Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

ललित
हसले मनी रोपटे!
‘‘अगं, टाक सगळं काम हातातलं, नि धावत इकडे ये.’’ आईच्या हाकेसरशी दारातूनच गच्चीत डोकावले. पिटुकली खार गच्चीच्या कट्टय़ावर बसून पुढच्या दोन पायात पोहय़ाचे कण पकडून, दाताने चावून-चावून खात होती. तिचं ते ऐटीत बसणं, गोंडेदार शेपूट हलवणं हे सारं काही जणू काही मीच राणी आहे इथली असं भासवणारं होतं! सकाळी नाश्त्यासाठी बनवलेल्या पोह्य़ांचा चाळ कट्टय़ावर ठेवला होता, त्याचाच ती फन्ना पाडत होती, चाहूल लागताच धूम पसार झाली.
वैशाखातल्या मध्यावरची ती माध्यान्हीची वेळ! सूर्य अगदी डोक्यावर आलेला! त्याला वाकुल्या दाखवत साऱ्या कुंडय़ा फुलांनी गच्च भरल्या होत्या. सकाळी फुलणारी आणि संध्याकाळी मावळणारी गर्दलाल, पिवळी, राणी रंगाची ‘ऑफिस टाइम’ची फुलं. मी यांचं नाव ‘भास्कर-फुलं’ ठेवलंय. बदामाच्या आकाराच्या जाड पोपटी पानातून मिरवणारी

 

ती दीडशे फुलं. ही फक्त डोळे भरून पाहायची. चिमटीत पकडायला गेलं, तर ते फूल कुस्करूनच जातं, इतकं ते नाजूक असतं. शिवाय फुलालगत उद्याच्या कळ्या असतात. त्यामुळे हात लावायचाच नाही, अशी ही भास्कर-फुलं! बाजूच्याच कुंडीत गडद हिरव्या पानाच्या चमेलीच्या पुढच्या टोकाला दोन-तीन फुलं आणि लालसर कळ्या डोकावायला लागलेल्या. नवीन पानांनी नटलेला मोगराही आपल्या कळ्यांचे दात दाखवत हसत होता. झेंडूच्या छोटेखानी रोपावर निदान दोन डझन तरी भगवे गोंडे गच्च पाकळ्यांनी पूर्ण उमललेले! शेवटच्या कुंडीतली गडद नारिंगी जास्वंदांची खूप दिवसानंतर आज दोन फुलं उमलली होती. त्यांचा तुरा हे चिमण्यांचं आवडतं खाद्य! ‘मीही मागे नाही हो,’असं म्हणत म्हणणारी, मध्यंतरी कीड लागलेली पिवळी जास्वंदं आजच कळ्या-फुलांनी बहरून आली होती. नव्या बहरातलं, सोनसळी पिवळं रूप बघतच राहावं असं होतं. बहुतांश कुंडय़ांमध्ये मंजिऱ्या पडून डोकावणारी कृष्ण तुळस. तुळशीवर इवली-इवली जांभळी फुलं आली होती. त्यावर हिरवट रंगाच्या वेगळ्याच माशा सतत घोटाळत राहतात या फुलांवर!
या जास्वंदीचं बाळरूप- छोटी-छोटी नारिंगी फुलं. एकाच वेळी खूप फुलं फुलणारं हे रोप! याची गंमत म्हणजे फुलाखाली वाटाण्याएवढा हिरवा गोल असतो. फूल पडून गेल्यावर सहा-सात दिवसांनी हा गोल सुकतो आणि डाळिंब उकलावं तसा हा गोल फुटून त्यातून बिया बाहेर पडतात. या बिया वाटण्यात वृक्षप्रेमींना कोण आनंद होत असावा! या साऱ्या रोपातून वेगळ्या उर्मीने डोकावणारे लाल-पिवळे गुलाब. दोन्ही कुंडय़ा जवळ जवळ असल्यामुळे पिवळ्या गुलाबावर लाल रंगाची जी सुंदर छटा आलीय ती बघतच राहावी अशीच होती!
हे सारं ‘रंगीत सुख’ डोळ्यांनीच पिऊन घेताना कालचा तो प्रश्नार्थक चेहरा आठवला. आमच्या परिसरात रोज महानगरपालिकेची कचऱ्याची गाडी येते. घंटा वाजवत फिरणाऱ्या त्या तरुणाला झाडाच्या काढलेल्या चार-पाच कैऱ्या खायला दिल्या. तेव्हा त्याने अगदी सहजपणे मला प्रश्न केला- ‘‘बाई, तुम्ही घरातला ओला कचरा कधीच देत नाही हो?’’
‘‘अहो तो कचरा म्हणजे माझं सोनं आहे, सोनं कधी देतात का कुणाला?’’ माझा हा उलटा प्रश्न त्याला समजलाच नाही.
