Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अपंग मतदारांकडेही लक्ष द्या!
मुंबई, ५ जून / प्रतिनिधी

 

राज्यातील एकूण मतदारांपैकी सुमारे पाच लाख मतदार (२००१ च्या जनगणनेनुसार) अस्थिव्यंगाने अपंग आहेत. ते हिररीने मतदानही करतात. असे असले तरी मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येते, असा आरोप ‘अपंग हक्क विकास मंच’ या संस्थेचे संघटक शंकर साळवे यांनी केला आहे. ते म्हणाले की, शहरी भागांतील मतदान केंद्रे पहिल्या, दुसऱ्या तर काही वेळा तिसऱ्या मजल्यावर असतात. अपंगांसाठी त्या ठिकाणी अपंगांसाठी रॅम्प असणे गरजेचे आहे. तात्पुरत्या स्वरूपात रॅम्प बसविण्यासाठी निधीही उपलब्ध करून दिलेला असतो. लोकसभा निवडणुकांदरम्यान साळवे यांनी ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ या भागांतील मतदान केंद्रांना भेट दिली असता रॅम्प नसल्याचे किंवा ते अयोग्य रीतीने बसविल्याचे आढळून आले. अशा परिस्थितीत अपंगांना मतदान करणे कठीण होऊन बसते. लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तरी अपंग मतदारांना रॅम्पची सुविधा पुरविली जावी, किंबहुना अपंगांची मतदान केंद्रे तळमजल्यावरच असावीत, अशी मागणी साळवे यांनी केली आहे.
गेली अनेक वर्षे या संदर्भातील त्यांचा लढा सुरू आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर ५ ऑक्टोबर २००५ रोजी निर्णय देण्यात आला. शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींसाठी तात्पुरता रॅम्प उभारण्यात यावा, लोकसभा निवडणुकांसाठी अपंगांना रॅम्प उपलब्ध करून देणे ही आयुक्तांची जबाबदारी राहील, असे त्या निर्णयात नमूद करण्यात आले होते. असे असूनही शहरांतील अनेक मतदान केंद्रांवर या सोयी उपलब्ध नव्हत्या.
साळवे म्हणतात की, प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे अपंग मतदार मतदान करण्यास उत्सुक नसतात. येत्या विधानसभा निवणणुकांसाठी तरी या समस्येवर उपाययोजना करण्यात यावी. गावच्या ठिकाणी ही समस्या उद्भवत नाही. पण ज्या शहरांमध्ये महापालिका आहेत, त्या ठिकाणी ही समस्या दिसून येते. मतदार नोंदणी कार्यालयही पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असते. त्यामुळे मतदान यादीत नावनोंदणी करणेही अशक्य होऊन बसते. येत्या २२ जूनपर्यंत मतदार नोंदणी करायची आहे. त्यामुळे आता तरी संबंधितांनी या दृष्टीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा साळवे यांनी व्यक्त केली आहे.