Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

हरवलेली माणसं की हरलेली घरं?
आपलं आत्मीय घर, मायेची माणसं सोडून परागंदा होणं माणूस का पत्करतो? त्यामागे कोणती कारणं असतात? ती टाळता येऊ शकतात का?
हल्ली घरातून बेपत्ता होणाऱ्यांची संख्या चिंतनीयरीत्या वाढत आहे. त्यातही १७ ते २५ या वयोगटातील तरुणांचं प्रमाण जास्त आढळतं. याचा वेध घेणारा लेख..
२५मे हा जागतिक स्तरावर हरवलेल्या मुलांचा दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने एक शोधयात्रा घडली. या शोधयात्रेची सुरुवात झाली- १३ मे रोजी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीने! बातमी होती- मुंबईतील हरवलेल्या व्यक्तींबद्दल! चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकारात यासंबंधात मिळवलेली माहिती खूपच धक्कादायक होती. सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या या महानगरात दहा वर्षांच्या आकडेवारीची सरासरी काढली असता लक्षात आलं की, मुंबईत रोज

 

दहा मुली आणि सात मुलगे बेपत्ता होतात. आणि सर्वात काळजीत पाडणारी गोष्ट म्हणजे त्यांचा वयोगट आहे १७ ते २५ वर्षांचा! या वयात पत्ता सांगणं सहज शक्य असतं. म्हणूनच खेदाने म्हणावे लागेल की, ही मुलं हरवली की घरातून निघून वा पळून गेलीत? या प्रश्नाचं बोट धरून माहितीची शोधाशोध सुरू झाली. या संशोधनात समोर आलेलं वास्तव फारच भयावह व हादरवून टाकणारं आहे.
गेली १५ र्वष माणसं हरवणाऱ्यांच्या तुलनात्मक तक्त्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. कोलकात्यासारख्या प्रचंड गर्दीच्या शहरापेक्षा मुंबईने हरवणाऱ्यांच्या यादीत प्रथम असावे, ही बाब मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करते. पण त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे १७ ते २५ हा हरवणाऱ्यांचा वयोगट आपल्या कुटुंबसंस्थेच्या ढासळत्या भिंती अधोरेखित करतो. घरातून निघून जाणं हे केवळ महानगरांमध्येच घडतंय असं नाही, तर अगदी छोटय़ा छोटय़ा खेडय़ांतून हरवणाऱ्यांच्या यादीतही हरवणाऱ्यांमध्ये १८ ते २५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण ४० ते ६० टक्के एवढं आहे.
‘तलाश’ या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार ‘मिसिंग पर्सन्स रिपोर्टस्’मध्येही हरवणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढताना दिसतं. आणि चिंतित करणारी गोष्ट म्हणजे हरवणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. ‘तलाश’द्वारा प्रकाशित माहितीमध्ये मृत म्हणून सापडलेल्या, पण ओळख न पटलेल्या व्यक्तींमध्ये पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा चार ते पाच पटीने जास्त आहे. नागपूरसारख्या छोटय़ा शहरातही दर आठवडय़ाला किमान दोन व्यक्ती या मृत्यूनंतरही अनोळखी राहतात. ही अनोळखी मृतकांची संख्याही अंगावर शहारे आणणारी आहे.
हरवणाऱ्यांमध्ये केवळ अशिक्षित, आर्थिकदृष्टय़ा विपन्नावस्थेतील व्यक्तीच असतात, सुखवस्तू, मध्यमवर्गीय सुशिक्षितांना या गोष्टीशी काही देणं-घेणं नसतं, असेही नाही. कारण ही आपत्ती कोणावर व कधी येईल, हे सांगणं अशक्य आहे. भूकंप, पूर, दरडी कोसळणे, त्सुनामी यांसारख्या संकटं आठवली किंवा अगदी अलीकडचा २६ जुलै २००५ चा मुंबईतील जलप्रलय आठवल्यास त्या एकाच दिवसात त्यावेळी सहाशेजण बेपत्ता झाले होते. त्यापैकी ५० जण अजूनही सापडलेले नाहीत. नैसर्गिक आपत्तींबरोबरच जातीय दंगली, आक्रमणं, अतिरेकी हल्ले, घातपात अशा दुर्घटनांमध्येही कितीतरी जिवांची कुटुंबीयांपासून ताटातूट होते.