‘‘एक मिनिट, माझ्याबरोबर वरच्या मजल्यावर येता का?’’ असं त्याला म्हटलं आणि तो माझ्या मागोमाग आला. कुंडीतली फुलांची रंगपंचमी त्याने डोळे भरून पाहिली.
‘‘ही बघा, आजच्या फ्लॉवरच्या भाजीची देठं, काल सोललेल्या वालाची सालं, या बघा कलिंगडाच्या रुजलेल्या बिया!’’
‘‘एवढी मस्त गोंडय़ांची फुलं कशी काय आली हो?’’
‘‘अहो, देवाच्या पूजेचं निर्माल्य रोज कुंडय़ातच टाकते. त्यातूनच ही रोपं आली. झेंडू फुलले. मुद्दाम काही लावली नाहीत.’’
‘‘अरे, हा बघा पालक रुजलाय इथे!’’ त्यानेच मला दाखवला.
‘‘किती वर्ष घालताय असा कचरा या कुंडय़ांत?’’
‘‘झाली सात-आठ वर्षे!’’
‘‘पण कुजत नाही का हा कचरा? घाण येत नाही?’’
‘थांबा हं, दाखवते’, म्हणून मी हाताने कुंडीतला वरचा कचरा बाजूला केला. काळ्या मातीत हजारो शंख होते. त्यातले थोडे तळहातावर काढून त्याला दाखवले. आणि म्हटलं, ‘‘सुरुवातीला अगदी थोडीच माती घातली, पाव कुंडीपेक्षा कमीच. आणि वर कचरा घालत गेले. दुधाला कसं विरजण लावतात ना, तसं अधून-मधून चमचाभर काळं सेंद्रिय खत त्यावर घातलं. आणि हे शंख व्हायला सुरुवात झाली’’.
‘‘पण मग शंख मोठे होऊन त्यातून गोगलगाय येते की काय?’’
‘‘नाही-नाही. हे शंख एवढेच राहतात. कुंडीतून बाहेरही पडत नाहीत. पावसात फक्त काठाशी येतात. यालाच ‘व्हर्मिकल्चर’, ‘गांडूळ खत’ म्हणतात. याचा विशेष म्हणजे पाणी कुंडीत घातल्यावर, जे पाणी बाहेर पडतं ते स्वच्छ पाणी असतं.’’
‘‘हं! म्हणूनच तुमच्या या २०-२५ कुंडय़ांखाली लाल मातीचं पाणी नाही, की लाल ओघळ नाहीत.’’ खाली वाकून बघत तो म्हणाला. हे शंखातले जीव कचरा खाऊन टाकतात. शिवाय खरकटं, अन्नाचे कण खायला कितीतरी पक्षी, खारी, फुलपाखरं येतच असतात.
‘‘बाई, हे सारं मीपण करेन आता! थोडीशी जागा आहे माझ्या घरापुढे!’’ त्याला थोडं सेंद्रिय खत आणि बिया देते, तोच खालून त्याच्या सहकाऱ्यांची हाक आली. तो म्हणाला, ‘‘बाई, आता मला तू काय करतोस? असं कोणी विचारलं तर मी ‘सोन्याच्या गाडीवर’ काम करतो, असंच सांगेन आणि हो! भूषण माझं नाव!’’. हे सांगत तो खाली उतरलाही!
कचऱ्याच्या गाडीबरोबर राहूनही मनानं सौंदर्य टिपणारा हा महानगरपालिकेला खरं भूषणच आहे, असं मनात येत होतं, तोच मोबाईलवर एक मेसेज आला, ‘उन्हाळा कडक होतोय, घराबाहेर पक्ष्यांसाठी पाणी ठेवा.’’
गच्चीत मोठय़ा ताटलीत ठेवलेलं पाणी हळूच पिणारी खारूताई पाणी पिताना हलणारा तिचा गळा, एकाच बाटलीतलं दोन स्ट्रॉने सरबत प्यावं, तशी समोरासमोर बसून पाणी पिणारी कबुतरं, चोचीतलं खाणं पाण्यात टाकून पाणी पिणारा कावळा, चाहूल लागताच झटकन उडणारा दयाळ, साळुंक्या, बुलबुल.. पाणी पिणाऱ्यांची सारी चित्रफीत माझ्या डोळ्यापुढून सरकून गेली.
