Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
जगाच्या व्यवहारात माझा खारीचाच वाटा असेल, पण त्यामागचे कष्ट किती अनमोल आहेत.
- हेलन केलर

जॅक बहुविकलांगता या व्याधीने ग्रस्त होता. (सेरिब्रल पाल्सी) बॅटरीवर चालणाऱ्या चाकाच्या खुर्चीला बसवलेलं बटण दाबण्याआधी त्याच्या कमी शक्तीच्या हाताचा तो कसाबसा वापर करीत असे. माझा विद्यार्थी नसूनही तो माझी व्याख्याने ऐकत असे व संघात्मक चर्चेमध्ये सहभागीही होत असे. त्याचं अस्पष्ट बोलणं समजून घेणं मला फार कठीण जाई. त्यामुळे तो काय बोलतोय हे त्याच्या वर्गमित्रांना मला समजावून देण्यास सांगत असे. त्याच्या वैयक्तिक चिंता, नैराश्य या सर्वाबद्दल तो

 

माझ्याशी बोलत असे व ते ऐकून माझ्या मनाला अतिशय वेदना होत असत. त्याचं दु:ख माझ्या मनास स्पर्शून जात असे. तो जितका एक धैर्यशील मुलगा होता तेवढाच मनाने कोमल होता!
एकदा तास संपल्यावर जॅक माझ्याकडे आला आणि त्याला काहीतरी काम करण्याची खूप तीव्र इच्छा होत असल्याचं त्यानं सांगितलं. त्या काळात निरनिराळ्या शारीरिक व्यंगांमुळे पीडित असलेल्या मोठय़ा माणसांना मी फ्रेसनो सिटी कॉलेजच्या आवारामध्येच वेगवेगळ्या भागात काम करण्याचं शिक्षण देत होते. मी जॅकला विचारलं, ‘कुठं काम करायचंय तुला?’
तो म्हणाला, ‘तुमच्याबरोबर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये.’ क्षणभर स्तब्ध होऊन मी विचार करू लागले, की टेबलं पुसणं, डिशवॉशरमध्ये खरकटी भांडी रचून ठेवणं, झाडणं- पुसणं, सामान भरणं इ. काम करण्यासाठी कोणत्या कौशल्याची गरज असते. एखादी बहुविकलांग व्यक्ती अशा प्रकारची कामं शिकण्यासाठी त्या शिक्षणक्रमात कशी काय सहभागी होऊ शकली असती? माझ्या प्रश्नाला माझ्याजवळ उत्तर नव्हतं. माझी मतीच कुंठित होऊन गेली होती.
जॅकने मात्र हसत निग्रही सुरात उत्तर दिलं, ‘मी कोणतंही काम करेन!’ आहा! त्याचा निश्चय व उत्साह बघून मला त्याचं इतकं कौतुक वाटलं म्हणून सांगू! दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक १० वाजता आम्ही दोघांनी कॅन्टीनमध्ये भेटण्याचं ठरवलं. तो वेळ पाळू शकेल का? माझ्या मनात शंका डोकावली. घडय़ाळ बघून त्याला वेळ सांगता येत होती का? दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळेच्या १५ मिनिटे आधीच कॅन्टीनजवळ मला त्याच्या चाकांच्या खुर्चीचा ओळखीचा आवाज आला. त्याला उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी व अंतर्दृष्टी प्राप्त होण्यासाठी मी मनोमनी परमेश्वराची प्रार्थना केली.
बरोबर १० वाजता आम्ही भेटलो व १० वाजून १० मिनिटांनी जॅक कामावर रूजू होण्यास तयारही झाला होता. उत्साहाच्या भरात त्याचं बोलणं अधिकच अस्पष्ट झालं होतं. त्यामुळं मला काही उमगत नव्हतं. त्या व्यावसायिक शिक्षणक्रमात जॅकला सहभागी होता यावं म्हणून मी करत असलेल्या प्रयत्नात पावला पावलावर अडथळे निर्माण होत होते. चाकांच्या खुर्चीमुळे टेबलांच्या अगदी जवळ जाणं त्याला शक्य होत नव्हतं. हातात वस्तू पकडण्यापलीकडे इतर कामांसाठी त्याला हातांचा उपयोग करता येत नव्हता. मी काही बदल करता येतील का ते पाहात होते, पण त्यात अयशस्वी झाले. मी नाउमेद झालेली पाहून एका सहृदयी रखवालदाराने मला मदत करण्याची तयारी दर्शवली. अध्र्या तासातच त्याला एक कल्पना सुचली. फरशा पुसण्याच्या दांडय़ाच्या हॅण्डलची लांबी त्याने कमी केली. त्यामुळे ते सहजतेने जॅकच्या बगलेत बसलं आणि मग दुसऱ्या हाताने त्याला ते फिरवता येऊ लागलं. टेबलाच्या पृष्ठभागापर्यंत पुसायचं कापड पोहोचेल अशी व्यवस्था केली गेली. एक टेबल पुसून झाल्यावर एका हाताने जॅक त्याची चाकांची खुर्ची पुढे ढकलून पुढच्या टेबलाशी जाऊ शकत होता.
