Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

शाबासकीनंतर एमएमआरडीए सुस्तावली
मुदत उलटून सहा दिवस झाले तरी लालबागचे काम अपूर्ण

प्रतिनिधी

पाठीवर शाबासकीची थाप पडली की, अनेकजण ढेपाळतात व त्यांचा कामाचा वेग मंदावतो, काहीसा असाच अनुभव लालबागवासियांना सध्या एमएमआरडीएच्या बाबतीत येत आहे. लालबाग येथील संत ज्ञानेश्वर पूल विक्रमी वेळत जमीनदोस्त करून एमएमआरडीएने मुंबईकरांची शाबासकी मिळविली होती. परंतु मुदत उलटून गेली तरीही तेथील रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले असून, पावसाळा तोंडावर आल्याने, त्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

खेळ ‘रोल चेंज’चा
‘जोडी जमली रे’ या विवाह जुळविण्याच्या ‘रिअॅलिटी शो’मध्ये आता नवीन पद्धत सुरू झाली असून त्यामुळे दर शनिवारप्रमाणे आता सेलिब्रिटी दाम्पत्य अतिथी म्हणून येणार नाहीत. तर स्पर्धक वेगळ्या पद्धतीचे इंटरॅक्टिव्ह खेळ खेळतील. ‘रोल चेंज’ हा खेळ दर्शकांचे आकर्षण ठरणार आहे. विश्वास आणि समजूतदारपणा, एकमेकांना समजून घेणे यावर लग्न टिकून राहतात. जोडीदाराला समजून घेणे, त्याच्या भावना जपणे याकडे लक्ष द्यावे लागते.

वर्षभर केलेल्या अभ्यासामुळे यश मिळाले - अलमास नाझीम सय्यद
प्रतिनिधी

लहान भावाने राज्यातून प्रथम आल्याची बातमी दिली तेव्हा कुराण शरीफ वाचत होते. त्याला नेहमी गंमत करायची सवय, त्यामुळे विश्वासच बसला नाही. मी त्याला रागावले पण, काही वेळातच बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी फोनवरून बातमी दिली आणि त्याचवेळी मी आईला जाऊन बिलगले, या शब्दात अलमास नाझीम सय्यद हिने आनंद व्यक्त केला. वर्षभर केलेला नियमित अभ्यासामुळे हे यश मिळाले, असेही तिने सांगितले. शिवाजी सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली अलमास नाझीम सय्यद बारावीच्या परीक्षेत राज्यातून प्रथम आली आहे.

एक खिडकी योजनाच हवी
विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) मधील तरतुदींनुसार मेच्या पहिल्या आठवडय़ात नवा ठराव तयार करण्यात आला आणि त्यानुसार म्हाडाच्या मुंबईतील ५६ वसाहतींचा पुनर्विकास करण्याचे ठरविण्यात आले. मात्र तरीही माशी कुठे शिंकली आहे हे कळायला मार्ग नाही. अद्यापही म्हाडाकडून म्हणाव्या त्या वेगाने पुनर्विकासाच्या फाईली पुढे सरकू शकलेल्या नाहीत. नव्या ठरावामुळे उपनगरातील म्हाडा वसाहतींचा जोमाने पुनर्विकास होईल यात शंका नाही. परंतु त्यासाठी म्हाडाकडून तात्काळ पुनर्विकासासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जारी होणे आवश्यक आहे. परंतु तेच होत नाही अशी तमाम विकासकांची तक्रार आहे.

वाणिज्य शाखेसाठी २६ हजार जागांची कमतरता
तुषार खरात

जागतिकीकरणाच्या रेटय़ात बी.ए., बी.कॉम., बीएस्सी अशा पारंपरिक अभ्यासक्रमांचे महत्त्व कमी होत चालले आहे. तीन चार वर्षांपूर्वीपर्यंत बी.कॉम.ला प्रचंड मागणी होती. परंतु, आता या अभ्यासक्रमाकडे फारसे विद्यार्थी वळत नाहीत. त्याऐवजी आता बीएमएस, बीएमएम, बीकॉम इन बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स, बीकॉम इन अकाऊंट अॅण्ड फायनान्स, बीएस्सी-आयटी अशा जॉब ओरिएन्टेड अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.

