Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

प्रादेशिक

मुख्य सचिवांना माहिती देण्यासही विलंब
मुंबई, ५ जून

दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख करकरे हे ९.४५ वाजता दादर येथील घरी पोहोचले आणि नियंत्रण कक्षाकडून हल्ल्याची माहिती मिळताच दक्षिण मुंबईच्या दिशेने निघाले. पोलीस निरीक्षक व चार शिपायांना सोबत घेऊन ते सीएसटी रेल्वे स्थानकात पोहोचले. तेथे अतिरिक्त महासंचालक (रेल्वे) के. पी. रघुवंशी हे उपायुक्त (परिमंडळ दोन) संजय मोहिते यांच्यासह हजर होते. सीएसटी येथे हल्ला करणारे अतिरेकी कामा इस्पितळाच्या दिशेने गेल्याचे सांगितल्यावर करकरे हे सहकाऱ्यांसोबत त्या दिशेने चालत निघाले. भायखळा येथील युरोपियन इमारतीत राहणारे अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे हे १० वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचले.

पर्यावरण दक्षता ही काळाची गरज- मुख्यमंत्री
मुंबई, ५ जून / प्रतिनिधी

राज्यात गुंतवणूक आणि विकासकामांची गती वाढत असून त्यामुळे प्रदूषण नियंत्रणाबाबतची आपली जबाबदारीही वाढत आहे. यामुळे पर्यावरणाची दक्षता ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त रवींद्र नाटय़ मंदिरात पार पडलेल्या कार्यक्रमात केले. पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण दक्षता मंचाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

सार्वजनिक डंपिग ग्राऊंडना लवकर परवानगी देण्यासाठी एमएमआरडीएचे साकडे
विकास महाडिक
मुंबई, ५ जून

मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरण क्षेत्रात येणाऱ्या सात महानगरपालिका आणि १३ नगरपालिकातील ११ हजार मेट्रीक टन घनकचऱ्याचा प्रश्न अंत्यत जटील आणि बिकट झाला असल्याने एक वर्षांपूर्वी एमएमआरडीएने निश्चित केलेल्या सहा जागांवर लवकरात लवकर शास्त्रोक्त पद्धतीचे सार्वजनिक डंपिंग ग्राऊन्ड विकसित करण्यात यावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भीती एमएमआरडीएने ५ जूनच्या पर्यावरण दिनानिमित्ताने सरकारला दिलेल्या अहवालात व्यक्त केली आहे.

संजीवन समाधीचे प्रत्यक्ष वर्णन प्रथमच पुस्तकरुपात
मुंबई, ५ जून प्रतिनिधी

पाषाणहृदयी माणसाच्या डोळ्यातही पाणी उभे करणारा, ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रत्यक्षानुभूतीचे शब्दांकन केलेला आणि केवळ डोळ्याचेच नव्हे तर मनाचेही बांध फोडणारा संत नामदेवांनी शब्दबद्ध केलेला संजीवन समाधी सोहळा, ग्रंथरुपात प्रथमच प्रकाशित करून मोरया प्रकाशनाने भाविकांवर मोठे ॠण केले आहे अशी भावना ह. भ. प. चैतन्य भानुदास महाराज देगलुरकर यांनी सदर ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत व्यक्त केली आहे. श्रीसंत नामदेवकृत श्रीसंत ज्ञानेश्वर-गौरव नावाचा हा ग्रंथ डॉ. म. वि. गोखले यांनी निरुपित केला आहे.

शालेय शिक्षणमंत्र्यांची ‘अखंड वादाची’ परंपरा सुरू !
संतोष प्रधान
मुंबई, ५ जून

राज्यातील लोकशाही आघाडी सरकारमधील शालेय शिक्षणमंत्री आणि वाद यांचे जणू काही समीकरणच तयार झाले आहे. कारण गेल्या दहा वर्षांंमध्ये हे खाते भूषविलेल्या सर्वच मंत्र्यांचे काही ना काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. इयत्ता अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा निर्णय सध्या असाच वादग्रस्त ठरला आहे. इयत्ता अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या निर्णयास विरोध झाला आहे. विशेषत: सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच त्याला विरोध दर्शविला आहे.