ही अपघात वा आपत्तींची कारणं समजू शकतात. पण त्यात बेपत्ता होणाऱ्या लोकांचं प्रमाण इतर प्रकारे हरवणाऱ्यांच्या प्रमाणापेक्षा बरंच कमी असतं. या हरवणाऱ्यांच्या वयोगटाचा आढावा घेतला असता लक्षात येतं की, नवजात अर्भकापासून ते वय वर्षे ९० पर्यंत हरवणाऱ्यांमध्ये वय, जात, वंश, वर्ण, शिक्षण यापैकी कोणत्याच बाबतीत भेद आढळत नाही. मात्र, वयानुसार हरवण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात.
ज्याकरता कुटुंबीयांना क्वचितच जबाबदार धरता येईल असं हरवणं म्हणजे लहान मुलांचे हरवणे! ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग चिल्ड्रेन’च्या वेबसाइटनुसार, दर ३० सेकंदाला एक मूल घरातून निघून जाते. १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील बेपत्ता म्हणून नोंद झालेल्या बालकांच्या हरवण्यामागे थोडीफार कौटुंबिक कारणं असली तरी त्यात मुलामुलींच्या अपहरणाच्या घटनाच जास्त असतात. धनाढय़ांच्या मुलांना खंडणीकरता पळवून नेले जाते, तर ‘निठारी’सारख्या अंगावर काटे आणणाऱ्या हत्याकांडांमध्ये मानसिक विकृती व अंधश्रद्धा यांच्यापायी लहानग्यांचा बळी घेतला जातो. मुलांचे अपहरण करून त्यांचा चोरी वा भिक्षा मागण्यासाठी वापर करणाऱ्या टोळ्याही आहेत. मुलींना घरगुती कामासाठी वा देहविक्रयासाठी अपहृत केले जाते. हे करणारे खुद्द कुटुंबीय वा परिचयातील व्यक्तीही असू शकतात. अरब देशांतून मुले-मुली पुरविण्याचा धंदा मुंबईत जोरात चालतो.
हरवणे वा बेपत्ता होण्याबद्दलची माहिती पोलिसांना ताबडतोब कळवणे अत्यंत आवश्यक असते. १८ वर्षांखालील मुला-मुलींचे हरवणे जास्त धोक्याचे मानले पाहिजे व त्यासंदर्भात त्वरित कारवाई केली जायला हवी. मात्र, आपल्याकडे अनेक प्रकरणांत हरवल्याबद्दलची तक्रारच पोलिसांत केली जात नाही किंवा उशिरा तरी केली जाते. हरवणे हा गुन्हा नसल्याने त्यासंबंधीचा रिपोर्ट ‘अदखलपात्र’ ठरतो व त्याची नोंद फक्त (जी.डी.) ‘स्टेशन डायरी’मध्येच केली जाते. दिल्लीत मात्र अशा बाबतीत एक चांगलं पाऊल उचललं जातं. तिथे १८ वर्षांखालील मुलींच्या बाबतीत व १२ वर्षांखालील मुलग्यांच्या बाबतीत हरवल्याची तक्रार असल्यास त्याचा एफ. आय. आर. दाखल करणे अनिवार्य केले गेले आहे. अनेक ठिकाणी ‘झीरो एफ. आय. आर.’ नोंदवला जातो. यात गुन्हा क्रमांक दिलेला नसतो. पुढे मात्र तातडीने पावलं उचलली जातात. ज्यात पत्रकं वाटणे, वर्तमानपत्रांतून जाहिराती, इतर पोलीस स्टेशन्सना कळविणे आदी कारवाई केले जाते. वस्तुत: यापेक्षाही अधिक सर्वव्यापी मोहीम उघडता येईल. पण आपल्याकडे अशा शोधकार्याला प्राथमिकता नसल्याने या प्रयत्नांत सातत्य राहत नाही. दररोजच ‘मिसिंग’च्या प्रचंड नोंदी होत असल्याने पोलिसांवरील ताण वाढतो. परिणामी हरवणाऱ्यांपैकी २० टक्के व्यक्ती कधीच सापडत नाहीत.
