Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

नवनिर्माणाचा ध्यासपंथी
एकदा स्वत:च्या मनाशी ठरवलं की, जिवाची पर्वा न करता बेधडकपणे कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाणाऱ्या कार्यकर्त्यांचं नाव आहे- श्रीधर क्षीरसागर. मालाड-मालवणी भागात सामाजिक काम करणाऱ्या ‘नवनिर्माण समाज विकास केंद्र’ या स्वयंसेवी सामाजिक संस्थेचा आणि ‘नवनिर्माण कम्युनिटी र्सिोस सेंटर’चा श्रीधर संस्थापक आहे. सध्या त्याची शंभरहून अधिक निष्ठावान कार्यकर्त्यांची टीम वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे. श्रीधरचा हा प्रवास अत्यंत खडतर तितकाच रोमहर्षक आहे.
१९९२ चा डिसेंबर महिना! मुंबईतल्या अनेक भागांमध्ये धार्मिक दंगल उसळली होती. जागोजागी कर्फ्यू लागला होता! मालाडच्या मालवणी भागात दहावीतला एक मुस्लिम मुलगा सहज म्हणून घरातून बाहेर पडला आणि गस्तीवरील पोलिसाने झाडलेली गोळी त्याच्या दोन्ही पायांतून आरपार गेली. पोरगा स्वत:च्या घराच्या दारातच कोसळला. घरातल्या लोकांनी त्याला

 

कसाबसा उचलून आत घेतलं. सगळे कुटुंबीय डोक्याला हात लावून पोराच्या भोवताली चिंताक्रांत बसले होते. त्याच भागात राहणाऱ्या एका तरुण सामाजिक कार्यकर्त्यांला कळलं की, शाळकरी पोराला गोळी लागलीय. त्याने पोलिसांना खूप वेळा फोन केला. प्रत्येक वेळेस पोलिसांनी त्याचं नाव विचारलं. नाव ऐकल्यावर पोलीस म्हणायचे, ‘‘तू तर हिंदू वाटतोस. तुला काय पडलंय त्या मुसलमान पोराचं. तू गप्प बस ना!’’ त्या कार्यकर्त्यांने पोलिसांना निर्वाणीचा इशारा दिला- ‘‘तुम्ही काही करणार नसलात तर मी कर्फ्यू असला तरीही त्या मुलापर्यंत पोहोचणार आणि त्याला हॉस्पिटलला नेणार. त्यादरम्यान माझं काहीही झालं तरी त्याची मला पर्वा नाही.’’ तो कार्यकर्ता बेडरपणे त्या मुलाच्या घरी पोहोचला. घरातल्या लोकांचा त्याच्यावर विश्वासच बसेना की, हा खरंच आपल्या पोराला वाचवायला आलाय म्हणून! माणसांचा माणसांवरचा विश्वास पार उडालेल्या त्या काळात मरणासन्न पोराचा सख्खा भाऊही, हा कार्यकर्ता आपलं काही बरं वाईट करेल का, या भीतीने त्याच्याबरोबर रुग्णालयात जायला तयार होईना. महत्प्रयासाने त्या कार्यकर्त्यांने एका हिंदू रिक्षावाल्याला पकडलं आणि पोराला घेऊन भगवती हॉस्पिटल गाठलं. पोराला पटापट उपचार मिळाले. त्याचे दोन्ही पाय वाचले आणि तोही वाचला.
