Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

वादग्रस्त उपविभागीय अधिकारी महिंद्रकर अखेर निलंबित
परभणी, ५ जून/वार्ताहर

येथील उपविभागीय महसूल अधिकारी सुनील महिंद्रकर यांनी जात प्रमाणपत्र देताना कार्यालयीन कार्यपद्धतीचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना शासनाच्या आदेशावरून निलंबित करण्याचे आदेश आज महसूल विभागाने काढले. परभणीचे उपविभागीय महसूल अधिकारी सुनील महिंद्रकर यांच्या कारकीर्दीत जात प्रमाणपत्राबाबत मोठय़ा प्रमाणावर तक्रारी होत्या.

सीमेन्स गॅस स्वीचगीअरचे उद्घाटन
चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक
औरंगाबाद, ५ जून /खास प्रतिनिधी
चार अब्ज गुंतवणुकीतून सुरू करण्यात आलेल्या सीमेन्स लिमिटेडने ग्रीनफिल्ड हायव्होल्टेज गॅस इन्स्युलेटेड स्वीचगीअर कंपनीचे उद्घाटन शुक्रवारी वाळूज औद्योगिक परिसरात झाले. भारतातील ही पहिली जीआयएस कंपनी आहे. वाळूजमधील अद्ययावत या कंपनीचे उद्घाटन पॉवर ग्रीड कॉपरेरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. के. चतुर्वेदी, सीमेन्स एजी एनर्जी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उडो निहागे, सीमेन्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर्मिन ब्रुक आदी उपस्थित होते. ही महाराष्ट्रातील सीमेन्सची दहावी आणि भारतातील ऊर्जा विभागाची सातवी कंपनी आहे.

‘इफ म्युझिक इज रिलीजन, रहेमान इज गॉड!’
वाचकहो, आजच्या ‘संवादा’चं हे शीर्षक चक्क चोरलेलं आहे. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट जीवनावरचं ‘इफ क्रिकेट इज रिलीजन, सचिन इज गॉड’ या नावाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. ३१ मे रोजी पुण्यात ए. आर. रहेमान यांची ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ झाली. त्या वेळी गीत, संगीत, ध्वनी आणि प्रकाशयोजना आणि ए. आर. रहेमान यांची संगीतातली अद्भूत रेंज आणि क्रांतिकारी वेगळेपण अनुभवला आणि वाटलं, हा तर संगीतामधला नवा देव आहे.

राजकीय पाठबळ असलेल्यांना चांगली ठाणी देण्याची परंपरा कायम
नांदेड जिल्ह्य़ातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
नांदेड, ५ जून/वार्ताहर
राजकीय पाठबळ असलेल्यांनाच पोलीस ठाणे देण्याची परंपरा कायम असून आज पोलीस प्रमुख सत्यनारायण चौधरी यांनी जिल्ह्य़ातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात पोलीस निरीक्षक सुरेश नवले यांना अर्धापूर पोलीस ठाणे बहाल करण्यात आले आहे.

गंगाखेड नगराध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा रंगणार!
काही नगरसेवक सहलीवर गेल्याने चुरस!
गंगाखेड, ५ जून/वार्ताहर
परभणी जिल्ह्य़ात गंगाखेड तालुक्याचे राजकारण वेगवेगळ्या घटनांनी वारंवार चर्चेत येते,त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक त्यास अपवाद ठरणे शक्यच नाही. येत्या २१ जून रोजी विद्यमान नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे यांचा नगराध्यक्षपदाचा कालावधी संपणार आहे. पुढील नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने पुन्हा एकवार शहराचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

सहाव्या बालनाटय़ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ थाटात
कोल्हापूरचे ‘बुद्धाची गोष्ट’ प्रथम, तर नागपूरचे ‘घायाळ पाखरा’ द्वितीय
औरंगाबाद, ५ जून /खास प्रतिनिधी
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित बालनाटय़ स्पर्धेत कोल्हापूरच्या बहुरूपी कला मंचच्या ‘बुद्धाची गोष्ट’ या नाटकाला २५ हजार रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले आहे. बालनाटय़ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी करण्यात आला.येथील तापडिया नाटय़मंदिरात ज्येष्ठ नाटय़कर्मी प्रा. त्र्यंबक महाजन यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी संयोजन समितीचे पदाधिकारी प्रकाश बच्छाव उपस्थित होते. प्रथम पारितोषिक मिळविलेल्या ‘बुद्धाची गोष्ट’ हे बालनाटय़ रंगमंचावर सादरही करण्यात आले.

