Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

सांगली महाआघाडीत धुसफूस
सांगली, ५ जून / प्रतिनिधी

सांगली महापालिकेतील सत्ताधारी विकास महाआघाडीचा कारभार असमाधानकारक असून काही ठराविक नगरसेवकांच्या प्रभागातच विकासकामे होत असल्याची टीका ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत यांनी शुक्रवारी करून विकास महाआघाडीला घरचा आहेर दिला, तर घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानेही विकासकामांबाबत नाराजी व्यक्त करीत प्रसंगी विरोधी बाकावर बसण्याचा इशारा दिल्याने विकास महाआघाडीतील धुसफूस चव्हाटय़ावर आली आहे.

हजारेंच्या हत्येची सुपारी देणाऱ्यास जाहीरपणे फाशी द्या- उद्धव ठाकरे
सोलापूर, ५ जून/प्रतिनिधी

पवनराजे निंबाळकर आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याला जाहीर फाशी दिली पाहिजे, अशी मागणी करीत आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला.लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला ताकद देणाऱ्या मराठवाडय़ातील मतदार जनतेचे आभार मानण्यासाठी ठाकरे यांचे मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी शुक्रवारी दुपारी मुंबईहून येथील विमानतळावर आगमान झाले.

विदेशी चित्रपटांबरोबर मराठी चित्रपटांनाही मिळतेय दाद
कोल्हापूर, ५ जून / विशेष प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बरोबरीने नव्याकोऱ्या व दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने रसिकांना मिळाली आहे आणि रसिकांचाही या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. ही माझ्यासारख्या कलाकाराच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बाब आहे अशा शब्दात अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी शुक्रवारी आपल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबाबतच्या भावना व्यक्त केल्या.

साताऱ्यात टेम्पोने ठोकरल्याने ३ ठार
सातारा, ५ जून/प्रतिनिधी
सातारा शहराजवळील वाडे येथे आयशर टेम्पो ट्रकने ठोकरल्याने तीनजण ठार झाले असून, एकजण जखमी झाला आहे.आयशर टेम्पो (एमएच-१४ एएस-९८४५) साताऱ्यातून लोणंदमार्गे जात असताना त्याने हीरो होंडा मोटारसायकल (एमएच-११ ए-१ ४४२३) वरून महेंद्र ऊर्फ सनी मानसिंग कदम (वय १८, रा.आरळे) व नवनाथ सीताराम दडस (वय १६, रा. पाटखळमाथा) हे दूध विक्रीसाठी साताऱ्याला येत होते, तर स्कुटी क्रमांक एमएच-११ एडी-१८६६ वरून अशोक पांडुरंग नलावडे (वय ५५, रा.वाडे) व त्यांचा मुलगा कुमार (वय १८) यांना ठोकरून टेम्पो दहा फूट फरफटत जाऊन जवळच्या ओढय़ात पलटी झाला. या भीषण अपघातात महेंद्र कदम व अशोक नलावडे जागीच ठार झाले तर नवनाथ दडस याचे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. कुमार अशोक नलावडे (वय १८) संजीवन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.अशोक नलावडे यांच्या घराची वास्तुशांत येत्या ११ जून रोजी होती, तर मयत महेंद्र कदम व नवनाथ दडस यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.

शिवराज्याभिषेक मिरवणूक
सातारा, ५ जून/प्रतिनिधी

येथील शिवराज्याभिषेक उत्सव समितीतर्फे सातारा शहरातील पोवईनाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सायंकाळी राजवाडामार्गे तालीम संघ मैदानापर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. शिवपुतळ्याची सजवलेल्या पालखी रथातून मिरवणूक काढली. त्यामध्ये राजा शिवछत्रपती मालिकेत शिवरायांची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी विकास देशमुख, व्यसनमुक्त संघटनेचे अध्यक्ष विलासबाबा जवळ व शहरातील विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते, उत्सव समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तानाजी मालुसरे यांचे वंशज बाळकृष्ण मालुसरे यांच्यासह घोडेस्वार, शिंगतुताऱ्या व ढोललेझीम पथकाच्या निनादात जय भवानी-जय शिवाजीच्या जयघोषात काढण्यात आली. सन्मित्र मंडळाने रामेश्वर येथील २२ कुंडातून आणलेल्या जलाने व दुधाने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मावळते पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला.