घरातील एखादी व्यक्ती हरवणं किंवा बेपत्ता होणं अथवा न सांगता घरातून निघून जाण्यानं कुटुंबीयांना जबरदस्त मानसिक आघात सहन करावा लागतो. या घटनेची पडछाया अन्य कुटुंबीयांवर अपरिहार्यपणे पडते. जेव्हा हरवलेली व्यक्ती पत्ता सांगू न शकण्याइतकी लहान असते, वा मानसिक संतुलन बिघडलेली असते, तेव्हा कुटुंबीयांना ती व्यक्ती हरवण्यासाठी पूर्णत: जबाबदार धरता येणार नाही. तरीही त्या व्यक्तीची काळजी घेण्यात कुठेतरी त्रुटी राहून गेली, हे मान्य करावेच लागते. पण जेव्हा बेपत्ता होणाऱ्यांत १७ ते २५ वयोगटातील व्यक्तींची संख्या जास्त आढळते, तेव्हा निश्चितपणे कौटुंबिक विसंवाद वा नातेसंबंधातील समस्यांकडे अंगुलीनिर्देश करावा लागतो. समाजशास्त्रज्ञ याकरता विस्कळीत कौटुंबिक स्थिती व वाढत्या सामाजिक ताणांकडे लक्ष वेधताना दिसतात. काही विश्लेषकांनी हरवणाऱ्यांमध्ये स्त्रिया, दलित, आदिवासी व मुस्लिम धर्मीयांचं प्रमाण जास्त असल्याचं म्हटलंय. हरवणाऱ्यांच्या सरासरीत महाराष्ट्र सर्वप्रथम व त्यानंतर मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक व गुजरातचा क्रमांक लागतो.
मुंबईसारख्या अनोळखी शहरातून काही विपरीत न घडता परत येण्याइतके सर्वच घर सोडणारे भाग्यवान नसतात. रागाच्या भरात घरातून पळून जाण्याचा घेतलेला निर्णय आपलं नुकसान करू शकेल, हे त्यांच्या लक्षात येत नाही. किंवा परिस्थिती अत्यंत जाचक वाटते म्हणून त्यातून सुटका करून घेण्यासाठी असे टोकाचे निर्णय घेतले जातात. १० वी-१२ वीच्या निकालानंतरही अनेक विद्यार्थी कमी गुण मिळाले म्हणून निराश होतात. त्यातून कुटुंबियांच्या अपेक्षांचं ओझं त्यांना सहन करणं कठीण जातं. अशावेळी घर सोडून जाणारे अनेक विद्यार्थी असतात. गेली चार वर्षे आम्ही चालविलेल्या हेल्पलाइनने अशा असंख्य मुलांचे टोकाचे निर्णय बदलवण्याचं काम केलं आहे.
सज्ञान व्यक्ती घर सोडून जाण्याची कारणं शोधली असता अनेक कारणं समोर येतात. त्यांची यादी अशी देता येईल : विस्कळीत कुटुंब, कुटुंबामधील दडपण, मोठे कुटुंब, शहराचे आकर्षण, आर्थिक विवंचना, कामाच्या शोधात, एक-पालकी कुटुंब, कुटुंबापासून दूर राहणारी मुलं, शारीरिक छळ/ शोषण, लैंगिक छळ/ अत्याचार, व्यसनाधिनता, अशिक्षितपणा, बालकामगार, अती राग येणे , गुन्हेगारी प्रवृत्ती, वैवाहिक विसंवाद, जोडीदाराने परित्यागणे, विवाहबाह्य़ संबंध, न्यूनगंड, स्वनियंत्रण अक्षमता, कुटुंबातील लिंगभेद, कर्जबाजारीपणा, मानसिक असंतुलन/ आजार, विस्मरण/ अल्झायमर, मतिमंदत्व, गंभीर आजार इत्यादी. या कारणांनी घर सोडणाऱ्यांची आपली अशी एक दीर्घ व्यथा असते. त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेत्ोला तर लक्षात येते की, ती व्यक्ती घरात गुदमरतेय! क्वचित तिच्यातील क्षमता, सर्जनशीलता कुटुंबीय ओळखू शकत नाहीत किंवा पालक स्वत:ची बेलगाम अपेक्षांची घोडी दामटत राहतात; ज्यामुळे काहीतरी नवं, आव्हानात्मक, समाधान देणारं काम करण्याची इच्छा असलेल्यांची घुसमट होते. आई-बाप हे ‘प्रोव्हायडर’ आहेत, हे मानलं तरी त्यांनी पैसे पुरवून पाल्यांच्या जगण्याचे हक्क विकत घेतलेत असं नाही ना! ‘आम्ही तुम्हाला पैसा पुरवून किती उपकार करतोय,’ ही भाषा सतत ऐकावी लागली तर अंगात असीम शक्तीची कारंजी उसळत असलेली बंडखोर युवापिढी त्यांना झिडकारणारच!
