून ११ किमी.ची जलवाहिनी टाकून शेंदुरजनाघाटला आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असले तरी प्रत्यक्षात अप्पर वर्धाचे पाणी गावकऱ्यांना १५ ते २० जून पर्यंत मिळणार आहे. तातडीच्या योजनेंतर्गत अप्पर वर्धाचे पाणी मिळण्यास वेळ असला तरी वाई रस्त्यावरील पुसलीनजीकच्या खदानला चांगले पाणी असून या खदानवर ५ अश्वशक्तीचे डिझेल इंजिन बसवून पुसली धरणाच्या जलवाहिनीला खाणीची जलवाहिनी जोडून गेल्या आठवडय़ात इंजिनने शुद्धीकरण केंद्रावर पाणी आणले. तासाला २० ते २५ हजार लिटर पाणी मिळत असून चोवीस तासापैकी टप्प्या टप्प्याने १४ ते १५ तास रोजचे पाणी उपलब्ध होत असल्याने बिकट पेयजल समस्येला खाणीमधील पाण्यामुळे ही समस्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते. खाणीतील पाणी दीड महिन्याआधी घेतले असते तर समस्या गंभीर झाली नसती, असे गावकऱ्यांचे मत आहे.

पटेलांनी विकासाचा आराखडा द्यावा -आमदार कुकडे
भंडारा, ४ जून/ वार्ताहर

विकासाच्या मुद्यावर निवडून आलेले प्रफुल्ल पटेल जाहीरपणे आता विकास करणार असल्याचे सांगतात. मात्र, त्यांनी जिल्ह्य़ाच्या विकासासंदर्भात आराखडा तयार केला असल्यास आधी तो जनतेपुढे ठेवावा, तसेच एकीकडे विकास व दुसरीकडे भकास अशी वृत्ती ठेवून वैनगंगा साखर कारखाना विक्रीस काढण्याचा प्रकार तो चालविण्याच्या अटीशिवाय होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असे मत आमदार मधुकर कुकडे यांनी व्यक्त केले. १० जूनला देव्हाडी येथील वैनगंगा साखर कारखान्याचा लिलाव केला जाणार आहे. या संदर्भात आमदार मधुकर कुकडे यांनी मत व्यक्त केले. जिल्ह्य़ाचा विकास होत असेल तर ती आनंदाची बाब आहे. मात्र, तो केला जात असताना त्याचा आराखडा जनतेपुढे ठेवणे आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्य़ातील हजारो लोकांच्या हिताचा असलेला वैनगंगा साखर कारखाना विक्रीसाठी काढला जात आहे. तो चालविण्याच्या अटीवर लिलाव होत असेल तर आमचा विरोध राहणार नाही. मात्र, लिलाव होऊन त्याचे एक एक भाग बाहेर जात असल्यास आम्ही हे होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रफुल्ल पटेलांचा विकासाचा मानस असताना ज्यामुळे जिल्ह्य़ाचा खऱ्या अर्थाने विकास साधला जाऊ शकतो. तो साखर कारखाना भंगारात जात असेल तर ती विकासाची योग्य दिशा नसून हा प्रकार आम्ही होऊ देणार नाही, असेही आमदार मधुकर कुकडे यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय टेनिक्वाईट स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात भंडाऱ्याचे सात खेळाडू
भंडारा, ४ जून / वार्ताहर

निवड स्पर्धेत भंडारा जिल्हा टेनिक्वाईट पुरुष व महिला संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळप्रदर्शन केल्यामुळे दोन्ही संघात जिल्ह्य़ातील सात खेळाडूंची निवड करण्यात आली. रेणुका व्यवहारे हिने स्पर्धेतील सर्व सामने व कसोटय़ा जिंकून संघाचे कर्णधारपद मिळविले. त्यानंतर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या खेळाडूत रेणुका व्यवहारे सोबत आरती दूधकुवर, स्वाती लोंदासे, नीता टांगले, तसेच पुरुष संघात सुरज दुधकुवर, संकेत डुंभरे व अॅडव्होकेट मृणाल बांडेबुचे यांचा समावेश झाला. हे सातही खेळाडू पाटना येथे ८ ते १२ जून ०९ या काळात होणाऱ्या फेडरेशन कप राष्ट्रीय टेनिक्वॉईट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करतील.