Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

मैत्र जिवीचे..
आज साठीत पोहोचलेल्या बालपणीच्या या वर्गमैत्रिणी नित्यनेमाने दरवर्षी मुंबई-पुण्याबाहेर पडून दोन दिवस पुनभ्रेटीचा आनंद घेतात व शाळेतले फुलपंखी दिवस पुन्हा अनुभवतात..
रात्रीचे बारा वाजलेत. आजूबाजूच्या सगळ्या घरातून निजानीज झाली आहे. फक्त एका बंगल्यातून मधूनच हास्याचा खळखळाट आणि तारस्वरातलं बोलणं ऐकू येतंय्. कुठल्या शाळेची ट्रीप आलीय् वाटतं- मुलींचाच कलकलाट वाटतोय हा! बघू, या आहेत तरी कोण! अगं बाई, मुली कुठल्या, चक्क आज्या दिसताहेत की? एवढय़ा जणी आज मध्येच इथे कुठून उपटल्या? आणि केवढा तो कल्लोळ?
गेल्या बारा वर्षांत लोणावळा, तळेगाव, सासवड, औंध, पुणे, आवास, तारा, रोहे अशा वेगवेगळ्या गावांतल्या लोकांना नक्कीच हा प्रश्न पडत असणार. त्यांना माहीत नाही की, दिसायला सगळ्या जणी साठीतल्या असल्या तरी आज त्या अंतर्बाह्य

 

