Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

...पण बोलणार आहे!
साइझ झीरो

‘साइझ झीरो’ हा शब्दप्रयोग आणि त्यामागची कल्पना अगदी अलीकडे समजली. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मोठय़ा कष्टाने, प्रयत्नपूर्वक तो आकार स्वत:च्या देहाला आणून दाखवला तेव्हा! मग साहजिकच त्याची सर्वत्र जाहिरात, चर्चा, गाजावाजा सुरू झाला. हे नेहमीचं डायटिंग, स्लिमिंग एवढय़ावर थांबणारं प्रकरण नव्हतं. त्याच्यापुढे जाऊन ‘साइझ झीरो’ हा अवास्तव आकार धारण करण्याचं हे आव्हान होतं. एकीनं ते पेललं. तिला ते जमलं, मग इतरांना का जमू नये? मग इतरेजन इरेला पेटले. सर्व बाजूंनी मोर्चेबांधणी केली गेली. यंत्र-तंत्रांची, आधुनिक आहारशास्त्राची मदत घेतली तर हे जमायला पाहिजे, या कल्पनेने आणखी काहीजणी प्रेरित झाल्या. मग त्या झीरो साइझचे योग्य ते कपडे, त्या आकृतीला शोभतील अशा बॅगा, पर्सेस, माळा, गॉगल्स,

 

