Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
अमिताभच्या ‘सिलसिला’ सिनेमामध्ये टय़ुलिप्सच्या ताटव्यांचे जे मनोहारी दर्शन झाले होते, तेव्हापासून ‘कधीतरी आपल्यालासुद्धा ही टय़ुलिप गार्डन बघायला मिळाली तर..’ची स्वप्नं रंगवली होती! आणि जेव्हा हे स्वप्न प्रत्यक्षात आले तेव्हा डोळ्यांत अक्षरश: आनंदाश्रू उभे राहिले. सभोवार पसरलेले टय़ुलिप्सचे विविधरंगी नेत्रसुखद ताटवे बघताना ‘किती बघशील दोन नयनांनी!’ अशी स्थिती झाली. आणि आपण दशमुखी रावण असतो तर वीस डोळ्यांनी हे सौंदर्य अनुभवता आले असते, असा बालिश विचारही मनात येऊन गेला.
हॉलंडमधील क्युकेनहॉफ ही जगप्रसिद्ध टय़ुलिप गार्डन वसंत ऋतूची प्रतीक आहे. मुख्यत्वेकरून टय़ुलिप्स, डॅफोडिल्स, हाय्असिंथ व अन्य वासंतिक फुलांनी ती बहरलेली आहे. या बागेचे क्षेत्रफळ ३२ हेक्टर म्हणजे जवळजवळ ७९ एकर

 

आहे. या बागेत वैविध्यपूर्ण पुष्पप्रदर्शने असून, एक संपूर्ण दिवसही या बागेचा आस्वाद घेण्यासाठी अपुरा पडतो. बागेतील पायरस्त्यांची लांबी १५ कि.मी. असून, जागोजागी अनेक विश्रांतीस्थाने तयार केलेली आहेत. अशी ही बाग एकमेवाद्वितीय आहे. ‘युरोपमधील सर्वात बहुमोल आकर्षण’ म्हणून या बागेचा सन्मान केला गेला आहे.
सुमारे ४२ दशलक्षाहून अधिक रसिकांनी हा पुष्पोत्सव आतापर्यंत ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला आहे. या चिरतरुण बागेने आज वयाची साठी गाठली आहे. १०० प्रकारची टय़ुलिप्स फुले इथे आहेत. असंख्य रंगांच्या छटांमध्ये ४।। दशलक्ष टय़ुलिप फुले बघताना खरोखरीच डोळ्यांचे पारणे फिटते. हा जगातील सर्वात मोठा ‘बल्ब फ्लॉवर पार्क’ असून, सात दशलक्ष फुलझाडे हातांनी लावलेली आहेत. इथे नुसतीच फुलं नसून ८७ प्रकारचे २५०० वृक्षही आहेत. तसेच डच मूर्तिकारांच्या १०० हून अधिक कलाकृतीही इथे आहेत.
दरवर्षी इथे एका संकल्पनेवर आधारित कार्यक्रम व पुष्परचना केली जाते. गेल्या वर्षी चीनमध्ये ऑलिम्पिक असल्याकारणाने ऑलिम्पिक प्रदर्शन, चायनीज डिझाइनमध्ये फुलांची रचना, चायनीज गार्डन, चायनीज पुष्परचना इ. गोष्टी केल्या गेल्या होत्या.
या वर्षी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेला वंदना म्हणून ५३,००० फुलांनी स्वातंत्र्यदेवी साकारलेली आहे. इ. स. १६०९ मध्ये हेन्री हडसन हे डच ईस्ट कंपनीतर्फे अमेरिकेत जिथे उतरले, ते भाग म्हणजेच आताचे मॅनहॅटन व न्यू अ‍ॅमस्टरडॅम होत. नंतर न्यू अ‍ॅमस्टरडॅमचे नाव बदलून न्यूयॉर्क झाले. या ऐतिहासिक नातेसंबंधाला ४०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदा क्युकेनहॉफमध्ये यू. एस. थीम तयार केलेली आहे. अमेरिकन गार्डन, स्वातंत्र्यदेवीचा पुष्पाविष्कार व अन्य अमेरिकन कार्यक्रमांचे आयोजन इथे करण्यात आले आहे.