एकदा स्वत:च्या मनाशी ठरवलं की, जिवाचीही पर्वा न करता बेधडकपणे कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाणाऱ्या त्या कार्यकर्त्यांचं नाव आहे- श्रीधर क्षीरसागर. मुंबईच्या मालाड-मालवणी भागात आपल्या कामामुळे वेगळी ओळख निर्माण केलेल्या ‘नवनिर्माण समाज विकास केंद्र’ या विश्वस्त स्वयंसेवी सामाजिक संस्थेचा आणि ‘नवनिर्माण कम्युनिटी र्सिोस सेंटर’चा श्रीधर संस्थापक आहे. सध्या शंभरापेक्षा जास्त निष्ठावान कार्यकर्त्यांचा त्याचा गट वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये काम करताना दिसत असला तरी इथपर्यंत पोहोचण्याचा श्रीधरचा प्रवास मात्र खडतर आणि रोमहर्षक आहे. अभियांत्रिकीचा विद्यार्थी असताना श्रीधरला राष्ट्र सेवादलाच्या शिबिरात जायची संधी मिळाली. त्याच काळात तो युथ हॉस्टेल्सबरोबर सह्य़ाद्रीच्या डोंगरदऱ्यातही भटकायचा. अशाच एका भटकंतीत त्याची गाठ पडली सेवादलातल्या काही सक्रिय कार्यकर्त्यांशी आणि ‘मिशेल’शीही! ही मुलगी (तेव्हाचे नाव मनीषा) सेवादलाच्या कार्यक्रमात गोड आणि मोकळ्या आवाजात गाणी म्हणायची. तिची गाणी ऐकण्यासाठी आणि अर्थातच तिच्यासाठीही श्रीधर सेवादलाच्या कामात शिरला. काही काळातच त्याला सेवा दलाचा साचलेपणा कळून चुकला. तो तिथे फार काळ रमला नाही. तिथून बाहेर पडून बरोबरीच्या काही तरुणांसोबत त्याने ‘प्रगत युवा मंडळ’ सुरू केलं. ‘शिधावाटपातला भ्रष्टाचार’, ‘बेस्ट भाववाढीचा निषेध मोचा’ इ. संघर्षांत्मक सामाजिक कामांमधून त्याची ओळख झाली कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्‍सवादी) कॉम्रेड श्रीधरन आणि कॉम्रेड चारुल जोशी यांच्याशी. याच काळात श्रीधर डॉ. धर्मानंद कोसंबी, डॉ. य. दि. फडके अशांची सामाजिक/ ऐतिहासिक पुस्तकं एकापाठोपाठ एक वाचायचा. कॉम्रेड मंडळींशी तावातावाने चर्चा करून आपली मतं मांडायचा. या देवाणघेवाणीतच खरं तर श्रीधरच्या पुढच्या वाटचालीचा भक्कम वैचारिक पाया रोवला गेला. मालाडच्या उत्कर्ष मंदिर शाळेचा श्रीधर हा हुशार विद्यार्थी. १९८९ मध्ये मृणाल गोरे यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्याच्या कामात त्याने त्यावर्षीची अभियांत्रिकीची परीक्षा दिली नाही आणि १९८९-९० मध्ये ‘हरसूद’ गावात नर्मदा बचाव आंदोलनासाठी ‘नर्मदा की पुकार’ या पथनाटय़ाचे सर्वत्र प्रयोग करण्यात आणखी एक वर्ष फुकट गेलं. पुढे चार वर्षांचा फादर अ‍ॅग्नेलमधला अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रम त्याने सहा वर्षांंत पूर्ण केला. यादरम्यान कुटुंबातील थोरामोठय़ांचा त्याने भरपूर ओरडा खाल्ला. भारावलेल्या अवस्थेत अनेक बुद्धिमान विद्यार्थ्यांसारखाच सगळं सोडून आदिवासींमध्ये जाऊन पूर्णवेळ काम करण्याचा तेव्हा श्रीधरचा विचार होता. या विचारांमुळेच बाबरी मशीद दंगलीच्या काळात त्याने अजगरअली इंजिनीयर यांच्यासोबत ‘पीपल्स सेंटर फॉर कम्युनल हार्मनी’ ही संस्था सुरू केली. संस्थेतर्फे सुरत, बिहार आणि मुंबईतली दंगल याविषयी सत्यशोधनाचं काम केलं. वेळप्रसंगी अनारक्षित डब्यात बसून प्रवास करून श्रीधरने