Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘मेटे-खेडेकरांच्या दबावाला बळी पडून शिवरायांचा इतिहास बदलणार का?’
मुंबई, ५ जून/ खास प्रतिनिधी

 

गेल्या वर्षीच्या इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात ‘दादोजी कोंडदेव यांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले’ असा उल्लेख होता तसेच त्याबाबतचे छायचित्रही होते. मधल्या काळात जातीयवादी मंडळींच्या दबावाला बळी पडून यावर्षी चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील दादोजी कोंडदेव यांचा उल्लेखच गाळण्यात आला तसेच त्यांच्या चित्राऐवजी शहाजी महाराजांचे चित्र प्रसिद्ध करण्यात आल्याचा गंभीर मुद्दा भाजप आमदार मधु चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विनायक मेटे व खेडेकर या जोडगोळीच्या दबावाला बळी पडून तर हा बदल केला नाही ना, असा सवाल चव्हाण यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित केला. या बदललेल्या धडय़ामध्ये म्हटले आहे की, शहजाराजांनी शिवरायांना युद्धकला शिकविण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली. यात दादोजी कोंडदेव यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. तसेच शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण, असा उल्लेख आहे. इतिहासाच्या या नव्या पुस्तकात दादोजी कोंडदेव यांच्या ऐवजी शहाजीराजांचे चित्र दाखविण्यात आले आहे. वास्तविक ज्यावेळी शिवरायांचे शिक्षण सुरू होते त्यावेळी शहाजीराजे तेथे उपस्थितही नव्हते, असे चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन इतिहास बदलून महापुरुषांचा अपमान करण्याबरोबरच नवीन पिढीला चुकीचा इतिहास शिकविण्याचे काम करत असल्याचे मधू चव्हाण यांनी सांगितले. याप्रकरणी चुकीची माहिती बदलून याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.