Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

गडकरी निर्दोष असल्याचा गृहमंत्र्यांचा निवाडा
मुंबई, ५ जून/प्रतिनिधी

 

नागपूर येथील योगिता अशोक ठाकरे या लहान मुलीच्या मृत्यू प्रकरणाबाबत नितीन गडकरी हे निर्दोष आहेत. या प्रकरणाबाबत बऱ्याच उलटसुलट बातम्या प्रसिद्धी माध्यमांमधून येत आहेत. मात्र त्यात काही तथ्य नाही, असे आज गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.
वास्तविक पाहता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात पोलिसांवर ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेतली होती. मात्र आज विधान परिषदेमध्ये नितीन गडकरी यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे हा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, या प्रकरणाची सरकारने सीआयडी चौकशी करावी व सरकारने ठोस भूमिका घ्यावी. याबाबत एक इंगळे नावाच्या व्यक्तीने आपल्याकडे पैशांची मागणी केली असून ते दिल्यास प्रकरण मिटवून टाकू, असे सांगितले. त्याला आपण नकार दिल्यानंतर हे प्रकरण पेटविण्याच्या धमक्याही त्याने दिल्या असून या इंगळेची गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांच्या या मुद्दय़ानंतर गृहमंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणात गडकरी निर्दोष असल्याचे जाहीर केले. तसेच प्रकरण उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असून त्याचा निकाल येत्या एक दोन दिवसांमध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे जर न्यायालयाने निर्देश दिले व गरज भासली तर सीआयडी चौकशी करू, असे गृहमंत्री म्हणाले.