Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

रायगडावर शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा
महाड, ५ जून/वार्ताहर
किल्ले रायगडावर आज मंगलमय वातावरणात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३३६ वा राज्याभिषेक सोहळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर उपस्थित होते. शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड व स्थानिक उत्सव समिती यांच्यातर्फे शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी गड देवता शिरकाईमातेचे पूजन आणि जगदीश्वराला अभिषेक करण्यात आला, त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

ध्वज विजयाचा उंच धरा रे..
विनायक दळवी
लंडन, ५ जून

पहिल्यावहिल्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदाला गवसणी घालणारी भारताची धोनी ब्रिगेड शनिवारी ट्रेन्ट ब्रिज येथे होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या एन्काउन्टरसाठी सज्ज झाली आहे. ध्वज विजयाचा उंच धरा रे.. अशा आशयाच्या शुभेच्छा साऱ्या भारतातून टीम इंडियाला दिल्या जात असताना शुक्रवारी विश्वचषक स्पध्रेला इंग्लंड आणि हॉलंड सामन्याने सुरुवात झाली. क्रिकेटसारख्या साहेबी खेळाने साऱ्या जगाला वेड लावणाऱ्या यजमान इंग्लंडने उद्घाटनाची जोशात आणि उत्साहात तयारी केली होती.

अंबानींच्या ‘महामुंबई सेझ’चे भवितव्य अधांतरी
जमीन संपादनासाठी मुदतवाढीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
मुंबई, ५ जून/ प्रतिनिधी
मुकेश अंबानी यांनी आपले नजीकचे सहकारी आनंद जैन यांच्यासह संयुक्तपणे प्रवर्तित केलेल्या ‘महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ)’साठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेला आणखी मुदतवाढ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट नकार दिला. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची अंतिम मुदत कायद्याने येत्या ८ जून रोजी समाप्त होत असल्याने या ‘सेझ’चे भवितव्य अधांतरी सापडले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या खंडपीठाने जमीन संपादनासंबंधी प्रशासनाला कोणतेही आदेश देण्यास स्पष्ट नकार दिला आणि गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची री ओढली आहे.

महिला आरक्षणाच्या विरोधासाठी शरद यादवांची विषप्राशनाची तयारी!
नवी दिल्ली, ५ जून/खास प्रतिनिधी

संसद व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी महिला आरक्षण विधेयक पहिल्या शंभर दिवसात पारित करण्याचा केंद्रातील मनमोहन सिंग सरकारने निर्धार व्यक्त करताच आज लोकसभेत त्याची पहिली तीव्र प्रतिक्रिया उमटली. महिला आरक्षण विधेयक पारित झाले तर आपण विषप्राशन करून जीव देऊ, अशी धमकी जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी दिली.

एक्स्प्रेस इन्व्हेस्टिगेशन
मुख्य सचिवांना माहिती देण्यासही विलंब

धवल कुलकर्णी, सागनिक चौधरी आणि वाय.पी. राजेश
मुंबई, ५ जून

२६/११ चा हल्ला घडल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना पोलिसांनी तात्काळ माहिती देणे अपेक्षित होते. परंतु त्यांनाही कळविण्यात आले नाही. तासाभरानंतर त्यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय सुरक्षा पथकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. केंद्रीय पथके येईपर्यंत अतिरेक्यांनी संपूर्ण ताबा घेतला होता. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस सहआयुक्ताने पोलीस नियंत्रण कक्षाचा ताबा घेऊन आपात्कालिन व्यवस्थेचा कमांडर म्हणून काम पाहणे... (उर्वरित वृत्त )

‘मेटे-खेडेकरांच्या दबावाला बळी पडून शिवरायांचा इतिहास बदलणार का?’
मुंबई, ५ जून/ खास प्रतिनिधी

गेल्या वर्षीच्या इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात ‘दादोजी कोंडदेव यांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले’ असा उल्लेख होता तसेच त्याबाबतचे छायचित्रही होते. मधल्या काळात जातीयवादी मंडळींच्या दबावाला बळी पडून यावर्षी चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील दादोजी कोंडदेव यांचा उल्लेखच गाळण्यात आला तसेच त्यांच्या चित्राऐवजी शहाजी महाराजांचे चित्र प्रसिद्ध करण्यात आल्याचा गंभीर मुद्दा भाजप आमदार मधु चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत उपस्थित केला.

