Leading International Marathi News Daily
शनिवार, ६ जून २००९
  'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
  हरवलेली माणसं की हरलेली घरं?
  ...पण बोलणार आहे!
साइझ झीरो
  मैत्र जिवीचे..
  विज्ञानमयी
  चिंचोणी
  नवनिर्माणाचा ध्यासपंथी
  काळ सुखाचा
व्हिडियो गेम्सचं भीषण व्यसन
  चिकन सूप...
मी कोणतंही काम करेन!
  'ती'चं जग
परस्परांशी रडलो, हसलो..
  कवितेच्या वाटेवर
घनुवाजे घुणघुणा
  जिद्दीचे पंख नवे!
  ललित
हसले मनी रोपटे!
  चिरतरुण क्युकेनहॉफ गार्डन
  हा छंद मनाला लावी पिसे..

 

'गुप्तवार्ता'चा नवा चेहरा
अलीकडेच मुंबई नि राज्यभरात झालेल्या दहशतवादी तसेच नक्षलवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर गुप्तवार्ता विभाग अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या विभागात एक स्वतंत्र सुभा निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत राज्यभरातून ८२ जणांची निवड करण्यात आली. त्यात २८ महिलांचा समावेश आहे. या विशेष अधिकाऱ्यांना दहशतवादी कारवायांसंदर्भातील माहिती संकलनाचे खास प्रशिक्षण देण्यात येणार असून, या सक्षम अधिकाऱ्यांच्या ताफ्याने गुप्तवार्ता विभागाचा चेहरामोहरा आमूलाग्र बदलला जाईल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या काही वर्षांत दहशतवाद्याचे लक्ष्य बनून राहिलेल्या मुंबईच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि राज्य पोलीस दलाचा भाग असलेल्या गुप्तहेर खात्याचा कार्यभार स्वतंत्रपणे चालवण्यात येण्याची निकड निर्माण झाली. अलीकडेच राज्य गुप्तवार्ता विभागासाठीच्या अधिकाऱ्यांच्या थेट नेमणूका करण्यात आल्या असून या अधिकाऱ्यांमध्ये

 

महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. या अधिकाऱ्यांना उच्च दर्जाचे अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त प्रशिक्षण दिले जाणार असून लवकरच ते सेवेत रुजू होणार आहेत.
खरे तर गुप्तवार्ता विभागात रुजू व्हायला अधिकारी फारसे राजी नसतात. या विभागात झालेली बदली ही कमी दर्जाची मानली जाते. त्यामुळे येथे बदली झालेला अधिकारी इथून काढता पाय कसा घेता येईल, याच विचारात असतो. याची सांगण्याची व न सांगण्याची अशी वेगवेगळी कारणे आहेत. त्यामुळे इथे आलेल्या मात्र सदैव बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून गुप्तवार्ता गोळा करण्याचे काम तितकेसे मनापासून केले जात नाही नि त्यामुळे या कामात सातत्यही राहत नाही. आणि मग एखाद्या प्रकरणाचा गोपनीय अहवाल तयार करताना केवळ पोलीस स्टेशनकडून आलेला अहवालच पुढे सारला जातो, असे काही प्रकरणांमध्ये घडले होते. या साऱ्या गोष्टींचा गुप्तवार्ता विभागाच्या कामकाजावर अनिष्ट परिणाम झाला नाही, तरच नवल!
ही कोंडी फोडण्याच्या दृष्टीने राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख डी. शिवानंदन यांनी सुवर्णमध्य काढत अलीकडेच राज्य गुप्तवार्ता विभागाचा स्वतंत्र सुभा स्थापन करण्याचे ठरविले. या विभागाच्या वरिष्ठ अधिकारी पदासाठी अलीकडेच थेट परीक्षा घेण्यात आल्या. थेट याचा अर्थ गुप्तवार्ता अधिकारी (गट ‘ब’) या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मांडवाखाली न होता स्वतंत्ररीत्या घेण्यात आल्या. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले अधिकारी हे विशिष्ट काम करण्यासाठी म्हणूनच निवडण्यात आले असल्याने त्यांना दिलेले काम करण्याबाबत त्यांच्या मनात अनिच्छा असण्याची शक्यताच राहणार नाही. त्यामुळे गुप्तवार्ता विभागाचे काम अधिक सुकर होऊन कामात सातत्य येईल, अशी शिवानंदन यांची भावना आहे.
नव्याने रुजू झालेले अधिकारी याकडे आपली नोकरी या दृष्टीने सकारात्मकतेने पाहत असल्याने त्यांची काम करण्याची उमेद आणि उत्साह लक्षात घेता त्यांचे काम परिणामकारक होईल. मात्र, गुप्तवार्ता विभागात नव्याने दाखल झालेल्या या अधिकाऱ्यांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण कसे मिळते, यावर बरेच काही अवलंबून आहे.
