Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन

यंदा उन्हाळी सुट्टीत घरा-घरांतल्या पीसींचा अंदाज घेतल्यावर लक्षात आलं की, बहुसंख्य मुले ‘जीटीए मॅनिया’ने पछाडलेली आहेत. ‘ग्रॅण्ड थेफ्ट ऑटो’ अर्थात जीटीए नावाच्या या क्राइम थ्रिलर व्हिडियो गेमचे लोण अमेरिकेतून आता सर्व भारतभर पसरलंय.
मुलांनी कॉम्प्युटरवर गेम्स खेळावेत की खेळू नये, ही चर्चा आता मागे पडलीय. मुलं पीसीवर सर्रास गेम खेळत असताना ‘पॅरेण्टल गाइडन्स’ ही संज्ञाही प्रत्यक्षात फारशी यशस्वी ठरलेली नाही, हे अनेक पालकही कबूल करतील. उलट, काहीजण हौसेने मुलांना एक्सबॉक्स किंवा प्ले-स्टेशनही उपलब्ध करून देताना दिसतात. यंत्र हाती आलं की मात्र ही चिमुरडी मुलं बापाचेही बाप ठरताना दिसतात.
व्हिडियो गेम्सचे चांगले परिणाम आणि दुष्परिणाम यावर अगदी जगभर मत-मतांतरे व्यक्त केली जात आहेत. पण गेम इण्डस्ट्री बूममध्ये आहे, एवढं नक्की. आधुनिक टीव्ही संच, इंटरॅक्टिव्ह डीश टीव्ही चॅनेल्स, मोबाइल, घडय़ाळं ते अगदी की-

 

चेन्सपर्यंत सर्वत्र व्हिडियो गेम्स व्यापलेले दिसतात. ऑफिसात पत्त्यांच्या ‘फ्री सेल’मध्ये रमलेले, बबल किंवा ब्रिक्स फोडत बसलेले महाभाग आपण पाहतोच. प्रवासातला वेळ मोबाइलमधला ‘टेट्रिस’ खेळण्यात सत्कारणी लावणारेही मोठय़ा प्रमाणावर दिसतात. मग पोरांनी खेळला कॉम्प्युटरवर खेळ तास- दोन तास, तर कुठं काय बिघडलं, असा सगळ्यांचाच पवित्रा असतो.
मात्र, यंदाच्या सुट्टीत घरा-घरांतल्या पीसींचा अंदाज घेतल्यावर लक्षात आलं की, शहरांमधली बहुसंख्य मुलं, विशेषत: मुलगे जीटीए मॅनियाने पछाडलेले आहेत. ‘ग्रॅण्ड थेफ्ट ऑटो’ अर्थात जीटीए नावाच्या या व्हिडियो खेळाचं लोण अमेरिकेतून आता भारतीय शहरांमध्ये पसरलंय. गेल्या दोन-तीन वर्षांत पायरटेड डीव्हीडींच्या मार्गाने हळूहळू ‘जीटीए’ भारतीय घरा-घरांत शिरला आणि भारतीय मुलांवर त्याचा अंमल दिसू लागला. या क्राइम थ्रिलर गेमने भारतातल्या वय वर्षे सात ते १७ या वयोगटातल्या मुलांना वेड लावलंय, हे सत्य आहे. ज्यांच्या घरात कुमारवयाचा मुलगा आहे आणि पीसी आहे, त्यांच्या घरात ‘जीटीए’ नाही, असं क्वचितच होईल. ज्यांच्याकडे ‘जीटीए’ नाही, अशा मुलांना गावंढळ समजलं जातं. अशा ‘मागे पडलेल्या’ मुलांच्या उत्थानासाठी शाळेतले, चाळीतले, कॉलनीतले किंवा सोसायटीतले समवयस्क जीटीएच्या पायरेटेड डीव्हीडी पुरवतात.
‘जीटीए’ गेमबद्दलच्या चर्चा हा मुलांच्या गप्पांमधला महत्त्वाचा भाग असतो. या कॉम्प्युटर खेळातल्या मिशन्सबद्दल मुलं सतत बोलत असतात. या खेळातले चीटकोड मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणात वितरीत केले जातात. बऱ्याच मुलांना हे चीटकोड तोंडपाठ असतात. चीटकोड म्हणजे गेम सुकर करण्याचे काही शॉर्टकट्स. म्हणजे चीटकोड वापरून शहरातले सगळे सिग्नल हिरवे करता येतात, ट्रॅफिक नाहीसं करता येतं, माणसं नाहीशी करून शहराचं रूपांतर घोस्ट सिटीमध्ये करता येतं, वगैरे. हे चीटकोड देणाऱ्या असंख्य वेबसाइट्स इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
१९९७ सालापासून रॉकस्टार या कंपनीने प्रकाशित केलेला ‘ग्रॅण्ड थेफ्ट ऑटो’ अर्थात मोटारचोरीच्या संकल्पनेभोवती रचलेला हा खेळ शहराच्या गुन्हेगारी जगतात प्रवेश करण्याची संधी खेळणाऱ्याला देतो. मारामारी, साहस, रस्त्यावरचं कुठलंही वाहन अडवून चालकाला बाहेर काढत वाहनाचा ताबा घेऊन बेधुंद ड्रायव्हिंग करण्याचं थ्रिल, विविध भूमिकांत शिरण्याची मुभा, वेगवेगळ्या मिशन्समध्ये गुप्त कारस्थानं करण्यातला थरार, शहरातल्या रस्त्यांवरून नियम तोडून केलेल्या शर्यती- अशी खेळात कधीही करण्याची मौज बहाल केल्यामुळे जीटीए प्रचंड लोकप्रिय झाला.