इ. अ‍ॅक्सेसरीज वगैरेंनी बाजारपेठा फुलल्या. गावातल्या जिम- स्पा- व्यायामशाळा जास्तच गजबजू लागल्या. या उपक्रमाला अनुकूल होतील अशा खाद्यपेयांच्या श्रेणी नव्याने बाजारात उतरल्या.
कोणी म्हणेल, यात तुमचं काय गेलं? तर काहीच नाही. व्यक्तिगत पातळीवर निश्चितच काही नाही. पण एकूण स्त्रीवर्गाला मात्र कळत-नकळत एक पाऊल मागे नेलं जातंय की काय, असा कधी कधी संशय येतो. कोणत्याही समूहातल्या जाणत्या, विचारी, विवेकी व्यक्ती एकदम अशा एखाद्या लाटेत स्वत:ला झोकून देत नसतात, हे खरं आहे. पण बहुसंख्यांना मोह पडतो. त्यांच्यापुढे चुकीचे आदर्श निर्माण होतात आणि तारतम्य सुटतं. तसं तर होणार नाही ना, अशी शंका येते.
झीरो म्हणजे शून्य. शून्य आकार असं खरं म्हणजे काही असू शकत नाही. आता तर म्हणे उणे एक, उणे दोन असेही आकार मोजायला सुरुवात झाली आहे! रूढ भाषेत याला हाडंकाष्टं असणं, विश्वास बसू नये इतकी बारीक, खंगलेली कुडी असणं, असं काहीसं म्हणता येईल. ज्या व्यक्तीनं ती पहिल्यांदा हासिल केली ती दृश्य माध्यमातली होती. तिचं असणं- दिसणं (की खरं तर न दिसणं?) ही तिच्या व्यवसायाची गरज होती. असे काही स्टंट करून लोकांचं लक्ष वेधून घेणं हीसुद्धा तिची व्यावसायिक गरज असू शकेल. तिनं ती पूर्णपणे भागवली, हे अभिनंदनीय आहे. तिचं वय, तिचा व्यवसाय, तिची आर्थिक-सांस्कृतिक चौकट, तिला रंगवावी लागणारी व्यक्तिरेखा या साऱ्यांची अनुकूलता त्यामध्ये गृहीत आहे.
वास्तवातल्या किती टक्के स्त्रियांना ही अनुकूलता आहे? हा एक प्रश्न; आणि वास्तवातल्या किती बायकांना तिचा आदर्श गिरवण्याची गरज आहे? हा दुसरा प्रश्न. व्यक्तीचं शरीर जो काही आकार धारण करतं त्यात अनेक घटकांचा समावेश असतो. आनुवंशिकता असते. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक अनुकूलता किंवा प्रतिकूलता असते. (घरातल्या मुलग्याला मुलीपेक्षा जास्त पोषक आहार मिळणं, घरात ओळीने तीन मुली झाल्यास त्यातल्या सर्वात धाकटी दुर्लक्षित म्हणून कुपोषित असणं, इ. इ.) लहानपणी ओढवलेले आजार, अपघात, आघात यांचा परिणाम असतो. वाढीच्या वयात मिळणारं निकोप किंवा दूषित पर्यावरण असतं. काही चुकीच्या सवयी, लकबी लहानपणी लागून जातात; ज्यांचे दूरगामी परिणाम आरोग्यावर होतात. या सर्वाखेरीज ज्याचा त्याचा ‘उपजत पिंड’ हाही कधीही ओलांडता न येणारा घटक असतो. या सर्वाच्या विवक्षित परिणामांमधून एखादं शरीर घडत, वाढत जातं. अशा प्रकारे विशिष्ट वयापर्यंत घडलेलं शरीर आमूलाग्र बदलणं, ‘सुधारणं’ ही काही ‘खायची’ गोष्ट नाही. त्यामागे किती लागावं, किती वेळ, पैसा खर्चावा, आणि पदरी किती आशा वा निराशा घ्यावी, हाही तारतम्याचा मुद्दा आहे.
यापेक्षाही माझ्यासारखीला खटकणारी गोष्ट आहे, ती म्हणजे यामागची सांस्कृतिक सक्ती. बाईनं नेहमी सुबक, सुंदर दिसलंच पाहिजे, हा आग्रह. तसं तर काय, आदर्श परिस्थितीत बाई-पुरुष कोणीही केव्हाही सुंदर दिसायला हवा. कोणाचंही शरीर आकर्षक, प्रमाणबद्ध, सुडौल असायला हवं. पण व्यवहारात तसं होत नाही. आणि पुरुषापेक्षाही एखादी बाई लठ्ठ वा बेढब आहे म्हणजे ती सर्वच दृष्टीनं नापास आहे, असं सुचवलं जातं.
शरीराचा संदर्भ नसलेली असंख्य कामं बायकांना करता येतात. त्या ती करत असतात. त्यामध्ये आपापल्या कुवतीने नाव, पैसा मिळवतात. तो देणाऱ्या संस्था, समाज त्यांच्या शरीराची सुबकता विचारात घेत नाही. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे निकष असतात. केवळ सामाजिक संदर्भात मात्र स्त्रीच्या शरीराचा प्रमाणबद्ध आकार हा एकच निकष! आणि ती कसोटी पार करण्यासाठी काही स्त्रियांची विवेकशून्य धडपड चालते.
दिल्लीतल्या एका महिला विद्यापीठाने काही वर्षांपूर्वी आपल्या विद्यार्थिनींच्या आरोग्याचं सर्वेक्षण केल्याचं वाचनात आलं होतं. त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते. तरुण, सुखवस्तू विद्यार्थिनींमध्ये अ‍ॅनिमिया, रक्तक्षय, केसांचं अनारोग्य, कातडीचे आजार इत्यादींचं प्रचंड प्रमाण होतं. १०० टक्के फिट, तंदुरुस्त अशा मुली वीस टक्केही नव्हत्या. फार लांबचं सोडा, काही स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरणी माझ्या परिचयातल्या आहेत. त्या नेहमी सांगतात की, आजच्या तरुण मुलींची शक्ती गर्भ पोसण्यास, मुलं मोठी करण्यात फार कमी पडते आहे. त्या एकेका मुलामध्ये जेरीला येतात आणि तिशी-पस्तिशीतच बरीचशी ऊर्जा हरवून बसतात. यामागे व्यावसायिक ताण, प्रदूषण इत्यादी बाबी असतील. तसंच सदैव बारीक राहण्याचा हट्ट, आदर्श फिगरबद्दलच्या अवास्तव कल्पना यांचाही मोठा भाग असेल, असं मानण्याला जागा आहे.
कधी कधी मनात येतं, महिलांमध्ये एक मोठा असा वर्ग आहे, की जो आर्थिक अडचणीपायी कुपोषित आहे. घरातल्या सर्वाच्या गरजा, मागण्या भागवता भागवता स्वत:च्या शरीराकडे पुरेसं लक्ष द्यायला असमर्थ आहे. सर्वसाधारण संसारांमध्ये ‘नवऱ्यापेक्षा बायको नेहमी गरीब असते,’ या न्यायानेही पुष्कळ बायका पोषणमूल्यं मिळवण्यात कमी पडताहेत आणि आता असा एक वर्ग निर्माण होऊ घातलाय, जो स्वेच्छेने, हौसेने, कुपोषित, अल्पपोषित आहे. म्हणजे एकूण सरासरी महिलांच्या आरोग्याबद्दल काय अंदाज करता येईल?
बाईनं केव्हाही नाजूक, दुबळं, असहाय असावं आणि बलदंड पुरुषानं आपल्या बळकट खांद्यावर तिचा भार वाहावा, हा ‘आदर्श’ आपण किती दिवस गोंजारणार? उलट, बाई ही निष्कारण दुबळी, असहाय नसावी, तिला तिचं आयुष्य उत्तम प्रकारे पेलता यावं, त्यासाठी लागणारं शारीर बळ तिनं प्रयत्नाने, हक्काने कमवावं, त्या शरीरसाधनेला प्रोत्साहन मिळावं, असं म्हणायला हवं. शिवाय बाई धट्टीकट्टी असावी ती फक्त धडधाकट पोरं जन्माला घालण्यासाठी नाही; तर आयुष्याचा सर्वार्थाने उपभोग घेण्यासाठी! जितकी घरादारासाठी, तितकी तिच्या स्वत:साठी. शोभेच्या बाहुलीला एक कोणीतरी सजवतो. दुसरा कोणीतरी काचेआड ठेवतो. तसलं दिखाऊ आयुष्य ज्यांनी मागितलेलं नाही, त्यांना तसल्या दिखाऊ शरीरयष्टीचा मोह पडायला नको. दुसरा कोणी तसा दबाव आणत असेल तर त्यांना ठणकावून सांगता यायला हवं, की ‘बाप हो, मी मॉडेल नाही. मला साइझ झीरोचा पाठलाग करायची गरज नाही. फक्त सुबक शरीराची स्त्रीच प्रभावी ठरते, लक्ष वेधून घेते असं मला वाटत नाही. मार्मिक बोलण्याने, विचारांच्या अद्ययावततेने, माहितीच्या समृद्धीने मी नक्कीच अनेकांत उठून दिसते. माझ्यासाठी ते पुरेसं आहे.’
मंगला गोडबोले
mangalagodbole@gmail.com