Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘मंदिर वही बनाएंगे’ कॅसेटवरील बंदी उठविण्याची मागणी
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
मुंबई, ५ जून / प्रतिनिधी

 

‘मंदिर वही बनाएंगे’ या कॅसेटवर घातलेली बंदी अयोग्य असल्याने ती त्वरित उठविण्यात यावी, अशी मागणी करीत आज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानपरिषदेत मोकळ्या जागेत धाव घेतली आणि त्यानंतर सभात्याग केला. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर औरंगाबाद आणि नांदेडमध्ये दगडफेक करण्यात आली, या बाबत पाशा पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर नितीन गडकरी यांनी ‘मंदिर वहीं बनाएंगे’च्या कॅसेटचा विषय उपस्थित केला. त्या उत्तर देताना गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले की, ‘मंदिर वहीं बनाएंगे’ आणि ‘बाबा तेरी मसजिद में’ या कॅसेटमुळे वारंवार दंगली उसळत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली.
शिवसेना-भाजपचे ज्येष्ठ सदस्यही सभागृहातील मोकळ्या जागेत आले तेव्हा जयंत पाटील म्हणाले की, रामाच्या नावाने मते मागणाऱ्यांवर सभागृहातील मोकळ्या जागेत येऊन घोषणा देण्याची वेळ येते. तरीही विरोधक घोषणाबाजी करीतच होते त्यातच सभापतींना पुढील कामकाज पुकारले तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला.
ध्वनिशोषक यंत्रणा बसविणार
मुंबईतील प्रमुख रस्ते आणि उड्डाणपूल यावर ध्वनिशोषक यंत्रणा बसविण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. उड्डाणपुलांवर बसविण्यात आलेली ही यंत्रणा जाहिरात फलकांसाठी आघाडी सरकारच्या कालावधीत काढून टाकण्यात आली, असा आरोप भाजपचे नितीन गडकरी यांनी केला.
शेतकरी कर्जमाफी
केंद्र सरकारच्या कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना लाभ झाला आणि त्याचे काय परिणाम झाले याचा अभ्यास करण्यात येईल आणि कर्जमाफीची मुदत एका वर्षांने वाढवावी यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल, असे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
काँग्रेसचे संजय दत्त यांनी विचारलेल्या मूळ प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, भूविकास बँकेच्या १७०८५८ सभासदांना पॅकेजचा लाभ झाला असून विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पॅकेजअंतर्गत ३६७२९.५७ लाख रुपये इतका निधी मिळाला आहे.
एस.टी. अपघातग्रस्तांना मदत
नागोठणे, पुणे, अहमदनगर, कळंब आदी ठिकाणी झालेल्या एस. टी. अपघातांमध्ये १७ जण मृत्युमुखी पडलेले असतानाही केवळ पाच जणांच्या नातेवाईकांनी मागणी केल्याने त्यांनाच मदत देण्यात आली होती. उर्वरित १२ जणांच्या नातेवाईकांना १५ दिवसांत प्रत्येकी दोन लाख रुपये द्यावे, असे आदेश विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी आज दिली. भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी या बाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.