Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मुख्य सचिवांना माहिती देण्यासही विलंब
मुंबई, ५ जून

 

दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख करकरे हे ९.४५ वाजता दादर येथील घरी पोहोचले आणि नियंत्रण कक्षाकडून हल्ल्याची माहिती मिळताच दक्षिण मुंबईच्या दिशेने निघाले. पोलीस निरीक्षक व चार शिपायांना सोबत घेऊन ते सीएसटी रेल्वे स्थानकात पोहोचले. तेथे अतिरिक्त महासंचालक (रेल्वे) के. पी. रघुवंशी हे उपायुक्त (परिमंडळ दोन) संजय मोहिते यांच्यासह हजर होते. सीएसटी येथे हल्ला करणारे अतिरेकी कामा इस्पितळाच्या दिशेने गेल्याचे सांगितल्यावर करकरे हे सहकाऱ्यांसोबत त्या दिशेने चालत निघाले. भायखळा येथील युरोपियन इमारतीत राहणारे अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे हे १० वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचले. पूर्व नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर ते लगेच निघाले आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात पोहोचले. तेव्हा कामा इस्पितळ परिसरात गोळीबार सुरू असल्याने ते त्यांची गाडी पुढे नेऊ शकत नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा वायरलेस ऑपरेटरला सोबत घेऊन कामटेही चालत निघाले. निरीक्षक साळसकर ९.३० वाजता घरी पोहोचले आणि दोन अतिरेक्यांना पकडण्यात आले असून त्यांच्या चौकशीसाठी जाण्याचे मारिया यांनी सांगितल्यामुळे ते ९.५० वाजता घरातून निघाले. चौकशीत ते दोन अतिरेकी इस्राईल दुतावासाचे सुरक्षा रक्षक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मारिया यांनी साळसकर यांना पोलीस मुख्यालयाच्या दिशेने येण्यास सांगितले. या काळात कामा इस्पितळात गोळीबार सुरु असल्याची माहिती मिळाल्यावर साळसकर यांनी कामा इस्पितळाच्या मागच्या प्रवेशद्वाराकडे जाण्याचे ठरविले. करकरे आणि कामटे अगोदरच तेथे होते. ते साळसकर यांच्या गाडीत बसले आणि अतिरेक्यांबाबत काहीच कल्पना नसलेल्या गल्लीच्या दिशेने ते निघाले.
दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग आणि प्रसाद हे पोलीस आयुक्त गफूर यांच्यासोबत ओबेराय-ट्रायडण्ट हॉटेलजवळ होते. सहआयुक्त (वाहतूक) संजय बर्वे आणि अतिरिक्त आयुक्त (दक्षिण प्रादेशिक विभाग) के. वेंकटेशन हेही त्यांना येऊन मिळाले. याठिकाणीही गफूर आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कुठलाही समन्वय नव्हता. आपल्या गाडीतील बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे गफूर नियंत्रण कक्षाशी संपर्कात होते.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख केरळात असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत संपूर्ण प्रशासकीय जबाबदारी पाहणारे राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना हल्ला होऊन एक तास उलटला असला तरी माहिती देण्यात आली नव्हती. ९.३० वाजता त्यांनी टीव्ही लावला तेव्हा त्यांना ही माहिती मिळाली. सीएसटी रेल्वे स्थानकात अतिरेक्यांचा गोळीबार प्रत्यक्ष पाहणाऱ्या एका वृत्तपत्राच्या वार्ताहराने सांगितल्यानंतरच सेंट जॉर्ज इस्पितळाच्या अधिष्ठात्यांनी मोठय़ा संख्येने मृतदेह आणले जात असल्याचे निदर्शनास आणले. हल्ल्याबाबत माहिती देण्यासाठी पोलिसांनी त्यांना १०.२० वाजता फोन केला आणि त्यानंतरच केंद्रीय पथकाला पाचारण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत हल्ल्याच्या ठिकाणांचा ताबा अतिरेक्यांनी घेतला होता. (क्रमश:)