Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहोळा उत्साहात साजरा
नागपूर, ५ जून/ प्रतिनिधी

क्षत्रीय कुलवंत सिंहासिनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी जय शिवाजी.. जीजाऊ माता की जय.. अशा घोषणा देत तुतारीच्या निनादात पुष्पवर्षांव आणि फटाक्यांची आतषबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहोळा आज शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शिवाजी महाराज राजे झाले तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके ११५६. आज या ऐतिहासिक स्फूर्तीदायी घटनेला ३३६ वर्षे झाली आहेत. या मंगलमयी घटनेचे स्मरण हिंदू समाजाने करावे, या हेतूने महाल भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहोळा आयोजित करण्यात आला होता.

किशोर इंगळे ‘ब्लॅकमेल’ करत असल्याचा गडकरींचा आरोप
गृहमंत्र्यांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी

नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

योगिता ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणाचा गैरफायदा घेऊन किशोर इंगळे ‘ब्लॅकमेल’ करत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी गृहमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. गडकरी वाडय़ातील पार्किंगमध्ये असलेल्या फियाट लिनिया गाडीत गेल्या १९ तारखेला योगिता अशोक ठाकरे या मुलीचा मृतदेह मिळाला. याप्रकरणी अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात असताना स्वत: गडकरी यांनी आजच या घटनेच्या सी.आय.डी. मार्फत चौकशीची मागणी केली आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांचा हा आरोप खळबळजनक ठरणारा आहे.

तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा सोमवारी समारोप
न्या. के.टी. थॉमस प्रमुख पाहुणे

नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के.टी. थॉमस येणार असून त्यामुळे कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या सुमारे महिनाभरापासून सुरू असलेल्या रा.स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाचा समारोप येत्या ८ तारखेला सायंकाळी रेशीमबाग मैदानावर होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून न्या. के.टी. थॉमस यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत हेही यावेळी उपस्थित राहतील. हिंदुत्व हे मूळ धोरण असलेला संघ मुसलमान व ख्रिश्चनांच्या विरोधात असल्याचा समज आहे.

विद्यार्थ्यांची आता प्रवेशासाठी धावपळ
नागपूर, ५ जून/प्रतिनिधी

करिअरमध्ये अत्यंत महत्वाचा टप्पा समजल्या जाणाऱ्या बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता कुठल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. आठवडाभरातच सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर होणार असून आता विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने त्याकडेही लक्ष लागले आहे. त्यामुळे पुढील महिनाभर तरी विद्यार्थ्यांपुढे अॅडमिशनसाठी धावपळ हाच एककलमी कार्यक्रम असणार आहे.
बारावीनंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेकडे विद्यार्थ्यांचा विशेष कल असतो.

प्रवेश साऱ्यांनाच मिळणार, प्रतीक्षा मात्र सीईटीची
नागपूर, ५ जून/ प्रतिनिधी

बहुप्रतिक्षित बारावीचा निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना आता ‘मिशन अॅडमिशन’चे वेध लागले असून अनेक महाविद्यालये आणि व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी खुणावत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नवीन महाविद्यालयांचे भरमसाट वाढलेले पीक लक्षात घेता कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता फारच कमी आहे.

२३ अट्टल गुन्हेगारांना अटक
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून विविध गुन्हे दाखल असलेल्या २३ गुन्हेगारांना अटक केली. या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. जय पदम्लोचन प्रधान (२३), एम.आय.डी.सी., संजय श्रीराम शेळके (२४), गणेशपेठ, अब्दुल वसीम अब्दुल रफीक (३२), लकडगंज, इब्राहिम युनुस (२६), पाचपावली, मोहमद नूर हसन (२०), पाचपावली, सुखदेव महादेव निखारे (३१), नंदनवन, चेतन बळवंत ठाकरे (१९), नंदनवन, शेख इस्माईल ईसराईल (२६), तहसील, आसिफ मोहम्मद सईद शेख (२०), तहसील, अनुज देवेंद्र गोयनका (३५), तहसील, प्रवीण सुभाष गुप्ता (१८), तहसील, प्रशांत किसनलाल अग्रवाल (१९), तहसील, चंद्रहास हंसराज जैन (२४), तहसील, मोहम्मद मुक्तार (२२), तहसील, शेख तफिक शेख जुमी रुत (२६), इमामवाडा, अजय विजय मेश्राम (३०), इमामवाडा, सन्निलाल रामसिंग गुदरिया (५८), इमामवाडा, राकेश लिंगेश्वर खोब्रागडे (१८), कोराडी, सुरेश गोपाळराव मोटघरे (३८), कोराडी, सोनू उर्फ अकबर असलम खान (३८), कोराडी, विजय गिरीधर निनावे (३४) हुडकेश्वर, प्रशांत माधव तिरपुडे (२८) जरीपटका. अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्यावर दरोडा, चोरी, चैन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगामस्ती करणे, दहशत पसरवणे असे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई गुरुवारी पहाटेपासून रात्री मध्यरात्रीपर्यंत करण्यात आली.

