Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

जॅकी चॅनची गांधीगिरी
वयाच्या हाकेला ओ देत म्हणा किंवा अभिनेता म्हणून मार्शल आर्टच्या घाण्याभोवती फिरत राहणे थांबून नवा रस्ता आजमावण्याची गरज ओळखत म्हणा , पण जॅकी चॅनने डेरेक यीच्या दिग्दर्शनात ‘शिंजुकु इन्सिडेंट’ या आपल्या चित्रपटात स्वत:ला वेगळ्या रूपात पेश केलं आहे खरं. शक्यतो मारामारी आणि हिंसा टाळणारा, आजूबाजूच्या हिंसेनं दु:खी होणारा, आजच्या भाषेत सांगायचं तर गांधीगिरी करणारा जॅकी चॅन हे या चित्रपटाचं वैशिष्टय़ आहे. अर्थातच कथेचा घाटही वेगळा आहे. वेगळा म्हणजे एकूण चित्रपटाच्या भाषेत ऑफ बीट नव्हे, पण जॅकी चॅन फॉम्युल्याहून नक्कीच वेगळा. तसंच अगदी आजच्या वास्तवाशी नातं सांगणारा स्थलांतरितांच्या आणि ‘उपऱ्यां’विरुद्ध स्थानिक यंत्रणेच्या संघर्षांचा या कथेच्या कण्यासाठी वापर करण्यात आलेला आहे, तेही चित्रपटाचं वैशिष्टय़. ९०च्या दशकाच्या सुरुवातीला कोसळत्या अर्थकारणापायी चीनमधून बेकायदेशीररीत्या जपानमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली. जपानमध्ये मिळतील ती हलकी सलकी कामं करून पोट भरायचं, जथ्या-जथ्यानं लहान-लहान खोल्यांतून रहायचं आणि पोलिसांची धाड पडली की पळायचं, लपायचं असं या चिनी बेकायदेशीर स्थलांतरितांचं जगणं. आजच्या घडीला आशियाई देशांतून युरोप-अमेरिकेत, बांगलादेशातून भारतात बेकायदेशीररीत्या घुसणाऱ्या, घुसून पोट भरू पाहणाऱ्या, अगदी बिहार-उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात कायदेशीररीत्या येऊनही उपऱ्या ठरणाऱ्या लोकांच्या भागधेयाशी साधम्र्य सांगणारी स्थिती. निक उर्फ स्टीलहेड (जॅकी चॅन ) हा असाच चीनमधून जपानमध्ये येतो, तिथल्या आपल्यासारख्याच आधी आलेल्या आपल्या चिनी बांधवांबरोबर राहू लागतो. चीनमध्ये बरा रोजगार मिळवणं हे या प्रत्येकाचं स्वप्न असतं. ती स्वप्नं पुरी करण्यासाठी निक झटतो. जो या मित्राला चेस्टनटचा ठेलाही घालून दण्यात यश मिळवतो. काही वर्षांपूर्वी चीनमध्ये अधिक चांगल्या भविष्याच्या शोधात आलेल्या आपल्या बालपणीच्या मैत्रिणीचा शोधही त्याला घ्यायचा आहे. मैत्रिणीचा शोध लागतो, तो ती टोकियोतल्या माफिया डॉनपैकी एक असलेल्या एगुचीची पत्नी म्हणून. बारचीतरुण मालकीण लिली सहृदय निकच्या प्रेमात पडते आणि त्याची सर्वतोपरी साथ करते. टोकियोत माफियांचं मोठं जाळं आहे आणि त्यांचं नेतृत्व छुप्या पद्धतीनं एक वृद्ध राजकारणीच करतो आहे. या माफियांमध्ये आपसेतली वैरं आहेत आणि एगुचीच्या खुनाचे प्रयत्न प्रतिस्पर्धी डॉनकडून होतात. उपऱ्यांच्या मागावर पोलीस सतत असतात, तसेच माफियांच्या मागावर असतात. या तीन प्रवाहांमधल्या संघर्षांत निक एकदा पोलीस अधिकारी कितानोचा, तर एकदा आपल्या मैत्रिणीचा पती एगुची याचाही जीव वाचवतो. कितानो त्याबद्दल या उपऱ्याविषयी कृतज्ञता बाळगून आहे, तर एगुचीच्या मनातही कृतज्ञता आहे, तो निकला आपल्यासाठी काम करण्याची ऑफर देतो. एगुचीला निक आणि आपल्या पत्नीच्या भावसंबंधाची कुणकुण लागते तेव्हा तो मत्सराने जळतोही, परंतु एगुचीची व्यक्तिरेखा एकसुरीदेखील नाही आणि माफियांच्या संघर्षांत निक आणि एगुची एका पातळीवर एकमेकांशी सहकार्य करीत एकमेकांना जपतातही, ते त्यांच्यातल्या त्या दुव्यामुळे. माफिया टोळ्या उपऱ्या चिन्यांना सतत जगणं कठीण करत असतात, जो हा त्यांच्या क्रौर्याला पुन: पुन्हा बळी पडत राहतो . एकीकडे निक कृतज्ञ पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीनं आपल्या बांधवांना कायदेशीर ओळखपत्रं मिळवून देतो, त्यांना रोजगार-व्यवसाय करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देतो, तर दुसरीकडे माफिया या लोकांचा वापर आपसातल्या वैमनस्यात करून घेत राहतात. एकेकाळचा पापभीरू जो ड्रगच्या आहारी जातो आणि कालपरवापर्यंत निकला मानणारे सारे नव्याने मिळालेली सत्ता, मिळू लागलेला पैसा यामुळे निकचा सचोटीचा सल्ला मानीनासे होतात. निक या साऱ्या परिस्थितीत वाट चुकलेल्यांना मार्गावर आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहतो, मैत्रीची कर्तव्यं जिवाची पर्वा न करता पार पाडतो आणि अखेपर्यंत आपलं सत्शील सत्त्व सोडत नाही. या कथावस्तूतली हिंसा नवी नाही की भावुक नाटय़ाचा खेळही नवा नाही. नवं आहे ते या चौकटीत जॅकी चॅनचं बसणं. प्रौढ वयाच्या जॅकी चॅननं ते खूप ताकदीनं नाही तरी बऱ्यापैकी पेललं आहे. अर्थात नेहमीचा जॅकी चॅन हवा असणाऱ्यांच्या पदरी निराशा येऊ शकेल.
शिंजुकु इन्सिडेंट
दिग्दर्शक - डेरेक यी
कलावंत - जॅकी चॅन, नाओटो ताकेनाका,
डॅनिअल वु, क्सू जिंगलेइ, फॅन बिंग बिंग, मसायो काटो