दंगलींविषयी संशोधनाचं काम केलं. हे शोधनिबंध त्या वेळेस ‘इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पॉलिटिकल वीकली’ (EPW) मध्ये छापून यायचे. दंगलीच्या ठिकाणी कसंही करून पोचायचं आणि ‘आँखो देखा हाल’ लिहून काढायचा, हे उद्योग त्याने दोन-तीन वर्षं केले. वेळी- अवेळी घरी पोहोचणाऱ्या श्रीधरला जेवण मिळायचं. मात्र स्वखर्चाच्या पैशांची कसलीच तरतूद नव्हती. श्रीधर शिकवण्या घ्यायचा, पण खरी मदत व्हायची ती नोकरी करणाऱ्या मिशेलकडूनच. तेव्हा जरी दोघांनी लग्न केलं नव्हतं, तरी ती त्याला आर्थिक मदत करायची. वैचारिक काथ्याकूट आणि सत्यशोधन यातलं श्रीधरचं स्वारस्य निघून जाण्यास तसाच एक भीषण प्रसंग कारणीभूत ठरला. झालं असं की, बिहार दंगलीच्या सत्यसंशोधनासाठी तो प्रत्यक्ष सीतामढी गावात पोहोचला आणि डोळ्यांदेखत त्याने एका सर्वस्वी निरपराध लहान मुलाचा एक पाय एका माणसाने तर दुसरा दुसऱ्याने ओढत अक्षरश: एखाद्या गुराला सोलावं तसं सोलून काढताना बघितलं. श्रीधर आरपार हादरला. सुन्न झाला. त्या पोराचे शारीरिक हाल श्रीधरसाठी मानसिक नरकयातनाच होत्या. तो आतून प्रचंड अस्वस्थ, बेचैन होता. स्वत:च्या माणूसपणाचीही त्याला लाज वाटायची. वाटायचं की, हे असं षंढासारखं नुसतं बघून, त्यावर लेख लिहून आपण नक्की काय साधणार? प्रत्यक्षात कुठल्या ना कुठल्या तरी प्रश्नाला थेट भिडणार की नाही? अशा धुमसणाऱ्या अस्वस्थतेत तो सुरतेच्या दंगलीला जाऊन आला आणि तिकडून परतला, तेव्हा मुंबईत हिंदू- मुस्लीम दंगल उसळली होती. लेखाच्या सुरुवातीचा प्रसंग घडला, तो याच काळात. तेव्हाच श्रीधरने ठरवलं की, रचनात्मक कार्य सुरू करायचं. शिक्षण पूर्ण करून पाठक इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये त्याने अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली. १९९४ मध्ये त्याने मिशेलबरोबर लग्नही केलं. लग्न झालं, दोन गोड मुलींचा जन्म झाला, पण म्हणून श्रीधर सर्वस्वी संसारी झाला नाही. त्याच्यातला चळवळ्या कार्यकर्ता त्याला स्वस्थ बसू देईना. बाहेरच्या ‘उचापत्या’ करतो, म्हणून पाठक कॉलेजने त्याला बडतर्फ केलं आणि संसारासाठी त्याने ‘महाराष्ट्र लोकहित सेवा मंडळ’ या संस्थेत अर्धवेळ कामाला सुरुवात केली. या संस्थेतर्फे आजूबाजूच्या झोपडपट्टीतल्या गोरगरिबांना धान्य वाटप केले जायचे. मात्र मुलांना मिळणाऱ्या साध्या चॉकलेट्समधली ९० टक्के चॉकलेट्स संस्थाचालकांच्या घरी जायची. हे बघून त्याने धमक्यांना न घाबरता त्या वेळचे हजारभर लोकांचा मोर्चा संस्थाचालकांसमोर नेला. . श्रीधरने इतर संस्थाचालकांना पटवून दिलं की, काही लोकांच्या भ्रष्टाचारामुळे संस्थेत नोकरीला असणारी व संस्था ज्यांना मदत करते, ती गोरगरीब लोकं का म्हणून भरडली जावीत? आर्थिक मदत देणाऱ्या संस्थेने त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला की, ही संस्था तूच हातात घेशील तर ती आम्ही चालू ठेवतो, नाही तर बंद करतो आणि त्यातूनच एका नवीन संस्था ‘नवनिर्माण समाज विकास केंद्रा’ची स्थापना करण्याचा निर्णय श्रीधरने १९९६ मध्ये घेतला.