अपंग शाळांतील शिक्षकांना रजा प्रवास सवलतीचा निर्णय
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

अपंगांच्या विशेष शाळा आणि कर्मशाळांमधील कायम शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चार वर्षांतून एकदा राज्यात कोठेही जाण्यासाठी रजा प्रवास सवलत आणि अंध शिक्षकांच्या विशेष वाचनभत्त्यात वाढ करण्याचा निर्णय शासनाच्या न्याय विभागाने घेतला आहे. चार वर्षांतून एकदा राज्यात कोठेही ‘रजा प्रवास सवलत’ ही योजना राज्यातील सर्वसाधारण प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी लागू होती. त्याच धर्तीवर सामाजिक न्याय विभागाने अपंग शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार, कर्मचाऱ्याने प्रवासाचे ठिकाण मुख्याध्यापकाला लेखी अर्ज देऊन कळविणे व पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. पती-पत्नी दोघेजण सेवेत असतील, तर दोघांपैकी एकानेच प्रवास देयक सादर करावे. रजा प्रवास सवलतीची नोंद मुख्याध्यापकाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत करण्याचे आदेश आहेत. हा प्रवासखर्च वेतन अनुदान प्राप्त राहणार आहे. त्याचप्रमाणे अंध शिक्षकांच्या विशेष वाचनभत्त्यात ३५० रुपयांवरून ५०० रुपये वाढ करण्यात आली आहे.

बालकीर्तनकार सुश्रुतचा पुण्यात सत्कार
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

यवतमाळच्या समता साहित्य अकादमीतर्फे बालकीर्तनकार सुश्रुत रानडे याचा नुकताच पुण्यात सत्कार करण्यात आला. सुश्रुत रानडे हा वयाच्या चौथ्या वर्षांपासून कीर्तन करत असून आतापर्यंत महाराष्ट्राशिवाय मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड आदी ठिकाणी मिळून त्याचे साडेपाचशेहून अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्याच्या कर्तृत्वाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्याला २००४ सालचा सांस्कृतिक पुरस्कार दिला आहे. समता साहित्य अकादमीनेही सुश्रुतला कला व नाटय़ राज्यस्तरीय समता पुरस्कार प्रदान केला. पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यक्रमात सुश्रुतला शाल, श्रीफळ, गौरवपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार रामदास तडस व बबनराव घोलप, रतनलाल सोनग्रा, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद तांडेकर, पुणे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, लेफ्टनंट राम पंचभाई वगैरे उपस्थित होते.

शिक्षणाचा काळाबाजार थांबवा; अन्यथा आंदोलन
नागपूर, ५ जून/ प्रतिनिधी

प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेताना गुणवत्तेला महत्त्व कमी व पैशाला जास्त दिले जात आहे त्यामुळे शिक्षणाचा हा काळाबाजार थांबविण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जगदीश पंचबुद्धे यांनी दिला आहे. अनेक विद्यार्थ्यांजवळ गुणवत्ता असताना त्यांना व त्यांच्या पालकांना संस्थाच्या दारोदारी फिरावे लागत आहे. हा सर्व प्रकार चीड आणणारा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पालकांची लुट थांबविणार असल्याचे पंचबुद्धे म्हणाले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था अधिनियम १९८७ अन्वये शैक्षणिक संस्थानी देणगी घेणे हा गुन्हा असातानाही देणगी रूपाने प्रवेश मिळत असल्यास याला जबाबदार शिक्षणाधिकारी राहतील. प्रत्येक शाळेतील प्रवेश हा गुणवत्तेच्या आधारावर व्हावा यामुळे मध्यमवर्गीयांना अडचण जाणार नाही यासंबंधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी विशाल लारोकर, नितीन भटारकर, रिंकु पापडकर, हेमंत महाकाळकर उपस्थित होते.

जागतिक स्तरावरील फोटोग्राफी शिबिरात तिरपुडे इन्स्टिटय़ूटच्या ललित अग्निहोत्रीची निवड
नागपूर, ५ जून/प्रतिनिधी

