Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

चिंचोणी
गेल्या वर्षी तिच्या सासूबाईंना पुण्याला आणलं. पण त्यांच्यामुळे तिलाही यायला उशीर झाला. कारण सासूबाई म्हणाल्या, ‘‘अखोजी झाल्याशिवाय मी नायी येत माय.’’ अक्षय्य तृतीया पितरांचा सण आणि तिचे सासरे गेलेले. पण सासूबाई स्पष्ट तशा म्हणाल्या नाहीत की, ‘तुया सासऱ्याले जिवू घातल्याशिवाय येत नायी’ म्हणून. कारण तसं स्पष्ट बोलण्याचा तो तेव्हाचा जमाना नव्हता. तिच्याही डोळ्यासमोर झरझर अक्षय्य तृतीया सरकत गेली. तिचे वडीलही वारलेले होते, पण त्यांचे काय ते पुण्याला गेल्यावर तिथे वार करतात. अर्थात तडजोड करीतच. कारण अखोजीला महत्त्व आहे, ते ‘चिंचोणी-मांडय़ाचे’; पण तिथे ती आमरस- पोळीवर भागवते.
विदर्भात एरवी भाजीत चिंच-गूळ घालण्याची प्रथा नाही, पण हा वर्षभराचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अखोजीला चिंचोणी

 

करतात. खेडय़ात त्यासाठी चिंचा विकत आणाव्या लागत नाहीत. चिंचेच्या झाडावरून खोसभर चिंचा पाडल्या की झाले अथवा ज्याच्या घरी वा शेतात चिंचेचे झाड आहे, त्याच्याकडे मागितल्या की, तो हौसेने देतो. कारण एरवी चिंचेचा उपयोग तांब्या-पितळेची भांडी घासण्यापुरताच केला जातो. चिंच खाल्ली की औषध उतरते, असा खेडय़ात समज आहे. शिवाय चिंच गुळासोबत खावी लागते. तशी गोड लागत नाही. त्यामुळे ती खाल्ली जात नाही.
‘अखोजी’ हा तसा शेतकऱ्यांचाच सण आहे. कारण त्या दिवशी कास्तकारीला सुरुवात करतात. शेतीच्या मशागतीचा तो मुहूर्ताचा दिवस असतो. त्या दिवशी मोठी लगबग असते. पदार्थाची रेलचेल असते. त्यामुळे गृहिणींचीही लगबग असते. ‘चिंचोणी’ हा या दिवशी सर्व पदार्थाचा राजा. त्याची तयारी एक-दीड महिन्याआधी सुरू होते.
खेडय़ात पूर्वी बलुतेदारी पद्धत होती. तेव्हा अक्षय्य तृतीयेसाठी कुंभार खास मातीचे घट करून आणायचे. त्या घटासोबत झाकणी व एक खापराचा तुकडा असायचाच. त्याबद्दलही त्याला अक्षय्य तृतीयेचे वाढण मिळायचे. अर्थात खरा मान या मडक्याचाच राहायचा. चिंचोणी करण्याची जी खास पद्धत होती, त्यात मडके महत्त्वाचे! अर्थात इतरही घागरी व करवे कुंभार पितरांच्या पूजेसाठी म्हणून आणून द्यायचा. पण हंडीसारखा हा घट महत्त्वाचा असायचा. गृहिणी तो घट धुऊन ठेवायच्या. आदल्या दिवशीच चिंच भिजू घालायच्या. त्यात भिजत घातलेल्या वाळ्याच्या मुळ्या वाटून घालायच्या. चिंचही वाटायची. शिवाय काथ व इतर सुगंधी वस्तू