Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

नैराश्यातून बाळासाहेब विखे यांचे पालकमंत्र्यांवर आरोप - कळमकर
नगर, ५ जून/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत मुलाच्या मतदारसंघात विरोधकांना आघाडी मिळाली. त्यामुळे माजी खासदार बाळासाहेब विखे यांना नैराश्य आले आहे. स्वतच्या मुलाला जिल्ह्य़ाचा पालकमंत्री करण्यासाठी त्यांनी दिलीप वळसे यांना हटविण्याची मागणी सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रवादी इतकी कच्ची नाही. पालकमंत्र्याचा वाद चिघळला, तर सत्तेचाही विचार आम्ही करणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर यांनी विखेंच्या आरोपांचा समाचार घेतला.

‘वॉटर’च्या निमित्तानं..
अगदी काल-परवाच ‘वॉटर’ असं इंग्रजी नाव असलेला हिंदी सिनेमा पाहिला. ७०-८० वषार्ंपूर्वी काही ठिकाणी पतीच्या निधनानंतर त्यांच्या विधवांना वाराणशीत नेऊन सोडत. तिथे आश्रमामध्ये श्रमाची कामे करत या विधवा राहात. ७-८ वर्षांंच्या बालविधवांपासून ते मृत्यूपंथाला आलेल्या ८०-९० वयाच्या स्त्रियांचा यामध्ये समावेश असे. या सिनेमात या विधवा स्त्रियांच्या जगण्याचं, मनाच्या आत सुरू असलेल्या सुकुमार भाव-भावनांच्या क ल्लोळाचं, छोटय़ा छोटय़ा इच्छांच्या दमनाचं फार प्रभावी चित्रण आहे. मृत्यू पत्करला, पण नको हे विधवेचं जीणं अशी अवस्था साऱ्याच विधवांच्या वाटय़ाला आलेली.

राहुरीमध्ये ७२ हजारांवर गोण्या कांद्याची आवक
राहुरी, ५ जून/वार्ताहर

येथील बाजार समितीत आज तब्बल ७२ हजार ७८९ कांदा गोण्यांची आवक झाली. क्रमांक एकच्या कांद्याला सुमारे ८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. यंदाच्या हंगामामधील अलीकडच्या काळात ही विक्रमी आवक मानली जाते. मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे काही भागांतील कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा भुसार लावण्याकडे कल केला होता. भुसार लावलेला कांदा ऑक्टोबर-सप्टेंबरपर्यंत साठवण करण्याकडेही उत्पादकांचा कल असला, तरी सध्या बाजार समितीत कांदा पिकाला बऱ्यापैकी भाव निघत असल्याने कांद्याची आवक वाढली आहे, अशी माहिती समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी दिली. आज समितीत आलेला कांदामाल नगर जिल्ह्य़ासह पुणे, नाशिक, औरंगाबादकडील बहुतांश भागातून आल्याचे त्यांनी सांगितले.

शोषण करून विकास नको - हजारे
नगर, ५ जून/प्रतिनिधी

पर्यावरणाचा ऱ्हास वेगाने होत आहे. शोषणामुळे जसा समाजाचा तोल गेला, तसा निसर्गाचाही समतोल ढासळला आहे. त्यामुळे मनुष्यजातीपुढे गंभीर संकट निर्माण होऊ पाहत आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे सांगितले. हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या पुढाकाराने जिल्ह्य़ातील विविध क्षेत्रांतील पाच भूमिपुत्रांचा सत्कार आज यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात करण्यात आला. त्या वेळी हजारे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम माने होते.

श्रीगोंदेकरांचा पुण्यात मुख्य अभियंत्यास घेराव
कुकडीचे पाणी देण्याचे आश्वासन

श्रीगोंदे, ५ जून/वार्ताहर

कुकडीचे आवर्तन सोडल्यानंतर श्रीगोंद्याला पाणी जाऊ न देण्यासाठी पाटबंधारे अधिकाऱ्यांमध्ये ‘फिक्सिंग’ झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १०० संतप्त शेतकऱ्यांनी आज पुणे येथील सिंचन भवनमधील मुख्य अभियंता शिवाजीराव उपासे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. कुकडीचे बंधाऱ्यात सोडलेले पाणी तातडीने बंद करून श्रीगोंद्याला पाणी पूर्ण क्षमतेने देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन उपासे यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या दालनातून माघार घेतली.