पिढी-पिढीमध्ये वैचारिक दरी असणं ही अपरिहार्य बाब नाही. नवीन पिढीची भाषा, विचारपद्धती मोठय़ांनी समजून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. पण त्याचवेळी मूल्यांमध्ये तडजोड करणं अभिप्रेत नाही. नवीन पिढी आधीच्या पिढीपेक्षा स्वकेंद्री होत आहे, तिला सर्व काही सहज मिळत गेलं तर नकार झेलण्याची सवय राहत नाही म्हणून पालक चिंतेत असतात व अधिकाधिक अधिकारशहा होत जातात. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर गदा येतेय, असं युवा पिढीला वाटू लागतं.
नवीन पिढीला मूल्य व भावनिक परिपक्वतेसंबंधी मार्गदर्शन करायला हवं, हे मान्य; पण त्याचा अर्थ त्यांना पंख पसरवून आकाशझेप घेऊ न देणं, असा नाही. कोवळ्या वयात विरुद्धलिंगी व्यक्तीकडे आकर्षित झाली म्हणून अनेक मुलींना उच्च शिक्षणाचे दरवाजे बंद करणारी, आवडीचा अभ्यासक्रम बाहेरगावी राहून पूर्ण करण्यापेक्षा आपल्या डोळ्यांसमोर व नियंत्रणात राहावी म्हणून मुलींना उपलब्ध अभ्यासक्रमाची सक्ती करत बाहेर न पाठविणारी अनेक कुटुंबं आढळतात. असं मनाविरुद्ध जगणं अनेकांना असह्य़ होतं आणि म्हणूनच आपलं स्वप्न साकारण्यासाठी घर सोडून जाणाऱ्या युवक-युवतींची संख्या वाढते आहे. मनाविरुद्ध लग्न करावं लागणं हेदेखील मानसिक अनारोग्याचं आणि विवाहाच्या अयशस्वीतेचं कारण ठरतंय. मनं न जुळल्याने अशा विवाहांची परिणती विघटनात होते. माहेरी कुणीच समजून घेणार नाहीत म्हणून मग ती एकाकी स्त्री भरकटत जाते.
हे सगळं घडू नये म्हणून ठोस पावलं उचलता येतील. मुळात कुटुंबसंस्था किती बळकट, किती पोषक, किती लवचिक आहे, यावर व्यक्तीचं त्या कुटुंबात राहणं अवलंबून असतं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या दसं आहे त्या व्यक्तिमत्त्वाचा सहज स्वीकार करणारं घर हवंसं वाटतं. प्रत्येकाला आपली वेगळी ओळख जपणारं, हसरं, खेळकर घर, प्रत्येक नात्यात मैत्र जपणारं घर आपलंसं वाटतं. मग बाहेर थकवा आला, निराशा वाटय़ाला आली तरीही आपल्याला कुशीत घेणारं आत्मीय घर प्रत्येकालाच विसावा वाटतं. असं घर त्यांच्या पंखांना नवं बळ देतं.