नॅशनल जिओग्राफी फोटोग्राफर्स क्लबतर्फेऑगस्ट महिन्यात जर्मनीत घेण्यात येणाऱ्या जागतिक स्तरावरील फोटोग्राफी शिबिरात संपूर्ण भारतातून केवळ दोघांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये एक चेन्नईचा व दुसरा नागपूर शहरातील तिरपुडे इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफीचा विद्यार्थी ललित अग्निहोत्री याचा समावेश आहे. अशा जागतिक स्तरावरील फोटोग्राफी शिबिरात तिरपुडे फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होणे ही इन्स्टिटय़ूटकरता गौरवाची बाब आहे. तिरपुडे इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफीतर्फे वर्षभरात तीन-चार आऊटडोअर्स आयोजित करण्यात येतात. इन्स्टिटय़ूटच्या प्रा. उज्ज्वला पराते यांनी आऊटडोअर्स फोटो क्लिक करण्यापूर्वी किंवा करताना व्हिज्यूअल्समध्ये कल्पकतेचा उपयोग करून एक नवी व्हिज्युअल फ्रेम कशी तयार करावी याबाबत ललितला मार्गदर्शन केले आहे. ललितच्या फोटोग्राफीला कानपूर आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पध्रेत ५१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. ललितने त्याच्या यशाचे श्रेय प्रा. उज्ज्वला पराते व संस्थेला दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद नोंदणी अभियान
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम नागपूरतर्फे सभासद नोंदणीं अभियान राबविण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ नुकताच विभागीय अध्यक्ष अशोक इंगोले यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मंगळवारी झोनचे सभापती हरिश ग्वालबंशी, नगरसेविका प्रगती पाटील उपस्थित होत्या. यावेळी सर्वच कार्यकर्त्यांनी संघटन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचा निर्धार केला. यावेळी ऋषी कारोंडे, अजय पाटील, शेरखॉ पठाण, विजय चिटमिटवार, अशरफ खान, अनिल मदने, प्रकाश जीवतोडे, अनिल गुडधे, महादेव ठाकरे, शशिकांत कठाळे उपस्थित होते.

‘द अदर फेस ऑफ कॅन्सर’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर, ५ जून/प्रतिनिधी

हृदयरोग व कर्करोगतज्ज्ञ डॉ. मनुभाई कोठारी द्वारा लिखित ‘द अदर फेस ऑफ कॅन्सर’ या पुस्तकाचे प्रकाशन राधाकृष्ण रुग्णालयात करण्यात आले. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्कृत भारतीचे विदर्भ अध्यक्ष डॉ. रामकृष्ण पुजारी व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मनुभाई कोठारी, गंगाराम अग्रवाल, गोविंद पोद्दार, अनंत घारड, डॉ. गोविंद वर्मा उपस्थित होते. डॉ. कोठारी यांनी त्यांचे संपूर्ण जीवन जनसेवेत घालविले आहे, असे प्रतिपादन डॉ. रामकृष्ण पुजारी यांनी यावेळी केले. डॉ. कोठारी यांच्या पुस्तकात सुश्रुतचे मूळ तत्त्व संस्कृतात लिहिले आहे. कर्करोग रुग्णांप्रती सुश्रुतचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. पुजारी यांनी कर्करोग रुग्णांना मदत करण्याचे आवाहन केले. कर्करोगाला प्रतिबंध लावणे हे कर्करोगावरील उपचारापेक्षा अधिक चांगले असल्याचे प्रतिपादन, डॉ. सगदेव यांनी केले. डॉ. विलास हलदुलकर यांनी रुग्णालयाविषयी माहिती दिली.

महापालिका शाळेचा निकाल ९६ टक्के
नागपूर, ५ जून/प्रतिनिधी

महापालिका शाळेचा दर्जा घरसत चालला अशी टीका होत असतानाच या शाळांचा १२ वीचा निकाल मात्र ९६ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल अधिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय उंटखाना या शाळेतील ७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ६९ विद्याथी उत्तीर्ण झाले, त्यात शशांक बागले या विद्यार्थ्यांला ७४ टक्के गुण मिळाले. सानेगुरुजी उर्दू कला माध्यमिक शाळा महाल, सानेगुरुजी उर्दू माध्यमिक शाळेचे एकूण ४३ पैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल ९७ टक्के लागला. २००७ मध्ये ७५ टक्के, २००८ मध्ये ८८ टक्के निकाल लागला होता.

सुरक्षा रक्षकाच्या बंदूक चोरी
नागपूर, ५ जून / प्रतिनिधी

उमरेड येथील वेकोलिच्या सुरक्षा रक्षकाची १२ बोरची बंदूक चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. हंसराज नानकचंद हरीजन (५०) असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ते एका खाजगी सुरक्षा एजन्सीतर्फे वेकोलिच्या येथील कार्यालयात सुरक्षा रक्षक आहेत. ते मूळचे पंजाबमधील सुलतानपूर जिल्ह्य़ातील चाकपेंढी येथील रहिवासी आहेत. २५ मे रोजी सुटी घेऊन ते मूळ गावी निघून गेले होते. त्यापूर्वी त्यांनी परवाना असलेली ६ राऊंड असलेली १२ बोरची बंदूक बैरल व बट वेगळे करून लाकडी पेटीमध्ये ठेऊन दिली होती. गुरुवारी ते कामावर परत आले व पेटी उघडून बघितली असता त्यातील बंदूक चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात जाऊन बंदूक चोरी गेल्याची तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी चोराविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील भांडेगावकर करत आहे.