अलीकडेच पार पडलेल्या या परीक्षेला राज्यभरातून सुमारे १२ हजार विद्यार्थी बसले होते. त्यात लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा कठोर चाचण्यांतून सुमारे ८२ विद्यार्थी निवडले गेले. त्यात २८ महिलांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांना सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी हडपसर येथे ट्रेनिंग अ‍ॅकेडमी सुरू करण्यात आली आहे. या अ‍ॅकेडमीमध्ये राज्य गुप्तवार्ता विभागासाठी आवश्यक असणाऱ्या शिपाई पदासाठी निवडल्या गेलेल्या प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. हे शिपाई या विभागातील अधिकाऱ्यांचे सहाय्यक म्हणून पुढे काम करतील.
यात निवडल्या गेलेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण येत्या १५ जूनपासून सुरू होणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्रभरात करण्यात येईल. प्रामुख्याने दहशतवादाचा धोका असलेल्या ठिकाणी तसेच नक्षलग्रस्त भागांत या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्या कामाचे स्वरूप अर्थातच गुप्त माहितीविषयक असेल. सुरक्षा यंत्रणांना आवश्यक असलेली माहिती गोळा करणे, त्याविषयीचे अहवाल सादर करणे, हा या अधिकाऱ्यांचा कामाचा एक भाग असेल.
यासंदर्भात माहिती देताना राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख डी. शिवानंदन यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर या विभागाची नव्याने पुनर्बाधणी करण्याच्या दृष्टीने उचललेले हे एक पाऊल आहे. अनेक कठोर चाचण्यांतून यशस्वी ठरलेल्या या उच्चशिक्षित उमेदवारांना देशभरातील उत्तम प्रशिक्षकांच्या हाताखाली प्रशिक्षण मिळेल. या उमेदवारांमध्ये तरुणींच्या वाढलेल्या संख्येबाबत बोलताना शिवानंदन यांनी निवडप्रक्रियेत लिंगसापेक्षता बाळगली नसल्याचे स्पष्ट केले. केवळ गुणवत्तेच्या निकषावरच उमेदवारांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. या निवड झालेल्या अधिकाऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाने प्रशिक्षण दिले जाणार आहे. दहशतवादी आव्हानांना सडेतोड उत्तर देण्यासाठी हा विभाग सज्ज राहील, असे सांगून, या नव्या बदलांमुळे गुप्तवार्ता विभाग अधिक कार्यक्षम होईल, असा विश्वासही शिवानंदन यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या स्वतंत्र गुप्तवार्ता विभागाच्या नुकत्याच घेतल्या गेलेल्या अधिकारी स्पर्धा परीक्षेत हर्षवर्धन कविटाके राज्यातून अव्वल, तर ठाण्याचा स्वानंद राजपूत दुसरा आला. या परीक्षेत निवडल्या गेलेल्या ८२ अधिकाऱ्यांमध्ये २८ महिला आहेत. त्यात गुणानुक्रमे वैशाली गवई प्रथम, तर प्रेमा लहामगे आणि स्वाती गोरे या दुसऱ्या व तिसऱ्या आल्या आहेत. स्नेहल सावंत, वर्षां मनाले, शीतल श्रेयकर आणि संतोष झगडे हे चार अधिकारी क्रीडावर्गासाठी राखीव कोटय़ातून निवडले गेले आहेत.
या परीक्षेत ज्या २८ महिला अधिकाऱ्यांची निवड झाली आहे, त्यात सोलापूर विभागातील स्वाती गोरे या २६ वर्षीय युवतीचा समावेश आहे. साताऱ्यातून बीई- इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी संपादन केलेल्या स्वातीला वेगळे आव्हानात्मक करिअर करायचे होते. गुप्तवार्ताविषयक काम करताना आपल्या तंत्रशिक्षणाचाही उपयोग होऊ शकेल, याचे समाधान स्वातीला वाटते. गुप्तवार्ता विभागात झालेल्या निवडीबद्दल तिला आनंद वाटतोय, मात्र आपल्यावर एक नवी जबाबदारी आल्याची जाणीवही तिला आहे. तिच्या या करिअर निवडीमध्ये तिला घरच्यांचे पूर्ण सहकार्य मिळत असल्याचेही तिने सांगितले.
