Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ५ जून २००९

विविध

महिला आरक्षण विधेयक १०० दिवसात संमत करून घेणार
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या अभिभाषणात मनमोहन सिंग सरकारचा पाच वर्षांचा रोडमॅप

नवी दिल्ली, ४ जून/खास प्रतिनिधी

राज्यांच्या विधानसभा तसेच संसदेत महिलांना एकतृतीयांश आरक्षण देण्यासाठी महिला आरक्षण विधेयक पहिल्या शंभर दिवसात पारित करण्याचा निर्धार केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या काँग्रेस-युपीए सरकारने आज जाहीर केला. पंचायत आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती करण्याचाही संकल्प आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी संसदेच्या उभय सभागृहाला संबोधून केलेल्या अभिभाषणात केला.

इस्लामी जगताने संघर्षांचा मार्ग सोडावा - ओबामा
कैरो , ४ जून / पीटीआय

अमेरिका आणि इस्लामी राष्ट्रे यांच्यातील संबंधांचे एक नवे पर्व सुरु करण्याची ग्वाही देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी संशय व हिंसक दहशतवाद यांना कायमची मूठमाती देण्याचे आवाहन आज संपूर्ण इस्लामी जगताला केले. जगभर इस्लामी मूलतत्ववादी संघटना जोर धरीत असताना ओबामांनी केलेले हे आवाहन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. इजिप्तमधील कैरो विद्यापीठात ओबामा बोलत होते. ‘स्सलाम वालेकुम’ या खास मुस्लिम अभिवादनवाचक संबोधनाने सुरुवात करुन ओबाम यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

ब्रिटनमधील व्हिसा घोटाळ्यातील तीन भारतीयांना तुरुंगवास
लंडन, ४ जून/वृत्तसंस्था

ब्रिटनमधील सर्वात मोठय़ा व्हिसा घोटाळ्याप्रकरणी ब्रिटनमधील वकील जतिंदरकुमार शर्मा (वय ४४), त्याची द्वितीय पत्नी राखी शाही (३१) आणि त्याची प्रथम पत्नी नीलम शर्मा या तिघांना शहर न्यायालयाने काल अनुक्रमे सात, आठ आणि चार वर्षांच्या तुरुंगवासाची सजा ठोठावली असून शिक्षा संपल्यानंतर त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवावे, असा आदेश दिला आहे. या घोटाळ्यातून या त्रिकूटाने किमान ३० लाख पौंडांची कमाई केल्याचा तर्क आहे.

वीजचोर पिता-पुत्राला एक कोटी रुपयांचा दंड, सक्तमजुरी
नवी दिल्ली, ४ जून/पी.टी.आय.
वीजचोरीप्रकरणी येथील विशेष न्यायालयाने एका उद्योगपतीला चार वर्षे सक्तमजुरी आणि त्याच्या मुलाला साडेसात महिन्यांची कैद सुनावली; शिवाय एक कोटी रुपये दंडही ठोठावला.
पूरनचंद हा उद्योगपती वीजचोरीत माहिर आहे. पूर्वीही त्याला एकदा वीजचोरीप्रकरणी पकडण्यात आले होते. पुढील तीन महिने कोठूनही वीजपुरवठा घेण्यास त्याला न्यायालयाने मनाई केली आहे. पूरनचंदला ४५ लाख ९६ हजार तर त्याचा मुलगा मुकेश याला २२ लाख ९८ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या वैयक्तिक दंडाव्यतिरिक्त नागरी उत्तरदायित्व म्हणून वेगळा ३० लाख ६४ हजार रुपये दंड उभयतांना भरावा लागणार आहे. वीजचोरी प्रकरणातील ही आजवरची सर्वात मोठी दंडाची रक्कम आहे. पूरनचंद याचा पश्चिम दिल्लीत प्लास्टिक सायकल चाके बनविण्याचा कारखाना आहे. डिसेंबर २००६ मध्ये ‘बीएसईएस’च्या भरारी पथकाने अचानक घातलेल्या छाप्यात पूरनचंद आणि त्याचा मुलगा मुकेश यांची वीजचोरी उघडकीस आली होती. सुमारे १०२ किलोव्ॉट एवढी वीजचोरी केल्याचे आढळून आले होते.

अमेरिकेने पाकिस्तानला खडसावले
वॉशिंग्टन, ४ जून / पीटीआय

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार व ‘जमात उद दवा’चा म्होरक्या मोहम्मद सईद याची निदरेष मुक्तता केल्याबद्दल अमेरिकेनेही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. मुंबई हल्ल्यामागे असलेल्या सर्व दहशतवाद्यांना शोधून काढून त्यांना शिक्षा द्या ,अशा शब्दांत अमेरिकेचे नागरी कामकाज विभागाचे सहाय्यक सचिव फिलीप जे. क्रोवेली यांनी पाकिस्तानला खडसावले आहे. सईदला लाहोर उच्च न्यायालयाने निदरेष मुक्त केले असले तरी पाकिस्तान सरकारने मुंबई हल्ल्यामागील सर्व संशयितांची चौकशी सुरू ठेवावी, असे फिलीप म्हणाले. त्यासाठी आम्ही पाकिस्तावर दबाव टाकत आहोत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.