Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सुरक्षित मतदारसंघात राष्ट्रवादीची सत्वपरीक्षा!
दिंडोरी मतदारसंघ
जयप्रकाश पवार

 

बारामतीनंतर सर्वाधिक सुरक्षित म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला शरद पवारांनी आपल्या यादीत स्थान दिल्यानंतरही त्यांचा हा दावा मतदारांनी भाजपला विजयी करीत सपशेल खोटा ठरविला. अनुसूचित जमातीसाठी राखीव, निवडून येणारा उमेदवारही आदिवासी असला तरी आजवरच्या निवडणुकांत स्थानिक सधन तसेच मराठा नेत्यांची पडद्यामागील सूत्रधाराची भूमिका कळीची ठरत आली. येत्या विधानसभा निवडणुकीतही ‘मागील पानावरून पुढे सुरु’ या उक्तीला अनुसरत लोकसभेतील घटनाक्रमाची पुनरावृत्ती झालीच तर हा सुरक्षित मतदारसंघ राष्ट्रवादीची सत्वपरीक्षा पाहणारा ठरू शकतो. काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे असा या मतदारसंघाचा प्रवास झाला आहे. थोडक्यात, चुरशीच्या तीव्रतेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ जशी राष्ट्रवादीची दमछाक करेल तव्द्तच कम्युनिस्ट, युतीलाही ते सहजी खिशात घालता येणे अवघड आहे.
दिंडोरी अन् हरिभाऊ महाले हे एक यापूर्वीचे ठरलेले समीकरण. जनता दलाला विधानसभेत अन् संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देतानाच या पक्षाची इभ्रत ेशाबूत ठेवण्याचे काम याच दिंडोरीने केले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, भाजप, बसपा आदी पक्षांनीही येथून आपापले नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. त्यात भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही १९८५ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी करून शर्यतीत उतरण्याचा प्रयत्न केला होता. धरणांचा तालुका, द्राक्षबागा, बागायती शेती या सर्वाच्या परिणामी राष्ट्रीय नेत्यांपासून राज्यपातळीवरील नेत्यांपर्यंतचा डोळा या तालुक्यातील काळ्या सोन्यावर राहिला आहे. येथील शेतजमिनीशी संबंधीत असंख्य घोटाळे उघडकीस आले अन् राज्यभर गाजले, रेशीम उद्योगाच्या नावाखाली गावेच्यागावे नाडली गेलीत, शेकडो शेतकरी कुटुंबे देशोधडीला लागलीत, विधीमंडळातही त्याची दखल घेतली गेल्याने सीआयडी चौकशीचे आश्वासन दिले गेले, चौकशा झाल्या, त्यात फसवणूक झाल्याचे स्पष्ट होवूनही चौकशीच्या गाडयाचं चाक मात्र मंत्रालय अन् त्यातील फाईलींमध्येच रुतले आहे. असा हा तालुका आदिवासी असला तरी त्यातील बव्हंशी भाग सधन आहे.
अशा या दिंडोरीच्या पुनर्रचनेनंतर नजीकचा आदिवासीबहुल पेठ तालुक्याचा भाग त्याला जोडला गेला आहे. नाशिक महापालिकेतील गंगापूर, आनंदवल्ली, सातपूर हा शहरीभाग या अगोदर दिंडोरीला जोडलेला होता, तोही आता वगळला आहे. त्यामुळेच वास्तव्य नाशिक शहरात अन् प्रतिनिधित्व दिंडोरीतील आदिवासींचे करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत ‘चेक’ बसू शकतो. येथील मतांचे ध्रुवीकरण हे पक्ष चिन्हापेक्षाही व्यक्तिपरत्वे अर्थात ओळखीचा चेहरा या एकमेव निकषावर अधिक लवकर होते. त्यामुळे येत्या निवडणुकीत जसे दिंडोरीतील इच्छुक असतील तसेच नव्याने जोडल्या गेलेल्या पेठ तालुक्यातील इच्छुकांचीही संख्या लक्षणीय राहील. राष्ट्रवादीला गत निवडणुकीतच बंडखोरीचे ग्रहण लागले होते. इच्छुकांच्या अधिकाधिक संख्येतच चुरशीची अन् प्रचंड बंडाळीचीही बीजे रोवली जातील असे आजचे एकूण चित्र आहे.

विधानसभा निवडणूक २००४ चे चित्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवाळ ६१ हजार २०५ मते मिळवित विजयी झाले. राष्ट्रवादीचेच बंडखोर माजी आमदार रामदास चारोस्कर हे सुमारे ३० हजार मते घेवून दुसऱ्या तर शिवसेनेचे डॉ. बी. एल. गागुंर्डे २७ हजार ९९० मते मिळवित तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

जनताच न्याय करेल!
लोकसभा निवडणुकीत काही कारणांमुळे पराभव झाला. पण विधानसभा निवडणुकीत जनताच न्याय्य भूमिका घेवून आजवर केलेल्या विकासकामाची पावती विजयाच्या रुपाने आपल्या पदरात टाकेल असा विश्वास आ. नरहरी झिरवाळ यांना आहे. दिंडोरीच्या पश्चिम व पूर्व पट्टय़ात राबविलेल्या उपसा सिंचन योजना, वळण योजना, बारमाही रस्ते, वीजेचा प्रश्न, पुलांची कामे यासह ‘गाव तेथे योजना’ या माध्यमातून तब्बल ११७ योजनांना गती दिली. आदिवासी भागातील वसतीगृहांची क्षमता वाढविली. लोकांना निवडणुकीत आश्वासन देण्यापेक्षा काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनीच निवडून दिले अन् त्यांनीच सुचविलेली कामे अग्रक्रमाने केल्यामुळे लोक आपल्यावर अन्याय करणार नाहीत.

सिंचन, आदिवासी आश्रमशाळांची दुरावस्था, शेती अन् शेतकरी यांच्याशी संबंधीत समस्या, रस्ते, आरोग्य आणि दर हंगामात परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची कोटय़वधीं रुपयांची होणारी फसवणूक.