रिलायन्स गॅसवाहिनीचे काम पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू
कर्जत, ५ जून/वार्ताहर

तालुक्यातील कुंभेफळ येथील रिलायन्स गॅसवाहिनीचे बंद पडलेले काम पोलीस बंदोबस्तामध्ये पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, या वेळी शेतकरी आणि कंपनीचे अधिकारी यांच्यामधील संघर्ष पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) संदीप जाधव यांच्या उपस्थितीमुळे टळला. मात्र, तालुक्यात अपूर्ण राहिलेले काम करताना पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. दोन महिन्यांपूर्वी कुंभेफळ शिवारात कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण करून काम बंद पाडले होते. तेव्हापासून आजपर्यंत अनेकदा पोलीस बंदोबस्त आणून काम सुरू करण्याचा प्रयत्न कंपनीने केला. मात्र, त्यांना यश आले नव्हते.
कालही सकाळी काम सुरू करताना शेतकरी तेथे जमले. त्यांनी काम सुरू करण्यास विरोध केल्याने पोलीस व अधिकारी परत गेले होते. मात्र, दुपारी स्वत संदीप जाधव जादा पोलीस कुमक घेऊन गेले. त्यांनी ज्यांच्या शेतात काम सुरू आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना बळाचा वापर करून पिटाळले. त्यानंतर काम सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याऐवजी कंपनीने पोलीस बळाचा आधार घेतला. सध्या वातावरण शांत वाटत असले, तरी पुन्हा शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत.

सुपारी देणाऱ्यांवर कारवाईसाठी आज तहसील कार्यालयांवर मोर्चे
नगर, ५ जून/प्रतिनिधी

आपल्या हत्येची सुपारी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई व्हावी, यासाठी उद्या (शनिवार) राज्यभर तहसील कार्यालयांवर मोर्चे नेण्यात येणार असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. कार्यकर्ते व हितचिंतकांनी आंदोलन हाती घेतले असून, त्यात आपला सहभाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हत्येच्या सुपारीबाबत माहिती उघड झाल्यानंतर आपला केंद्रीय गृहमंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती हजारे यांनी दिली. सध्याच्या आंदोलनात आपला सहभाग नसला, तरी हत्येची सुपारी देणाऱ्याचा शोध वेळेवर न घेतला गेल्यास ३० ऑगस्टपासून राज्यभर जेलभरो आंदोलन हाती घेण्यात येईल. येत्या दि. ११पासून आपण राज्यभर लोकशिक्षण व जनजागृती मोहीम सुरू करणार असल्याची माहितीही हजारे यांनी दिली.

साखर चोरीप्रकरणी दोघांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
भोरही न्यायालयीन कोठडीत
संगमनेर, ५ जून/वार्ताहर

संगमनेर कारखान्याच्या साखर चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी शुगर माफिया कैलास सावंत ऊर्फ श्यामराम देसाई व मनोज भटेवरा या दोघांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयाने आज १४ दिवसांची वाढ केली. दुसरीकडे सुमारे एक कोटी १२ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी दीपक भोर यालाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. संगमनेर कारखान्याच्या गोदामावर दरोडा टाकून सुमारे दीड कोटीची ८ हजार ६३० साखर पोती चोरून नेल्याचा आरोप असलेला या प्रकरणातील मुख्य आरोपी शुगर माफिया कैलास हिंदुराव सावंत याला पोलिसांनी ८ मे रोजी रात्री औरंगाबादला अटक केली होती. सावंतच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर आज पुन्हा न्यायाधीस एस. टी. अग्रवाल यांच्यासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ केली. दुसऱ्या प्रकरणात प्रतिष्ठितांना सिटी बँकेसाठी वाहने पुरवायची आहेत, असे सांगून १ कोटी ११ लाख ६० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या विशाल राजगुरू, त्याची पत्नी सोनल व दीपक भोर या तिघा आरोपींपैकी भोर संगमनेर पोलिसांच्या ताब्यात आहे. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यालाही येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस टी. अग्रवाल यांच्यासमोर उभे केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या फसवणूक प्रकरणातील मुख्य दोन आरोपी तुर्भे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना ताब्यात घेण्याससंगमनेर पोलिसांना यश मिळालेले नाही.

