Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

व्यापार - उद्योग

आयपीटीव्हीवर होणार अभ्यास!
प्रतिनिधी

केबल आणि डीटीएच सेवांना पर्याय ठरलेल्या आयपीटीव्ही म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हीजनचे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. आयपीटीव्हीमध्ये सार्वजनिक कंपन्यांबरोबरच अनेक खाजगी कंपन्यांनीही आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलनंतर भारती टेलिकॉम या कंपनीने भारतात आपले आयपीटीव्ही आणले. आता स्मार्ट डिजीव्हीजन या कंपनीने ‘माय वे’ या नावाखाली आयपीटीव्हीचे नेवे रुप बाजारात आणले आहे.

सॉफ्ट स्किल्स मॉडय़ूलसह क्लिनिकल रिसर्चमधील शिक्षणासाठी ‘क्रेमा’चा पुढाकार
व्यापार प्रतिनिधी:
देशात प्रथमच क्लिनिकल रीसर्च एज्युकेशन आणि मॅनेजमेंट अॅकॅडमी (क्रेमा) आपल्या खास ‘अॅडव्हान्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल रीसर्च मॅनेजमेंट अभ्यासक्रमांची सुरुवात करत आहेत. यात केवळ क्लिनिकल रीसर्च मॉडय़ुलचाच समावेश नसून क्लिनिकल डेटा व्यवस्थापन, फार्माकोव्हिजिलन्स आणि व्यवस्थापन तसेच सॉफ्ट स्किल मॉडय़ुलचाही समावेश आहे. भारतातील हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यासक्रम असून यासह लीप लर्निग सिस्टीम्सची सुरुवात केली जाईल.

बार्कलेज्च्या ‘हॅलो मनी’ सेवेचा विस्तार
व्यापार प्रतिनिधी:
बार्कलेजच्या भारतातील ग्लोबल रिटेल अँड कमर्शिअल बँकेने (जीआरसीबी) आपल्या ‘हॅलो मनी’ सेवेचा येथे विस्तार केला आहे. जीआरसीबीने त्यासाठी भारतातील नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनएफटी) संस्थेच्या रोख हस्तांतरण व्यवस्थेचे सहकार्य घेतले आहे. ‘हॅलो मनी’ सेवा उपलब्ध केलेल्या कोणत्याही ग्राहकांस केवळ मोबाईल फोनचा वापर करून आपल्या बार्कलेज बँकेच्या खात्यावरील रोख भारतातील कोणत्याही बँकेत हस्तांतरित करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. ज्या ग्राहकांनी बार्कलेज बँकेची ‘हॅलो मनी’ सेवा उपलब्ध केली असेल त्यांना ही सेवा निशुल्क पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा ग्राहकांना आपली रोख सहज व जलदगतीने हस्तांतरित करणे शक्य होणार आहे. त्यासाठी बँकेच्या कोणत्याही शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. ‘हॅलो मनी’ सेवेत भारतीय रिझव्र्ह बँकेची ‘पेमेंट इंटरफेस’ (पीआय) प्रणाली वापरुन लाभार्थीच्या खात्यात रोख जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे जे ग्राहक ही सेवा उपलब्ध करणार असतील त्यांनी लाभार्थीच्या बँकेचा पुढील तपशील जाहीर करणे आवश्यक आहे. जेणे करून हा व्यवहार पूर्ण करणे शक्य होईल.

महानगर बँकेच्या नफ्यात १०८ टक्क्यांनी वाढ
व्यापार प्रतिनिधी:
महानगर को-ऑप. बँकेस मार्च २००९ अखेर रु. ८.३४ कोटी इतका निव्वळ नफा झालेला असून मागील वर्षांच्या तुलनेत नफ्यामध्ये १०८ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. बँक आपल्या सभासदांना १२ टक्के दराने लाभांश सातत्याने देत आलेली आहे. मार्च २००९ अखेर बँकेचा नेट एन.पी.ए. ३.०५ टक्के असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष गुलाबराव शेळके यांनी दिली. बँकेने ऑडिटपूर्व प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार बँकेचे खेळते भांडवल हे ९१८.४१ कोटी झाले असून ७२०.२१ कोटींच्या ठेवी बँकेकडे आहेत. सभासदांना ४२१.२८ कोटींचे विविध योजनांमध्ये कर्जवाटप केलेले असून गुंतवणूक रु. ३३९ कोटींची आहे. बँकेचे भाग भांडवल १९ कोटींचे असून, राखीव व इतर निधी मिळून ८१ कोटी असून सभासद संख्या ४५ हजाराच्या वर गेलेली आहे. तसेच विविध कर्ज योजनांचे व्याजदरसुद्धा आता बँकेने कमी केलेले असून आता सभासदांना घरासाठी देण्यात येत असलेल्या कर्जामध्ये ०१ टक्क्यांपर्यंत कमी केलेले आहेत. सोने तारण, आयुर्विमा/राष्ट्रीय बचत प्र. पत्रे व इतर विश्वस्त कागदपत्रांच्या तारणावर १३ टक्के, तर सर्व प्रकारच्या व्यापारी कर्ज मंजूर मर्यादेनुसार १४, १४.५० व १५ टक्के व्याजदर अशा तीन प्रकारात निश्चित केला आहे, अशीही माहिती शेळके यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीत आणि स्पर्धात्मक युगामध्येही अधिकाधिक कार्यक्षम ग्राहक सेवा देण्यासाठी कोअर बँकिंग प्रणाली सुरू केली असून बँकेच्या लालबाग, घाटकोपर, चंदननगर-पुणे व शिरुर या शाखांमधून १२ तास ग्राहक सेवा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घाटकोपर, तुर्भे, पुणे व नाशिक या शाखांमध्ये एटीएम मशिन्स बसविण्यात आलेली आहेत. तसेच १३ शाखांमार्फत फ्रँकिंग मशिनद्वारे मुद्रांक विक्री सुविधा उपलब्ध केलेली आहे.

