Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

हा छंद मनाला लावी पिसे..
साधारण पाच-सहा वर्षांपूर्वी कावळा, चिमणी, मोर, पोपट, साळुंखी इतकेच हाताच्या बोटांवर मोजण्याइतके पक्षी माहिती असलेल्या आम्ही दोघी सलीम अलींचं Book of Indian Birds हातात पडल्यावर आरपार बदलून गेलो. सलीम अली, ग्रिमीट आणि दुर्बिणी घेऊन पक्षीवेडय़ांच्या आगळ्या दुनियेत अलगद दाखल झालो. हळूहळू बालबुडय़ा/ लालगाल्या बुलबुल, हळद्या, नाचण, सूर्यपक्षी, सातबाया, खंडय़ा, शिंपीण, दयाळ हेही पक्षी सहज ओळखता येऊ लागले. पक्षीनिरीक्षणाच्या मोहापोटी ऐरोली, शिवडी, येऊरचे जंगल, नागला बंदर, नॅशनल पार्क, आयआयटी अशा आसपासच्या परिसरांना वारंवार भेटी घडू लागल्या. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचे आपण किती निराळे असतो नाही! काळानुसार आपण बदलच जातो, हे निश्चित. आमचे हे पक्षीवेड नेमके कशामुळे बहरत गेले, ते आज सांगता येणार नाही. आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागल्यामुळे असेल किंवा अशाश्वत जीवनशैलीमुळे येणाऱ्या असमाधानाच्या गराडय़ात

 

काही शाश्वत, निरपेक्ष सापडतंय का, याचा शोध घेण्याची धडपड म्हणून असेल, पण पक्षीविश्वात आम्ही रमून गेलो, हे खरे!
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सगळीकडे भारावल्यागत पक्षी निरखण्यासाठी नजर शोधक झाली. प्रवास करायला आपल्याला आवडतेच; पण साधा पुण्या-नाशिकपर्यंतचा प्रवासही पक्षीप्रवास होऊ लागला.
एखाद्या व्यक्तीशी आपली मैत्री होते. ही मैत्री दृढ होताना नव्या नात्यातआपले आणि त्या व्यक्तीचे सगेसोयरेही हळूहळू शिरकाव करतात. तसंच काहीसं आमचंही झालं. पक्ष्यांबरोबरच जंगलातील इतर गोष्टीही आवडू लागल्या. झाडं, पानं, फुलं, फुलपाखरं, किडे, कीटक, प्राणी यांच्याशी नाते जुळून आले. पक्षीनिरीक्षणातून जंगलवाचनाचा पाठ मिळाला. येऊरला जंगलाची प्रथम भेट झाली. नागझिऱ्याचे जंगल सर्वार्थाने भेटले. प्रत्यक्ष जंगलात राहण्याचा एक वेगळा अनुभव मिळाला. पिंजऱ्यामध्ये पाहिलेले प्राणी प्रथमच इथे मुक्त अवस्थेमध्ये पाहायला मिळाले. प्राण्यांच्या पावलांचे ठसे, मचाण, प्राण्यांसाठी नाही, तर वाघ बघायला मिळावा म्हणून चक्क माणसांसाठी बांधलेले पिंजरे, विविध प्राण्यांची वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या कारणांसाठी येणारी साद किंवा आवाज- या साऱ्याचे नव्याने अर्थ समजू लागले.
नागझिरा जंगलाने तर आम्हाला जंगलाच्या प्रेमातच पाडले आणि मग सतत जंगल साद घालू लागले. जंगलाची भेट हे टॉनिक वाटायला लागले. या वर्षी मे महिन्यात बांधवगडला जाण्याचा योग आला. अनेक जंगलप्रेमींकडून बांधवगडबद्दल ऐकले होते. तेथील वाघाची फिल्म बघितली होती. नागझिऱ्यासारखे बांधवगडच्या जंगलातील घनदाट भागात तुम्हाला राहता येत नाही. मात्र, मुख्य जंगलाच्या बाहेर अनेक विश्रामस्थळे आहेत. पुण्याच्या ‘युवाशक्ती’ संस्थेने सर्व सहभागी सभासदांची राहण्याची सोय ‘टायगर ट्रेल’ या रिसॉर्टमध्ये केली होती. रिसॉर्टच्या जेवणघराच्या आजूबाजूला असलेली भरपूर झाडे, पाठीमागे तळे, मातीचा रस्ता यामुळे जंगलात राहण्याचा ‘फील’ होता. तळ्यामध्ये असंख्य गुलाबी कमळे, मोठा पाणकावळा, खंडय़ा, बंडय़ा, सुतार, तांबट यांनी आमचे ‘टायगर ट्रेल’मध्ये स्वागत केले.
पुढच्या दोन दिवसांत चार वेळा आम्ही जंगलात गेलो. उघडय़ा जीपमधून जंगलाची सफर हा वेगळाच अनुभव होता. बांधवगड जंगल पांढऱ्या वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पण एकही पांढरा वाघ आता तिथे सापडत नाही. विंध्याचल पर्वतरांगांमध्ये असलेल्या या जंगलात सुमारे ४० वाघ आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक प्राणी, २५० प्रकारचे पक्षी, ५१५ प्रकारचे वृक्ष, लहान लहान तळी यांनी समृद्ध असणाऱ्या या जंगलाचा सर्वानी परिपूर्ण आनंद घ्यावा म्हणून जंगलाच्या प्रवेशद्वारावरच..
Dear Friends,
My sighting in wild is a matter of chance. Single minded objective for me during park visit may disappoint you to enjoy this park in its total wilderness...
असे वाघानेच आवाहन केले आहे. या जंगलात वाघ अडचणीच्या ठिकाणी, दलदलीमध्ये, उंच गवतात झोपलेला किंवा सुस्त पडलेला असतो. हत्तीवरील सफारीत एका वेळी चारजणांना सोबत घेऊन माहूत वाघाच्या अगदी जवळ जातो. अशा एका वाघिणीच्या भेटीच्या वेळीच आमच्या हत्तीचा एक पाय चिखलात रुतल्यामुळे हत्ती वाघिणीकडे झुकला. त्याच वेळेस झोपेतून नुकत्याच उठलेल्या वाघिणीने पूर्ण डोळे उघडून आमच्याकडे पाहिले. जेमतेम चार ते पाच फुटांवर असणाऱ्या वाघिणीचा आपण आयताच ब्रेकफास्ट ठरणार की काय, असे त्या क्षणी हत्तीवरच्या आम्हा चौघांना वाटून गेले. पण वाघ काही निसर्गत: नरभक्षक नसतो. जर त्याचे जंगलातील अन्नच संपले किंवा जंगलच राहिले नाही, किंवा आपण त्याच्यावर आक्रमण करण्याचा, त्याला घाबरविण्याचा प्रयत्न केला तरच तो आपल्यावर हल्ला करतो.
‘तुमच्याकरिताच मी इथे उन्हं खात बसलो आहे, काय पाहायचे आहे ते पाहा मला..’ अशा आविर्भावात बसलेल्या वाघाने एकदा मात्र आम्ही जीपमध्ये असताना अगदी जवळून मनसोक्त दर्शन दिले. रस्त्याच्या कडेला लागून विरळ झालेल्या माळरानामध्ये आरामात बसलेल्या वाघाला बघण्यासाठी सुमारे १० ते १५ फुटांवर उभ्या असलेल्या १५ ते २० जिप्स आणि त्यातील जवळजवळ शंभरएक माणसे असे आगळेवेगळे दृश्य आम्हाला एकदा पाहायला मिळाले. जंगलाचा राजा यापेक्षा वेगळा कोण असणार, हे मनोमन पटले.
बांधवगडच्या या जंगलाने वाघ-वाघिणीचे नितांतसुंदर दर्शन घडवून आम्हाला खूश केलेच, शिवाय ठिकठिकाणी दिसणारे मोर, लांडोर, असंख्य हरणे, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या करामती करताना समोर येणारे लंगूर, क्वचित भेटणारी रानडुकरे, अत्यंत दुर्मिळ असणारा लेसर एडज्यूटंट नावाचा स्टॉर्क आणि त्याचबरोबर ब्लॅकनेक्ड स्टॉर्क, जंगलामध्ये हमखास दृष्टीस पडणारे निरनिराळ्या प्रकारचे गरुडही पाहायला मिळाल्यामुळे आमचा आनंद शतगुणित झाला.
सुमारे ७० प्रकारचे छोटे-मोठे पक्षी न्याहाळताना खूप मजा आली. बऱ्याच जंगलांना भेट देऊनही कधीही न दिसलेली अनेक प्रकारची गिधाडे मोठय़ा संख्येने इथे पाहायला मिळाली. चेस्टनट बेलीड नताच हा फक्त पुस्तकात पाहिलेला चिमणीच्या आकाराचा, झाडाच्या बुंध्याभोवती फिरणारा आणि झाडाच्या बुंध्याचा रंग ल्यालेला पक्षी, टिकल्स ब्ल्यू फ्लायकॅचर, सुरंगी किंवा स्वर्गीय नर्तक हे आम्हाला टायगर ट्रेलच्या आवारातच दिसले.
दोन दिवसांच्या या सफरीमध्ये बांधवगड जंगल-संरक्षक, जीपचालक व मार्गदर्शक यांची जंगलाबद्दलची आत्मीयता, आस्था व प्रेम पाहून वाटले की, या सजग मंडळींमुळेच जंगल टिकून आहे. जंगलातील प्राणी, पक्षी, झाडे यांची सर्वागीण माहिती त्यांना असते. जंगलच्या नियमांचे काटेकोर पालन ते करतात. जंगलात कोणी कचरा वा प्लॅस्टिक टाकणार नाहीत, याची काळजी ते घेतात.

