Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

विशेष लेख

जलप्रदूषण रोखताना..

 

भारतातील जलप्रदूषण या विषयाचा आवाका मोठा आहे. जलप्रदूषण होऊन गोडय़ा पाण्याचे स्रोत कमी होत आहेत. ७० टक्के जलप्रदूषण घरगुती सांडपाण्यामुळे होते, याचे कदाचित आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. भारतातल्या ३०० प्रथम दर्जाच्या शहरांतून साधारण १८ हजार दशलक्ष लिटर सांडपाणी प्रतिदिनी निर्माण होते. यात महाराष्ट्राचा वाटा साधारण २५ टक्के, गंगा खोऱ्यातून साधारण ३० टक्के आणि इतर १५ खोऱ्यांतून उरलेले सांडपाणी नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात सोडले जाते. यातील ७५ टक्के भूमिगत गटारातून वाहते आणि २० ते ३० टक्केच प्रक्रिया करून सोडले जाते. लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे या साधारण १८ हजार दशलक्ष लिटर सांडपाण्यात औद्योगिक सांडपाण्याचा वाटा पाच टक्क्यांपेक्षा जास्त नाही.
केवळ मुंबई शहरातील स्थिती पाहता, सांडपाण्याचा वाटा १५% आहे. साधारण २,८०० ते तीन हजार दशलक्ष लिटर सांडपाणी प्रतिदिनी तयार होते. म्हणजे मुंबईकर प्रतिमाणशी प्रतिदिनी १०० ते २५० लिटर पाणी वापरतो, त्याच्या ८०% म्हणजे ८० ते २०० लिटर सांडपाणी तो निर्मित करीत असतो. पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकात, व्यक्तिगत स्वच्छतेसाठी, कारखान्यांतले उत्पादन वगैरे कारणांसाठी मुंबईकर वापरतो व सांडपाण्याची निर्मिती करतो.
बहुमजली निवासी इमारतीच्या गच्चीवरील पाण्याची टाकी संपूर्ण भरल्यानंतर पाणी वाहून जाणे मुंबईकरांना नित्याचेच झाले आहे. त्याचे नागरिकांना काही वाटतही नाही. काही वेळा तीनचतुर्थाश टाकी सांडपाणी जमिनीच्या पातळीवर येते. ते तसेच वाहत गेले तर फार मोठे संकट येईल.
सांडपाण्यात पुष्कळशा प्रमाणात तरंगते पदार्थ, विरघळलेले पदार्थ आणि इतर प्रदूषके असतात. कधी कधी त्याचे तापमान नेहमीच्या पाण्यापेक्षा जास्त असते. त्यात जैविक व कुजणारे पदार्थही असतात. शिवाय नायट्रेट्स् फॉस्फरस, हायड्रोजन सल्फाइड, अमोनिया, मिथेन इतर विषारी पदार्थ आणि प्रचंड प्रमाणात जीवजंतू असतात. शिवाय बुरशी व विषाणू असतात. त्यातील पुष्कळसे मानव आणि इतर प्राण्यांना घातक ठरतात.
अशा सांडपाण्यात जिवाणू किती असू शकतील? प्रत्येक माणूस एक हजार ते चार हजार लक्ष जंतू दर दिवशी विष्ठेतून बाहेर फेकतो व ते सांडपाण्यात उतरतात. म्हणूनच शहराचे आरोग्य हे सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावली जाते, त्यावर अवलंबून असते. यासाठी निराळे संशोधन करायची गरज नाही. किंबहुना शहराचे आरोग्य वापराच्या पाण्यापेक्षाही सांडपाण्याशी जास्त निगडित आहे.