‘स्वयंपूर्णता- मदत नव्हे’ हे न. स. वि. केंद्राचे (NSVK) त्याने ब्रीदवाक्य ठरवले. याला अनुसरून त्याने समाजातील जे जे घटक- मग त्यात स्त्रिया, लहान मुले आणि तृतीयपंथी मंडळी यापैकी कोणीही, कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करत असतील तर त्यांना एकत्र आणायचं, त्यांच्यातील क्षमतांची त्यांना जाणीव करून द्यायची, त्या क्षमतांचा विकास घडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करायचं, अडल्या-नडलेल्या सर्वाना स्वयंपूर्णतेसाठी नानाविध प्रकल्प करायला मदत करायची आणि शेवटी ‘सामाजिक मालकीच्या’ तत्त्वावर त्या प्रकल्पाचा मालकी हक्कही त्यांच्याकडे सोपवायचा, असा खऱ्या अर्थाने सर्वागीण समाजविकासाचा प्रयत्न श्रीधरने धडाडीने सुरू केला. तो नेहमीच्या रुळलेल्या वाटेने गेला नाही. कोणत्याही कारणाने शिक्षण सोडून द्यावे लागलेल्यांसाठी शाळा गळती थांबवण्याचे वर्ग सुरू केले. तिथल्याच काही जणांना शिक्षक म्हणून तयार करून गरजू विद्यार्थ्यांना मदत करायला सुरुवात केली. यातूनच श्रीधरने नवनिर्माण समाज विकास केंद्राच्या दोन मुख्य प्रकल्पांना सुरुवात केली. १) कौटुंबिक विकास कार्यक्रम २) मायक्रो क्रेडिट.
कौटुंबिक विकास कार्यक्रमाचे मुख्य उद्देश्य म्हणजे कुटुंबाला त्यांच्या आरोग्यविषयक, शिक्षणविषयक, आर्थिक प्रश्न समजावून देणे आणि त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीचे सल्ले, मार्गदर्शन व योग्य प्रशिक्षण देऊन संपूर्ण कुटुंब आत्मनिर्भर करणे. १९९८ मध्ये फक्त दोन कार्यकर्त्यांच्या मदतीने सुरू केलेल्या या कार्यक्रमासाठी श्रीधरने गेल्या ११ वर्षांत २३ प्रशिक्षित व समर्पित कार्यकर्त्यांचा गट तयार केला असून त्यांच्या मदतीने मालवणीतल्या न्यू कलेक्टर कम्पाऊंड, आकाशवाणी, चारकोप (कांदिवली), आंबोजवाडी (मालाड) व धारावीतही हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. खास करून कुटुंबातली ‘स्त्री’ तिच्या जाचातून, कोशातून कशी बाहेर येईल व संपूर्ण घराचा कायापालट होऊन ते कुटुंब ताठ मानेने समाजात वावरायला लागेल, याकडे श्रीधर लक्ष देतो. अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम राबवला तर वर्षभरात सुमारे बाराशे कुटुंबांचा विकास होऊ शकतो, असं प्रकल्पप्रमुख पूनम नवले अभिमानाने सांगते.
ज्या गरीब व्यक्तींना कोणतीही बँक, कोणतीही क्रेडिट सोसायटी थारा देत नाही, अशा लोकांना कर्ज देण्याचे आणि काही काळानंतर हप्त्याहप्त्याने का होईना, कर्ज परत घेण्याचे काम ‘मायक्रो क्रेडिट’ या प्रकल्पाद्वारे करण्यात येते. कर्जाची ९० टक्के रक्कम व्यवसायासाठी तर १० टक्के शिक्षणासाठी खर्च होईल, याकडे कटाक्षाने लक्ष ठेवले जाते. व्यवसाय व्यवस्थित सुरू झाल्यावर कर्जफेडीच्या हप्त्यासोबत बचतीलाही कशी सुरुवात होईल, हे बघून या बचतीतूनच पुन्हा दुसरे कर्ज देण्यात येते. दुसऱ्या कर्जापूर्वी त्या व्यक्तीला न. स. वि. केंद्राची कमीत कमी दोन-तीन प्रशिक्षणे घ्यावीच लागतात. या प्रशिक्षणाची धुरा गेली १०-१२ वर्षे श्रीधर उत्तम प्रकारे सांभाळत आहे. आजमितीस कर्जरूपाने दिलेली रक्कम सुमारे ६८ लाख असून बचतीची रक्कम २७ लाख आहे. याबाबत प्रकल्पप्रमुख आशा कांबळे हिने सांगितले की, या १०-१२ वर्षांत कर्जफेडीचे प्रमाण ९९ टक्के इतके उत्तम असून फसवणुकीचे प्रमाण अत्यल्प आहे. ही आशा कांबळे न. स. वि. केंद्रात (NSVK) आली, तेव्हा फक्त १२वी उत्तीर्ण होती. सध्या ती बिझनेस मॅनेजमेंटची पदवी प्राप्त करीत आहे. आशासारखे अनेकजण स्वत:मध्ये अंतर्बाह्य़ सुधारणा घडवीत इतरांना जाणून घेत, सोबत घेऊन खऱ्या अर्थाने नवनिर्माणासाठी झटत आहेत. यातच श्रीधरच्या प्रचंड धडपडीचे, मेहनतीचे, निष्ठेचे सार्थक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे.