घरातल्या पाहुण्यांना अलविदा करून किर्र्र.. तिन्हीसांजेला थकून गेलेल्या पावलांनी गच्चीत फेऱ्या मारत होते. अचानक मादकसा रानगंध वारंवार खुणावतोय, असं जाणवू लागलं. हा परिचित असा वास.. कुठून वर येतोय? म्हणून आजूबाजूला कुतूहलाने बघितलं. घरामागचा हिरव्यागार पानांनी डवरून आलेला कदंब, फिकट नारिंगी रंगाच्या चेंडूसारख्या गोल फुलांनी गच्च भरला होता. त्याचाच हा गंध आसमंतात भरून राहिला होता. याबरोबरच आणखीही काही सुवास त्यात मिसळले होते. खाली विहिरीजवळ असलेला अनंत पांढरं टोपलं घालावं, तसा पांढऱ्याशुभ्र फुलांनी भरला होता, उन्हामुळे लहान आकार झालेल्या पारिजातकाच्या कळ्या झाडाच्या शेंडय़ावर उमलल्या होत्या. उजव्या बाजूला शेजारी असलेला पांढरा चाफाही बहरात होता, तर एकेरी, दुहेरी तगर उन्हाळ्यात दृष्टीला गारवा देत होती. घरालगत असलेली सुपारीची पोय पसवली होती, तुऱ्यासारख्या फुललेल्या त्या पोयीला केवडय़ाच्या रंगाच्या मण्याएवढय़ा सुपाऱ्या लागल्या होत्या. समोर असलेला एक वेगळाच वृक्ष बिट्टीसारख्या पण वेगळ्या पिवळ्याजर्द फुलांनी डवरून आला होता.
जोडीला शेजारचे जाड देठांचे जड जड फणस! आणि घरावर अर्धअधिक पसरलेलं जांभळाचं झाड. पानोपानी शेंडय़ाला जांभळाचे घड! ते खायला दिवसभर पक्ष्यांची चाललेली टिव-टिव, शिट्टय़ा! जांभळं खायची खारीची लगबग. सारं डोळे भरून न्याहाळणं गमतीशीरच. जुन्या मोठय़ा सिंकमध्ये लावलेली रजनीगंधा, दरवेळी एक उभा दांडा येऊन त्यावर ४०-५० कळ्या येतात व दिवसागणिक फुलतात. पण मे महिन्यात आजीला भेटायला कशी सारी नातवंडं जमा होतात, तसंच काहीसं रूप माझ्या रजनीगंधाचं झालंय. दांडय़ांच्या सर्व बाजूंनी १०-१५ छोटेखानी जुळे गुच्छ आले आहेत. ही लेकुरवाळी रजनीगंधा संध्याकाळी उमलली की, सुगंधाची बहार येते.
‘‘अगं या वेलावर पिवळी चांदण्यासारखी फुलं बघ.’’ आईने दाखवलं.
‘‘अगं आई, हा कंटोल्याचा वेल. गेल्या वर्षी भाजीवालीकडून दोन पिकलेली कंटोळी घेतली.
‘काय बावळट बाई आहे, लोकं पिकी कंटोली काढून टाकतात’, अशा विचाराने ती भाजीवाली गालातल्या गालात मला हसत होती. ती कंटोळी नंतर पिकली आणि फुटून लालभडक बिया बाहेर पडल्या. त्या बिया कुंडीत टाकल्याने हा वेल आलाय.
‘‘अगं, हे बघ मटकीएवढं कंटोलं आलंय!’’ मी आईला दाखवलं. संध्याकाळी हे पिवळं फूल, सकाळी मिटलं की, मोत्याच्या कुडय़ासारखं दिसेल बघ!’’
ओल्या आंबेहळदीचा (लोणचं करताना उरलेला!) तुकडा, कोंबाचं आलं, मोडाच्या अडकुळ्या, देठाचं गाजर आता पहिल्या सरीत सारं रुजून येईल. पण तोवरचा हा रखरखीत उन्हाळा सुसह्य करणारं हे देखणं सुख. माझ्या या ‘हिरव्या मैत्रीणच’ आहेत. मनीची सारी हितगुजं मी त्यांच्याशी वाटून घेते, रोज रात्री पाणी घालताना!
या मैत्रिणींनी मला दिलेल्या भेटी इतर कोणापेक्षाही खूपच मौल्यवान! नारळाएवढं टरबूज, तणांनी दुसऱ्या झाडाला घट्ट पकडून लोंबणाऱ्या खिरे काकडय़ा, लालबुंद छत्रीसारखी भासणारी फुलं, नंतर लोंबणाऱ्या मिरच्या, वालाच्या शेंगा, कुळीथ कितीऽऽ किती सांगू?
त्या रोपाच्या परवानगीने हे सारं काढताना जीवाला होणारा आनंद, मिळणारं सुख, स्वर्गाहूनही थोरच! म्हणूनच माणिक वर्माच्या आवाजातले ते शब्द- ‘‘हसले मनी चांदणे’’ बदलून म्हणावंसं वाटतं- ‘‘हसले मनी रोपटे!’’
शोभा नाखरे