निर्भेळ आनंद देणारे असे हे निसर्गवाचन. वेळ व सुट्टीच्या मर्यादेमुळे जंगलवाचन आवरतं घ्यावं लागलं आणि परतीचा प्रवास सुरू झाला. जंगलातला मुक्काम अजून एक-दोन तरी दिवस वाढायला हवा होता, असे सारखे वाटत राहिले. अजून खूप काही पाहायचे आहे, असे वाटत राहिले आणि हुरहूर लागून राहिली. या हुरहुरीतूनच पुढचा प्रवास कुठे करायचा, याची आधी मनातल्या मनात आणि नंतर आपापसात चर्चाही सुरू झाली. या भटकंतीतील निसर्ग सतत खुणावत होता. अशा या जंगलभ्रमंतीच्या आठवणी आणि भविष्यातील जंगलभेटीचे संकल्प यांची स्वप्नं बघत नित्याचे धकाधकीचे जीवनही मग सुंदर होऊन जाते.
..तर मुक्तजीवी प्राणी-पक्ष्यांच्या वावराने पावन झालेल्या बांधवगडच्या घनदाट रानात दिल की तसल्ली के लिये दोन-तीन दिवस मनमुक्तपणे घालविण्यास काहीच हरकत नाही. हे सर्व जीव आपल्या शहरी, निर्जीव जीवनात नवा प्राण, नवा जीवनरस भरताहेत, हे निश्चित.
तर मग बांधवगडच्या जंगलात जाणार ना वाघाच्या भेटीला?
शुभदा न्यायते
सीमा केतकर