Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विधान परिषद व राज्यसभेसाठी नेत्यांची मोर्चेबांधणी
नगर जिल्हा
श्रीरामपूर, ५ जून/प्रतिनिधी

 

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असले, तरी नगर जिल्ह्य़ात मात्र राज्यसभा आणि विधान परिषदेवर वर्णी लागावी, म्हणून नेत्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
राज्यसभेच्या तीन जागा रिक्त आहेत. राष्ट्रवादीचे नेते गोविंदराव आदिक, काँग्रेसचे माजी खासदार बाळासाहेब विखे यांचे राज्यसभेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनीही राज्यसभेचा आग्रह धरला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आदिक यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांना राज्यसभेचा शब्द देण्यात आल्याचे सांगण्यात येते. आदिक यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही, तर ते विधानपरिषदेच्या उमेदवारीकरिता चिरंजीव अविनाश आदिक यांचे नाव पुढे करण्याची शक्यता आहे. आमदार यशवंतराव गडाख यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या आमदारकीची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे चार-सहा महिन्यांकरिता पोटनिवडणूक होणार की नाही, याबद्दल संभ्रम आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांकडे त्यासंबंधी प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यांच्या आदेशानंतरच निर्णय होईल. गडाख यांनी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.
पोटनिवडणूक जाहीर झाल्यास चार महिन्यांच्या आमदारकीकरिता चार-पाच क ोटींचा खर्च येईल. परंतु हा खर्च करण्याची तयारीही अनेकांनी ठेवली असून, मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आपला हक्क कायम ठेवण्याकरिता नेत्यांचा खटाटोप आहे. विधानपरिषदेकरिता शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे, भानुदास क ोतकर, डॉ. सुधीर तांबे, तसेच राष्ट्रवादीचे आमदार शिवाजी कर्डिले उत्सुक आहेत. ससाणे यांचा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने उमेदवारीसाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांना राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसच्याही काही नेत्यांचा विरोध आहे.
राज्यसभेकरिता विखे इच्छुकआहेत. राज्यसभेच्या दोन जागांवर राष्ट्रवादी हक्क सांगत आहे. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी विखे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा आग्रह धरत आहेत. त्यामागे राज्यसभेची राष्ट्रवादीची एक जागा कमी क रून ती पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.