दयाळू सोनियांनी मला माफ केले - संगमा
नवी दिल्ली, ५ जून/खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन संस्थापकांपैकी एक, माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांनी विदेशी वंशाच्या मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची माफी मागितल्याचे आज पत्रकारांपुढे मान्य केले. दहा वर्षांपूर्वी विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आपण सोनियांची माफी मागितली आणि त्यांनीही उदार मनाने आपल्याला माफ केले, असे संगमा यांनी सांगितले. पुत्र कोन्राड संगमा यांच्या विवाहाच्या निमंत्रणाचे निमित्त साधून संगमा यांनी २ जून रोजी त्यांच्या केंद्रीय राज्यमंत्री कन्या अगाथा संगमा यांच्यासोबत १०, जनपथ येथे सोनिया गांधींची भेट घेतली होती.

गडकरी निर्दोष असल्याचा गृहमंत्र्यांचा निवाडा
मुंबई, ५ जून/प्रतिनिधी

नागपूर येथील योगिता अशोक ठाकरे या लहान मुलीच्या मृत्यू प्रकरणाबाबत नितीन गडकरी हे निर्दोष आहेत. या प्रकरणाबाबत बऱ्याच उलटसुलट बातम्या प्रसिद्धी माध्यमांमधून येत आहेत. मात्र त्यात काही तथ्य नाही, असे आज गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.
वास्तविक पाहता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात पोलिसांवर ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेतली होती.

मान्सूनचे आगमन विलंबानेच
पुणे, ५ जून/खास प्रतिनिधी

नैर्ऋत्य मान्सूनचे केरळमध्ये नियोजित वेळेआधीच आगमन झाले असले तरी तो महाराष्ट्रात मात्र काहीसा उशिरानेच दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे महाराष्ट्रातील आगमन ७ जूननंतरच होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत मात्र तो कर्नाटक, आंध्र प्रदेश व आसाममध्ये पोहोचण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले. राज्यात मान्सूनचे आगमन लांबले असले तरी अनेक ठिकाणी वादळी पावसाच्या मोठय़ा सरी पडत आहेत. आज सायंकाळी साडेपाचपर्यंत पुण्यात ५५ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या काही दिवसांत मान्सून मात्र पुढे सरकलेला नाही. मान्सून या वर्षी केरळमध्ये २३ मे रोजीच दाखल झाला. तिथे सामान्यत: तो १ जून रोजी पोहोचतो. या वर्षी लवकर दाखल झाल्याने तो पुढेही वेळेआधीच पोहोचणार का, याबाबत उत्सुकता होती. मात्र महाराष्ट्रात यायला त्याला उशीर झाला आहे.

अन्यथा पाणीकपात अटळ
मुंबई, ५ जून / प्रतिनिधी
शहरात अनेक विभागांत पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच आता येत्या आठ दिवसांत पावसाचे आगमन झाले नाही तर मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पाण्याची पातळी खालावली आहे. सध्या मुंबईकरांना ३४०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. हा पुरवठा ३३०० दशलक्ष लिटरवर आणण्यात येईल, असे फाटक यांनी सांगितले. गेल्या वर्षीही जून व जुलै महिन्यात काही दिवस पाणीकपात करण्यात आली होती. मुंबईकरांना गेल्या २५ वर्षांत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागलेला नाही. या वर्षीही पाऊसाचे आगमन वेळेवर होईल आणि पाणीकपात करावी लागणार नाही, अशी आशा पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी व्यक्त केली.

दाऊदच्या भावावर कराचीत गोळीबार?
कराची, ५ जून/वृत्तसंस्था
मुंबईत १९९३ मध्ये घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनीस याच्यावर कराचीत प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्यांनी आज दिले. बॉम्बस्फोट मालिकेच्या संदर्भात तो भारताला हवा आहे. दरम्यान, अनिसच्या मृत्यूबाबत अद्याप किंवा गोळीबाराच्या घटनेसंदर्भात पोलिसांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही.

पाकिस्तानात मशिदीत स्फोट; ४० ठार
इस्लामाबाद, ५ जून/पी.टी.आय

पाकिस्तानातील एका मशिदीवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान ४० जण ठार झाले असून, ५० जण जखमी झाले आहेत. हल्ला झाला त्यावेळी वायव्य पाकिस्तानातील दिर परिसरातील या मशिदीत हजारो लोक शुक्रवारच्या नमाजासाठी जमले होते. या परिसरात पाकिस्तानी सुरक्षादलांनी तालिबानी दहशतवाद्यांच्या विरुध्द मोहीम उघडली आहे.‘हयागोई शेर्की’ येथील मशिदीत स्फोट झाला त्या वेळी सुमारे २०० लोक जमलेले होते. प्राथमिक वृत्तानुसार हा आत्मघातकी हल्ला असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यामध्ये मशिद आणि आसपासच्या दुकानांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या स्फोटाची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

 

प्रत्येक शुक्रवारी