उड्डाणपुलांची कामे रखडल्याने पावसाळ्यात वाहतुकीची कोंडी
विकास महाडिक

मुंबईतील वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सुरू केलेल्या चार उड्डाणपुलांच्या कामात मुंबईच्या दक्षिण विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटिशकालीन तीन मुख्य जलवाहिन्यांचा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी ही कामे ठराविक मुदतीत पूर्ण होऊ शकणार नाहीत, असे एमएमआरडीएच्या सूत्रांनी स्पष्ट केले. सदर उड्डाणपुलांचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे पावसाळ्यात या भागातील वाहतूक विस्कळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दुकानांवर मराठी नामफलकांचा काँंग्रेस, राष्ट्रवादीचा आग्रह
प्रतिनिधी

मुंबईतील दुकानांवरील नावांचे फलक मराठीतच असावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठविला होता. मात्र आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही शहरातील दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत, असा आग्रह धरला असून पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांना यासंदर्भात एक निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे दुकानांवरील नामफलक मराठीत असावेत, या नियमाची अंमलबजावणी केली नाही तर राजकीय पक्ष त्याचा मुद्दाकरून फायदा उठवतात, अशी भीती या निवेदनात राज ठाकरे याचे नाव न घेता व्यक्त करण्यात आले आहे.

जहांगीरमध्ये उमाकांत तावडे यांचा ‘बुद्धाविष्कार’
चित्रकार उमाकांत तावडे यांच्या बुद्धांच्या चित्रांचे प्रदर्शन सध्या जहांगीर कलादालनात भरले आहे. ध्यानस्थ गौतम बुद्धाची विविध रूपे उमाकांत यांनी चितारली आहेत. बुद्धाचे बदामी ध्यानस्थ डोळे, बोधीवृक्षाची पाने, मोठाले कान यांचे रेखीव चित्रण उमाकांत यांनी केले आहे. लाल, पिवळा, तपकिरी, तांबडा यांच्या विविध छटांनी बुद्धाची रूपे साकारली आहेत. स्तब्ध बुद्धाची शांतता चित्रांतून जाणवते. चित्रांमध्ये अॅक्रेलिक रंग व पोतकामाचा वापर करण्यात आला आहे.
हे प्रदर्शन मंगळवार, ९ जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व चित्ररसिकांना पाहायला मिळेल.
प्रतिनिधी

प्रकाश कुलकर्णी यांना आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार
प्रतिनिधी

पत्रकारितेतील ४० वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यंदाचा ‘आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार आणि दै. ‘नवशक्ति’चे संपादक प्रकाश कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच तर साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल द. ता. भोसले, तर कला क्षेत्रासाठी अभिनेते विजय चव्हाण यांना आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आचार्य अत्रे यांच्या ४० व्या पुण्यतिथीदिनी सासवड येथे होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदरचे सचिव विजय कोलते यांनी अलीकडेच ही घोषणा केली. कुलकर्णी यांना मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याआधी ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, पत्रकार संजय राऊत, डॉ. दीपक टिळक, राजीव साबडे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

गुणीजणांना राजहंस पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी

कला व रुग्ण सेवेत कार्यरत असलेल्या राजहंस प्रतिष्ठान ट्रस्टच्या आठव्या वर्धापनदिन अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या समारंभात आठ गुणीजनांना राजहंस पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते प्रभाकर पणशीकर उपस्थित होते. पं. व्ही. आर. आठवले, मृणाल गोरे, राजू परुळेकर, कांचन अधिकारी, शेखर दादरकर, मीनल मोहाडीकर, उज्ज्वल निरगुडकर व डॉ. बाळ भालेराव यांना राजहंस पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी नवचैतन्य प्रकाशित व कॅप्टन डॉ. आनंद जयराज बोडस यांच्या दोन ग्रंथाचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ. यशवंत पाठक यांचे ‘समर्थ रामदास’ या विषयावर व्याख्यान झाले. ‘ऋण गोव्याचे, शब्द सुरांचे’ या संगीतमय कार्यक्रमात रवींद्र बिजूर, सुरेश बापट, निलाक्षी पेंढारकर, अर्चना गोरे, आनंद सहस्रबुद्धे, साई बॅँकर, प्रभा मोसपकर, नीला सोहनी यांनी गाणी सादर केली. सूत्रसंचालन मंगला खाडीलकर यांचे होते. संस्थेचे अध्यक्ष कबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

