Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ध्वज विजयाचा उंच धरा रे..
विनायक दळवी
लंडन, ५ जून

 

पहिल्यावहिल्या आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदाला गवसणी घालणारी भारताची धोनी ब्रिगेड शनिवारी ट्रेन्ट ब्रिज येथे होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या एन्काउन्टरसाठी सज्ज झाली आहे. ध्वज विजयाचा उंच धरा रे.. अशा आशयाच्या शुभेच्छा साऱ्या भारतातून टीम इंडियाला दिल्या जात असताना शुक्रवारी विश्वचषक स्पध्रेला इंग्लंड आणि हॉलंड सामन्याने सुरुवात झाली.
क्रिकेटसारख्या साहेबी खेळाने साऱ्या जगाला वेड लावणाऱ्या यजमान इंग्लंडने उद्घाटनाची जोशात आणि उत्साहात तयारी केली होती. परंतु वरुणराजाने त्यांच्या सोहळ्यावर पाणी फेरले. त्यामुळे उद्घाटनीय कार्यक्रम रद्द करून यजमानांना २० मिनिटे उशिराने इंग्लंड-हॉलंड सामनाच सुरू करणे क्रमप्राप्त होते. आयसीसीचे अध्यक्ष डेव्हिड मॉर्गन यांनी सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा रद्द झाल्याबद्दल खेद प्रकट केला. शनिवारी होणाऱ्या भारताच्या सलामीच्या लढतीच्या पाश्र्वभूमीवर येथील भारतीयांमध्ये कमालीचा उत्साह तिकीट खिडकीवरही दिसून आला. याचप्रमाणे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि उपकर्णधार वीरेंद्र सेहवाग यांच्यात बेबनाव झाल्याच्या वृत्ताने शुक्रवारी क्रिकेटवर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती. परंतु धोनीने या वृत्ताबाबत नाराजी प्रकट करीत पत्रकार परिषदेत संपूर्ण टीम इंडियाच्या साक्षीने एकीचे बळ दाखवून दिले. हेच बळ भारताला दुसरा विश्वचषक जिंकून देईल, असा विश्वास धोनीने प्रकट केला. बांगलादेशचा संघ ‘लिंबू-टिंबू’ असला तरी या संघाने असे अनेक धक्के क्रिकेट विश्वाला दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर बांगलादेशला कमी लेखून चालणारे नाही. भारतासाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारताचा आघाडीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग दुखापतीमुळे सलामीच्या लढतीलाच मुकण्याची चिन्हे आहेत.