‘मुली’च झालेल्या आहेत. कारण आज त्या आपलं ‘रीयुनियन’- पुनर्भेट साजरी करताहेत. अगदी नित्यनियमाप्रमाणे दरवर्षी मुंबई-पुण्याबाहेर पडून दोन दिवस तरी आपले शाळेतले ते फुलपंखी दिवस पुन्हा एकदा अनुभवताहेत.
या आहेत शाळेच्या एका वर्गात असलेल्या चौतीस-पस्तीस जणी. वर्ग कुठला? तर दादर हिंदू कॉलनीतल्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींची शाळा नं. २ मधला. पण केव्हाचा? १९६० साली एस.एस.सी. पास झालेला. पण या वर्गाचं वैशिष्टय़ म्हणजे या सगळ्या जणींनी १९५० मध्ये पहिलीत प्रवेश घेतला तेव्हापासून आजतागायत म्हणजे सुमारे साठ र्वष त्या अगदी एकत्र म्हणजे घट्ट एकत्र आहेत. डबल प्रमोशनमुळे त्यांनी अकरावीपर्यंतचा प्रवास दहा वर्षांतच पुरा केला आणि १९६० मध्ये एस.एस.सी. होऊन बाहेर पडल्या, तरी आज पन्नास र्वष त्यांचं संघटन आहे तस्संच आहे, नव्हे थोडं अधिकच घट्ट झालंय्.
दादरची हिंदू कॉलनी म्हणजे सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी माणसांची मोठी वसाहत. इथली सर्वच मुलं न चुकता किंग जॉर्ज शाळेत जायची. कारण त्या संकुलातल्या सर्व शाळांतून देण्यात येणारं उच्च दर्जाचं शिक्षण. त्या वेळेला कुणाला इंग्रजी माध्यमाची ओढच नसायची. कारण आमच्या मराठी माध्यमाच्या शाळांतूनही इंग्रजी उत्तम प्रकारे शिकवलं जायचं. शाळेचा शिक्षक वर्गही दर्जेदार, श्रेष्ठ प्रतीचा, समर्पित वृत्तीचा आणि मुलांवर प्रेम करणारा. त्या काळात या शाळांतून शिकलेली सर्वच मुलं आजही आपल्या त्या शिक्षकांना विसरलेली नाहीत. नुसतं पुस्तकी शिक्षणच नाही तर चित्रकला, संगीत, नाटय़, निरनिराळे खेळ यांतही या शाळा आपल्या मुलांना प्रवीण करत असत. आजही शाळेचे दिवस आठवले की, मनाचा एक कोपरा हळवा होऊन जातो.
आम्ही सगळ्या मुली १९६० मध्ये एस.एस.सी. होऊन बाहेर पडल्यानंतर अनेक वर्ष शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं-बाळं, घरसंसार यातच बुडलो होतो. अनेक जणी उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्या. काही तिथंच स्थायिक झाल्या. कालांतरानं अनेकींची मुलंही परदेशात गेली, त्यांची लग्नं, लेकीसुनांची बाळंतपणं, बेबी सीटिंग यातही अनेक जणी मग्न झाल्या आणि अचानक आमच्या वर्गाची कायमची ‘मॉनिटर’ किशोरी हिला तीव्रतेने वाटलं की आम्ही सगळ्या मैत्रिणींनी (क्लास ऑफ नाइंटिन सिक्स्टी) एकत्र भेटलं पाहिजे. लगेच अनेकींचे पत्ते काढून फोनाफोनी करून एक दिवस मुक्रर केला आणि काय आश्चर्य- मुंबईतल्या २६ जणी आणि पुण्याच्या १४ जणी एका जागी भेटलो की! पुण्याच्या मुली तर बस करून आल्या. त्या दिवशीच्या अनुभवानं सर्वानी एकमतानं ठरवलं की दरवर्षी आपण असंच भेटायचं, तेही दोन दिवसांसाठी. शनिवारी सकाळी निघायचं आणि रविवारी रात्री परतायचं.
आमच्यापैकी बहुतेकजणी डॉक्टर्स, प्राध्यापक, बँक मॅनेजर्स, उद्योजक, प्राचार्य, लेखिका, संपादक झालेल्या आहेत, यशस्वी सुगृहिणी आहेत. कित्येकींची निरनिराळ्या गावात फार्म हाऊसेस आहेत, बंगले आहेत. आलटूनपालटून त्या आम्हाला आमंत्रण देतात आणि आम्ही चक्क २६ सीटर बस करून तिथे जातो. दोन दिवस खूप मौजमस्ती करतो. पुन्हा एकदा ‘शाळेतल्या मुली’ बनतो आणि घरी परततो. दरवर्षी नेमानं हा कार्यक्रम होतो आणि वाढत्या उत्सुकतेनं ‘पुढच्या वर्षी कुठे?’ याचा खल होतो. त्या दोन दिवसात खाणं-पिणं, भेंडय़ा लावणं, गाणी आणि शाळेतल्या कविता म्हणणं हे तर होतंच, पण त्याहून जास्त आतल्या मनाला खोल जाऊन भिडणारं एकमेकींच्या विचारांचं, अनुभवांचं आदानप्रदानही होतं. कुणाच्या काही समस्या असतील तर त्याही अगदी मोकळेपणानं सर्वासमोर मांडल्या जातात, आपापल्या परीनं सल्ले दिले जातात. कुणी जागतिक किंवा राष्ट्रीय स्तरावर काही पुरस्कार मिळवलेले असले तर त्यांचे सत्कारही होतात. मैत्रिणींकडून मिळालेल्या कौतुकानं सत्कारमूर्तीच्याही अंगावर मूठभर मांस चढतं.
या सगळ्यात विशेष जाणवतो तो या मैत्रिणींच्या नात्यातला निर्मळपणा. आज सगळ्याजणी साठी ओलांडून गेलेल्या आहेत. जगरहाटीप्रमाणे प्रत्येकीच्या गाठीशी सुख-दु:खांचे निरनिराळे अनुभव आहेत. पण एकमेकींच्या मैत्रसंबंधात कुठेही स्वार्थ नाही, हेवेदावे नाहीत. आहे ते निखळ प्रेम, निखळ मैत्रभाव..
आम्ही सगळ्या जणी साधारण एकाच वर्षांत साठीच्या झालो. तेव्हाच्या आम्ही आमची ‘सामुदायिक साठी’ साजरी केली. आमच्या पुण्याच्या मुलींच्या गटानं तर ‘साठीची लावणी’ सादर करून बहार आणली.
आयुष्याच्या वळणावरचं
तिसरं ठिकाण मोक्याचं
साठावं वरीस धोक्याचं बाई
साठावं वरीस धोक्याचं ..
पुढच्या वर्षी म्हणजे ३१ जानेवारी २०१० रोजी आम्ही आमच्या वर्गाची साठी (१९५०-२०१०) आणि शालेय जीवनाच्या समाप्तीची पन्नाशी (१९६०-२०१०) साजरी करणार आहोत. या निमित्त शाळेतच जमणार आहोत. यावेळी शिक्षिकांनाही बोलावणार आहोत. १९६० मध्ये एसएससी झालेल्या आमच्या शाळेतल्या (इं.ए.सो. गर्ल्स स्कूल नं. २) सर्व मुलींना आमचं आग्रहाचं आमंत्रण आहे. यासाठी १ जुलैपूर्वी संपर्क साधा (सकाळी ८ ते रात्री ८) किशोरी (कामत) पेडणेकर- ९९६९५७३२०८, कुमुद (भावे) कानिटकर- ९८९२७५००५९, मीना (पळणीटकर) दिवेकर- ९८१९०१९९९७, कुंदा (अजिंक्य) कीर्तिकर- ०२२- २४२२२३८५.
मृदुला प्रभुराम जोशी
mrudulapj@hotmail.com