प्रेमा लहामगे हिनेही या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. प्रेमाने पुण्यातून कृषीविज्ञान विषयातून एम. एस्सी. पदवी प्राप्त केली आहे. ती राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होती. तिने एमपीएससीचीही परीक्षा दिली आहे. त्या परीक्षेच्या दीर्घ प्रक्रियेपेक्षा गुप्तवार्ता विभागातर्फे घेतली गेलेली ही परीक्षा कमी वेळखाऊ होती, असे तिने सांगितले. अर्थातच वेगळे आव्हानात्मक काम करण्याची तिचीही इच्छा होती. तिला आपल्या कामाकरता राज्यभरात कुठेही पाठविले जाऊ शकते. त्यासाठी प्रेमाची पूर्ण मानसिक तयारी झालेली आहे. तिचीच नव्हे, तर तिच्या घरच्यांचीही. हे काम करताना मुलगी म्हणून कुठेही वेगळी ट्रीटमेन्ट मिळण्याची तिची अपेक्षा नाही. लवकरच सुरू होणारे प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण करून देण्यात येणारी जबाबदारी सांभाळण्यासाठी ती कंबर कसणार आहे.
साताऱ्याच्या नीलम भुजबळने गणितातून बी. एस्सी. पूर्ण केले असून, साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव महाविद्यालयातून ती सध्या एम.बी.ए. करीत आहे. २२ वर्षांची नीलम उच्च शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षाही देत होती. दरम्यान, तिने राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अधिकारीपदाची ही परीक्षा दिली आणि त्यात ती उत्तीर्ण झाली. गुप्तवार्ता अधिकारी म्हणून काम करण्याचे आव्हान पेलताना मुलगी म्हणून कुठलीही अडचण येणार नाही, असे ती ठामपणे म्हणते.
या परीक्षेत यश पटकावलेली वर्षां मनाले ही औरंगाबादची. वर्षांने एम. एस्सी. (कॉम्प्युटर्स) केले असून, ती औरंगाबादमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळते. वर्षांचे लग्न झाले असून, करिअरमध्ये आपल्याला घरच्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे तिने सांगितले. पोलीस सेवेत असल्यामुळे तिला या करिअरमधील कामाचा प्रचंड व्याप नि ताणतणावांची चांगलीच जाणीव व सवय आहे. त्यामुळे काम, बदली या साऱ्याची पूर्ण मानसिक तयारी असलेली वर्षां राज्य गुप्तवार्ता विभागाचे नवे आव्हान स्वीकारायला सज्ज आहे. गुप्तवार्ता विभाग जी जबाबदारी सोपवील ती पेलताना स्त्री म्हणून कुठलीही अडचण येणार नाही, असे तिने ठामपणे सांगितले.
औरंगाबादच्या वैशाली गवई हिने गणित या विषयात एम.एस्सी. केले असून, त्यानंतर तिने बी.एड.ही पूर्ण केले आहे. जालन्याच्या जिल्हा परीक्षेच्या शाळेत ती शिक्षणसेवक म्हणून कार्यरत आहे. नवी जबाबदारी जिकिरीची असून कामही जोखमीचे आहे. या करिअरमध्ये वेळ, बदली याची तमा बाळगायची नसते, हेही वैशालीला ठाऊक आहे. तिच्या या निर्णयामध्ये घरच्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे तिने सांगितले.
प्रशिक्षणानंतर या अधिकाऱ्यांची महाराष्ट्रभर सर्वत्र नेमणूक केली जाईल. त्यांच्या मदतीला सहाय्यकही दिले जाणार आहेत. त्यांचे काम गुप्तवार्ताविषयक अहवाल तयार करण्याचे असून, हे अहवाल विभागाच्या मुंबईतील मुख्य केंद्राकडे पाठविण्यात येतील. ही सर्व पदे ‘ब वर्ग’ अधिकाऱ्यांची असून, त्यांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा लाभणार आहे. पुढील दहा वर्षांत आपल्या कामाद्वारे या अधिकाऱ्यांना पोलीस उपअधीक्षक या पदापर्यंत पोहोचता येईल.
मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये जुलै २००६ साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांनी राज्य गुप्तहेर खात्याचे पितळ उघडे पडले होते. या बॉम्बस्फोट मालिकेनंतर गुप्तहेर विभागाच्या पुनर्बाधणीची निकड नव्याने जाणवू लागली. या घटनेनंतर मुंबईभेटीवर आलेल्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी गुप्तहेर खाते बळकट करण्याची गरज व्यक्त केली होती आणि त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळाने गुप्तहेर खात्याचा चेहरामोहरा बदलण्याचे निश्चित केले. तत्कालीन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी गुप्तवार्ता विभागाची ‘एखाद्या अधिकाऱ्याला शिक्षा म्हणून बदली करण्यासाठी वापरला जाणारा विभाग’ ही प्रतिमा पुसली जाईल, असे सुतोवाच त्यावेळी केले होते. तेव्हापासून गुप्तवार्ता हा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले. या विभागातील गोपनीय माहिती गोळा करणारे अधिकारी सेवानिवृत्त होईपर्यंत तिथेच कार्यरत राहतील, अशी योजना आखण्यात आली. राज्य सरकारकडे गेल्या काही वर्षांपासून स्वतंत्र गुप्तवार्ता विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाचे भिजत घोंगडे होते खरे, मात्र रेल्वे बॉम्बस्फोटानंतर या प्रस्तावाकडे लक्ष पुरविले गेल्याची कबुलीही पाटील यांनी त्यावेळी दिली होती.