या धडपडीत श्रीधरला ज्या काही ध्ययेवादी कार्यकर्त्यांची साथ मिळाली आह, त्यामध्ये तृतीयपंथीयांसाठीच्या ‘आस्था’ प्रकल्पाचा प्रमुख संजय शिंदे, क्षयरोग निर्मूलन प्रकल्प प्रमुख राजन शिंदे आणि सरकारी नोकरीचा भरपूर अनुभव गाठीशी असलेले न.स.वि. केंद्राचे अध्यक्ष जयकांत अज्मूल या तिघांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील.
पहिले दोन प्रकल्प यशस्वीपणे सुरू असतानाच १९९८ च्या पालिका निवडणुकीसाठी न. स. वि. केंद्राने ‘लोक जाहीरनामा’ तयार केला होता. सर्व उमेदवारांना एकाच व्यासपीठावर बोलावून त्यांच्यासमोर हा जाहीरनामा श्रीधरने ठेवला. कार्यक्रमाचे सर्वसंमतीने ध्वनिमुद्रणही केले होते. सभेमध्ये जनतेपैकी कोणालाही आपले प्रश्न मांडण्याची मुभा होती. याच सभेत कल्पना सय्यद नावाची एक तृतीयपंथी व्यासपीठावर आली. मराठी मिश्रित हिंदीत तिने त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. सभेनंतर श्रीधर कल्पनाला भेटला, तिच्याशी चर्चा केली. तिच्यासोबत त्यांच्या समाजातील अनेकजणांबरोबर बैठका घेतल्या. सर्वप्रथम त्यांची सहकारी बँक स्थापन करण्याचे कठीण काम श्रीधरने हातात घेतले. तीन-चार वर्षांतच कल्पना एड्सने मरण पावली. तिच्या आकस्मिक मृत्यूची कारणे शोधताना श्रीधरसमोर यापूर्वी कधीही न पाहिलेले वेगळे विश्व उभे ठाकले आणि तृतीयपंथीयांच्या भयाण आयुष्याची धग त्याच्यापर्यंत थेट भिडली. त्यांच्याशी गप्पा मारताना लहानपणापासूनच्या त्यांच्या घुसमटीची श्रीधरला पुरेपूर जाणीव झाली. त्यांच्या शारीरिक, मानसिक, लैंगिक समस्यांचे रौद्र स्वरूप त्याला कळले. समाजाच्या मुख्य धारेपासून दूर जाऊनही या लोकांच्या परिस्थितीत फार काही फरक पडत नाही, हे जेव्हा श्रीधरच्या लक्षात आले, तेव्हा त्याने तृतीयपंथीयांपैकी काही जणींना इंडियन सोसायटी फॉर अप्लाइड बिव्हेरिअल सायन्सच्या (ISABS) प्रयोगशाळांना पाठवायला सुरुवात केली. तत्पूर्वी सुमारे २००३-०४ मध्ये श्रीधरला त्याच्या एका नवतेज नावाच्या मैत्रिणीने तिच्या खर्चाने ISABS च्या प्राथमिक लॅबसाठी (Basic Lab) गोव्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठवलं होतं. प्रचंड चकचकीत हॉटेलात बसून अनेक मंडळी जेवणातलं कितीतरी अन्न फेकतात, मस्त मजा करतायत असं बघितल्यावर श्रीधर आयोजकांशी भांडला. स्वत:चे सामान घेऊन निघाला. ISABS च्या प्रशिक्षकार्ंपैकी एका-दोघांनी त्याला समजावलं की ‘‘तू एक दिवस थांबून बघ आणि नंतर तुझा निर्णय घे’’! त्या एक दिवसाच्या कार्यशाळेत श्रीधरने अनुभवलं