Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

जिद्दीचे पंख नवे!
‘या मॅडम, भेटलात का आमच्या वाघाला? दिसतोय का निशांत क्वाड्राप्लेजिक? आमच्या दास ऑफशोअर इंजिनीअरिंग प्रायव्हेट कंपनीचा तो संचालक आहे. दीडशेच्या वर कर्मचारी असलेल्या कंपनीचे सर्व व्यवस्थापन तोच सांभाळतो..’ निशांतचे काका मोठय़ा अभिमानाने हे सांगत होते.
नवी मुंबईतील बेलापूरमध्ये या कंपनीचा पत्ता शोधत मी ‘सागर उदय’ या अद्ययावत, कलात्मक इमारतीत पोहोचले. आपल्या प्रशस्त, फ्रेश लुक असलेल्या ऑफिसमध्ये व्हीलचेअरमध्ये बसून कॉम्प्युटरवर तो कामात व्यग्र होता. निशांतचं वागणं-बोलणं पाहून मी कुणा क्वाड्राप्लेजिकला भेटायला आले आहे, हे क्षणभर विसरूनच गेले.
‘मॅडम, मी आजपर्यंत स्वत:बद्दल असं कधीच कुणाशी बोललेलो नाही. एक मात्र सांगतो, आज मी जे काही दिसतो आहे, करतो आहे, ते सर्व माझ्या कुटुंबियांच्या- म्हणजे आई- बाबा, दोन काका, शिवाय माझ्या भावी पत्नीच्या प्रोत्साहन व पाठिंब्यामुळेच!’
बारावीच्या यशानंतर इंजिनीअरिंगची पदविका प्राप्त करण्यापूर्वीच घरच्या परंपरेला धरून सुटे भाग बनविण्याचा एक कारखाना

 