विल्हेवाट लावण्यासाठी सांडपाणी एकत्र करून महापालिकेने रस्त्यांमध्ये जमिनीखाली जी भुयारी गटारे बांधली आहेत, त्यात पुढे वाहत नेण्यासाठी सोडले जाते. यालाच सांडपाणी योजना असे म्हणतात. सांडपाण्याचा निचरा, म्हणजे जमिनीखाली ३० ते ३५ फुटांवर एकत्रितरीत्या आलेले सांडपाणी पंपाच्या साहाय्याने वर आणून त्यावर प्रक्रिया करून समुद्रात किंवा खाडय़ांत सोडणे यालाच मलनि:सारण योजना म्हणतात. मुंबई शहराच्या या मलनि:सारण योजनेचे महाकाय स्वरूपसुद्धा पाणीपुरवठा योजनेसारखेच मोठे आहे. कुलाबा, वरळी, वांद्रे, वर्सोवा, मालाड, घाटकोपर आणि भांडुप या सात सांडपाण्याच्या विभागात नऊ इंचापासून ७२ इंचापर्यंत नळ आणि १० फूट व्यासाचे बोगदे सांडपाणी वाहून नेण्यासाठी बांधले गेले आहेत. या सर्वाची मिळून लांबी साधारण १,४०० कि.मी. आहे. सात विभागांसाठी प्रत्येकी एक अशी सात मुख्य उदंचन केंद्रे बांधली गेली. त्यातील ४ केंद्रे ६५ ते १०० फूट जमिनीखाली खोल आहेत. वांद्रे येथील उदंचन केंद्र तर जगातील एक मोठे उदंचन केंद्र समजले जाते. सात विभागांपैकी कुलाबा, वरळी आणि वांद्रे येथील समुद्रात सांडपाणी सोडण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून नळ आणि बोगदे बांधले गेले. त्यातील वरळी आणि वांद्रे येथील बोगदे तीन किमी लांब, समुद्राच्या तळापासून साधारण १५० फूट खाली आणि १२ फूट व्यासाचे आहेत. अशा कामासाठी अर्थातच देशाबाहेरील कंत्राटदारांची मदत घेताना देशातील कंत्राटदारांना सुद्धा अनुभव मिळाला.
सांडपाणी विशिष्ट उंचीवर आणण्यासाठी मुंबई शहरात एकंदर ५५ उदंचन केंद्रे बांधली गेली. पाणीपुरवठा योजनेप्रमाणेच जरी मलनि:सारण योजना टप्प्याने कार्यान्वित केली तरी त्याचा कालखंड १९८० ते २००५ एवढा कमी आहे. अर्थात पुढील टप्प्याचा विचार चालू असून २०३० पर्यंतच्या लोकसंख्येसाठी पुढील १० वर्षांत आता कार्यान्वित केलेली योजना आणखी अद्ययावत करण्यात येणार आहे.
मुंबई शहराच्या तीन दिशांनी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेला समुद्र आणि खाडय़ा यांचा या कामी फार मोठा लाभ मिळतो. सांडपाण्यात कोटींच्या संख्येने जंतू तर असतातच पण त्यातील काही प्राणिमात्रांना घातक असतात. त्याशिवाय सांडपाण्यात तेल, ग्रीझ, कीटकनाशक द्रव्ये, जड धातू, विषारी पदार्थ आणि इतर प्रदूषके असतात. ही प्रदूषके किती प्रमाणात आणि कोठे समुद्रात आणि खाडय़ांमध्ये सोडायची, त्यामुळे जलजीवांवर तसेच मासेमारी आणि इतर उद्योगांवर काय परिणाम होईल, याचा साकल्याने विचार या योजनेत केला गेला. ही प्रदूषके समुद्र आणि खाडय़ांमध्ये सोडल्यावर नैसर्गिकरीत्या वाहात किती आणि कधी येतात, जंतू सूर्यप्रकाशामुळे आणि इतर कारणांमुळे कधी आणि कोठे नष्ट होतात आणि किनाऱ्यापासून किती अंतरावर जंतू आढळल्यास आरोग्यास धोका पोहोचतो, या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी सागरी सर्वेक्षण केले गेले.
शहराच्या सभोवती असलेल्या निसर्गातील पाण्यात किती प्रदूषके आणि सांडपाणी सामावून घेण्याची क्षमता आहे याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास केला गेला. त्याचप्रमाणे निसर्गात उपलब्ध असलेले पाणी, त्याचे प्रमाण, प्रवाहांचे निरनिराळ्या खोलींवर असलेले वेग, वारा, लाटा, यांचाही अभ्यास केला गेला आणि त्यासाठी जागतिक परिणाम विचारात घ्यावे लागले आणि त्यानंतर मलनि:सारण योजना तयार केली गेली. वर्सोवा, मालाड, घाटकोपर आणि भांडुप या सांडपाणी विभागात मात्र सांडपाण्यासाठी कुंडे बांधून यांत्रिक पद्धतीने त्याला ऑक्सिजन वायू पुरवून प्रक्रिया केलेले सांडपाणी जवळील खाडय़ांमध्ये सोडले गेले. या सर्व योजना झाल्यावर पर्यावरणावर त्याचा काय परिणाम होईल, याचाही अभ्यास केला गेला आणि परिणाम होऊ नये म्हणून उपाययोजना कार्यान्वित केल्या गेल्या. योजनेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही ही काळजी घेतली गेली.