की, वेगवेगळ्या आर्थिक वर्गाची/ जातीची/ धर्माची/ लिंगाची/ व्यवसायाच्या व्यक्तींमधील भेद विसरून, कित्येकांचे मुखवटे गळून माणसातलं माणूसपण एकमेकांना खूप जवळ आणलं! एक प्रकारची ऊर्जा निर्माण होऊन सर्वाचंच सध्याचं आयुष्य सुखी होतंय, हेही त्याला जाणवलं. ‘बेसिक’ लॅब पूर्ण करून मुंबईत परतल्यावर त्याला जाणवलं की, तो स्वत:ही एक वेगळाच माणूस म्हणून घडतोय. आजूबाजूची बरीच मंडळी त्याच्याशी खूप छान वागत आहेत. त्याने स्वत:चे परीक्षण केले, तेव्हा त्याला कळले की खरे तर तो खूप बदलतोय, म्हणून इतर मंडळी बदलत आहेत. एका प्रयोगशाळेचा स्वत:वरचा झालेला सकारात्मक परिणाम बघून श्रीधरने ISABS च्या निरीक्षण, समन्वय आणि वर्तन शास्त्र या पुढच्या पायऱ्या पार केल्या. पैसेवाली मंडळी ISABS चा लाभ घेऊ शकतात, पण ज्यांना एवढे पैसे देणे परवडणार नाही, त्यांचे काय? अशांसाठी मग श्रीधरने कमी खर्चातली प्रयोगशाळा मालाडला मनोरी बीचवरच्या एका रिसॉर्टमध्ये केली. हळूहळू ISABS च्या प्रयोगशाळेमध्ये देशभरात प्रथमच तृतीयपंथी आणि झोपडपट्टीतील मुले इ.चा सहभाग वाढायला लागला. ‘ममता’ व ‘सौम्या’ नावाच्या दोघीजणी ISABS च्या कार्यशाळेमध्ये एकदम रुळल्यामुळे इतर कार्यकर्त्यांनाही श्रीधर समाजातल्या मुख्य प्रवाहात आणायचा प्रयत्न करत आहे. ज्या दोघी-तिघी काही वर्षांपर्यंत तुमच्या-आमच्या तथाकथित प्रतिष्ठित लोकांशी बोलताना कायम मान खाली घालून बोलायच्या, त्या आता इतर सर्व कार्यकर्त्यांबरोबर हसतखेळत गप्पा मारतात, तावातावाने वाद घालून स्वत:ची मते मांडतात आणि सर्वासोबत डबेही खातात. त्यांनी भले त्यांचे सर्व उद्योग सोडले असले, तरीही आपला हा समाज त्यांना आहे तसं स्वीकारणार का, हा मुख्य प्रश्न आहे.
वेगवेगळ्या परिस्थितीत माणसातला अमानुषपणा बघूनही श्रीधरचा ‘माणसांवरचा’ आणि ‘माणुसकी’वरचा विश्वास उडत नाही. जेमतेम ४० वर्षांचा एक तरुण या समाजातच राहून, किंचितही वैफल्यग्रस्त न होता स्वसामर्थ्यांवर अत्यंत आत्मविश्वासाने स्वत:ला ‘नवसमाज निर्माणाच्या’ कामात सर्वस्वी झोकून देतो. एवढंच नव्हे, तर अत्यंत निष्ठावान, प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी तयार करून ‘माणूस’ म्हणून हजारो लोकांना खऱ्या अर्थाने ताठ मानेने जगायला प्रवृत्त करू शकतो, हे बघून माझ्यासारखीच तुमचीही समाजाविषयीची, पर्यायाने साऱ्या देशाच्या भवितव्याविषयीची काळजी थोडी तरी कमी होईल, याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही. संपर्क- navnirmanindia@gmail.com
रोहिणी गोविलकर