निशांतने चालवायला घेतला आणि पदविकेनंतर मात्र वडील व दोन काका यांनी चालविलेल्या ‘दास ऑफशोअर’ उद्योगाचा तोही एक भाग बनला.
माझगाव गोदीमधल्या दीर्घ अनुभवाच्या बळावर ही कंपनी सुरू करण्यात आली होती. समुद्रातील तेल-वायू मिळविण्यासाठी उभारलेल्या प्लॅटफॉम्र्स-ब्रिज यांची तांत्रिक देखभाल करण्याचे काम ही कंपनी करते. तसेच स्काय-वॉक उभारण्याचे कामही कंपनी करते. बांद्रय़ाचा स्काय-वॉकच्या देखभालीचे काम त्यांच्याकडे आहे. या कामासाठी लागणाऱ्या सामग्रीची निर्मिती वर्कशॉपमध्ये केली जाते. कामाचे नियोजन, कर्मचाऱ्यांची नेमणूक, देखभाल, साइट व्हिजिट्स या साऱ्या निशांतच्या जबाबदाऱ्या होत्या. व्यवसायात स्थिरावण्यात त्याला काहीच समस्या नव्हत्या. उंच भराऱ्या घेण्यास अवघे आकाश मोकळे होते. नुकतीच बी.कॉम. झालेली बालमैत्रीण रसनाबरोबर साखरपुडाही झाला होता. सगळे कसे अगदी छान चालले होते!
पण विधिलिखित काही वेगळेच होते. त्या दिवशी कामाच्या निमित्ताने सांगलीला जात असताना त्यांच्या अ‍ॅम्बॅसेडर गाडीला अपघात झाला. पहाटेच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकशी तिची टक्कर झाली. समोर बसलेला कर्मचारी आणि ड्रायव्हरच्या पायांचे फ्रॅक्चर झाले. त्यांचे तेवढय़ावर निभावले. पण मागच्या सीटवर झोपलेल्या निशांतच्या मानेला, पाठीला जबरदस्त धक्का बसला. मानेखालचे तीन-चार मणके तुटले. शरीराची वाताहत झाली. त्याला बेशुद्धावस्थेत सांगलीच्या कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले. तात्काळ लागणारे उपचार झाले. एक आठवडा सर्वसाधारण प्रकृती स्थिरावण्यात गेला. एक-दोन किरकोळ शस्त्रक्रिया झाल्या आणि पुढच्या उपचाराकरिता मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्याला हलविण्यात आले. इथे आल्यावर अपघाताच्या परिणामांचे गांभीर्य समजले. मानेच्या मणक्यातील नसांना जबरदस्त इजा पोहोचली होती. निदान होते- क्वाड्राप्लेजिया. डॉक्टरांनी स्पष्टच सांगितले की, ‘निशांत कधीच उभा राहू शकणार नाही. लघवी, शौचाला नैसर्गिकरीत्या होणार नाही. सर्वसाधारण जीवन तो जगू शकणार नाही.’ हे ऐकल्यावर घरातले सर्वचजण गर्भगळीत झाले. रसनाला कसे सांगावे, तिची प्रतिक्रिया काय असेल, तिला त्याची कशी काळजी घ्यावी लागेल, याची सर्वाना चिंता वाटत होती. परंतु रसनानेच सर्वाना जबरदस्त हिमतीने सांभाळून घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये असताना निशांतसमोर जो अश्रू काढील, जो त्यांची हिंमत मोडील त्यांना हॉस्पिटलमध्ये येण्यास तिने बंदी केली. निशांतची पूर्ण जबाबदारी तिने स्वीकारली. डॉक्टरांचे आदेश तिने नुसते पाळले नाही, तर एखाद्या वैद्यकीय सहकाऱ्यासारखे सर्व समजून घेऊन तिने निशांतची सेवा केली. कॅथेटरपासून ते बेड सोअर्स स्वच्छ करून त्याचे ड्रेसिंग, त्याची दाढी, आंघोळ, त्याला तयार करणे या सर्व गोष्टी रसना करीत होती. अन्ननलिका- श्वसनलिकेला छिद्र पडल्यामुळे निशांतच्या पोटात थेट राइस टय़ूब लावल्याने निशांतला बोलता येत नव्हते. त्याबद्दल निशांत सांगतो- ‘रसनाच माझा आवाज झाली. मला काय बोलायचंय, ते ओळखून ते काम ती तात्काळ करायची.’
‘अरे निशांत, तुला कुठे तुझे हात-पाय वापरायचे आहेत? दोन अटेंडंट तुझी सर्व कामे करून देतात. तुला तुझ्या व्हीलचेअरमध्ये बसून फक्त डोकं वापरायचं आहे. ते तू शंभर टक्के करू शकतोस, याची मला खात्री आहे. तेवढंच तू कर.’ निशांतला आयुष्यात भक्कमपणे उभे राहण्याचे बळ देणारी त्याची भावी पत्नी रसना सांगत होती आणि तिच्या या सहजपणे सांगण्याकडे मी थक्क होऊन पाहत होते.
‘इतक्या कोवळ्या वयात तू हे सर्व कसं केलंस?’ असं मी तिला विचारताच ‘जे करावं लागलं, ते मी करत गेले. निशांतचा प्रतिसाद, त्याच्या घरच्यांचे सहकार्य यामुळेच मी हे करत गेले. निशांतचे स्पिरीट, आत्मविश्वास जीवनेच्छा आणि उत्साह टिकविण्यासाठी हॉस्पिटलच्या सात महिन्यांच्या वास्तव्यात वॉर्डमध्ये कंदील लावून दिवाळीही साजरी केली. डॉक्टरांकडून संमती घेऊन शनिवार- रविवार त्याचा रुग्णालयाचा युनिफॉर्म बदलून इतर पेहरावामध्ये तयार करून नरिमन पॉइंट, गेटवे ऑफ इंडिया, चौपाटीला फिरवून आणण्याचे कामही तिने केले. त्याचं हॉस्पिटलमधील वास्तव्य अशा प्रकारे सुसह्य केलं.’
दिल्लीच्या ‘नॅशनल स्पायनल कॉर्ड इंज्युरीज सेंटर’मध्ये निशांतला पुनर्वसनाच्या उत्तम संधी उपलब्ध असल्याचे कळले, तेव्हा दिल्लीला एक खोली घेत सात-आठ महिने तिथे राहून आम्ही त्याच्यावर उपचार केले. फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, समुपदेशन, मसाज नियमितपणे केल्याने निशांतमध्ये खूप फरक पडला. सेंटरला येणाऱ्या अनेक दुर्दैवी अपंगांना पाहून निशांतने स्वत:च्या नशिबाबद्दल देवाचे आभार मानले. आपण नक्की चांगले जगू शकतो, याची त्याला खात्री पटली. विश्वास वाढला. व्हीलचेअरमध्ये बसून आत-बाहेर फिरण्याचे तंत्र त्याला अवगत झाले. अटेंडंटच्या सहाय्याने कामाचे व्यवस्थापन करता येऊ लागलं. निशांतमध्ये चैतन्याचं स्फुल्लिंग जागं झालं.
२००१ ते २००५ हा काळ आता मागे पडला असला तरी अपघाताच्या दिवसाचे कटु स्मरण त्यांना आजही होत असतं. ‘आता माझा व्यवसाय, हिंडणं-फिरणं सर्व काही सुरळीत सुरू आहे. मला कसलंही टेन्शन नाही. घरातल्यांनाही नाही. उभं राहणं, चालणं या व्यक्तिरिक्त मी सर्व काही करू शकतो. कॉम्प्युटर, व्हीलचेअर, माझे अटेंडंटस्, माझी कार.. आणि सर्वात महत्त्वाची माझी रसना माझ्याजवळ आहे. आणखी काय पाहिजे?’ असं जेव्हा निशांत म्हणतो तेव्हा भारावून जायला होतं.
उषा धर्माधिकारी