एवढय़ा प्रचंड प्रमाणातील योजना करूनसुद्धा जलप्रदूषणाच्या बाबतीत मुंबई शहर फारसे समाधानी नाही. मुख्य अडचण म्हणजे साधारण अर्धी लोकवस्ती ‘शहरी गरीब’ आहे, झोपडपट्टय़ांत राहते आणि त्यातून निर्माण झालेले सांडपाणी भूमिगत गटारात न येता आणि प्रक्रिया न होताच जवळच्या समुद्रात/खाडीत जाते. नैसर्गिक पाणी अरबी समुद्र, ठाणे खाडी, वर्सोवा खाडी, मालाड खाडी येथे उपलब्ध आहे. गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मलबार हिल, हाजी अली, वरळी, शिवाजी पार्क, जुहू बीच, मढ, मनोरी, मिठी नदी येथील नैसर्गिक पाण्याचे सर्वेक्षण (२००७-२००८) दर्शवते की, विरघळलेला ऑक्सिजन, बी.ओ.डी. आणि सेंद्रीय प्रदूषकांच्या बाबतीत प्रदूषण अजूनही आहे.
मुंबई शहराभोवतालच्या सर्व नैसर्गिक पाण्याचे सर्वेक्षण आणि अभ्यासही केला गेला आहे. हा अभ्यास किनाऱ्यापासून एक किलोमीटर अंतरावर आणि जास्तीच्या अंतरावर केला गेला. सततच्या सर्वेक्षणाचा उद्देश असा होता की, मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील पाण्याचा गुणात्मक दर्जा तपासणे व ठरविणे, वरळी, वांद्रे येथील आऊटफॉलमधून होणाऱ्या सांडपाण्याचा नैसर्गिक पाण्यावर होणारा परिणाम तपासणे आणि मासे उपलब्धतेवर होणारा परिणाम तपासणे. सकृद्दर्शनी असे दिसते की, माशांच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होत नाही, उलट ती वाढते आहे आणि किनाऱ्यापासून एक किलोमीटर अंतरावरील नैसर्गिक पाण्याची गुणवत्ता सुधारत आहे. अर्थात, किनाऱ्यावर जे सांडपाणी प्रक्रिया न करताच नैसर्गिक पाण्यात जात आहे त्यामुळे त्याचा वाईट परिणाम दिसून येत आहे.
मलनि:सारण योजना अशा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केली गेली नसती तर शहरांभोवताली असलेले सर्व किनारे आजच्यापेक्षाही जास्त प्रदूषित झालेले दिसले असते. शेवाळाचे साम्राज्य पसरले असते. समुद्रात पोहावयास जागा राहिल्या नसत्या आणि गॅस्ट्रो वगैरे आजारांनी मुंबईकर ग्रासून गेले असते. या योजनेमुळे परिसर बऱ्यापैकी स्वच्छ दिसणे, किनाऱ्यावरील दरुगधी कमी होते, किनाऱ्यावर वाहत येणारे पदार्थ कमी असणे, मासेमारी वाढणे, समुद्राच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राखले जाणे, समुद्रातील जीवसृष्टीची विविधता विषारी पदार्थ नसल्यामुळे योग्य असणे वगैरे पुष्कळ फायदे शहरासाठी झाले आहेत.
अर्थात आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा पण अशा चांगल्या परिस्थितीचा फायदा मुंबई शहराला मिळाला आणि त्यात बाधा आली नाही. उद्योग, व्यापार, नोकऱ्या, आरोग्य, शिक्षण या गोष्टींवरसुद्धा चांगला परिणाम झाला आणि इतर फायदे झाले. आरोग्याच्या बाबतीत विचार केल्यास पाण्यापासून होणाऱ्या रोगांवर नियंत्रण, त्यातील घट, मुलांमध्ये होणाऱ्या आजारांमध्ये घट, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांवर परिणाम न होणे, आरोग्यावरील खर्च कमी होणे, वगैरे मुद्दे जरूर लक्षात घ्यावयास पाहिजेत.
याचा अर्थ संपूर्ण समाधानी राहिले पाहिजे असा होत नाही. जागतिक परिमाणांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास अजूनही काही त्रुटी आहेत. त्यात पुढील काही वर्षांत योग्य सुधारणा होतील अशी अपेक्षा.
सुरेश पाटणकर
निवृत्त मुख्य अभियंता, मुंबई महानगरपालिका