Leading International Marathi News Daily

शनिवार, ६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहोळा उत्साहात साजरा
नागपूर, ५ जून/ प्रतिनिधी

क्षत्रीय कुलवंत सिंहासिनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय... जय भवानी जय शिवाजी.. जीजाऊ माता की जय.. अशा घोषणा देत तुतारीच्या निनादात पुष्पवर्षांव आणि फटाक्यांची आतषबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहोळा आज शेकडो नागरिकांच्या

 

उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
शिवाजी महाराज राजे झाले तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके ११५६. आज या ऐतिहासिक स्फूर्तीदायी घटनेला ३३६ वर्षे झाली आहेत. या मंगलमयी घटनेचे स्मरण हिंदू समाजाने करावे, या हेतूने महाल भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहोळा आयोजित करण्यात आला होता. अभिषेक जोशी यांच्या पौराहित्याखाली मंत्रोच्चारात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रारंभी पंचामृताने अभिषेक करण्यात आला. प्रारंभी यावेळी शिवकथाकार विजयराव देशमुख, अंजनगाव सूर्जीचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज, श्रीमंत मुधोजी राजे भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहिते, भाग संघचालक सुनील शिरपूरकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी परिसरातील शिवभक्त मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भगवे फेटे परिधान करून आबालवृद्ध हा सोहोळा डोळे भरून अनुभवत होते. अभिषेक झाल्यानंतर जितेंद्रनाथ महाराज व विजयराव देशमुख यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. तुतारीच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव.. अशा घोषणा देण्यात आल्या. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली ‘जय देव जय देव जय जय शिवराया’ या आरतीने सोहोळ्याची सांगता झाली.
आरती झाल्यावर चिमासाहेब भोसले व्यायामशाळेच्या सदस्यांनी संभाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली विक्रम भोसले, संदेश खरे, जयसिंगराव भोसले, राजे विक्रम भोसले, सुभाष भोसले, रणजित भोसले, प्रभाकर भोसले व ९० वर्षीय डॉ. चौरे यांनी तलवार, भाला, दांडपट्टा व काठीचे आकर्षक विविध प्रात्याक्षिके सादर केली. रणागणांवर शत्रूशी लढताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्राचा उपयोग करून त्यांना कसे ठार केले, त्याची विविध प्रात्याक्षिके यावेळी व्यायाम शाळेच्या सदस्यांनी सादर केली.
या सोहोळ्याच्या वेळी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोहराव मोहिते, वे.शा.स. कृष्णशास्त्री आर्वीकर, कवी अरुण देशपांडे, नगरसेवक बंडू राऊत, प्रवीण दटके, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, चंदू पेंडके, चंद्रकात लाखे, समितीचे सदस्य दत्ता शिर्के, विनोद कनकदंडे, राजेश मगरे, विजय कैथे, अविनाश देशपांडे, संजय बाराहाते, प्रसन्न बारलिंगे, दिलीप दिवटे, प्रसाद काळे, बंडू देशपांडेसह परिसरातील महिला-पुरुष उपस्थित होते.