हर्सूल कारागृहातील कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद, ५ जून /प्रतिनिधी
आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका आरोपीने हर्सूल कारागृहात अंगावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली. नंदू राघोजी केंद्रे (वय ३४, रा. बालाजीनगर, ता. पैठण) असे या कैद्याचे नाव असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रे याच्यावर सहकारी कैद्याने हल्ला केल्याचे प्रथम सांगण्यात आले होते. त्याच्या शरीरावरील जखमाही तशाच दिसत होत्या. मात्र कारागृह प्रशासनाच्या वतीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांचे तुळजाभवानीस साकडे
तुळजापूर, ५ जून/वार्ताहर
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले. आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबई आणि कोकण विभागात शिवसेनेला घवघवीत यश मिळो, असे साकडे त्यांनी घातल्याचे समजते.कळंब येथे आभार सभेच्या निमित्ताने जाहीर सभेसाठी जाताना सोलापूर भेटीनंतर उद्धव ठाकरे हे तुळजापूर येथे आले होते. त्यांच्यासोबत खासदार चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, माजी खासदार कल्पनाताई नरहिरे, शिवशरण बिराजदार (सोलापूर), जिल्हाप्रमुख अनिल कोचरेसह अनेक नेते व पदाधिकारी हजर होते.लोकसभा निवडणुकीत सेनेस तुळजापूर तालुक्यात मताधिक्य मिळाल्याचे स्पष्ट झाल्याने ठाकरे यांनी संतोष व्यक्त केला

बारावीत कमी गुण मिळाल्याने शालेय विद्यार्थिनीची आत्महत्या
परभणी, ५ जून/वार्ताहर

बारावी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे एका शालेय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली.बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्याला अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून क्रांती कदम या विद्यार्थिनीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. क्रांती ही येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती.

बॅँकेच्या व्यवस्थापकाला मारहाण करून लूट
तुळजापूर, ५जून/वार्ताहर
जिल्हा बँकेच्या काटगाव शाखेचे व्यवस्थापक भास्करराव केवडे यांना अज्ञात चोरटय़ांनी वाहन अडवून मारहाण करून लुटण्याची खळबळजनक घटना बुधवारी चव्हाणवाडी-नांदुरी रस्त्यावर घडली. श्री. केवडे हे बुधवारी त्यांच्या दुचाकीवरून मंगरूळ-चव्हाणवाडी मार्गावरून काटगावकडे निघाले असताना दिवसाढवळ्या सकाळी १० च्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी बळाचा वापर करून त्यांचे वाहन अडविले. चाकूचा धाक दाखवून दगडाने जबर मारहाण केली आणि त्यांच्याजवळील कपाटाच्या चाव्या, तीन-चार नोंदवह्य़ा हिसकावून घेतल्या. त्यांच्याजवळ रक्कम आहे काय, याची चाचपणी केली. रक्कम नसल्याचे लक्षात घेता पिवळ्या मोटारसायकलवरून बसून गेले. लुटारूंनी तोंडावर रुमाल बांधले होते. भास्करराव केवडे यांच्या तक्रारीवरून तामलवाडीचे पोलीस निरीक्षक संजय कुलकर्णी यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. वसंत बिरादार
लोहा, ५ जून/वार्ताहर
श्रीसंत गाडगेमहाराज महाविद्यालय, लोहा येथील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. वसंत बिरादार यांची अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाली आहे. डॉ. वसंत बिरादार यांनी प्राचार्य पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. १९९० पासून ते लोहा येथील महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. ललित लेखन, समीक्षक म्हणून त्यांचा परिचय आहे. ‘मसाप’च्या कार्यकारिणीचे ते सदस्य होते. विविध प्रकारची १२ पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहे. ‘स्वाराती’ विद्यापीठात मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य असलेले डॉ. बिरादार पत्रकारही आहेत. त्यांना पां. वा. गाडगीळ, भारतभूषण पुरस्कार मिळाला आहे. पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

माजी नगरसेविका शेख सल्तनतबी यांचे निधन
अंबाजोगाई, ५ जून/वार्ताहर
शहरातील काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका शेख सल्तनतबी शेख सत्तार यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी दुपारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ५८ वर्षांचे होते. मनमिळावू स्वभावाच्या शेख सल्तनतबी १९७८ ते २००६ या कालावधीत काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका व काही काळ पालिका सभापतीही होत्या. त्यांना कर्करोग झाला होता.