वाटून घालायच्या. हल्ली हा चिंचोणीचा मसाला विकतही मिळतो. पण पूर्वीच्या गृहिणी वाळ्यासोबतच वेलदोडे घालत. सर्व वाटून झाल्यावर धुतलेल्या घरात आरावर (चुलीतल्या विस्तवावर) घट चिंचोणी गरम करायला ठेवत. नंतर त्यावर त्याच मडक्यासोबत आणलेले झाकण ठेवत व खापराचा तुकडा चुलीत गरम करायला लाकडांच्या खाली ठेवून देत. अर्थात चिंचोणी विस्तवावर ठेवण्याआधी त्यात गूळ कालवीत. चुलीतला खापराचा तुकडा गरम होऊन लालभडक झाला की, मग तो सांडशीने चिंचोण्याच्या घटावर धरीत. त्यावर तूप घालीत. अर्थातच खापराचा तुकडा खोलगट असल्यामुळे त्यात तूप ओतता येई. जेवढे तूप त्या तुकडय़ावर मावेल तेवढे ओतून, नंतर त्यावर जिरे टाकीत. खापराचा तुकडा गरम असल्यामुळे तूप गरम होई. गरम तुपात जिरे टाकल्यामुळे ते छान तडतडायला लागे. आणि तो खापराचा तुकडा आरावर ठेवलेल्या चिंचोणीच्या घटात, झाकण काढून सोडून देत आणि परत झाकण ठेवीत. त्यामुळे चिंचोण्याला तडतडीत फोडणी बसे आणि आरावर ते छान गरम होत राही. ही खरी चिंचोणी करण्याची ग्रामीण पद्धत. त्यात कुंभाराचा सहभाग मोठा व महत्त्वाचा सुद्धा.
अखोजीला चिंचोण्यासोबत आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे ‘मांडे’. मांडय़ालाही कुंभाराचा हातभार लागतोच. कारण कुंभार त्यासाठी लागणारा खापराचा पालथा तवा करून आणतो. मातीचेच पसरट गोलाकार घमेले तो करून आणतो. ते चुलीवर पालथे ठेवायचे आणि मांडे त्या गरम तव्यावर शेकायचे. मांडे रव्याचे करतात. त्यासाठी गहू ओलवतात. अखोजीला पितरांसाठी कानोले (करंज्या) लागतातच. तेव्हा करंज्या, पापडय़ा व मांडे यांसाठी बेताने गहू ओलवतात. रवा मुरला की, चुरून -गोलाकार चापटी करून मग पालथ्या मुठीवर मांडा मोठा करतात आणि पालथ्या तव्यावर शेकून घडी घालून ठेवतात. मांडय़ांची घडीही जरा वेगळीच असते. मांडे सर्वाना करता येत नसत.
गावात एक मामी होत्या. त्यांनाच फक्त मांडे करता येत होते. त्यामुळे अखोजीच्या दिवशी प्रत्येक घरी त्यांना खास असं निमंत्रण असायचं. तेही आग्रहाचं- ‘निदान पितरांपुरते मांडे करून द्या ना जी!’ पण मामींना त्यात आनंद वाटे. त्यातल्या त्यात वेळ काढून त्या सर्वत्र जात. त्यांचीही त्या दिवशी वेगळीच लगबग असे. एक तर घराचा रामरगाडा त्यांनाच निस्तरावा लागे. तरीही त्या दिवशी त्या खूश असत. प्रत्येक गृहिणी त्यांची वाट बघत. त्याचा त्यांना खूप आनंद होत असे. हा दिवस त्यांच्यासाठी खास आनंदाचा असे.
