Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

लोकमानस

आता तरी गरिबांसाठी कृती होईल का?

 

ग्रंथविश्व या सदरात ‘ग्लोबलायझेशन आणि हिंसा’ हे समर खडस यांनी केलेले परीक्षण वाचले (३० मे). अ‍ॅल्क्स पेरी यांनी ‘फॉलिंग ऑफ द एज’मध्ये जे मत मांडले आहे, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही तर जागतिकीकरणाचे इतके भयंकर परिणाम होणार, हे निश्चितच होते. आपल्या देशात जागतिकीकरणाचा फायदा फार तर १० ते २० टक्के लोकांना झाला असेल. जागतिकीकरण प्रगतीच्या नावाने पुढे आणले गेले. मग दोन दशकांनंतरही आपल्याकडच्या खेडय़ापाडय़ांत जायला रस्ते नाहीत, मुलांसाठी शाळा नाहीत, हे कसे? पायाभूत सुविधा सोडा, साधी पाण्याची सोयही तिथे नाही.
सरकारी गोदामे भरलेली असताना तिथे भूकबळी पडतात. शेतकरी आत्महत्या करतात. म्हणूनच पेरी यांनी जागतिकीकरणाच्या यशस्वितेबद्दल व्यक्त केलेली शंका शंभर टक्के बरोबर आहे.
लोकसभेत जनतेने स्पष्ट कौल दिलेले सरकार तरी जनतेला विश्वासाला पात्र ठरते का आणि पुढे पाच वर्षांत गरिबांच्या बाबतीत काय धोरण अवलंबते, हे आता पाहायचे.
रमेश वेदक, घाटकोपर, मुंबई

‘त्या’ गीताचे मूळ गायक आजगावकर
झी मराठी वाहिनीवरील सारेगमप या कार्यक्रमात ऋषिकेश रानडे याने ‘वेगवेगळी फुले उमलली’ हे भवानीशंकर पंडित लिखित श्रीनिवास खळे संगीत दिग्दर्शित गीत छान गायले. त्या वेळी दाखविण्यात आलेल्या श्रेयनामावलीत या गीताचे मूळ गायक म्हणून पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे नाव दाखविण्यात आले. प्रस्तुत गीत १९६०-६५ दरम्यान आकाशवाणी मुंबई ‘ब’ केंद्रावरच्या सुगम संगीत कार्यक्रमात गायक वसंत आजगावकर यांनी अप्रतिम गायले होते. त्या वेळी आणि अजूनही आकाशवाणी सुगम गीत गायक-गायिकांना ध्वनिमुद्रित गीत गाण्याची परवानगी नाही. ‘वेगवेगळी फुले उमलली’ गीताची पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रिका नंतर निघाली.
अशोक सहस्रबुद्धे, मुलुंड, मुंबई

‘अवजड उद्योग’ हा शब्दप्रयोग चुकीचा
विलासराव देशमुख यांच्याकडे अवजड उद्योगाचे खाते सोपविण्यात आले. एकूण महाराष्ट्राच्या वाटय़ाला अवजडसारखे महत्त्वाचे खाते आले ही गोष्ट महत्त्वाची. मात्र अवजड हा शब्द गेली काही वर्षे सतत खटकत आला आहे. ऌीं५८ कल्ल४ि२३१्री२ याला ‘अवजड’ हा प्रतिशब्द शोधून काढण्यात आला. अशा उद्योगात भारी भांडवल व शेकडो एकर जमीन लागते व उत्पादन प्रतिदिन कित्येक टनावारी असते. टाटा आयर्न, तसेच सल्फ्युरिक अ‍ॅसिड, कृत्रिम खते, यासारखे उद्योग ही त्याची उदाहरणे. अशा उद्योगांना ‘भारी उद्योग’ म्हणणेच योग्य होईल. ‘अवजड’चा मराठीत अर्थ ‘न पेलण्याजोगे’ असा प्रचारात आहे व इंग्रजीत त्याचा प्रतिशब्द वल्ल६्री’८ि असा शब्दकोशात आहे. म्हणूनच ‘भारी उद्योग’ असे भाषांतर योग्य वाटते.
तरी भाषातज्ज्ञांच्या समितीने योग्य तो शब्द सुचवावा.
श्रीकृष्ण हळदणकर, अंधेरी, मुंबई

इथे पुरस्कार विकत मिळतात.
मुंबईतून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या हस्ते ८० पुरस्कार घाऊकरीत्या वाटण्याचा कार्यक्रम गोवंडी येथे २४ मे रोजी झाला. पुरस्कार देणाऱ्या संस्थेने केवळ चारपाच योग्य व्यक्ती पुरस्कारासाठी निवडल्या होत्या; पण आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाकीच्यांना दोन-पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात ‘सम्राट’, ‘रत्न’, ‘भूषण’, ‘अलंकार’ आदी उपाध्या अक्षरश: वाटण्यात आल्या. यात मटकेवाले, गॅरेजमालक, झोपडीदादा अशांना पत्रकार, समाजसेवक म्हणून हे पुरस्कार देण्यात आले. पैसे काढण्याची ही अभिनव ‘लाइन’. अशा ‘सशुल्क पुरस्कारां’चे पेवच फुटले असून यांपासून सावध राहणे श्रेयस्कर. नामांकित पाहुण्यांनी आपल्या हातून कुणाचा सत्कार होत आहे, याचे भान बाळगावे.
प्रकाश ताटे, गोवंडी, मुंबई