चौकशीसाठी उपोषण
सोयगाव, ५ जून/वार्ताहर

तालुक्यातील पाझर तलावातील दुरुस्तीत बोगस कामे झाल्याबद्दल त्याची चौकशी व्हावी म्हणून तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते.
पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

एम. फिल.धारक विद्यार्थ्यांची निदर्शने
औरंगाबाद, ५ जून /खास प्रतिनिधी
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एम. फिल.धारकांच्या कृती समितीतर्फे शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
भाऊसाहेब झिरपे, पंडित शिंदे, दादासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. एम. फिल.च्या जुन्या विद्यार्थ्यांना लघु शोधप्रबंध सादर करण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे. दरम्यानच्या काळात विविध विषयांच्या पदव्युत्तरच्या परीक्षा असल्याने काही मार्गदर्शक विद्यार्थ्यांचे प्रबंध सादर होऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी कालमर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. शहीद भगतसिंग अध्यासन केंद्र चालू करण्याचे निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून ते तात्काळ सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

जमिनीसाठी छळ तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नांदेड, ५ जून/वार्ताहर
वडिलोपार्जित जमीन माझ्या नावावर करून दे, या मागणीसाठी धनसिंघ राठोड याचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध सिंदखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किनवट तालुक्यातल्या विक्रमवाडी येथील भाऊराव राठोड याची पत्नी सुनीता राठोड व पोलीस कॉन्स्टेबल प्रेमसिंग राठोड (सध्या नेमणूक किनवट पोलीस ठाणे) या तिघांनी धनसिंग राठोड यांचा गेल्या सहा महिन्यांपासून जमीन वाटणीच्या नावाखाली छळ चालविला होता. ४ जूनला सुनीता राठोडने प्रेमसिंगच्या मदतीने धनसिंग राठोड यांना अर्वाच्य शिविगाळ केली. एवढेच नवहे तर जिवे मारू, अशी धमकी दिली. या प्रकाराने भयभीत झालेल्या धनसिंग राठोड यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आज या प्रकरणात कृष्णा राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्यापि कुणालाही अटक करण्यात आली नाही.

मुलांच्या खेळण्यावरून विद्यार्थ्यांला मारहाण
औरंगाबाद, ५ जून /प्रतिनिधी
लहान मुलांना घरासमोर खेळण्यास मज्जाव करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला चारजणांनी बेदम मारहाण केली. ही घटना काल रात्री ९.३०च्या सुमारास कटकट गेट येथे घडली. शेख जावेद शेख दस्तगीर (वय २२, रा. कटकट गेट) या विद्यार्थ्यांने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या घरासमोर लहान मुले खेळत होती. यास जावेद याने विरोध केला. याचा राग आल्याने बबनी, अफजल, शेरू आणि अविज या चारजणांनी त्याला मारहाण केली. त्याबरोबरच त्याच्या कुटुंबातील शेख जहीर आणि शेख नजीर यांच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केला.

पोलिसात तक्रार दिल्याने मारहाण
औरंगाबाद, ५ जून /प्रतिनिधी
मोटार उभी करण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या भांडणानंतर पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, म्हणून शेख इरफान शेख हाफीज आणि त्याच्या कुटुंबीयांना लोखंडी सळईने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास बायजीपुरा भागात घडली. याप्रकरणी शेख इरफान यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात बाबू पठाण, मुन्ना, त्याचा भाऊ आणि अन्य चार ते पाचजणांविरुद्ध गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. इरफानचा भाऊ मजहर आणि बाबू पठाण यांच्यात मोटार उभी करण्यावरून वाद झाला होता. मजहरने जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा तपास सुरू असतानाच बाबू, मुन्ना, त्याचा आणखी एक भाऊ आणि चार ते पाच मित्रांनी बुधवारी रात्री इरफान, त्याचा भाऊ, आई आणि वडिलांना बेदम मारहाण केली. आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, असे त्यांचे म्हणणे होते. मारहाण करणाऱ्यांनी लोखंडी सळईचा वापर केला आणि घरातील सामानाचीही नासधूत केली.

