Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..

‘वुमन टुडे’च्या ऑनलाइन अंकामध्ये ‘मानवी नातेसंबंधांचा गुणसूत्रात्मक अभ्यास’ यामध्ये डॉक्टरेट मिळवलेल्या शेली टायलर नावाच्या महिला शास्त्रज्ञाच्या शोधनिबंधातील एक भाग लेख-स्वरूपात आला आहे. त्यात ती लिहिते, उत्क्रांतीचा वारसा सांगतो की, ज्या स्त्रिया आपापसातले दृढ नातेसंबंध जपतात, त्या आणि त्यांची मुले इतर स्त्रियांपेक्षा जास्त चांगले आयुष्य जगतात. भावनिक आणि शारीरिक चढ-उतारांना त्या जास्त चांगल्या तऱ्हेने तोंड देऊ शकतात. एकमेकींच्या साहाय्याने वाटचाल करणाऱ्या स्त्रियांमध्ये मोठय़ातल्या मोठय़ा संकटाला सामोरे जाण्याची शक्ती विकसित होत गेलेली आहे. टायलरच्या म्हणण्यानुसार संकटाच्या किंवा तणावाच्या मन:स्थितीत असताना स्त्रियांच्या मेंदूतून ऑक्सिटॉसिन नावाचे रसायन स्त्रवते आणि त्या प्रभावामुळे स्त्रियांना दुसऱ्या स्त्रियांकडे आधारासाठी वळण्याची प्रेरणा मिळते. नातेवाईक

 

आणि स्नेही-सोबत्यांच्या सहवासात हे ऑक्सिटॉसिन स्त्रवण्याचे प्रमाण सर्वात जास्त असते आणि म्हणूनच हल्लीच्या ताणतणावग्रस्त दैनंदिन जीवनात स्त्रियांनी एकत्र जमून बोलण्याचे, रोजच्या साध्या वा त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांवर चर्चा करणारे प्रसंग जाणीवपूर्वक घडवून आणायला हवेत. रुटिन किंवा एकसुरी आयुष्य सर्वात जास्त ताण निर्माण करते, असेही टायलर त्या लेखात लिहिते.
नेटयुगातल्या स्त्रियांचे एकत्र भेटायचे, गप्पा करायचे, चर्चातून समस्यांना उत्तर शोधायचे आधुनिक अड्डे म्हणजे त्या लिहीत असलेले ब्लॉग्ज. साक्षी जुनेजा (वय २६ वर्षे) आणि तिच्या मैत्रिणींच्या सिंडिकेट ब्लॉगवर चर्चा चालू आहे घरातल्या ‘एम फॅक्टर’च्या दबावाचा सामना कसा करावा, याबाबतची. एम फॅक्टर म्हणजे मॅरेजचा दबाव.
साक्षी सुशिक्षित पंजाबी घरातली, उच्चशिक्षित, चांगल्या पगाराची नोकरी असणारी मुलगी. केवळ २५ वर्षे उलटून गेली म्हणून तिला घरातून लग्न करण्याचा सततचा आग्रह होत असतो. साक्षीचा त्याला विरोध नाही. पण स्थळाला- म्हणजेच मुलाला ‘नकार’ द्यायचा अधिकार साक्षीला नाही. तिने ‘नाही’ म्हटल्यावर घरच्यांकडून प्रचंड मानसिक दबाव आणला जातो, असे साक्षीचे म्हणणे. ठरवून केल्या जाणाऱ्या लग्नांमध्ये व्यवसाय, पैसा, घरदार याबाबतीत वरचढ असणारा मुलगा आपल्या मुलीसाठी शोधला आणि त्याचा होकार आला की, मुलीने त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, असे मानले जाते. या गोष्टीला साक्षीचा विरोध आहे. साक्षीच्या वयाच्या अनेक मुलींनी यावर आपलेही असेच अनुभव शेअर केले आहेत. आधुनिक घरांमध्ये मुलींना ओझे मानले जात नाही, तरीही मुलीचे लग्न करून देणे आणि ते योग्य वयात करून देणे, ही आपल्यावर सर्वात मोठी जबाबदारी आहे; ती लवकरात लवकर पार पडावी, असा दृष्टिकोन का असावा, हा या चर्चेतला महत्त्वाचा मुद्दा आहे.
भारतीय व्यक्तीशी लग्न करून भारतातच स्थायिक झालेल्या परदेशी स्त्रियांचा एक याहू ग्रुप आहे आणि या स्त्रिया आपापसात अगदी घट्ट संबंध जोडून आहेत. त्या आपले अनुभव लिहितातच, पण नियमाने परस्परांना भेटतही असतात. एकमेकींच्या अडचणींची दखल घेऊन मार्गदर्शन करतात. इथे राहून जास्त वर्षे झालेल्या स्त्रिया नव्याने राहायला आलेल्यांना सल्ले देतात. मदत करतात. विविध स्तरांतील परदेशी स्त्रिया यात आहेत. राजनैतिक अधिकाऱ्यांपासून ते अजून शिक्षण न संपलेल्या विद्यार्थ्यांशी लग्न केलेल्या या परदेशी स्त्रियांना भारतात दीर्घकाळासाठी राहताना हवामानापासून राहण्या-जेवण्याच्या सोयींपर्यंत सामाजिक-सांस्कृतिक बदलांशी सामना करावा लागतो. त्यांचे अनुभव अत्यंत रोचक आहेत.
रोमाना नावाची एक फ्रेंच महिला आता पन्नाशीच्या घरात आहे. वयाच्या २१ व्या वर्षी ती लग्न करून भारतात आली आणि तमिळ नवऱ्याबरोबर दिल्ली, चेन्नई, मुंबई, सुरत अशा विविध ठिकाणी राहिली. तिला त्या- त्या ठिकाणच्या भाषा तर येतातच, पण ती स्थानिक स्वयंपाकही उत्कृष्ट करते. आपल्या पाककृती ती याहू ग्रुपवर नियमाने शेअर करते. परदेशी चवीला मानवणारे बदल तिच्या रेसिपीजमध्ये केलेले असतात. परदेशी नववधूंची भारतातील दत्तक आई म्हणून तिला सगळ्या मान देतात. सहा महिन्यांपूर्वी तिचा नवरा गेला. ती कुर्गमध्ये सध्या स्थायिक आहे. ‘तू परत घरी जाणार का?’, असं तिला काहींनी विचारलं तेव्हा ती लिहिते की, ‘मी घरीच आहे माझ्या. भारताशिवाय मला दुसरे घर नाही.’ भारतातल्या खेडोपाडी प्रवास करत, तिथल्या लोकजीवनाचा अभ्यास करण्याचा तिचा यापुढे मानस आहे.
फेमिनाच्या अंकात ‘विमेन फाइट्स बॅक’ या सदरासाठी अनेक स्त्रिया स्वत:चे अनुभव लिहीत असतात. ते खूप वाचनीय असतात. कौटुंबिक किंवा सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि त्या अन्यायावर वेगवेगळ्या स्तरांवर कायदेशीर वा समुपदेशक किंवा सेवाभावी संघटनांची मदत घेऊन त्याचा योग्य रीतीने कसा प्रतिकार करावा, याचे मार्गदर्शन त्यातून होते. आणि अशाच प्रकारच्या परिस्थितीतून जाणाऱ्या स्त्रियांसाठी हे अनुभव, त्यांचा हा लढा प्रेरणादायीही ठरतो.
शर्मिला फडके
sharmilaphadke@gmail.com