Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

महिला आरक्षणाच्या विरोधासाठी शरद यादवांची विषप्राशनाची तयारी!
नवी दिल्ली, ५ जून/खास प्रतिनिधी

 

संसद व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी महिला आरक्षण विधेयक पहिल्या शंभर दिवसात पारित करण्याचा केंद्रातील मनमोहन सिंग सरकारने निर्धार व्यक्त करताच आज लोकसभेत त्याची पहिली तीव्र प्रतिक्रिया उमटली. महिला आरक्षण विधेयक पारित झाले तर आपण विषप्राशन करून जीव देऊ, अशी धमकी जनता दल युनायटेडचे अध्यक्ष शरद यादव यांनी दिली.
यादव यांचा जदयु रालोआतील प्रमुख घटक पक्ष असला तरी भाजपने या मुद्यावरून मतभिन्नता व्यक्त केली आहे. जदयु हा भाजपचा मित्रपक्ष आणि महिला आरक्षण विधेयकाचा विरोधक असला तरी काही मुद्यांवर आमचे मतभेद असू शकतात, असे भाजपच्या लोकसभेतील उपनेत्या सुषमा स्वराज यांनी लगेच स्पष्ट केले. महिला आरक्षण विधेयकाला भाजपने आधीच समर्थन जाहीर केले आहे.
भलेही विषप्राशन करून जीव देऊ, पण कुठल्याही किंमतीत महिला आरक्षण विधेयक पारित होऊ देणार नाही, अशी ‘भीष्मप्रतिज्ञा’ आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना यादव यांनी केली. संसदेत आमचे संख्याबळ भलेही कमी असेल, पण लक्षात ठेवा विष प्राशन करणारा सॉक्रेटिस एकटाच होता, असेही ते म्हणाले. महिला आरक्षण हे महिलांना स्वातंत्र्य देण्याचे माध्यम नसून त्यामुळे तोडगा निघण्याऐवजी प्रश्न आणखी भीषण स्वरुप धारण करेल. देशातील सर्व समस्यांचे मूळ जातीयवादात आहे. िहमत असेल तर सरकारने जातीप्रथा संपुष्टात आणावी, महिला आपोआपच समोर येतील. राष्ट्रपती वा लोकसभा अध्यक्षपदाचा महिलेला मान दिल्याने महिलांना स्वातंत्र्य लाभणार नाही. त्यासाठी महिलांना शूद्र आणि अतिशूद्रांच्या वर्णव्यवस्थेतून बाहेर काढावे लागेल, अशी टीका यादव यांनी केली.