हिंदी चित्रपटनिर्माते आणि मल्टिप्लेक्सचालक यांच्यातील वाद मिटला
मुंबई, ५ जून / प्रतिनिधी
हिंदी चित्रपट निर्माते-वितरक आणि मल्टिप्लेक्सचालक यांच्यात गेले दोन महिने सुरू असलेला वाद आता संपुष्टात आला आहे. येत्या १२ जूनपासून मल्टिप्लेक्समध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. वासु भगनानी यांचा ‘कल किसने देखा’ हा चित्रपट १२ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘बिग सिनेमाज’ आणि मल्टिप्लेक्सचालक यांच्यात २९ मे रोजी समझोता झाला होता. त्याच वेळी हा वाद संपुष्टात येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. काल रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या बैठकीनंतर इतर मल्टिप्लेक्सचालक (आयनॉक्स, सिनेमॅक्स, फेम, फन रिपब्लिक आणि मूव्हिटाइम) आणि हिंदी चित्रपट निर्माते-वितरक यांच्यातील वादावरही तोडगा निघाला आहे. या संबंधीचा करार सोमवारी होणार आहे, असे समजते. यापुढे पहिल्या आठवडय़ासाठी हिंदी चित्रपट निर्मात्यांना उत्पन्नाचा ५० टक्के वाटा मिळणार आहे. दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या आठवडय़ासाठी अनुक्रमे ४२.५, ३७.५ आणि ३० टक्के वाटा मिळणार आहे. संपानंतरचा पहिला चित्रपट येत्या शुक्रवारी झळकणार असला तरी बहुतेक चित्रपटांचे प्रमोशन अजूनही सुरू झाले नाही. त्यामुळे त्यानंतरचा चित्रपट येण्सास किमान महिन्याभराचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे.

‘राष्ट्रवादी’बद्दल अविश्वासाचे वातावरण दूर करा - पवार
मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश
मुंबई, ५ जून / खास प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, पक्षाच्या काही धोरणांमुळे समाजात तेढ आणि लोकांमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार झाले असल्यास ते दूर करावे लागेल, असे स्पष्टपणे बजावले. याचाच अर्थ मराठा आरक्षणाचा पाठपुरावा करणाऱ्या नेत्यांना चपराक असल्याचे मानले जात आहे. तसेच काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्याची राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर पवारांनी पक्षाच्या निवडक नेत्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत नेत्यांची झाडाझडती घेताना मंत्र्यांना कामगिरी सुधारावी, असे त्यांनी बजावले. पक्षाच्या फक्त सहा मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे. अन्य मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार मागे पडल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. लोकांमध्ये पक्षाबद्दल नाराजी का निर्माण झाली याची कारणे शोधण्याचा आदेश त्यांनी नेत्यांना दिला. छोटे छोटे समाज घटक पक्षाच्या का विरोधात गेले याकडे लक्ष देण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला ३८ टक्के तर शिवसेना-भाजप युतीला ३५ टक्के मते मिळाली आहेत. एकटे लढल्याने इतरांचा फायदा होईल, हे त्यांनी लक्षात आणून दिले.

विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्याकरिता ठाकरे -मुंडे भेट
मुंबई, ५ जून / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला अपयश आले असले तरी खचून न जाता विधानसभा निवडणुकीकरिता रणनीती ठरविण्यासाठी आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. पुढील आठवडय़ात भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणी हे ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. याचप्रमाणे राज्यसभेच्या युतीच्या वाटय़ाला आलेल्या एका जागेकरिता संभाव्य उमेदवाराबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून मोठय़ा मताधिक्याने विजय प्राप्त केल्यानंतर मुंडे यांनी प्रथमच ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. केंद्रात रालोआचे सरकार स्थापन झाले नसले तरी निवडणुकीत व त्यानंतर शिवसेनेने रालोआला दिलेल्या सहकार्याबद्दल आडवाणी यांनी ठाकरे यांचे आभार मानले असल्याचे मुंडे यांनी त्यांना सांगितले.

राज अग्रवालप्रकरणी सात आरोपींना जन्मठेप
मुंबई, ५ जून / प्रतिनिधी
राज अग्रवाल या १४ वर्षांच्या युवकाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी शिवडीच्या सत्र न्यायालयाने आज सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर अन्य तिघांची पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सय्यद अस्लम, सय्यद अख्तर, नदीम शेख, सुनील वाल्मिकी, गोविंद शिंदे, सचिन भूनकर आणि सुरेंद्र कदम या सात आरोपींना जन्मठेपेची तर धनाजी हजारे, राजेंद्र भोसले आणि सचिन लोढकर या तिघांची निर्दोष मुक्तता केली. राज अग्रवाल याचे दादर येथून १८ नोव्हेंबर २००३ मध्ये खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. तेथून त्याला पुण्याच्या दौंडनजीक नेऊन १० दिवस ओलीस ठेवण्यात आले होते.