१५ व्या शतकात या ठिकाणी खाद्य-वनस्पतींचे (herbs) पीक घेतले जात असे. त्यावरून याला ‘क्युकेनहॉफ’ म्हणजेच ‘किचन गार्डन’ असे नाव पडले. १९४९ साली इथे प्रथम पुष्पप्रदर्शन भरले आणि त्यानंतर या बागेतील फुलांचा आलेख चढतच गेला. इथल्या फुलांचा पूर्ण बहर साधारणत: दोन महिने असतो. त्यासाठी ३१ माळी वर्षभर अविश्रांत मेहनत घेत असतात. टय़ुलिप्स खरी तर पर्शिया व टर्कीची! त्यांचे युरोपमध्ये आगमन १६ व्या शतकात झाले. पुढे एका तुर्कीश शब्दावरून त्यांचे नामकरण ‘टय़ुलिप’ असे झाले. अशी एक लोककथा आहे की, फरहाद या राजपुत्राचे शिरीनवर फार प्रेम होते. परंतु घरच्यांना ते पसंत नसल्यामुळे शिरीनचा वध करण्यात आला. त्यामुळे फरहादला अनावर शोक झाल्याने त्याने स्वत:ला कडय़ावरून झोकून दिले. त्याच्या रक्ताच्या थेंबा-थेंबातून टय़ुलिप्सची फुले तयार झाली व लाल रंगाच्या टय़ुलिप्सना म्हणून प्रेमाचे प्रतीक मानले जाऊ लागले. पिवळ्या रंगांची टय़ुलिप्स आनंददायी व आशा पल्लवित करणारी असतात, तर पांढरी टय़ुलिप्स क्षमाशीलतेचे प्रतीक मानली जातात. जांभळा रंग स्वामित्वाचा प्रतीक आहे. म्हणूनच लग्नाच्या ११ व्या वाढदिवसाला टय़ुलिप्सचा पुष्पगुच्छ भेट देण्याची प्रथा युरोपमध्ये प्रचलित आहे.
या स्वर्गीय नंदनवनात जाण्यासाठी आपल्याला प्रथम जावे लागते अ‍ॅमस्टरडॅमला! एकतर मुंबईहून सरळ फ्लाइट घेऊन किंवा युरोप फिरताना युरोरेलने किंवा फ्लाइटने अ‍ॅमस्टरडॅमला जाता येते. क्युकेनहॉफ हे अ‍ॅमस्टरडॅम व डेन हॅग यांच्या मध्ये आहे. अ‍ॅमस्टरडॅम, डेन हॅग, लेडन व शिफॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ इथून सर्व ठिकाणांहून बससेवा उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर सार्वजनिक वाहतूक सेवेने इथे येण्याचे व गार्डनच्या प्रवेश फीसकट काँबो तिकीटही आपण काढू शकतो. त्यामुळे कुठेही तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. हे तिकीट एअरपोर्टपासून ते रेल्वेस्टेशन किंवा टूरिस्ट इन्फर्मेशन सव्‍‌र्हिसपर्यंत कुठेही उपलब्ध असते. ही बाग सकाळी आठ वाजता उघडते ती संध्याकाळी साडेसात वाजता बंद होते. (आमचा बागेतून बाहेर पडण्याचा नंबर शेवटून पहिला होता.) वसंत ऋतू सुरू असल्याने इथे दिवस मोठा असतो. त्यामुळे संध्याकाळचे ७।। कधी वाजले, हे आम्हाला कळलेच नाही.
पार्कमध्ये प्रवेश करतानाच सोव्हेनिअर शॉप आहे. पण नेहमीप्रमाणे ‘येताना बघू,’ असे म्हणत पुढे गेल्यावर उजव्या हाताला यांत्रिक वाद्यवृंद आपले स्वागत करतो. आम्ही दैनंदिन कार्यक्रमांबद्दल माहिती मिळविण्यासाठी सरळ स्वागतकक्ष गाठला. गार्डनचा मॅप मिळाल्यामुळे कुठे काय आहे व आधी काय बघता येईल, हे ठरवता आले. तसेच या वर्षीपासून एक नवीन आकर्षण इथे सुरू झाले आहे, ते म्हणजे ‘व्हिस्पर बोट’! ही बोट बागेमध्ये ५० मिनिटांची चक्कर मारून आणते. या बोटीचे वैशिष्टय़ म्हणजे ही पारंपरिक बोट असून, त्याचे इंजिन मात्र विजेवर चालते. त्यामुळे ती इको-फ्रेंडली असून, अजिबात आवाज करीत नाही वा धूरही सोडत नाही. आरस्पानी, स्फटिकासारख्या चमचमणाऱ्या, नितळ पाचूच्या रंगाच्या तळ्यामधून, आजूबाजूच्या रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांमधून, गुलाबी थंडीतला हा नौकाविहार जणू स्वर्गारोहणाचा प्रत्यय देतो! हा अनुभव व्यक्त करायला शब्दच थिटे पडतात. कॅमेरा खाली ठेववतच नाही.