त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये एक स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्रात सुरू होणारे अशा प्रकारचे हे दुसरे प्रशिक्षण केंद्र आहे. केंद्रीय गुप्तहेर विभागाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या गुप्तवार्ता विभागात (स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेन्ट- एसआयडी) कायमस्वरुपी नेमणुका करण्याचे ठरले आणि भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी हा या विभागाचे नेतृत्व करेल, असेही निश्चित करण्यात आले.
आतापर्यंत गुप्तवार्ता विभागात बदलीवर आलेल्या अधिकाऱ्याला गोपनीय माहिती गोळा करण्याचे तंत्र अवगत होईपर्यंत अथवा त्याचे पुरेसे नेटवर्किंग तयार होईपर्यंत त्याची बदली इतरत्र व्हायची आणि मग त्या अधिकाऱ्याच्या हुशारी व कौशल्याचा उपयोग गुप्तवार्ता विभागाला क्वचितच व्हायचा. आता नव्याने आकाराला येणाऱ्या गुप्तवार्ता विभागाच्या या स्वतंत्र विभागामुळे याला आळा बसेल. गुप्तवार्ता विभागाच्या नवनियुक्त अधिकाऱ्यांना दहशतवादी गटांचा सामना कसा करायचा, हे शिकवतानाच शहरातील अंडरवर्ल्ड नेटवर्कची माहिती मिळवण्याचे खास प्रशिक्षणही देण्यात येईल.
या गुप्तवार्ता विभागासाठी सरकारने विशेष निधीची तरतूद केली असून, गुन्हेजगताची माहिती काढणे व लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी गटांच्या नेटवर्कची माहिती मिळविण्याच्या दृष्टीने शहरात गुप्तवार्ता विभागाचे कक्ष तयार करण्यात येणार आहेत, अशीही माहिती सूत्रांनी दिली. या विभागातर्फे राज्यांतर्गत खबऱ्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल, संशयितांना नियंत्रणाच्या टप्प्यात आणणे तसेच गुन्ह्याची नोंद असलेल्यांची इत्यंभूत माहिती तयार ठेवणे, आदी प्रशिक्षण गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले जाणार आहे.
गुप्तवार्ता विभागात काम करण्यासाठी अर्हता नि उत्साह यांच्यासोबत इतरही गुणांची आवश्यकता असते. त्यात समाजाच्या बऱ्या-वाईट घटकांशी उत्तम प्रकारचे नेटवर्किंग प्रस्थापित करण्याची आवश्यकता असते. पुरुष अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महिला अधिकाऱ्यांनाही तोडीस तोड काम करत अशा नेटवर्किंगकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सुरुवातीला त्यांना जवळपास नेमणूक मिळण्याची शक्यता असली तरीही गुप्तवार्ता विभागात साधारण दोन वर्षांनी बदली होते. अशावेळी गुप्तवार्ता अधिकाऱ्यांना सध्याचे नेटवर्किंग सोडून नव्या ठिकाणी नेमणूक झाल्यावर नव्याने नेटवर्किंगसाठी बांधणी करावी लागते. ही कठीण कामगिरी पेलण्यासाठी विशेष तयारी या नव्या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.
एखादी माहिती गोळा करताना संबंधित व्यक्ती तसेच संशयाची सुई ज्यांच्यावर स्थिरावते अशा व्यक्तींना पोलीसठाण्यात बोलावून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास करत माहिती गोळा केली जाते. मात्र, गुप्तवार्ता विभागाचे कामच असे आहे की, सर्व माहिती ही गोपनीय पद्धतीने गोळा केली जाते आणि त्याचा अहवाल सादर केला जातो. यासाठी उत्तम नेटवर्किंगची आवश्यकता असते आणि हे गुप्तवार्ता विभागात नव्याने दाखल झालेल्या नव्या तरुण-तरुणींपुढचं मोठं आव्हान आहे. ते ही मंडळी किती समर्थपणे पेलतील, हे आगामी काळात दिसून येईलच.
सुचिता देशपांडे
suchitaadeshpande@gmail.com