घरात वादविवाद होऊच नयेत असं मुळीच नाही. आपली मतं ठामपणे मांडता येण्याचं पहिलं व्यासपीठ घरच असावं. पण मतभिन्नतेचा आदर करायलादेखील याच घरात शिकता यावं. कुटुंब हा नैसर्गिक समूह आहे. इथली नाती ‘बाय डीफॉल्ट’ असतात. ‘बाय चॉइस’ नसतात. विवाहात मात्र हा चॉइस असतो. त्यावेळी विचारपूर्वक निर्णय घेतला जावा. आपलं जीवन ही स्वत:च्या अस्तित्वाला अर्थ मिळविण्याची एक अखंड धडपड असते. आपल्याला आधार देणारं, घडवणारं कुटुंब ही आपली ओळख बनते.
घरातून निघून जाणारी व्यक्ती त्या कुटुंबाची ओळख नाकारत असते का? घरापासून दूर जाऊन घर शोधणारी ही मंडळी एका दिवसात किंवा रात्रीत त्या निर्णयाप्रत पोहचत नसतात. त्यांचं घरापासून तीळतीळ तुटत दुरावणं कुटुंबियांनी वेळीच समजून घ्यायला हवं. त्यासाठी परस्परांतील नात्यांची वीण घट्ट असायला हवी. एकटेपणाचं दु:खं घरात असतानाही अनेकांच्या वाटय़ाला येतं. अशांना मग घराबाहेर पडण्याची ओढ लागते. घरात समजून घेणारं कुणीच नसेल, विकासाचे मार्ग खुंटलेत असं वाटत असेल, तर कुढत, कुचंबणा झेलत बसण्यापेक्षा मोकळ्या आभाळाखाली मुक्त श्वास घेण्याची माणसाला आस लागते.
सहज पैसा कमावता येतो, हे वास्तव भोवताली बघणारे युवक-युवतीही घराबाहेर पडतात. त्यांना अर्निबध जगण्याचं व्यसन जडतं किंवा ‘मेरी मर्जी’प्रमाणे जगणं आवडायला लागतं. सर्वच गरजांची पूर्ती करण्यासाठी आवश्यक ती साधनं व जबाबदारीरहीत जीवनपद्धती ही जीवनशैली बनायला लागते. अशा प्रकारच्या जगण्यामुळे निर्माण होणारी व्हल्नरेबिलिटी किंवा कमजोरी दृष्टिपथात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. कुटुंबात परतण्याचे दरवाजे अशा व्यक्तीने स्वत:च बंद केलेले असतात.
घर सोडून जाणाऱ्यांची घरं आणि कुटुंबीय त्यांची वाट पाहत राहतात. कुणी निराशाग्रस्त होऊन मरणाच्या दारात पोहचतात. घराबाहेर पडणाऱ्यांना कुणीतरी ‘अजूनही परत ये’, असा निरोप सांगावासं त्यांना वाटत राहतं. एकीकडे खोटय़ा प्रतिष्ठेच्या कल्पनांपायी आपल्या काळजाच्या तुकडय़ाला दूर लोटून कायमचं पारखं करणारे पाषाणहृदयी पालक आहेत, तर दुसरीकडे पदोपदी बोट धरून चालवणाऱ्या पालकांचं ऋण विसरून कृतघ्न बनणारे पाल्यदेखील आहेत. म्हणूनच विसंवादाची सुरुवात झाल्या झाल्याच योग्य ती उपाययोजना करायला हवी. आणि असा दुरावा मुलात निर्माणच होऊ नयेम्हणून काळजी घ्यायला हवी.
प्रत्येकाला आपली मूळं कुठल्यातरी भूमीत रुजवावीच लागतात. अन्यथा जगणंच कठीण व्हायचं. मात्र, उत्कर्षांच्या उच्चतम टप्प्यावर उभा असलेला मनुष्यप्राणी अधिक सकस, अधिक समृद्ध व पोषक भूमीच्या शोधात भटकत राहतो. ही भटकंती मृगजळाच्या पाठी फिरणं न ठरो, एवढीच अपेक्षा!
स्वाती धर्माधिकारी
swatidharmadhikarinagpur@gmail.com