चव्हाण वारणा कॉलेजचा माजी विद्यार्थी मेळावा
पेठवडगाव, ५ जून / वार्ताहर
कष्ट करून घेतलेल्या शिक्षणाचे महत्त्व वेगळे असते, हे या शिक्षणसंस्थांच्या माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांना पटवून देणे तसेच शिक्षण व्यवस्थेबद्दलची समाजाची मानसिकताही बदलणे गरजेचे असल्याचे, रत्नागिरी येतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.ए.देव यांनी वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यावेळी बोलताना सांगितले.वारणानगर (ता.पन्हाळा) येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा सांस्कृतिक भवनमध्ये वारणा समूहाचे नेते आणि महाराष्ट्राचे अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्या वेळी प्रा.देव बोलत होते. प्रा.के.जी.जाधव यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. ए. एम. गुरव, प्रा. आलोणे व पोलिस अधिकारी झालेली मीरा बनसोडे यांची भाषणे झाली.

‘कस्तुरबाई’च्या प्राचार्यपदी डॉ. प्रीती पाटील यांची नियुक्ती
सोलापूर, ५ जून / प्रतिनिधी

येथील कस्तुरबाई शिक्षण महाविद्यालयाच्या (बीएड) प्राचार्यापदी डॉ. सौ. प्रीती पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक संस्थेचे सचिव डॉ. रणजित गांधी यांनी जाहीर केली. वालचंद शिक्षण संस्थेमार्फत चालणाऱ्या या महाविद्यालयाचा नावलौकिक आहे. त्यात नूतन प्राचार्या डॉ. पाटील या भर घालतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या वेळी संस्थेचे समन्वयक डॉ. आर. आर. शहा, पराग शहा, निवृत्त प्राचार्य डॉ. बी. जी. अहिरे, डॉ. विजयकुमार डोळस आदी उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा बँकेकडून बोगस कर्ज दिल्याची तक्रार
सोलापूर, ५ जून / प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३० लाखांचे बोगस कर्जवाटप झाल्याची तक्रार करीत या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते डॉ. सी. जी. हविनाळे यांनी केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत हे बोगस कर्जवाटप झाल्याची तक्रार डॉ. हविनाळे यांनी जिल्हाधिकारी व सहकार आयुक्तांकडे करीत बँकेच्या संचालक मंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल न घेतल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार बरुर येथील रहिवासी किंवा खातेदार शेतकरी नसलेल्या अनिल अशोक बिराजदार या परप्रांतीय व्यक्तीला गेल्या २४ एप्रिल रोजी बरुर सहकारी विकास संस्थेच्या सचिवाने सभासदत्व दिले. त्यानंतर खोटी कागदपत्रे तयार करून जिल्हा बँकेकडून या व्यक्तीला ३० लाख ५० हजार २०० रुपयांचे कर्ज अदा करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कुरळपकर
इस्लामपूर, ५ जून / वार्ताहर

कासेगाव शिक्षण संस्थेच्या इस्लामपुरातील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. राजेंद्र कुरळपकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कुरळपकर हे या महाविद्यालयात गेली १५ वर्षे उपप्राचार्य म्हणून काम पहात होते, तर ऑगस्ट २००९ पासून ते प्रभारी प्राचार्य म्हणून काम पहात होते. एस. एस. विभागाचे प्रमुख, होस्टेल प्रमुख व महाविद्यालय नॅक समन्वयक समितीचे समन्वयक म्हणूनही डॉ. कुरळपकर यांनी काम पाहिले आहे. डॉ. कुरळपकर यांचे संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, उपाध्यक्ष बी. आर. ढवळेकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अभिनंदन केले.