Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दयाळू सोनियांनी मला माफ केले - संगमा
नवी दिल्ली, ५ जून/खास प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन संस्थापकांपैकी एक, माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांनी विदेशी वंशाच्या मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची माफी मागितल्याचे आज पत्रकारांपुढे मान्य केले. दहा वर्षांंपूर्वी विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आपण सोनियांची माफी मागितली आणि त्यांनीही उदार मनाने आपल्याला माफ केले, असे संगमा यांनी सांगितले. पुत्र कोन्राड संगमा यांच्या विवाहाच्या निमंत्रणाचे निमित्त साधून संगमा यांनी २ जून रोजी त्यांच्या केंद्रीय राज्यमंत्री कन्या अगाथा संगमा यांच्यासोबत १०, जनपथ येथे सोनिया गांधींची भेट घेतली होती. या भेटीत राजकीयदृष्टय़ा पूर्णपणे संपुष्टात आलेला विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल संगमा यांनी सोनियांची माफी मागितली. दयाळू सोनियांनी आपल्याला माफ केले, असे खुद्द संगमा यांनीच आज संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुत्राच्या विवाहाला उपस्थित राहण्याचेही सोनियांनी आश्वासन दिल्याचे संगमा यांनी सांगितले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला चालू महिन्यात दहा वर्षे पूर्ण होत असतानाच संगमा यांनी क्षमायाचनेची जाहीर वाच्यता करून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांतील पराभवामुळे आधीच तोंडघशी पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणखीच गोची केली आहे. संगमा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे मेघालयात स्वतंत्र संस्थान असून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसवर ते अवलंबून नसल्यामुळे त्यांची पुढची चाल कोणती असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शरद पवार यांना साथ देत विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसमधून हकालपट्टी होण्यापूर्वी संगमा यांचे पक्षात निर्विवाद महत्त्व होते. सोनिया गांधींच्या ते खास मर्जीतले समजले जायचे. पवार यांनी काँग्रेस आणि सोनिया गांधींशी तडजोड केली, पण संगमा यांच्या माध्यमातून काँग्रेसवर प्रखर टीकाही सुरु ठेवली होती. पण आता संगमाच काँग्रेसला वश झाले असून त्यांनी सोनियांची माफी मागितल्यामुळे पवार यांचीही कोंडी झाली आहे.