जॅकच्या हाती जणू स्वर्गच आला होता! काही न करता दुरून नुसतं बघत बसण्यापेक्षा सक्रिय सहभागी झाल्यामुळे त्याला स्वत:चा खूप अभिमान वाटू लागला. मी बघत होते की वाटेमधल्या खुच्र्या जॅक त्याच्या चाकांच्या खुर्चीने बाजूला करू शकत होता. मग काय, जॅकसाठी एक वेगळ्या प्रकारचं काम नव्याने नेमून दिलं गेलं. चाकांच्या खुर्चीने हालचाल करता यावी म्हणून टेबलाजवळच्या खुच्र्या वाटेमधून बाजूला ढकलून भिंतीशी रांगेत उभ्या करून मार्ग मोकळा करण्याचं काम जॅक मोठय़ा उत्साहाने व अभिमानाने करू लागला. त्याचा आत्मसन्मान वाढू लागला! काही काम करण्याची आपल्यात क्षमता आहे व आपली योग्यताही मोठी आहे याची अखेर त्याला खात्री पटली!
एक दिवशी रडत रडतच जॅक माझ्याकडे आला. काय झालं असं विचारल्यावर त्यानं सांगितलं की, काही लोक त्याला त्याचं काम करू देत नव्हते. त्याला नक्की काय म्हणायचं होतं ते सुरुवातीला मला कळलं नाही. नंतर तो खुर्ची हलवताना मी त्याला पाहिलं. माझ्या लक्षात आलं की, खुच्र्या हलविण्याचं काम करताना त्याला खूप कष्ट करावे लागत होते. ते बघून काही जणांना वाटलं की वाटेत येणाऱ्या खुच्र्या बाजूला ढकलताना पाहून त्याला मदत करावी या हेतूने ते खुच्र्या बाजूला सरकवू बघत होते. तो त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. पण कोणी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. नंतर मी जाड पुठ्ठय़ापासून काही कार्ड बनवून जॅकच्या समोरच्या ट्रेमध्ये ठेवली व त्याच्या अडचणीचं निवारण झालं. प्रत्येक कार्डावर लिहिलेलं होतं :
‘हॅलो, माझं नाव जॅक. मी या कॅन्टीनमध्ये नोकरी करतो. टेबल पुसण्याचं काम करतो आणि वाटेतल्या खुच्र्या भिंतीकडे सरकवून ठेवतो. मला मदत करावी असं वाटतंय ना तुम्हाला? ‘कृपा करून’ मला फक्त एक स्मितहास्य बहाल करा. आणि सांगा की किती मोठ्ठं काम करतोय मी!’
जॅकने एक कार्ड त्याच्या चाकांच्या खुर्चीवरच्या ट्रेमध्ये दर्शनी भागात अडकवून ठेवलं आणि बाकीची करड येणाऱ्या-जाणाऱ्यांना तो वाटत असे. त्यामुळे इतर विद्यार्थी त्याची व त्याच्या कामाची गंभीरपणे दखल घेऊ लागले. आपली कोणी दखल घेतली वा कोणी थोडा आधार पुरवला की आपल्याच मनात स्वत:ची प्रतिमा उंचावू शकते, असा अनुभव जॅकला त्या सहा महिन्यांत अनुभवायला मिळाला. त्याचा मनोनिग्रह हे माझं मोठ्ठं स्फूर्तिस्थान आहे. अन्य विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोणती पद्धत वापरावी याचा विचार करताना मी त्याचंच उदाहरण डोळ्यासमोर ठेवत असते. त्याचप्रमाणे आयुष्यात येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी परमेश्वराने बहाल केलेल्या बुद्धीनुसार वागण्यासाठी जॅक माझ्यासाठी आदर्श ठरला आहे.
डॉली ट्राऊट
I'll Do Anything
स्वैरानुवाद : उषा महाजन
sayhi2usha@rediffmail.com