उदयोन्मुख क्षेत्रात गुंतवणूकविषयक शिखर परिषद
व्यापार प्रतिनिधी:
आयसीआयसीआय बँकेच्या पुढाकाराने ‘कृषी, अन्न आणि उदयोन्मुख क्षेत्रात गुंतवणूक’ या विषयावर १२ जून रोजी शिखर परिषद होणार आहे. कृषी व अन्नधान्यामध्ये व्यवसाय करणारे इक्विटी फंड व्यवस्थापक, व्हेंचर कॅपिटलिस्ट, उद्योजक आदींचा समावेश यात असेल. सिटी व्हेंचर कॅपिटल इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक पी. आर. श्रीनिवासन, अॅक्टिस कंपनीचे भागीदार जे. एम. त्रिवेदी, टीव्हीएस कॅपिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गोपाळ श्रीनिवासन, यूटीआय व्हेंचर्सचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजा कुमार आदींची परिषदेत भाषणे होणार आहेत. कृषी व अन्नधान्य क्षेत्रातील अद्ययावत माहिती, नवे कल, विश्लेषण यावर चर्चा या परिषदेत केली जाणार आहे. तसेच उदयोन्मुख क्षेत्रातील संधी या विषयात अर्हताप्राप्त क्षेत्रे, बियाणे, आरोग्य, अन्नधान्य, किरकोळ विक्री, शिक्षण, पायाभूत सोयीसुविधा व दळणवळण इत्यादीबद्दल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येईल.

बजाज इलेक्ट्रिकल्सला ८९.१ कोटींचा नफा
व्यापार प्रतिनिधी:
बजाज इलेक्ट्रिकल्सने २००८-०९ या आर्थिक वर्षांत तसेच शेवटच्या तिमाहीत भरीव कामगिरी केली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीची विक्री ४४ टक्क्य़ांनी वाढून ६४८ कोटी रुपयांवर पोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत याच तिमाहीत कंपनीने ४५२.२ कोटी रुपयांची विक्री केली होती. कंपनीचा नफाही ४३ टक्क्य़ांनी वाढून ४७.५ कोटी रुपयांवर पोचला आहे. २००७-०८ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीस ३३.२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. २००८-०९ या आर्थिक वर्षांत कंपनीच्या एकूण उलाढालीने १८०१ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. उलाढालीत २८ टक्के वाढ नोंदली गेली आहे. कंपनीस ८९.१ कोटी रुपयांचा नफा झाला. २००७-०८ मध्ये कंपनीस ७३.१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीच्या सर्व व्यवसाय विभागात वाढ झाली आहे. संचालक मंडळाने प्रति शेअर शंभर टक्के लाभांशाची शिफारस केली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज म्हणाले, ‘‘वितरणाचे उत्तम जाळे आणि गुणवत्ता तसेच तत्पर सेवा यांच्या जोरावर ही कामगिरी कंपनीस करता आली.’’

ओम्निटेकचा १२ % लाभांश
व्यापार प्रतिनिधी:
ओम्निटेक इन्फोसोल्यूशन्स लि. या भारतातील आघाडीच्या बिझनेस अॅव्हेलिबिलिटी आणि बिझनेस कंटिन्यूइटी सोल्यूशन्स प्रोव्हायडरने ३१ मार्च, २००९ पर्यंतच्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर केले आहे. २००८-०९ या आर्थिक वर्षांत कंपनीला १७३.६१ कोटी रुपये एकूण महसूल मिळाला. गेल्या वर्षी याच कालावधीतील १३२.६२ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यामध्ये ३१ टक्के वाढ झाली. निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या २५.५७ कोटी रुपयांच्या तुलनेत २९ टक्क्याने वाढून ३३.०९ कोटी रु. झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत एबिट्डामध्ये ४७ टक्के वाढ झाली. कंपनीला २५.१९ रुपये प्रति शेअर उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी ते २१.५३ रुपये होते.कंपनीच्या संचालक मंडळाने १२ टक्के लाभांशाची शिफारस केली आहे.या वेळी बोलताना ओम्निटेक इन्फोसोल्यूशन्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक अतुल हिमानी म्हणाले की, सध्याच्या मंदीच्या काळात कंपन्या खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात असताना आम्ही आमच्या ग्राहकांना चांगल्या प्रमाणात खर्च कमी करण्यासाठीचे पर्याय सुचवीत आहोत. त्यामुळे आम्हाला आर्थिक मंदीतही समाधानकारक वाढ साध्य करणे शक्य झाले.