मराठी महिन्यांप्रमाणे चैत्रापासून नवीन वर्ष सुरू होते. गुढीपाडवा वर्षांचा पहिला सण, पण कृषी संस्कृतीत तसे नाही. आषाढी पौर्णिमा, ज्याला शहरात गुरुपौर्णिमा म्हणतात- तो वर्षांचा पहिला सण. कारण यावेळी पहिले पीक निघून शेती रिकामी झालेली असते. बायकांनी दाणादुणा वेचून पूर्ण शेत काळेभोर केलेलं असते. अशा शेतात शेताची पूजा करून या दिवशी नांगराची पूजा करून शेत नांगरले जाते. पितरांचीही पूजा केली जाते. अक्षय्यतृतीयेला लेकी माहेरी येतात. झाडाला झोके टांगतात. त्यांच्या माहेरपणासाठीही नव्हाळीचे पदार्थ करतात. पण महत्त्व चिंचोणी आणि मांडय़ाचेच राहते. गजाननबाबांच्या पोथीत खास चिंचोण्याचा उल्लेख आहे. आजकाल जेवणाची कंत्राटं घेणारेही मांडे करून घालतात, पण त्याची चव चुलीवरच्या मांडय़ासारखी लागत नाही. कारण चुलीवरच्या मांडय़ांमध्ये ते करणाऱ्या बाईचा त्यात जीव गुंतलेला असतो.
चिंचोण्यात बुडवून तळलेल्या कुरडय़ा आणि सांडोळ्या खूपच छान लागतात. त्यामुळे चिंचोण्यात त्या बुडवून बाळगोपाळ खातात व पाणी-पुरीसारखी मजा घेतात. पण चिंचोणी फक्त आंबटगोड लागते, ती तिखट नसते. विशेष म्हणजे चिंचोणी चार-पाच दिवस टिकू शकते. उलट ती दुसऱ्याच दिवशी छान लागते.
अशाच एका खेडय़ातील घरी अखोजीला चिंचोणी शिजवले. सण झाला. थोडेफार उरले. दुसऱ्या दिवशी खाऊ, म्हणून ठेवून दिले. सणाचा थकवा सगळ्यांनाच आला होता. रात्री पटापट सगळे झोपी गेले. रात्री स्वयंपाकघरात मांजर आलं. उंदीर पकडण्याच्या नादात धावत गेलं. तिचा पाय लागून मडक्यावरचे झाकण खाली पडले आणि नेमकी त्यात पाल पडली. चिंचोण्याच्या चिकटपणामुळे पालीला बाहेर पडता येईना. शेवटी त्यातच तिचा प्राण गेला. सकाळी चहा करताना सुनेला वाटले, सासूने रात्री चोरून चिंचोणी मुलाला प्यायला दिले. कारण त्याला ते खूप आवडायचे. तिने परत झाकण ठेवले. सकाळी खरेच सासूने न्याहरी झाल्यावर मुलाला चिंचोणी प्यायला दिले. आता त्यात पाल पडली, हे कोणाला माहिती नव्हते. आता सुनेला चिंचोणी प्यावेसे वाटले. पण सासूने लगेच खुंटीला टांगलेल्या कढईत मडके ठेवून दिले. बरे, सासूने मडक्यात डोकावून चिंचोणी किती आहे, हे पाहिलेही; पण आत सोडलेल्या खापरखुंडीमुळे तिला काही संशय आला नाही व काही दिसलंही नाही. मुलगा शेतात गेला. जशी चिंचोणी पचू लागली, तसे त्याला कसेतरी होऊ लागलं. नंतर तर उलटय़ाही सुरू झाल्या. खेडय़ात कुठला डॉक्टर मिळतो? हे दे, ते दे करता करता वेळ निघून गेली. बघता बघता तो भुईवर कलंडला. तसे चिंचोणीत काहीतरी पडले, हे सगळ्यांच्या लक्षात आले. ते बाहेर ओतले, तेव्हा कुठे त्यात काळी पाल दिसली. पण आता काहीच इलाज नव्हता. नंतर त्या घरी चिंचोणी करावेसे वाटले नाही आणि खावेसेही वाटले नाही. चिंचोणीऐवजी पर्यायी पदार्थ म्हणून ‘आमरस’ ज्याला शहरात पन्हं म्हणतात, ते केले जाऊ लागले. त्यांच्याच शेतात चिंचेचे झाड होते. ते मात्र सासूने तोडून टाकले, चिंचोण्याची आठवणच नको म्हणून. तरीही सुनेला कायम अपराधी वाटतच राहिले.
डॉ. प्रतिमा इंगोले