तांत्रिक भाषेत या खेळाला ‘सॅण्डबॉक्स गेम’ म्हणतात. अशा प्रकारच्या खेळात खेळाडूला कोणत्याही क्षणी चाललेला खेळ सोडून कुठलंही नवीन मिशन स्वीकारता येतं. अशा फ्री-रोमिंग व्हिडियो गेम्समध्ये ‘जीटीए’ अव्वल मानला जातो. त्यामुळेच मुलं तासन् तास खेळूनही कंटाळत नाहीत. मल्टिपल मेथड्स देऊ केल्यामुळे हा खेळ जुनाही होत नाही. मानसिकदृष्टय़ा मुलांचा पगडा घेणारा हा खेळ म्हणूनच जगभरातल्या पालकांच्या चिंतेचा विषय झाला आहे.
२००२ साली पाश्चात्य जगात या खेळाचं नवं व्हर्शन ‘जीटीए थ्री’ आलं आणि सायबर झोनमधल्या रस्त्यांवर रक्त सांडायला सुरुवात झाली. पाठोपाठ २००३ साली ‘व्हाइस सिटी’चं आगमन झालं आणि मुलांना मॅट्रिक्समधलं स्वैरांगण उपलब्ध झालं. मुलांचं मोठं आकर्षण म्हणजे यातलं मुक्त ड्रायव्हिंग, रस्त्यावरच्या टकरा आणि ठोकरा, गाडय़ांची बिनधास्तपणे लावली जाणारी वाट; ते अगदी बोटीपासून, हेलिकॉप्टर आणि विमान चालवण्यापर्यंत गुन्हेगारी क्षेत्रात होत जाणारी बढती.
मुलांच्या खेळातलं हे प्रौढ स्वरूप पालकांच्या टीकेला मात्र आमंत्रित करू लागलं. सुरामारीपासून ते मशीनगनपर्यंत शस्त्रं घेऊन संघटित गुन्हेगारीचा भाग होऊन सुपारी घेऊन माणसं मारणं, मारलेल्या माणसाचे पैसे उचलून श्रीमंत होणं, ड्रग डीलिंग करणं, पोलिसाला लाच देऊन सुटणं, हे आणि असे अनेक फंडे मुलं या खेळातून शिकू लागली. यात रस्त्यांवरून अर्धनग्न फिरणाऱ्या आणि खेळातल्या पार्टीत दिसणाऱ्या कमी कपडय़ांतल्या ललना हा भारतीय पालकांच्या डोकेदुखीचा आणखी एक विषय. हे कमी होतं म्हणून की काय, त्यात बायकांची दलालीही आली. तिसऱ्या व्हर्शनमध्ये तर तुम्ही एखादी वेश्या गाडीत घालून ‘सेक्लुडेड प्लेस’वर जाऊ शकता. ‘जीटीए- सॅन अ‍ॅण्ड्रिया’ या व्हर्शनमध्ये तर कुप्रसिद्ध ‘हॉट कॉफी मोड’ होता. म्हणजे खेळाच्या आतला हा छोटा खेळ. या खेळात युजर इंटरॅक्टिव्ह वापरून सायबरविश्वातला लैंगिक अनुभवही घेता येत होता. या मिनी सेक्स गेमवर प्रचंड गदारोळ झाला आणि रॉकस्टारने हा भाग काढून घेतला. पण त्याआधी बऱ्याच डीव्हीडी वितरित झाल्या होत्या. हा सगळा भाग हॅकर्सनी आमच्या खेळात घुसडला, असा पवित्रा रॉकस्टारने घेतला. इंटरनेटवर आजही काही साइटवर या मिनी खेळाचे चीटकोड उपलब्ध आहेत. आणि किशोरवयीन मुलं ते शोधून काढू शकणारच नाहीत, याची खात्री कुणालाच देता येणार नाही.