तणावमुक्त जीवनावर मार्गदर्शन कार्यक्रम
औरंगाबाद, ५ जून/खास प्रतिनिधी

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वाळूज शाखेतर्फे बजाजनगरातील हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात ९ जूनपासून ‘तणावमुक्त जीवन कसे जगावे’ यावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्वागीण विकास, एकाग्रता, आत्मविश्वास आणि तणावमुक्त जीवन याविषयी या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. १४ जूनपर्यंत हे मार्गदर्शन शिबिर होणार आहे.

व्यंकटेश महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत लक्षणीय यश
लातूर, ५ जून/वार्ताहर
लातूर विभागीय मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात व्यंकटेश कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाच्या एम.सी.व्ही.सी. विभागातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीची शेफाली अशोककुमार त्रिपाठी हिने ६०० पैकी ५१९ गुण मिळवून लातूर विभागीय मंडळात प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाविद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचा निकाल ९७.२ टक्के, कला शाखेचा निकाल ९०.१९ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ८१.१५ टक्के, एम.सी.व्ही.सी.चा निकाल ९४.५ टक्के एवढा लागला आहे.

श्रीनिवास जोशी यांना पुरस्कार
अंबाजोगाई, ५ जून/वार्ताहर
शहरातील दीनदयाळ नागरी सहकारी बँक येथील कर्मचारी श्रीनिवास श्रीकांत जोशी यांना महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक संघटना, मुंबईचा कै. बापुराव देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्मचाऱ्याची गुणवत्ता तसेच सामाजिक काम व इतर कामातील प्रगती लक्षात घेऊन राज्यपातळीवर संपूर्ण नागरी सहकारी बँकेतून लिपिक वर्गातून दरवर्षी कै. बापुराव देशमुख उत्कृष्ट सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार दिला जातो. या वर्षी अंबाजोगाई येथील दीनदयाळ नागरी बँकेतील कर्मचारी श्रीनिवास जोशी यांना पुरस्कार जाहीर झाला असून त्याचे वितरण १२ जूनला मुंबईत जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

विवाहितेच्या छळप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा
जिंतूर, ५ जून/वार्ताहर
जिंतूर तालुक्यातील मौजे भिलज येथील विवाहितेचा छळ करणाऱ्या चारजणांविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑटो घेण्यासाठी माहेरहून ३० हजार रुपये घेऊन येण्यावरून यशोदा भाऊराव शेळके या महिलेस तिच्या सासरच्यांनी तिला उपाशी ठेवून मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी यशोदा शेळके यांनी तक्रार दिल्याने भाऊराव शेळके (नवरा), पाराजी शेळके (सासरा), जनाबाई (सासू), अर्जुन (भाया), दुर्गा अर्जुन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज उपसा सिंचन परिषद
लोहा, ५ जून/वार्ताहर
राष्ट्रवादी किसान भारतीचे प्रदेशाध्यक्ष शंकर धोंडगे यांच्या उपस्थितीत माळेगाव (ता. लोहा) येथे आज (शनिवारी) उपसा सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे यांनी दिली. लिंबोटी धरणाची एक मीटर उंची वाढवावी या व अन्य पाणी समस्या संदर्भात या परिषदेत विचारविनिमय करण्यात येणार आहे. शंकर धोंडगे हे या विषयावर बोलणार असून मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी किसान भारतीचे अध्यक्ष प्रभाकर आढाव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे, युवक अध्यक्ष गायकवाड यांनी केले.

