Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी विरोधक सज्ज
गणेश कस्तुरे

 

नांदेड जिल्ह्य़ातल्या वेगवेगळ्या मतदारसंघाची झालेली पुनर्रचना, मतदारसंघात चव्हाण परिवाराला मानणारा मोठा गट, मतदारसंघात झालेली विकासकामे, शिवसेना-भाजपा युतीचे या भागात असलेले नगण्य अस्तित्व, मुख्यमंत्री समर्थकांची असलेली मोठी फळी या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापुढे आव्हान कसे उभे करावे या विवंचनेत विरोधी पक्षाचे पदाधिकारी आहेत. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावता येईल की नाही यासाठी आतापासून चाचपणी सुरू असली तरी विरोधी पक्षाला कोणताही मार्ग सापडला नाही. काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी दीर्घकाळ नेतृत्व केलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनेही बऱ्यापैकी पाय रोवले आहेत.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पूर्वीचा मुदखेड मतदारसंघ पुनर्रचनेत भोकर झाला आहे. मुदखेड, अर्धापूर, भोकर या तालुक्यांचा समावेश या नव्या मतदारसंघात आहे. पूर्वीचा मुदखेड विधानसभा मतदारसंघ अशोक चव्हाण यांच्यासाठी एकप्रकारे डोकेदुखीच होता. नांदेड शहरालगत असलेल्या तरोडा तसेच नायगाव तालुक्यातल्या काही गावात त्यांना अडचणीत आणण्याचे उद्योग देशमुख कंपनीनी वेळोवेळी केली. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नव्हता. पूर्वीचा मुदखेड किंवा आताचा भोकर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या भागातील मतदारांनी नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी आपले बळ उभे केले आहे. भोकर मतदारसंघातून १९६२ ते १९८० या दीर्घ कालावधीत काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी नेतृत्व केले होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच ग्रामपंचायतीत काँग्रेसचेच वर्चस्व आहे. काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात जि. प. निवडणुकीत स्वकीयांनीच दगा दिल्याने अर्धापूर, येळेगाव, बारड या जि. प. गटात काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. परंतु त्यानंतर परिस्थिती बदलण्यात मुख्यमंत्री समर्थकांना बऱ्यापैकी यश आले आहे.
लोकसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघाने काँग्रेसलाच आघाडी दिली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनापासून प्रचार न करता काँग्रेसने या विधानसभा मतदारसंघातून तब्बल वीस हजारांची आघाडी मिळविली. भोकर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २,१०,६१२ आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघाचे शंकरराव चव्हाण यांनी दीर्घकाळ नेतृत्व केले. शंकरराव चव्हाण यांना मानणारा मोठा गट या भागात आहे. शिवाय भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र याच मतदारसंघात आहे. शंकरराव चव्हाणानंतर या भागाचे नेतृत्व गोरठेकर कुटुंबीयांकडे गेले. गोरठेकर सध्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांची फळीही लक्षणीय आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विरोधासाठी केवळ विरोध होत असल्याने आगामी निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध कोण उमेदवार द्यावा, अशी चिंता विरोधी पक्षाला सतावत आहे. पुनर्रचित मतदारसंघामुळे काँग्रेसला पर्यायाने अशोक चव्हाण यांना फायदा होणार आहे.

विधानसभा निवडणूक २००४ चे चित्र
२००४ साली झालेल्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा ७५ हजार मतांनी झालेला विजय एकतर्फी होता. चव्हाण कुटुंबीयांच्या तालमीत तयार झालेल्या माजी खासदार गंगाधरराव कुटुंरकर यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या निवडणुकीत ‘देशमुख-पाटील’ वादही उफाळून आला होता. परंतु चव्हाण यांना तब्बल १,५०९३२ मते मिळाली होती. तर कुंटूरकर यांना ३५,४७८ मतांवर समाधान मानावे लागले होते. शिवसेना-भाजपा युतीच्या पाठबळावर उभे राहिलेल्या स्वतंत्र भारत पक्षाच्या शोभाताई वाघमारे यांना केवळ १०,५१३ मते मिळाली होती. अशोक चव्हाण यांना पराभूत करण्याचे मनसुबे मतदारांनी उधळून लावले होते.

यशाची एकेक पायरी..
मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे यशाची एकेक पायरी चढत असताना, मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागातून त्यांना मिळणारा प्रतिसाद, शिवाय आतापासूनच त्यांच्या समर्थकांनी सुरू केलेली तयारी या सर्व पाश्र्वभूमीवर त्यांच्यापुढे कडवे आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षातील नेते केवळ चाचपणीच करीत आहेत.

भोकर विधानसभा मतदारसंघात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, भोकर शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीचा विस्तार, ग्रामीण भागातल्या अनेक रस्त्यांची दुर्दशा तसेच सिंचनाचे प्रश्न आगामी विधानसभा निवडणुकीत येतील हे स्पष्ट आहे.