विहिरीचे काम करताना डोक्यात दगड पडून मृत्यू
देवळाली प्रवरा, ५ जून/वार्ताहर

नेवासे तालुक्यातील सोनईजवळील धनगरवाडी येथे विहिरीचे काम चालू असताना दगड डोक्यात पडून एकजण ठार झाला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. धनगरवाडी येथील विलास रघुनाथ ढोकणे यांच्या विहिरीचे काम चालू असताना आज सकाळी हा प्रकार घडला. संतोष बापू डोईफोडे (वय ३५) याच्या डोक्यात दगड पडून तो जबर जखमी झाला. तनपुरे कारखान्यावरील विवेकानंद नर्सिग होममध्ये दाखल केले असता दुपारी उशिरा तो मयत झाला.

आर्मी स्कूलजवळील बंगल्यात साडेतीन लाखांची चोरी
नगर, ५ जून/प्रतिनिधी

नगर-जामखेड रस्त्यावरील आर्मी स्कूलजवळील एका बंगल्यातून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरीस गेला. दि. २४ मे रोजी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आज भिंगार ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मीना सुमन दत्ता (५३ वर्षे, रा. बंगला ५, जामखेड रस्ता, आर्मी स्कूलजवळ) यांनी फिर्याद दिली आहे. दत्ता यांचा बंगला गेल्या पाच महिन्यांपासून बंद होता. बंगल्याचे दरवाजे, कुलूपही तसेच होते. तरीही बंगल्यातून चोरी झाली असे पोलिसांनी सांगितले. मात्र, फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार बंगल्याचे कुलूप डुप्लीकेट चावीने उघडून आतील ऐवज चोरून नेला असावा. पोलिसांनी या प्रकरणी बंगल्याशेजारी राहणाऱ्या चौघाजणांची संशयावरून चौकशी सुरू केली आहे. फिर्यादी महिलेनेही या चौघांवर संशय व्यक्त केला आहे.
श्रीमती दत्ता यांचे पती नेव्हीमध्ये नोकरीस असून, ते पंजाबमध्ये आहेत. त्यांचा मुलगा पुण्यास शिक्षण घेत असल्याने त्या गेल्या पाच महिन्यांपासून पुण्यास गेल्या होत्या. गेल्या २४ तारखेस त्या घरी परतल्या. त्यांनी कुलूप उघडून बंगल्यात प्रवेश केला असता कपाटातील ड्रॉवरमधून कोणीतरी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, डॉलर्स असा ३ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भिंगार ठाण्यात फिर्याद दिली. तपास सहायक निरीक्षक साईनाथ ठोंबरे करत आहेत.

बसमधील प्रवाशाचा लॅपटॉप चोराने लांबवला
नगर, ५ जून/प्रतिनिधी

चहा पिण्यासाठी थांबलेल्या खासगी आरामबसमधील एका प्रवाशाचा ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरीस गेला. हा प्रकार नगर-जामखेड रस्त्यावरील साईराम ढाबा येथे आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडला. मोहन देवीदास पाटील (४१ वर्षे, रा. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. हैदराबाद-शिर्डी या खासगी आरामबसमधून ते नाशिकला परत चालले होते. ही बस सकाळी साईराम धाब्यावर थांबली. पाटील चहा पिण्यासाठी खाली उतरले असता, त्यांचा ३५ हजारांचा लॅपटॉप चोराने बसमधून लांबवला. नगर तालुका ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार बटुळे करीत आहेत.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे तहसीलदारांना निवेदन
नेवासे, ५ जून/वार्ताहर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येच्या सुपारीप्रकरणी निषेध करून तालुका भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. तालुकाध्यक्ष रामराव भदगले यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हजारे यांच्या हत्येचा करण्याचा कट सुदैवाने उघडकीस आला. मारेकऱ्यांनासुद्दा सुपारी घ्यावीशी वाटली नाही, असे हे व्यक्तिमत्त्व आहे. हजारेंनी आपले पूर्ण जीवन सामाजिक कार्यासाठी खर्च केले. केवळ नैतिकतेच्या आधारावर सरकार अस्थिर करण्याची किमया फक्त अण्णाच करू शकतात. लोकहिताचे व लोकशाही जिवंत ठेवणारे कायदे, नियम बनविण्यास त्यांनीच भाग पाडले. अशा आधुनिक संताच्या हत्येचा कट म्हणजे लोकशाहीला लागलेल्या गलिच्छ राजकारणाचा कळस आहे, असे निवेदनात म्हटले आहे. कटामागील सूत्रधारास त्वरित अटक करावी, तसेच या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर कारभारी गरड, बद्री शिंदे, यासीन शेख, बन्सी सातपुते, विठ्ठलराव निमसे, शिवाजीराव फाटके आदी कार्यकर्त्यांच्या सह्य़ा आहेत. नेवासे शाखेने आज मोर्चा काढण्याऐवजी निवेदन दिले.

