Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

रायगडावर शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा
महाड, ५ जून/वार्ताहर

 

किल्ले रायगडावर आज मंगलमय वातावरणात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३३६ वा राज्याभिषेक सोहळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर उपस्थित होते. शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, दुर्गराज रायगड व स्थानिक उत्सव समिती यांच्यातर्फे शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी गड देवता शिरकाईमातेचे पूजन आणि जगदीश्वराला अभिषेक करण्यात आला, त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मराठी तिथीप्रमाणे आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस पहाटे ध्वजारोहण केल्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रारंभ झाला. महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पूजा, नंतर गंगास्नान, शस्त्रपूजन, औक्षण इत्यादी विधी करण्यात आले. धुक्याच्या गडद वातावरणामध्ये ढोलताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. पालखीमध्ये महिलांनी पारंपरिक वेश परिधान करून लेझीम पथकात भाग घेतल्याने सर्वांचे लक्ष मिरवणुकीमध्ये वेधले होते. ढोलताशांच्या गजरात दांडपट्टा, मल्लखांब असे मर्दानी खेळ सादर करण्यात आले. सर्वत्र पाणीटंचाई असताना गडावरील तलाव मात्र पाण्याने भरलेला होता. त्यामुळे गडावर आलेल्या शिवभक्तांना पाण्याची कमतरता भासली नाही.