व्हाइस सिटीमध्ये १९८० च्या दशकातलं मायामी स्टाईल शुद्ध भांडवली अमेरिकन शहरांचं फन्की कल्चर, तिथला रेडियो, व्हाइस ओव्हर, पाटर्य़ा, पोशाख, गाडय़ा यांचं कोंदण आहे. आधीच अमेरिकेची ओढ असलेल्या आपल्या मुलांना हा खेळ आवडू लागला नसता तरच नवल. अर्थात सात-आठ वर्षांच्या लहान वयातल्या मुलांना ‘या’ गोष्टींचं पूर्ण आकलन नसलं तरी त्याचं एक्स्पोजर कशाला द्या, हा मुद्दा राहतोच. या खेळातली हिंसा आणि सेक्स हेही चिंतेचे विषय आहेत. पण त्याहीपेक्षा खेळातून विकसित होणारी बेपर्वा मानसिकता अधिक गंभीर आहे.
अमेरिकेतल्या कुप्रसिद्ध अलाबामा शूटआऊटमागे जीटीए हा खेळच कारणीभूत असल्याचं मानलं जातं ते याचमुळे. अलाबामामध्ये २००३ साली जून महिन्यात डेव्हिन मूर नावाचा १७ वर्षांचा मुलगा कारचोरी करताना पकडला गेला. डेव्हिनने पोलिसाचं पिस्तूल हिसकावून त्याला आणि त्याच्या साथीदाराला गोळी घातली आणि वाटेत आलेल्या आणखी एकाला गोळी घालून तो पसार झाला. डेव्हिन सातत्याने घरात जीटीए खेळत होता, हे नंतरच्या खटल्यात सामोरं आलं.
मेक्सिकोमधल्या अल्बुकर्क इथे २००६ साली आपले वडील, सावत्र आई आणि सावत्र बहिणीला मारणारा कोडी पोसी हा मुलगाही जीटीए खेळाचा चाहता होता, हे सिद्ध झालं.
२००८ च्या ऑक्टोबरमध्ये ‘जीटीए ४’ या नव्या गेमचं आगमन झालं तेव्हा दक्षिण लंडनमधल्या क्रॉयडॉन इथे हा खेळ विकत घ्यायला रांग लावलेल्या एकावर सुरीहल्ला झाला होता. मॅन्चेस्टरमध्येही हा खेळ पळवण्यासाठी एका मुलाचा जबडा मुलांकडूनच फोडला गेला होता.
‘व्हाइस सिटी’ खेळातला कथित नायक टॉमी व्हर्सेटी हा फ्लोरिडातल्या क्युबन व हैतियन माणसांना लक्ष्य करत असल्याने प्रत्यक्षातही फ्लोरिडातल्या क्युबन व हैती समुदायाने जीटीए प्रकाशित करणाऱ्या रॉकस्टार या कंपनीविरुद्ध वांशिक भेद केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर असे संवाद आणि संदर्भ या खेळातून काढून टाकले गेले.
तेव्हाच्या सिनेटर हिलरी क्लिंटन, अ‍ॅटर्नी जॅक थॉम्पसन यांच्यापासून ते ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अ‍ॅण्ड द फॅमिली’ या संस्थेचे अध्यक्ष डेव्हिड वॉल्श यांच्यापर्यंत अनेकांनी या खेळाच्या विरोधात जाहीरपणे धोक्याचा इशारा दिला आहे. हल्ल्यांमध्ये बळी ठरलेल्या लोकांपासून ते अनेक स्वयंसेवी संस्थांनी रॉकस्टार या कंपनीला जबाबदार धरत त्यांच्यावर खटलेही दाखल केले आहेत.
जीटीए या खेळावर त्यानंतर जगभर ‘हिंसक व लैंगिकदृष्टय़ा उत्तेजक’ असा शिक्का मारला गेला आणि ‘केवळ प्रौढांसाठीच’ अशी वर्गवारी या खेळासाठी केली गेली. एवढं सगळं होऊनही या खेळाच्या लाखो डीव्हीडी हातोहात खपताहेत. अमेरिकन बाजारपेठेतला हा खेळ ऑलटाइम फेवरिट आणि बेस्टसेलर मानला जातो. भारतीय बाजारपेठेतही जीटीए हा खेळ आता सीडी-डीव्हीडी आणि पुस्तकांच्या दुकानांतून सर्रास मिळू लागलाय. आपल्याकडेही त्याला ‘१८ प्लस’ असं सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि तरीही तो आपल्या मुलांसाठी विकत घेणारे पालक दृष्टीस पडताहेत.
अर्थात एकीकडे हे चित्र असताना, ‘आम्ही आमच्या पीसीमधून जीटीए गेम डिलिट केलाय,’ असं सांगणारे जागरूक पालकही भेटतात, याचीही आवर्जून नोंद घ्यायला हवी.
पराग पाटील
paraglpatil@gmail.com