‘जिल्हा बँकेच्या राजूर शाखेत ग्राहकांना उद्धट वागणूक’
राजूर, ५ जून/वार्ताहर

येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत नुकतेच बदलून आलेले अधिकारी जाणीवपूर्वक ग्राहकांना उद्धटपणाची वागणूक देत आहेत. आदिवासी भागातील ग्राहकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्याची त्वरित बदली करून सामाजिक बांधिलकी असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. येथील जिल्हा सहकारी बँकेत मोठय़ा प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असते. त्यात बहुतांशी अशिक्षित ग्राहक, महिला बचतगट, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांची वर्दळ असते. त्यांना सहकार्य करण्यापेक्षा त्यांना उद्धटपणाची वागणूक मिळते. त्याचा प्रत्यय शिक्षण संस्था व पत्रकारांनाही आला आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे. एखाद्या खासगी सावकाराप्रमाणे हे अधिकारी वागत असून, त्यांना परत नगरला बदली हवी असून, कामाचा ताण होत असल्यानेच ते असे करीत असल्याची चर्चा आहे. सामाजिक संस्था व ग्राहक न्याय मंचाने त्यांचा निषेध केला आहे. लवकर शिष्टमंडळ बँकेच्या अध्यक्षांना भेटणार आहे.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उद्या सीईटी मार्गदर्शन
राहुरी, ५ जून/वार्ताहर

भारतीय जैन संघटना आणि डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने रविवारी (दि. ७) बारावी शास्त्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सीईटी (सामाईक प्रवेश प्रक्रिया) संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संगणक आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार येणार आहे. कारखाना कार्यस्थळावरील मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १पर्यंत हा कार्यक्रम होईल. बारामती येथील अभियंता हेमचंद्र शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. प्रवेश पात्रता, उपलब्ध जागा, परीक्षेची पात्रता, जागावाटप, अभ्यासक्रम, शैक्षणिक शुल्क, वेळापत्रक, फॉर्म, प्रवेश फेऱ्या यातून करावयाची अचूक निवड याचे मार्गदर्शन मेळाव्यात केले जाईल. प्रवेश विनामूल्य आहे. या मेळाव्यात कारखान्याचे अध्यक्ष रामदास धुमाळ, कार्यकारी संचालक बी. बी. पवार, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य डॉ. वसंत बोरा, विभागीय उपाध्यक्ष दीपक गांधी, जिल्हा कार्यकारी सदस्य प्रकाश सोळंकी, शहर सचिव जयंतीलाल छाजेड आदी उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळ ज्येष्ठ नागरिक संस्थेचा उद्या वर्धापनदिन
श्रीगोंदे, ५ जून/वार्ताहर

तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असणाऱ्या शहरातील सायंकाळ ज्येष्ठ नागरिक संस्थेचा दहावा वर्धापनदिन रविवारी (दि. ७) होत आहे. तालुक्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या ज्येष्ठ मंडळींचा यानिमित्ताने सत्कार करण्यात येणार आहे. वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर होनराव यांनी दिली.
तालुक्याच्या सर्वागीण विकासाचा श्रीगणेशा ज्या सहकारी कारखानदारीमुळे झाला, त्या विकासाचे शिल्पकार, श्रीगोंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांना खास मानपत्र देऊन या समारंभात गौरविण्यात येईल. या सहकारी कारखानदारीच्या माध्यमातून शैक्षणिक, कृषी, सामाजिक विकास करण्यात श्री. नागवडे यांना मोलाची साथ देणारे शिवरामअण्णा पाचपुते, कामगार नेते रंगनाथ तात्या पंधरकर, संपतराव जामदार यांचाही यानिमित्ताने सत्कार करण्यात येईल.
पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष भागचंद घोडके, प्रभारी तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास सोमवंशी उपस्थित राहणार आहेत. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यलढय़ात स्वतला झोकून देणारे स्वातंत्र्यसेनानी शमशोद्दीन इनामदार यांचाही या वेळी सत्कार करण्यात येईल. समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. होनराव यांनी केले आहे.