निवारा अभियानचे आमदारांना साकडे
प्रतिनिधी

मुंबईतील गरजू व्यक्तींसाठी स्थापन करण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांना गृह प्रकल्पांसाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी ‘निवारा अभियान’तर्फे आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या संस्थांचे सभासद आमदारांना भेटून आपली मागणी त्यांच्याकडे मांडणार आहेत. कमाल जमीन धारणा कायद्यानुसार गरजूंना जमीन द्यावी, या मागणीसाठी गेली दोन वर्षे आंदोलन सुरू आहे. सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या जमिनीची किमत अदा करण्यासाठी संस्थांनी निधीही गोळा केला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी चर्चा करण्याची तयारी दाखविली होती. मात्र ते आता वेळच देत नाहीत, अशी तक्रार ‘निवारा अभियान’तर्फे करण्यात आली आहे. मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आता संस्थांच्या सभासदांनी आपल्या विभागातील आमदारांना भेटून आपली मागणी त्यांच्याकडे मांडावी आणि आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणी आवाज उठवावा, असा आग्रह धरावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही तर येत्या ८ जून रोजी विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ‘निवारा अभियान’तर्फे देण्यात आला आहे.

नवी मुंबई पोलिसांना मिळणार मोठी घरे
प्रतिनिधी

गृहमंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने सीबीडी बेलापूर येथील मोडकळीस आलेली चाळ टाईप घरे पाडून तेथे सिडकोमार्फत इमारत बांधून पोलिसांना मोठी घरे उपलब्ध होणार आहेत. गेली ३० ते ३५ वर्षे पोलीस कर्मचारी मोडकळीस आलेल्या १० बाय १० च्या चाळ टाईप घरांमध्ये राहात होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करून अंदाज समितीद्वारा बैठका घेऊन आणि वेळोवेळी भेटी देऊन याचा पाठपुरावा केला. अंदाज समितीचे आमदार सुरेश वरपूडकर, मधुकरराव चव्हाण, अरविंद सावंत यांच्या सोबत दौरा करून, तत्कालीन सिडको व्यवस्थापक, पोलीस आयुक्त व नवी मुंबई महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन हा प्रस्ताव तयार केला. गृहमंत्री जयंत पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की पोलिसांची चाळ टाईप घरे तोडून तेथे नव्या इमारती बांधून पोलिसांना मोठी घरे उपलब्ध करून द्यावीत. त्याबरोबरच कम्युनिटी सेंटर व क्लब हाऊस इत्यादी सुविधा देखील त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहेत. या बैठकीस आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे एम.डी. गिल गुलाबराव पोळ, पोलीस आयुक्त नवी मुंबई रामराव वाघ, माजी पोलीस आयुक्त व पोलीस गृहनिर्माण बोर्डाचे खोत, नगरविकास व गृहविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बीएमएम-मराठी अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठ अधिकाऱ्यांची चालढकल
प्रतिनिधी

बॅचलर ऑफ मास मीडियाचा मराठीतील अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय होऊनही या संदर्भात विद्यापीठातील संबंधित अधिकारी चालढकल करीत असून या प्रकरणात कुलगुरु डॉ. विजय खोले यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी सिनेट सदस्य दिलीप करंडे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. दिलीप करंडे यांनी या पत्रात म्हटले आहे की, ज्या महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमासाठी परवानगी मागितली आहे त्यांना ती देण्यास विद्यापीठातर्फे दिरंगाई होत आहे. बारावीचा निकाल जाहीर झालेला असताना जर महाविद्यालयांना बीएमएम मराठी अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतचे पत्र मिळाले नाही तर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही. या प्रकरणी परवानगीची पत्रे विद्यापीठाने त्वरित संबंधित महाविद्यालयांना पाठवावीत, अशी मागणी करंडे यांनी केली आहे.

हिंदी ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ सुरू
प्रतिनिधी

झी मराठी वाहिनीवर दाखविण्यात येणारा सारेगमप लिट्ल चॅम्प्स हा कार्यक्रम मराठी प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय ठरला. त्याचप्रमाणे आता झी टीव्हीनेही हिंदी सारेगमप लिट्ल चॅम्प्स कार्यक्रम सुरू केला आहे. गायक अभिजीत भट्टाचार्य आणि गायिका अलका याज्ञिक या कार्यक्रमाचे परीक्षक असून काल, शुक्रवारपासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे. दर शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम दाखविण्यात येईल. वेगवेगळ्या ९ शहरांमध्ये झालेल्या ऑडिशन्समधून अंतिम १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. ८ ते १३ या वयोगटातील सहा मुले आणि सहा मुलींची निवड करण्यात आली. ऑडिशन्समध्ये सुमारे ५० हजार बालगायक आणि बालगायिकांनी सहभाग घेतला होता. त्यातून ३० हजार मुलांना प्रत्यक्ष निवड चाचणीत प्रवेश मिळाला.