महासंघाची उद्या बैठक
लोहा, ५ जून/वार्ताहर

भटक्या-विमुक्त जमातीच्या मुलभत समस्या व इतर वीस मागण्यांसंदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लोहा येथे रविवारी राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमाती महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक संघटनेचे संस्थापक प्रा. संजय बालाघाटे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. भटक्या विमुक्त जमातीच्या मूलभूत समस्या, इतर वीस मागण्यासंदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी प्रा. संजय बालाघाटे, प्रा. राजेश ढवळे हे मार्गदर्शन करणार आहेत.

ऊठसूठ दौरा करणाऱ्या माजी सभापतीला चपराक
हिंगोली, ५ जून/वार्ताहर
पंचायत समितीच्या सभापतीला त्यांच्या कार्यक्षेत्रात महिन्यातून सात दिवस दौरा करता येतो; परंतु हिंगोली पंचायत समितीचे माजी सभापती कानबाराव गरड यांनी त्यापेक्षा अधिक दिवस दौरा केल्याने त्यानिमित्त झालेला खर्च २६ हजार ३०४ रुपये तात्काळ भरणा करण्याचे लेखी पत्र गट विकास अधिकाऱ्यांनी देऊन चांगलीच चपराक मारली आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, हिंगोली पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी अनुज्ञेय दौऱ्यापेक्षा जीपद्वारे अधिक दौरे केल्याबाबत पंचायत समितीचे माजी सभापती कानबाराव गरड यांना १ जूनला दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे की, या कार्यालयाचे वर्ष २००६-०७ चे लेखा परीक्षण अहवालमधील परिच्छेद क्रमांक १० अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (पीठासीन अधिकारी सदस्य) प्रवास भत्ते व दैनिक भत्ते सुधारणा नियम १९९३ नुसार पंचायत समिती सभापती व त्याच्या कार्यक्षेत्रात एक महिन्यात एकूण सात दिवस अनुज्ञेय आहे; परंतु त्यापेक्षा जास्त दिवस दौरा केल्याचे नमूद केले आहे.

महिला बचतगटांना कर्जाचे वाटप
बोरी, ५ जून/वार्ताहर
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व (कै.) नानासाहेब तात्यासाहेब चौधरी सेवाभावी संस्था, बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचतगट सक्षमीकरणाच्या विविध योजनेंतर्गत लाभार्थीना कर्जाचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती सदस्य अशोकराव चौधरी यांच्या पुढाकारातून या योजनेंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी सामकादेवी बचतगट (बोरी तांडा), इंदिरा गांधी बचतगट (माक), एकता बचतगट (नामदेवनगर बोरी) या गटांना प्रत्येकी १ लाख ६० हजार व रमाबाई आंबेडकर महिला बचतगट (माक) यांना २ लाख २० हजार रुपये कर्ज देण्यात आले.बोरी येथील चार गटांना प्रत्येकी ४ लाख १० हजार रुपये कर्ज मंजूर झाले असून पुढील आठवडय़ात लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे अजय चौधरी यांनी स्पष्ट केले. तीन गटांना दुग्ध व्यवसायासाठी तर ख्वाजा गरीब नवाज या गटास साडी सेंटर व रेडीमेड उद्योगासाठी कर्ज देण्यात येणार आहे. तसेच ३० बचतगटांना संस्थेंतर्गत प्रत्येकी २५ हजार रुपये खेळते भांडवल म्हणून देण्यात आल्याची माहिती संस्थेचे नेटके यांनी दिली.

डॉ. विमल मुंदडा यांच्या हस्ते विकासकामाचा शुभारंभ
अंबाजोगाई, ५ जून/वार्ताहर

केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी तथा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्या हस्ते ६ व ७ जून रोजी केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. डॉ. विमल मुंदडा यांच्या हस्ते ६ जूनला सायंकाळी ६ वाजता केज तालुक्यातील आनेगाव येथील भारत निर्माण योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ७ वाजता धनेगाव येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठकीला त्या उपस्थित राहणार आहेत. ७ जूनला अंबाजोगाई तालुक्यातील काळविट लमाणतांडा येथील तांडा सुधार योजनेंतर्गत पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन, हारणखुरी तांडा येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन- सकाळी ९ वाजता, मांडवा पठाण येथील तांडा सुधार योजनेंतर्गत मैदरी तांडा येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन सकाळी १० वाजता, कुरणवाडी येथील टिक्कानाईक तांडा आणि चनई तांडा येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.