‘जिल्ह्य़ाच्या शैक्षणिक, औद्योगिक विकासाबाबत अर्थसंकल्पात अपेक्षाभंग’
उपेक्षेला नेतेच जबाबदार - देशमुख
नगर, ५ जून/प्रतिनिधी

राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्य़ातील काही योजनांचा समावेश झाला असला, तरी जिल्ह्य़ाच्या शैक्षणिक व औद्योगिक विकासासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात नाही. एकूणात जिल्ह्य़ाला दुर्लक्षित करण्याची परंपरा याही वर्षी कायम असल्याची खंत इंदिरा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक देशमुख यांनी व्यक्त केली. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देशमुख यांनी म्हटले आहे की, नगर येथील भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी निधीची तरतूद करून अर्थमंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप वळसे यांनी नगरकरांच्या प्रलंबित मागणीला चालना दिली. याशिवाय श्रीरामपूर येथे (स्व.) रामराव आदिक यांचे स्मारक, नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचे काम अशा काही योजनांचा राज्याच्या अर्थसंकल्पात समावेश झाला आहे. तथापि, पुणे, नाशिक, औरंगाबादच्या तुलनेत याही वर्षी नगरकडे दुर्लक्ष झाले. शैक्षणिक विकासासाठी आय.आय.टी., आय.आय.एम., शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, संरक्षण प्रबोधिनी अथवा य.आय.आय.टी. अशा उच्च शिक्षणाची गरज असताना त्यासाठी नगरचा विचार झाला नाही. त्याला जिल्ह्य़ातील नेतेच जबाबदार असून, राजकीय इच्छाशक्तीअभावीच जिल्ह्य़ाची अवहेलना होत असल्याची टीका देशमुख यांनी केली.

फिरत्या तारांगणामध्ये दिवसा तारे पाहण्याची संधी
नगर, ५ जून/प्रतिनिधी

फिरत्या तारांगणामध्ये दिवसा तारे पाहण्याची संधी जिल्ह्य़ातील नागरिकांना येथील भास्कराचार्य अॅस्ट्रॉनॉमी रिसर्च सेंटर व पुणे येथील ‘आयुका’च्या वतीने उपलब्ध होणार आहे. दि. १० ते २० जूनदरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमास लार्सन अँड टुब्रो, शेवगावचे बाळासाहेब भारदे हायस्कूल, संगमनेरचा रोटरी क्लब, यशपुष्प मंच, सृष्टी, लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूर यांचे सहकार्य लाभले आहे. ३० फूट गुणिले ३० फूट गुणिले १२ फुटांच्या अर्धगोलाकार घुमटात कृत्रिमरित्या आकाशाचे प्रोजेक्शन केले जाणार आहे. एका वेळी ३०जण या तारांगणात बसू शकतात. नगर येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात १० ते १२ जून, शेवगावच्या भारदे विद्यालयात १४ व १५ जून रोजी, श्रीरामपूरला १६ ते १८ जून रोजी व संगमनेर येथील नगरपालिका क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये १९ व २० जून रोजी तारांगणाचा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे. मात्र, प्रवेशिका आवश्यक असल्याने १० जूनपर्यंत नगरसाठी ९२७१२६५११०, शेवगावसाठी ९९७५५३३७७५, श्रीरामपूरसाठी ९३२६६३६१०१, संगमनेरसाठी ९८२२०६२४२१वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय खगोल वर्षांनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सेंट्रल बँकेच्या नापूर शाखेचे भूमिपूजन
नगर, ५ जून/प्रतिनिधी

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या नागापूर येथील शाखेच्या इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण बँकेचे पुणे येथील उपमहाप्रबंधक जी. बी. सोनगावकर यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरचे क्षेत्रीय प्रबंधक पळसोकर, नागापूर एमआयडीसी शाखेचे प्रबंधक कुर्लेकर उपस्थित होते. सोनगावकर म्हणाले की, बँकेची स्वतची वास्तू उभी राहणार असून, ही सर्वासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बँकेने कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘ऑपरेशन नवचेतना’ ही मोहीम सुरू केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. ज्या कर्मचाऱ्यांनी बँकेला भूखंड मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, त्यांना या भूमिपूजनाचे श्रेय जाते. सोनगावकर यांनी ग्राहकांबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. बँकेचे नगर व वाळकी शाखेचे ग्राहक कटारिया व चितळकर यांचीही या वेळी भाषणे झाली. आर्किटेक्ट माने व कोंबळे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. सहायक क्षेत्रीय प्रबंधक वानखेडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक अहिरराव, जनसंपर्क अधिकारी तुमाने कार्यक्रमास उपस्थित होते. प्रबंधक सुभेदार यांनी आभार मानले. मुख्य रोखपाल डावरे यांनी सूत्रसंचालन केले.