या बोटीची सफर प्रथम घेतल्यामुळे बागेचा ट्रेलर बघून झाला व मेन पिक्चरची सुरुवात करण्यासाठी पोटपूजेला लागलो. इथे दिवसातून दोनदा दीड तासांची गाइडेड टूर असते. या टूरमधून जाताना वेगवेगळ्या देशांतल्या लोकांचा सहवास मिळाल्याने आपल्या ज्ञानात बरीच भर पडते. ओपन एअर गार्डनबरोबरच अनेक पुष्पप्रदर्शनेही ठिकठिकाणी आढळतात. ऑर्किडच्या निरनिराळ्या तऱ्हा बघताना बघणाऱ्याचीच दमछाक होते. आणि हो, फोटो काढण्यासाठी एवढे सुंदर सुंदर स्पॉट्स असल्याकारणाने एक दिवस का होईना, आपण पण बॉलिवूडचे कलाकार आहोत (extra का असेना!) असा संध्याकाळपर्यंत गोड (गैर)समज होतो. तसंही या बागेला 'most photographed place in the world' म्हटलं जातंच!
दुपारी आमचे या पुष्पवाटिकेत भोजन चाललेले असताना अचानक फुलांनी सजवलेले बरेच रथ संथपणे जाताना दिसले. तेव्हा कळले की, ही ‘फ्लॉवर परेड’ असून, तिचा ४० कि.मी.चा मार्ग नॉर्डविक ते हार्लेम असा आहे आणि दुपारी ती क्युकेनहॉफ पार करून जाते. या परेडला ‘फेस ऑफ स्प्रिंग’ असे म्हणतात. ही नेदरलँडची अतिशय प्रसिद्ध परेड आहे. या मिरवणुकीमध्ये फुलांनी शोभिवंत केलेली जवळजवळ २० ते ३० वाहने असतात. फुलं एवढी असतात, की अख्खं एक फुलांचं बेटच चाललंय की काय, असं वाटतं.
इथे येणाऱ्या रसिकांच्या सोयीचा एवढा विचार केला गेलेला आहे की, डीजी-कॅमवाल्यांसाठी इथे एक फोटोवर्कशॉपही ठेवले आहे. कमी वेळात ते आपल्याला उत्कृष्ट फोटोग्राफीच्या टिप्स देतात. त्यामुळे फोटो काढणाऱ्याचा आत्मविश्वास वाढतो.
आपल्याबरोबर लहान मुलं असली तर त्यांना, ‘आई, चल ना, कंटाळा आलाय,’ असं म्हणायला संधीच ठेवलेली नाहीए. मुलांसाठी ट्रेझर हंट, अमेझिंग व्होयेज ऑफ डिस्कव्हरी, प्ले-ग्राऊंड, जंगल जिम अशी अनेक आकर्षणे आहेत. आणि हो, गार्डनच्या लेकमध्ये वॉक घेण्याची मजा मोठय़ांना पण येते बरं का!
या गार्डनला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये लहानांपासून तरुण, प्रौढ, एकटी माणसे, वृद्ध माणसे, व्हीलचेअरवरून आलेले अपंग अशा सर्वाचा समावेश असतो. रम्य निसर्गाच्या या सान्निध्यात सर्व दु:खे, व्यथा-वेदना आणि शारीरिक त्रासांवर मात करून माणसाला निखळ आनंद देणाऱ्या या बागेच्या निर्मात्यांना खरोखरीच धन्यवाद द्यायला पाहिजेत. वर्षांचे दहा महिने अथक कष्ट घेतल्यावर दोन महिने येणाऱ्या फुलांच्या बहरामुळे तिच्या पडद्यामागच्या निर्मात्यांचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो.
आपल्याकडे काश्मीरमध्ये गेल्या वर्षीपासून झबरवान हिलच्या पायथ्याशी एक टय़ुलिप गार्डन खुली झाली आहे. आशिया खंडातील ती सर्वात मोठी टय़ुलिप गार्डन असून, १.२ दशलक्ष टय़ुलिप या गार्डनमध्ये आहेत. अर्थात या फुलांचे माहेरघर नेदरलँडच आहे.
बरेच लोक युरोपची टूर करतात. पण सर्वानाच युरोपला जाण्याचा योग्य मोसम- जेव्हा टय़ुलिप गार्डन पाहता येते, तो- माहीत असतोच असे नाही. साधारणपणे २० मार्च ते २० मेपर्यंत दोन महिनेच ही गार्डन आपण बघू शकतो. बाकी दहा महिने ती बंद असते. युरोप सहलीचा वारेमाप खर्च करूनही आपण या आनंदाला मुकलो असे होऊ नये.
क्युकेनहॉफ गार्डनच्या षष्ठय़ब्दीपूर्तीनिमित्ताने टय़ुलिपच्या सौंदर्याला मन:पूर्वक दाद!
विनीता उदय लिमये
vinitalimaye@yahoo.com