आंतरराष्ट्रीय इव्हेंट तंत्रज्ञान पुरस्कार व प्रदर्शन
प्रतिनिधी:
इव्हेंट अॅण्ड एण्टरटेन्मेंट मॅनेजमेंट असोसिएशनची इव्हेंट उद्योगातील दुसरी राष्ट्रीय परिषद ‘इमॅजिन २००९’ यंदा ९ ते १२ जुलैदरम्यान आग्रा येथे आयोजित करण्यात आली असून, त्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय इव्हेंट तंत्रज्ञान प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. तसेच प्रथमच आंतरराष्ट्रीय इव्हेंट तंत्रज्ञान पुरस्कारही देण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात या उद्योगाशी संबंधित तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांमध्ये जगभरात कोणकोणत्या गोष्टी नव्याने विकसित झाल्या ते मांडण्यात येणार आहे. इव्हेंट क्षेत्रातील विविध २० गटांत योगदान देणाऱ्या लोकांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पुरस्काराची ट्रॉफी प्रदान करण्या येणार आहे. जाहिरात आणि विपणन क्षेत्रांतील प्रसून जोशी, श्रीपाद नाडकर्णी, सुनील लुल्ला परीक्षक असून एम. जी. परमेश्वरन हे अध्यक्ष असतील. या सोहळ्याला कोरिओग्राफर शामक डावर, फॅशन डिझायनर विक्रम फडणीस आदी मान्यवर उपस्थित राहतील.

२००० काश्मिरी युवक ‘ग्लोबल टॅलेण्ट ट्रॅक’च्या कौशल्य चाचणी व प्रशिक्षणाला सामोरे जाणार
व्यापार प्रतिनिधी:
पुणेस्थित ग्लोबल टॅलेण्ट ट्रॅक ही अद्ययावत रोजगारासंदर्भातील कौशल्य चाचणी व प्रशिक्षण कंपनी असून तिची निवड एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पपूर्तीसाठी काश्मीर युनिव्हर्सिटीची भागीदार म्हणून करण्यात आली आहे. राज्यातील युवकांच्या कौशल्याची चाचणी घेऊन त्यांची रोजगारासाठीची क्षमता वाढवली जाणार आहे. जीटीटीच्या सीईओ डॉ. उमा गणेश म्हणाल्या, ‘‘पुणे विद्यापीठाबरोबर जीटीटीने राबवलेला यशस्वी फॉम्र्युला अनेक राज्यांत वापरला गेला असून तिथे आम्ही सिस्कोसमवेत भागीदारी करून शंभर विशिष्ट महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना कौशल्य कार्यक्रम पुरवण्यात आले होते. काश्मीर युनिव्हर्सिटीसमवेत झालेल्या भागीदारीमुळेच देशातील ज्या भागात आत्यंतिक गरज आहे तेथे रोजगारासंदर्भातील कौशल्ये विकसित करता येतील. जीटीटी श्रीनगर शहरात स्वत:चे केंद्र सुरू करणार असून मे २००१ मध्ये पुणे, जयपूर, दिल्ली व चंदिगड येथे सुरू करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये अधिक भर पडेल.
विविध प्रकारच्या नोकऱ्या आणि धंद्यामध्ये येऊ इच्छिणाऱ्यांमध्ये कौशल्य निर्माण व्हावे याकरता जीटीटीच्या वतीने विशेष मिश्र शैक्षणिक पद्धती अवलंबली जाते. पहिल्या तीन कार्यक्रमांमध्ये आयटी, ज्ञानावर आधारित सेवा व रिटेल यावर भर देण्यात आला आहे. इंटर्नशीप, प्लेसमेंटच्या संधी देण्यासंदर्भातील कॉर्पोरेट क्षेत्राचा सक्रिय सहभाग आणि जर्मन ज्युअल सिस्टीम मॉडेलचा स्वीकार यामुळे जीटीटीच्या एम्प्लॉएबिलिटी चाचणी व प्रशिक्षणाला वेगाने परिमाण मिळाले असून मंद गतीने चालणाऱ्या अर्थव्यवस्थेतील नोकरीसंदर्भातील समस्येवर उपाय शोधून देणारे आहे.